नवी दिल्ली: वैद्यकीय प्रवेशाशी संबंधित ‘नीट’ (नॅशनल एलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स एक्झाम) परीक्षेतील अनियमिततेच्या प्रकरणावर मंगळवार, दि. 11 जून रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने परीक्षा आणि समुपदेशन रद्द करण्याची मागणी फेटाळून लावली. वैद्यकीय प्रवेशाच्या ‘नीट’ परीक्षेतील अनियमिततेच्या प्रकरणावर मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. यावेळी ‘नीट’ रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.
त्यावर सुनावणी करताना न्यायालयाने परीक्षा रद्द करण्याचे आदेश देण्याची विनंती करणारी याचिका फेटाळून लावली. त्याचप्रमाणे समुपदेशनदेखील रद्द केले जाणार नाही, असेदेखील न्यायालयाने सांगितले आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने नॅशनल टेस्टिंग यंत्रणेस चांगलेच फटकारले आहे. या प्रकारामुळे परीक्षेचे पावित्र्य बाधित झाल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्याचवेळी न्यायालयाने या संपूर्ण प्रकरणावर ‘एनटीए’ला नोटीस बजावली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी दि. 8 जुलै रोजी होणार आहे.