बीड मराठा-वंजारी समाज तणाव आणि सत्य!

    01-Jun-2024   
Total Views |
vanjari samaj beed maratha

 
बीड, आंबाजोगाई येथे काही महिन्यांपासून मराठा विरुद्ध वंजारी समाज हा वाद धुमसत होता. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर वाद आणखीन उफाळला. हिंदू समाजाचे दोन गट आपापसात काल्पनिक शत्रुत्वाच्या आधारे विरोधक होणे, हे अत्यंत घातक होते. हे सगळे थांबणे गरजेचे होते. या अनुषंगाने समाजांमध्ये आलेली वितुष्टता दूर करण्यासाठी आंबाजोगाईच्या रा. स्व. संघाने केलेल्या कार्याचा, तसेच बीड जिल्ह्यातील मराठा-वंजारी समाजाच्या सद्यस्थितीचाही मागोवा घेणारा हा लेख...

वंजारी समाजातील व्यक्तीला मारहाण झाली. नाभिक समाजाच्या लोकांच्या दुकानाची तोडफोड झाली. मराठा विरुद्ध इतर मागासवर्गीय संघर्ष पेटला. जातीय जमाव एकत्र करत एकमेकांवर दगडफेकसुद्धा केली गेली. मराठा विरुद्ध वंजारी समाज असे वातावरण सोशल मीडियावर आणि त्याद्वारे समाजाच्या घरघरांत निर्माण झाले. हे काय होते? काय खरे काय खोटे?

घर घर में अब एकही नाम
एकही नारा गुंजेगा
मेरा भारत का बच्चा बच्चा
जय जय श्री राम बोलेगा
या भावनेने दि. 22 जानेवारी रोजी तर बीडचा सकल हिंदू समाज जातपात विसरून एक झाला होता. मग हे का? याचा मागोवा घेताना हेच जाणवले की, आरक्षणाच्या मुद्द्यावर दोन्ही समाजांना चिथावले गेले. ग्रामीण भागातील साध्या भोळ्या लेाकांना कोणीतरी चिथावले की, ‘बघ रे, वंजारी समाजाची व्यक्ती खासदार झाली, तर तुम्हा मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही’ आणि वंजारी समाजाला कोणीतरी भडकवले होते की, ‘मराठा समाजाचा माणूस दिल्लीत गेला, तर तुमच्या वाट्याचे आरक्षण हिसकावले जाईल.’ दोन्ही समाजांना भडकावणारे आणि चिथावणारे हे जे कोणी आहे, त्या देशद्रोही, समाजद्रोही शक्तीचे टुलकिट दोन्ही समाजात द्वेष पसरवून समाज आणि देशाला खिळखिळे करणे हेच आहे. पण, लक्षात कोण घेतो?

काही लोकांचे म्हणणे आहे की, दोन्ही समाजांचे येथे प्राबल्य आहे. हिंदू शक्ती म्हणून त्यांची एकी कोणालातरी नको होती. त्यामुळेच हे सगळे त्यांनी घडवले आहे. मराठा समाज काय किंवा वंजारी समाज काय, सगळेच सरसकट श्रीमंत किंवा गरीब नाहीत. त्यामुळे आरक्षणामुळेच आपले चांगभले होईल, असे वाटणारे लोक दोन्ही समाजांत आहेत. अशातच मराठा आरक्षणावर उपोषण आंदोलने सुरू झाली. आता आपल्याला आरक्षण मिळेल, आपल्या नातेवाईकांना सगेसोयर्‍यांना आरक्षण मिळेल, या आशेने मराठा समाजातील बहुसंख्य लोक गावोगावी एकत्र आले, तर मराठ्यांना आरक्षण मिळाल्यावर ‘सगेसोयरे’ म्हणत इतर मागासवर्गीय समाजातूनच ते आरक्षण मिळवतील, अशी भीती वाटून इतर मागासवर्गीय समाजही एकवटले. यात वंजारी माळी समाज प्रामुख्याने एकवटला. मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांसमोर काल्पनिक शत्रू म्हणून उभे केले गेले. आरक्षणाचा मुद्दा योग्य की अयोग्य, हा विषयच नाही.

