युद्ध, संघर्ष आणि त्यामधून उमटणारे जागतिक पडसाद, अर्थव्यवस्थेवर निर्माण होणारा ताण, जीवित, वित्तहानी या सगळ्यांची प्रचीती जगाने यापूर्वी घेतली आहेच. नैसर्गिक स्रोतांच्या मोठ्या प्रमाणावर होणार्या नुकसानाचा नैसर्गिक सृष्टीवर, जैवविविधतेवर नकारात्मक प्रभाव पडतो. अशाचप्रकारे आत्ता जगभर चर्चेत असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाचेही तसेच. या युद्धामध्ये जागतिक अर्थव्यवस्था तर कोलमडलीच; पण त्याचबरोबर प्रचंड जीवित आणि वित्तहानीसुद्धा झाली. पण, आपला आजचा विषय हा नाही.
जागतिक पातळीवर होणार्या युद्धांचे वन्यजीवांवर, पक्ष्यांवर कशाप्रकारे परिणाम होतात, यावर आपण चर्चा करणार आहोत.मुळात पहिला प्रश्न हा उद्भवतो की, खरोखरच युद्धाचे वन्यजीवांवर, पक्ष्यांवर प्रामुख्याने पक्षी स्थलांतरावर परिणाम होतात का? तर, हो! युद्ध होते, त्या परिसरामध्ये होणारे बॉम्ब ब्लास्ट, गोळीबार, जाळपोळ या सगळ्यामुळे प्राण्यांचे, पक्ष्यांचे मृत्यू ओढवतात. हे थेट परिणाम झाले, पण त्याचबरोबर काही छुपे किंवा अप्रत्यक्ष परिणाम पाहिल्यास अधिवासाचे नुकसान, पक्ष्यांच्या प्रजनन स्थळांचे नुकसान, मानवनिर्मित आपत्तीमुळे हवामान बदलावर, तापमानवाढीवर होणारा परिणाम या सगळ्यामुळे वन्यजीवांचे अप्रत्यक्ष नुकसान होतेच. महत्त्वाचे म्हणजे, हा संपूर्ण परिसर पुन्हा पुनरुज्जीवित करणे शक्य होणे म्हणजे जवळपास अशक्यच! यंदाच्या रशिया-युक्रेन युद्धाच्या घटनांमुळे मोठ्या ठिपक्यांचा गरूड (ॠीशरींशी डिेीींंशव एरसश्रश) या पक्ष्यांच्या प्रजातीने आपला स्थलांतराचा मार्ग बदलला.
फेब्रुवारी २०२२ मध्ये सुरू झालेल्या रशिया-युक्रेन युद्धाची वेळ आणि साधारणतः मार्च-एप्रिल हा परदेशी पक्ष्यांच्या स्थलांतराचा कालावधी असलेला काळ, एकाचवेळी आल्यामुळे याचा पक्ष्यांना चांगलाच फटका बसला. मोठ्या ठिपक्यांचे गरूड युरोपातून आशिया आणि आफ्रिकेत स्थलांतर करतात. ‘करंट बायोलॉजी’ या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या ‘अॅक्टिव्ह युरोपियन वॉरझोन इम्पॅक्ट्स रॅप्टर मायग्रेशन’ या अहवालामध्ये ही नोंद करण्यात आली आहे. टॅग केलेल्या १९ गरूडांच्या अभ्यासावर आधारित हे संशोधन असून, त्यांच्या वागणुकीमध्ये बदल दिसून आले, असे संशोधकांनी नोंदविले आहे. ‘युनिव्हर्सिटी ऑफ ईस्ट अँग्लिया’, ‘ब्रिटिश ट्रस्ट फॉर ऑर्निथॉलॉजी’ आणि एस्टोनिया आणि बेलारूसमधील स्थानिक भागीदारांचे संशोधक २०१७ पासून पूर्व आफ्रिकेतील पाणथळ प्रदेशांपासून ते युरोपातील पाच हजार किलोमीटरपर्यंतच्या गरुडांच्या हालचालींचा मागोवा घेत होते. ‘आययूसीएन’च्या रेडलिस्टमध्ये असुरक्षित गटात मोडणार्या या प्रजातीची युरोपातील संख्या कमी झाली आहे, तसेच बेलारुसमध्ये प्रजनन करणारी अगदी थोडीच संख्या शिल्लक आहे. असे असताना मोठ्या ठिपक्यांच्या गरूडांना संवर्धित करण्यासाठी त्यांचे अधिवास, स्थलांतराचे मार्ग सुरक्षित ठेवणे गरजेचे आहे.
युद्धामध्ये ओढवलेल्या अनेक समस्यांमध्ये मोठ्या ठिपक्यांचे गरूड ज्या क्षेत्रामध्ये प्रजनन करण्यासाठी येतात, त्या भागातील अधिवासाचे झालेले नुकसान ही मुख्य समस्या ठरत असून, त्यांच्या स्थलांतर मार्गामध्ये अडथळे निर्माण झाले आहेत. गरूडाव्यतिरिक्त इतरही अनेक स्थलांतरित तसेच स्थानिक पक्ष्यांना या युद्धाचा फटका बसल्याची शक्यता नाकारता येत नाही.पक्ष्यांनी स्थलांतराचा मार्ग बदलला म्हणून बिघडलं कुठे? असा प्रश्न पडू शकतो. पण, स्थलांतराचा मार्ग बदलल्यामुळे स्थलांतराचा कालावधी वाढला आहे. मधली विश्रांतीची काही स्थळे वगळली गेली, तर स्थलांतराच्या ठिकाणी पोहोचण्यास पक्ष्यांना अधिक प्रवास करावा लागतो, ज्यामुळे पर्यायाने त्यांची अधिक ऊर्जा यात खर्ची घातली जाते. अभ्यास केलेल्या १९ गरूडांपैकी १५ गरूडांनी त्यांचा स्थलांतर मार्ग बदलला, ज्यामुळे त्यांच्या प्रवासात थोडीथोडकी नाही, तर ८० किमीची अधिक भर पडली. त्यांच्या या प्रवासामध्ये त्यांची विश्रांतीची आणि खाद्याच्या असलेल्या ६० टक्के स्थळं वगळली असून त्यांच्या खाद्यासाठी, विश्रांतीसाठी ते नितांत गरजेचे असते. याचाच अर्थ त्यांच्या कष्टामध्ये भर पडली असून, याचा परिणाम पुढे त्यांच्या स्थलांतरावर, प्रजननावर होण्याची शक्यता आहे. या अभ्यासामध्ये गरूडांनी यंदा धीम्या गतीने स्थलांतर केले, तसेच नेहमीपेक्षा अधिक उंचीवरून स्थलांतर केले. यावर संशोधनात्मक सखोल अभ्यासाची गरज असून, उपायांचा शोध घेणे ही संवर्धनाची पहिली पायरी ठरेल.