गाशा गुंडाळला...

    10-Jun-2024   
Total Views |
VK Pandian


बिजू जनता दलाचे नेते आणि माजी प्रशासकीय अधिकारी व्ही. के. पांडियन यांनी राजकारणाला सोडचिठ्ठी दिली. ओडिशा माझ्या हृदयात आणि नवीन पटनायक माझ्या श्वासात असल्याचे सांगत, त्यांनी हा निर्णय घेतला आहे. तामिळनाडूत जन्मलेले पांडियन उच्चशिक्षित. २००० सालचे ओडिशा बॅचचे ते आयएएस अधिकारी होते. मात्र, त्यांनी प्रशासकीय सेवेला रामराम करत राजकारणात प्रवेश केला. नवीन पटनायक यांच्या सरकारमध्ये ते काम करत असताना पटनायक यांचे लाडके प्रशासकीय अधिकारी होते. बिजू जनता दलात प्रवेश केल्यानंतर पक्षात त्यांचे चांगलेच वजन वाढले. नवीन बाबूंनंतर दुसरा बिजदचा चेहरा म्हणून पांडियन यांच्याकडे पाहिले जाऊ लागले. निवडणुकीत त्यांनी नवीनबाबूंसोबत जोरदार प्रचारदेखील केला. मात्र, ओडिशामध्ये बिजू जनता दलाला मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. ओडिशात लोकसभेच्या २१ जागा असून त्यापैकी २१ जागा भाजप, तर काँग्रेसला एक जागा मिळाली. बिजदला निवडणुकीत भोपळाही फोडता आला नाही. त्याचप्रमाणे, विधानसभा निवडणुकीतही बिजदचा धुव्वा उडवत भाजपने बहुमत मिळवले. प्रचारादरम्यान पांडियन यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. त्याला कारणेही तशीच होती. नवीन पटनायक यांनीही आपला उत्तराधिकारी घोषित केलेला नसतानाही, पांडियन यांनी स्वतःला नवीनबाबूंचे उत्तराधिकारी म्हणून घोषित केले. नव्हे नव्हे तर तसे भासवलेसुद्धा. प्रचार शिगेला पोहोचलेला असताना नवीनबाबूंचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला होता. यामध्ये नवीन पटनायक भाषण करत असून, त्यांचा एक हात थरथरत आहे. यानंतर ही बाब पांडियन यांच्या लक्षात येताच, त्यांनी तो हात कॅमेरा टिपणार नाही, अशा पद्धतीने उचलून पोडियमवर ठेवला. या कृतीमुळे बिजदवर आणि पांडियन यांच्यावर प्रचंड टीका झाली. मुळात अशा वयात स्वेच्छा निवृत्ती स्वीकारून नव्या नेतृत्वाला पुढे करणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता नवीनबाबू स्वतः प्रचारात उतरले. यावेळी प्रत्येक ठिकाणी पांडियन सोबत होते. मात्र, ओडिशात धुळधाण झाल्यानंतर पांडियन यांनी आपला गाशा गुंडाळला आहे.

युवराज, नीट समजून घ्या!


कोणतीही आवई उठवायची आणि त्याबाजूने खोटेपणाने उभे राहत उगाच आढेवेढे घ्यायचे. थोड्याशा जागा वाढल्या काय, लागलीच काँग्रेसचे राजकुमार आपल्या फॉर्ममध्ये आले. निकालानंतरची एक हास्यलकेर त्यांनी मागील कित्येक वर्षांनंतर अनुभवली असावी. मुळात जितक्या जागा भाजपने २०२४ साली जिंकल्या आहेत, तितक्या जागा तर काँग्रेसने २०१४, २०१९ आणि २०२४ अशा तीन लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा मिळवलेल्या नाही. सपा, तृणमूल आणि अन्य मित्रपक्षांमुळे किमान यंदा २००चा आकडा तरी गाठता आला. युवराज त्यानंतर इतके प्रवाहात आले की, मग त्यांनी आपल्या युपीए सरकारमधील घोटाळ्यांची मालिका विसरत थेट शेअर बाजारात घोटाळा झाल्याचा आरोप केला. मागेही ‘राफेल’वरून युवराजांनी वादळ उठवले, मात्र ते नंतर फुसके ठरले. आताही युवराज राहुल गांधी यांनी सत्ताधार्‍यांना घेरण्यास आम्ही सज्ज असल्याचे सांगितले. ‘अब की बार चारसो पार’ची खिल्ली उडवत राहुल यांनी देशभर मतं मागितली. मात्र, तरीही सत्तेचा सोपान मिळविण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण झाले नाही. काही जागा वाढल्यानंतर त्यांना पंतप्रधान झाल्यासारखे वाटू लागले आहे. ‘नीट’ परीक्षेत काहीही गोंधळ नसताना, राहुल यांनी नसलेली आग पेटविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर याप्रकरणी संसदेत आवाज उठविणार असल्याचे सांगितले. ‘संसदेत मी तुमचा आवाज बनेन, तुमच्या भविष्याशी मी खेळू देणार नाही,’ असा विश्वासही त्यांनी दिला. मुळात असे आश्वासन देताना अजून विरोधी पक्षनेता ठरणे बाकी आहे, त्याआधीच राहुल यांनी रान उठवून दिले आहे. बरं संसदेत राहुल गांधी नेमके कोणते पराक्रम गाजवितात, हे तर अख्ख्या देशाने पाहिले. डोळा मारण्यापासून ते जबरदस्तीने गळाभेट घेण्यापर्यंत राहुल यांनी सर्व संसदीय मर्यादा मोडलेल्या आहेत. त्यामुळे ज्यांना संसदेत कसे वर्तन करावे, गैरहजर राहू नये याची साधी नीटशी माहिती नाही, त्यांच्याकडून ‘नीट’च्या विद्यार्थ्यांनी अपेक्षा तरी का कराव्या म्हणा? प्रभू श्री राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला बोलावूनही गेले नाही. ते का गेले नाही, याची कारणे पुढे समोर आली आहेच. मात्र, ज्या नेत्याचा इतिहास वारंवार पराभवाचा आहे, भर पत्रकार परिषदेत अध्यादेश फाडण्याचा आहे, त्याच्याकडून न झालेल्या गोंधळाबाबत न्यायाची अपेक्षा तरी कशी करावी.


पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.