मात्र, बीडमध्ये मराठा विरुद्ध वंजारी समाजाची तेढ माजवणारे कोण असावे? आणि कोणाच्या माध्यमातून महाराष्ट्रात हे सगळे घडत असेल, हे प्रश्न महाराष्ट्रातील अनेक लोकांना पडले आहेत. कारण, शेतकरी आंदोलन असू दे किंवा ‘सीएए’ विरोधातील आंदोलन, या आंदोलनामागे देश आणि समाज फोडण्याचीच कारस्थाने करणारी लोक घुसली होती. मूळ मुद्दा बाजूला राहून देशात अस्थिरता माजवण्यासाठीचे कटकारस्थान आहे की काय, असेही वाटण्याएवढे या आंदोलनामध्ये घडले होते. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात मराठा आरक्षण असू दे की धनगर आरक्षण असू दे की, आणखीन कोणते आरक्षण असू दे, हे आरक्षण समाजातील गोरगरीब शोषित वंचितांसाठी खरोखर आवश्यकच आहे. मात्र, याच आरक्षणाच्या नावाने समाजात तेढ माजवणे, देशभरात लोकांना चिथावणे, असली कारस्थाने काही लोक करतात. आरक्षणाने आपले भले होईल, या समज-गैरसमजात इतर लोकही अशा लबाड लोकांच्या भोवती गोळा होतात. पण, आरक्षणाच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या आणि त्यातून दुसर्‍या समाजाशी संबंध बिघडवणार्‍या या लोकांना काय मिळते? या परिक्षेपात आरक्षणाची मागणी करत सहज लोकप्रियता मिळवणार्‍या त्यांच्या नेत्यांना काय मिळते? हे पाहिले तर वाटते, गरीब बिचारा समाज कोणीही आरक्षणाच्या नावाने हाका.. हे वास्तव देशभर आणि जवळजवळ सर्वच समाजांचे आहे बरे!

विषयांतर झाले असे वाटेल, पण तसे नाही. मुद्दा बीडमध्ये निर्माण झालेला सामाजिक तणाव हा आहे. याचे बीज आरक्षणाचा मुद्दा आहे असे वरवर तरी दिसते. अर्थात, पुढे काही महिन्यांतच याला राजकारणाचे काटेही उगवलेच. त्यामुळे पूर्वी बीडमध्ये संभाव्य खासदार किंवा आमदाराची जात केवळ राजकीय पक्ष विचारत घेत होते, मात्र जनता विचारात घेत नव्हती. त्याच बीड जिल्ह्यात या निवडणुकीमध्ये जातीयवादाने विकृत रुप घेतले. एकमेकांच्या जातींना गलिच्छ आणि संकुचित वृत्तीने लक्ष्य केले गेले. लोकसभेच्या निवडणुकीतील उमेदवारांची जात काढत त्यांनाही भयंकर जातीयवादातून ट्रोल केले गेले. सोशल मीडियावर बीड जिल्ह्याचे काही व्हिडिओ खूप गाजले. अर्थात लाईक्स, कमेंट्ससाठी ते गाजले. मात्र, समरसतेची कार्यकर्ता म्हणून मला आणि माझ्यासारख्या असंख्य लोकांना या व्हिडिओमुळे प्रश्न पडला की, “जातीयतेचा विषाणू कधी संपेल? की तो अस्तित्त्वात नाहीच? त्याला काही लोक स्वताःच्या सोयीने निर्माण करत असतील का?” त्या काही व्हिडिओपैकी दोन व्हिडिओंचा सारांश देते.
 
व्हिडिओ एक - कोठल्यातरी देवळाबाहेर लोक जमले आहेत. विविध वयोगटांतील पुरुष मंडळी. त्यात वयोवृद्धही आहेत. शपथ देणारा अगदी महत्त्वाची आणि जगण्या-मरण्याची शपथ देत आहे, अशा आविर्भावात त्या 40 - 50 जणांना शपथ देतो-
 
“मी अशी शपथ घेतो की, बजरंगबलीसमोर की, मी इतर कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही. इतर पक्षाला मतदान केले, तर बजरंगबली माझ्या चारही मुंड्या चित करेल. मी माझ्या समाजासाठी दुसर्‍या समाजाचे मन वळवीन. त्यांना सांगेन आजपर्यंत आम्ही तुम्हाला जगवले, आता तुम्ही आम्हाला जगवा. मी कोणत्याही बड्या नेत्याला चहा प्यायला बोलावणार नाही. घरात येऊ देणार नाही. मी मराठा समाजाच्या नेत्यालाच मतदान करीन,” शपथ दिली गेली. त्यानंतर काही लोकांनी ‘एक मराठा लाख मराठा’ म्हटले आणि घोषणा दिल्या गेल्या. ‘मनोज जरांगे-पाटील आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं’ प्रसारमाध्यमांवर फिरणारा हा एक व्हिडिओ, तर दुसरा एक व्हिडिओही सोशल मीडियावर फिरला. तो असा - काही लोकांची बैठक आहे. गंभीर चिंतन सुरू आहे. त्यामध्ये म्हटले जात आहे, “आता त्यांच्या समाजाच्या कीर्तनकार महाराजांना आपल्या येथे कीर्तनाला बोलवायचे नाही. त्यांच्या दुकानांतून खरेदी करायची नाही. तसे करताना कोणी दिसले, तर त्याला दंड दिला जाईल.” थोडक्यात वंजारी समाज मागे हटणार नाही. दोन्ही व्हिडिओ बीड जिल्ह्यातील!

याच काळात केजमधील नांदूरघाट गावात वंजारी समाजातील आणि मराठा समाजातील लोकांनी एकमेकांवर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला. दोन्ही समाजातील लोकांनी त्यांच्या समाजातील लोकांवर हल्ला झाला, असेच म्हटले. सोशल मीडियावर जे व्हिडिओ आहेत, त्यातून दिसले की, दगडफेक दोन्ही बाजूंनी झाली होती. पण, सगळाच मराठा समाज किंवा सगळाच वंजारी समाज दगडफेकीत सामील झाला होता का? तर तसे नव्हते. या घटनेला कारणीभूत झालेली घटना कोणती? या गावात पूर्वी ग्रामपंचायतीवर वंजारी समाजाचे वर्चस्व होते. मात्र, सध्या मराठा समाजाचे वर्चस्व आहे. ग्रामपंचायत आणि त्यानुसारच्या व्यवहारात जे लोक होते, त्यांचे राजकीय मतभेद होते. त्यांपैकीच एकाने निवडणुकीतील एका उमेदवाराबाबत आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर टाकली. या सगळ्या गोष्टी राजकारणाच्या संदर्भात होत्या. आमच्या नेत्याबदल अशी पोस्ट का टाकली, म्हणत वंजारी समाजाचे लोक या पोस्ट टाकणार्‍याकडे गेले. बरीच चर्चा झाल्यानंतर त्याने पोस्ट काढून टाकली. मात्र, तोपर्यंत त्याच्या मराठा समाजाचेही लोक गोळा झाले होते. त्यांना वाटले वंजारी समाजाचे लोक मिळून आपल्या समाजाच्या व्यक्तीकडे का आले? या गैरसमजातून दोन्ही जमावांमध्ये वाद झाला आणि दगडफेक झाली. या घटनेला आपण पूर्णतः राजकीयच म्हणू. मात्र, या घटनेने बीडचे राजकारण - समाजकारण ढवळून निघाले. वंजारी समाज हा मराठा समाजाविरोधात एकत्र आला, असे मराठा समाजाला वाटले. वंजारी समाजाला वाटले की, मराठा समाज आमच्यावर हल्ला करण्यासाठी जमा झाला. गर्दीचे मानसशास्त्र कळणे कठीण. आरक्षणाच्या नावाने समर्थन किंवा विरोधासाठी समाजाला एकत्रित करणे आणि त्यांच्या एकतेचा उपयोग विधायक कामात करून घेणे, हे सोपे काम नाही.

तर या घटनेचे पडसाद संपूर्ण बीड जिल्ह्यात, त्यातही आंबाजोगाईमध्ये त्वरित पसरले. सोशल मीडियाची भूमिका यामध्ये मोठीच होती. कोणीतरी एक जातीय पोस्ट टाकली की, त्याच्या समर्थनार्थ विरेाधात संदेश पोस्ट करणारे शेकडो लेाक तयार झाले. याने ही पोस्ट केली का? असे म्हणत लगेच दुसरा त्याहूनही विघातक जातीयवादी पोस्ट किंवा कमेंट करत होता. त्यातूनच दोन्ही समाजांत गोंधळाचे आणि द्वेषाचे वातावरण तयार होत होते. हा द्वेष अगदी घरघरात पसरला. (अर्थात याला सन्माननीय अपवादही आहेतच.) हिंदू समाजामध्ये फूट पाडणारे यशस्वी होताना दिसत होते. पण, ‘यदा यदा हि धर्मस्य...’ जेव्हा केव्हा अधर्माचे पेव फुटू लागण्याची चिन्हे असतात, तेव्हाच ईश्वर स्वतः किंवा कोणाच्या न कोणाच्या माध्यमातून तेथे शुभ निर्माण करतोच करतो. बीडमधील आंबेजोगाईमध्येही हे झाले.

हम दिन चार रहे ना रहे,
तेरा वैभव अमर रहे माँ
या विचारप्रेरणेने कार्य करणारे बीडमधील रा. स्व. संघाचे स्वयंसेवक एकवटले. समाजाचा भाग आहात, समाजात जा, समाजासाठी काम करा, समाजाला सोबत घेऊन काम करा, अशी शिकवण मनात आणि विचारातही जागृत असल्याने या स्वयंसेवकांनी जातीय तणाव निर्मूलन करण्याचा निश्चय केला. हेसुद्धा सांगायलाच हवे की, हे स्वयंसेवक विविध जातसमूहातील आहेत. याबाबत आंबाजोगाईचे रा. स्व. संघ कार्यवाह बिपीन क्षीरसागर आणि सहकार्यवाह अमोल नेहारकर यांच्याशी संवाद साधला. त्यानुसार, आंबाजोगाईमधील रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांनी सर्वप्रथम स्थानिक 24 जातींच्या प्रमुखांची बैठक घेतली. बीडमधील उफाळलेल्या जातीय तणावाबद्दल काय वाटते? याबाबत त्यांच्यात संवाद निर्माण करण्यात आला. अर्थात हे कृत्रिम वाटेल. पण, समाजप्रमुखांच्या माध्यमातून समाजाला एकत्र आणणे गरजेचे होते. या सगळ्यांनी जिल्ह्यात सुरू असलेल्या मराठा-वंजारी किंवा मराठा-ओबीसी विवादाबद्दल त्यांचे मत, अनुभव सत्य मांडले. पूर्वी असे घडले नव्हते. असतील तर वैयक्तिक वाद असतील. आताच इतका वाद का? याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. असे जातीय वाद होणे अत्यंत वाईट असून, हे थांबले पाहिजे, असे मत सगळ्याच समाजप्रमुखांनी व्यक्त केले. पण, ते थांबणार कसे? तर या सगळ्यांनी विचारमंथन करून सांगितले की, “आंबाजोगाईतील ज्या गावांमध्ये मराठा-वंजारी संघर्ष दिसून आला, त्या गावामध्ये धर्मगुरू, संत कीर्तनकार यांनी समाजाशी याबाबत संवाद साधावा. तसेच, त्या गावातील कुटुंंबांना गावाबाहेरील त्यांच्या नातेवाईकांनी-पाहुण्यांनी भेटावे. त्यांच्याशी याबाबत सकारात्मक संवाद साधावा. या दोन गोष्टी घडल्या, तर सोशल मीडिया किंवा राजकारण किंवा अन्य गोष्टींमुळे समाजात विकोपाला गेलेला वाद निवळायला मदत होईल.”

या दोन सूचनांवर काम सुरू झाले. गावातील मराठा आणि वंजारी समाजातील कुटुंंबांच्या नातेवाईकांशी संवाद साधला गेला. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून आणि केवळ हिंदू समाज अखंड राहावा या काळजीपोटी, नातेवाईक-पै पाहुणे आंबाजोगाईतील गावांमध्ये त्यांच्या त्यांच्या नातेवाईकांकडे भेट देऊ लागले. दुसर्‍या जातीबद्दल द्वेष किंवा भीती कशी सर्वथा चुकीची आहे, हे कधी थेट तर कधी, ‘लेकी बोले, सूने लागे’च्या धर्तीवर ते सांगू लागले. त्यांच्या शहरात सगळा समाज कसा एकत्र गुण्यागोविंदाने राहतो, हे सांगू लागले. गावाबाहेरचे नातेवाईक भेटायला आले. आपल्याला चार समजूतीचे विचार सांगितले, या विचारांनी तणावग्रस्त गावातील लोकही वादविवाद विसरत पुन्हा घरादारांत, कामधंद्यात, नातेवाईकांच्या सरबराईत रमले. दुसरीकडे रा. स्व. संघाच्या माध्यमांतून समाजाची श्रद्धा असलेल्या सन्माननीय धर्मगुरू, संत, कीर्तनकार यांचीही बैठक घेण्यात आली. अच्युत महाराज जोशी, अंबादास महाराज चिक्षे, प. उद्धव बापू आपेगांवकर, गोविंद कुडके, डॉ. विनोद महाराज निकम, डॉ. नाथराव महाराज घरजाळे आणि संप्रदायातील इतर मान्यवर या बैठकीला हजर होते. त्यांनी सर्वानुमते ठरवले की, ज्या गावात दोन समाजांत टोकदार संघर्ष झाले, त्या गावात भजन-कीर्तन करायचे, आख्याने करायची.


समाजाला रूचेल, आवडेल या माध्यमातून जातीयतेविरोधात आणि हिंदू धर्मसंस्कृती एकतेबाबत प्रबोधन करायचे. दोन्ही समाजातील प्रभावशाली कुटुंबाशी संपर्क साधायचा. त्यांच्या माध्यमातून सलोखा शांती निर्माण करायची. या धर्मप्रवीण मान्यवरांनी जे ठरवले ते केलेही. कीर्तन-भजनाच्या माध्यमातून समाजाशी संवाद साधताना या मान्यवरांनाही हेच दिसले की, कोणालाही जातीय वादविवाद नको होता. शांती हवी होती. दोन्ही समाजातील लोकांचे म्हणणे होते की, “बीडमध्ये आजही अनेक समस्या आहेत, त्यातील प्रमुख म्हणजे पाण्याची समस्या, दळणवळणाची समस्या या सगळ्या समस्या वार्‍यावर सोडून मी वंजारी, मी मराठा, मी हा, मी तो असे करून काय साधणार? हिंदू म्हणून एक राहिलो, तर देव, देश, धर्म वाचवू. नाहीतर, बीडमध्येही लॅण्ड आणि लव्ह जिहाद डोके वर काढत आहे. जातीवाद करत राहिलो, तर संपून जाऊ” काही महिन्यांपूर्वी अयोध्येतील राममंदिरासाठी एकत्र येऊन नाचलो, आनंदलो आणि आता आम्ही रामनाम विसरून जातनाम कसे काय करू लागलो, यावर तर बहुसंख्य लोकांनी आश्चर्य, संताप आणि दुःखही व्यक्त केले. या सगळ्या संवाद प्रक्रियेतून समाजातील तणाव हळूहळू निवळू लागला. हे सगळे सुरू असताना, काही लोक सोशल मीडियावर जातीयवाचक आक्षेपार्ह पोस्ट टाकतच होते. त्यातून पुन्हा तणाव वाढण्याची शक्यता होती.

आंबाजोगाईचे रा. स्व. संघाचे कार्यवाह बिपीन क्षीरगसागर आणि त्यांच्यासोबत समविचारी लोक उपविभागीय दंडाधिकारी दिपक वजाळे यांना भेटले. सोशल मीडियावरील जातीय तणावनिर्माण करणार्‍या आक्षेपार्ह पोस्टवर त्वरित कार्यवाही करावी, अशी त्यांनी विनंती केली. त्यानंतर तीनच तासांत प्रशासनाकडून पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले की, “बीड जिल्ह्यात सोशल मीडियावरील जातीय तणाव निर्माण करणार्‍या 200 पोस्ट कायमच्या डिलीट करण्यात आल्या. तसेच जातीयवादी आक्षेपार्ह पोस्ट टाकणार्‍यांची सोशल मीडियावरील खाती ब्लॉक करण्यात आली. यापुढे पोलीस आणि प्रशासनाचे सोशल मीडियावरील पोस्टकडे लक्ष असेल. जातीयवादी तणाव निर्माण करणार्‍या आक्षेपार्ह पोस्ट आढळल्यास त्वरित कारवाई करण्यात येईल.” प्रशासनाकडूनच हे जाहीर झाल्यामुळे आणि कारवाई झाल्यामुळे सोशल मीडियावर विनाकारण द्वेष पसरवणार्‍यांवर अंकुश आला. अशा प्रकारच्या पोस्ट येणेच कमी झाले. त्यामुळेही तरुणाईच्या मनाला आणि डोक्यालाही शांतता मिळाली. आता सध्या बीड शांत आहे. या शांतीसाठी सर्वार्थाने योजनाकार्य करणार्‍या आंबाजोगाईतील रा. स्व. संघाच्या स्वयंसेवकांच्या कार्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. विध्वंसक परिस्थितीमध्ये केवळ राष्ट्रहित आणि समाजहित जोपासणार्‍या राष्ट्रशक्तीच्या कार्याला वंदन. इतकेच मनात येते-
एक दिव्य ज्योति से असंख्य दीप जल रहे
कौन लो बुझा सके आंधियो में जो जले


सामाजिक सद्भाव प्रार्थना

मी शपथ घेतो की, बीड हा माझा जिल्हा आहे. या जिल्ह्यातील सर्व जाती धर्मांतील लोक हे माझे मित्र आणि बांधव आहेत. माझ्या जिल्ह्यातील विकासासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन. मी माझ्या जिल्ह्यात जातीवाद निर्माण होऊ देणार नाही. सोशल मीडियावरून मी कोणाच्याही भावना दुखावणार नाही, याची काळजी घेऊन पिढ्यान्पिढ्यांचे गावगाड्यातील अठरापगड जातींचे संबंध मी जोपासीन. केवळ वैयक्तिक स्वार्थापोटी सामान्य जनतेच्या मनात विष कालवणार्‍या समाजकंटकांपासून मी सावध राहीन. राजकारण हे राजकारणापुरतेच ठेवीन आणि त्याचा माझ्या सामाजिक, वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनावर कोणताही परिणाम होणार नाही, याची काळजी घेईन.

एक जबाबदार बीड जिल्हा नागरिक
(बीडकरांसाठी प्रतिज्ञा - मदन नरवडे, दत्तप्रसाद रांदड, ऋषी जैन आणि बिपीन क्षीरसागर यांनी बीड जिल्ह्याच्या नागरिकांसाठी एक प्रतिज्ञा तयार केली. सोशल मीडियाद्वारे ती बीडकरांपर्यंत पोहचेल, असे नियोजन केले. या प्रतिज्ञेनेही बीडकर जागृत झाले.)

9594969638


योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.