नुकत्याच एका अहवालात 2.1 कोटी भारतीयांनी परदेशी पर्यटनाला पसंती दिल्याचा अहवाल प्रसिद्ध झाला. पण, देशांतर्गत पर्यटकांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली. म्हणूनच ‘केल्याने होत आहे रे...’ या उक्तीनुसार भारतीय पर्यटकांना सांगावेसे वाटते की, ‘गेल्याने होत आहे रे, आधी गेलेचि पाहिजे!’
पर्यटन उद्योगासंबंधी एक अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला. त्या अहवालाप्रमाणे, परदेशात जाण्याकडे भारतीयांचा कल वाढला आहे. अहवालानुसार, दुबई, बँकॉक आणि सिंगापूर ही भारतीय पर्यटकांसाठी सर्वात जास्त लोकप्रिय परदेशी ठिकाणे आहेत. याशिवाय, लंडन, टोरंटो आणि न्यूयॉर्कसुद्धा तितकीच लोकप्रिय शहरे. गेल्या वर्षी नवीन परदेशी ठिकाणांच्या शोधात अनेक पटींनी वाढ झाल्याचेही अहवालात सांगण्यात आले आहे. यामध्ये हाँगकाँग, अल्माटी, पारो, बाकू, दा नांग आणि तिबिलिसी या ठिकाणांचा समावेश आहे. भारतीय केवळ प्रसिद्ध ठिकाणे म्हणजे अमेरिका आणि युरोपमध्येच जात नाही. परंतु, त्यांनी परदेशांमध्ये लहानलहान देशांमध्येसुद्धा जाणे पसंत केले आहे, ज्याला ‘हटके पर्यटन’ किंवा ‘ऑफ बीट डेस्टिनेशन’ असे म्हटले जाते. भारतीय अधिकाधिक वैविध्यपूर्ण देशांचा शोध घेत आहेत, असेही या अहवालातून अधोरेखित होते.
2022च्या आकडेवारीप्रमाणे, 2.1 कोटी भारतीयांनी परदेशात प्रवास केला. हा एक ऐतिहासिक रेकॉर्ड म्हणावा लागेल आणि दरवर्षी भारताच्या बाहेर पर्यटनाकरिता जाणार्यांची संख्याही वेगाने वाढतच आहे. मात्र, देशांतर्गत पर्यटकांची संख्या त्याच वेगाने वाढताना दिसत नाही.
भारतीयांनी 2023 मध्ये 17 अब्ज डॉलर्स परदेशी प्रवासावर खर्च केले आणि 2024 मध्ये हा खर्च 50 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकतो, असेही या अहवाल सांगतो.
भारतातसुद्धा पर्यटनाच्या अफाट संधी
म्हणून यानिमित्ताने देशवासीयांना असे आवाहन करावेसे वाटते की, परदेशात पर्यटन करणार्या भारतीयांनो, परदेशात जायच्या आधी भारतातसुद्धा पर्यटन करा आणि भारताच्या अर्थव्यवस्थेचा विकासाचा वेग वाढवा. स्थानिक पर्यटनाला परदेशातील पर्यटनासारखीच चालना द्या.
‘इंटरनॅशनल टुरिझम डेव्हलपमेंट इंडेक्स’च्या अहवालाप्रमाणे, जागतिक पर्यटन क्रमांकात भारत गेल्या वर्षी 29व्या स्थानावरुन 39व्या स्थानावर पोहोचला आहे. म्हणजे जगाच्या तुलनेत पर्यटनामध्ये आपण फार मागे आहोत. याचे कारण म्हणजे, अजूनही म्हणावे तेवढे परदेशी पर्यटक भारतात येत नाही.
या अहवालात भारतीय पर्यटकांच्या देशांतर्गत काही खास प्रवास पद्धतींचा उल्लेख करण्यात आला आहे. धार्मिक स्थळांना भेट देण्याकडे लोकांचा कल वाढला आहे. उदाहरणार्थ, 2023 मध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत उज्जैन (359 टक्के) आणि बद्रीनाथ (343 टक्के), अयोध्या प्रवासासाठी पर्यटक गेल्याचे लक्षात आले आहे.
भारतामध्ये प्रेक्षणीय स्थळे भरपूर आहेत, परंतु तिथे जाण्याचा रस्ता कठीण आहे. त्यात विमानाचे भाडेही खूपच जास्त आहे. म्हणूनच अनेकांना परदेशात विमानाने जाणे जास्त स्वस्त वाटते. याशिवाय काही पर्यटनस्थळी असलेली हॉटेल्स विनाकारण किमती वाढवून पैसे वसूल करतात. पर्यटनस्थळी पोहोचल्यानंतर सुरक्षा व्यवस्था फारशी मजबूत नाही, याचा अनुभव येतो. पर्यटकांना त्रास देणारे अनेक जण असतात, जसे की भिकारी, तथाकथित गाईड, घोडेवाले वगैरे. याचा विशेषत्वाने परदेशी पर्यटकांना नाहक जास्त त्रास होतो. तसेच परदेशी पर्यटकांवर झालेले अत्याचारांच्या घटनाही माध्यमांमध्ये अनेकदा उजेडात आल्या आहेत. म्हणूनच असे सांगावेसे वाटते की, परदेशीय पर्यटकांनी भारतात यावे, याकरिता त्यांचा सर्वांगीण प्रवास हा आरामदायक आणि सुखकर झाला पाहिजे. टूर ऑपरेटर्स जे परदेशी पर्यटकांना भारतात आणतात, त्यांना काही सवलतीदेखील मिळायला हव्या. त्यामुळे त्यांना भारताचे एक चांगले ‘टुरिस्ट डेस्टिनेशन’ म्हणून मार्केटिंग करणे सोपे होईल.
पर्यटनस्थळांमध्ये सुधारणा आवश्यक
देशातील पर्यटनस्थळांमध्ये अनेक सुधारणा व्हायला पाहिजेत. बहुतेक पर्यटन स्थळे ही अत्यंत गलिच्छ असतात आणि तिथे रोजच्या रोज साफसफाईची गरज आहे. उदाहरण म्हणजे काश्मीरमधले दल लेक, ज्याचे पाणी अत्यंत गलिच्छ आहे. कारण, दुर्दैवाने श्रीनगरचे सगळे सांडपाणी या तलावात सोडले जाते.
या भागामध्ये घोड्यांवरून जायचे दर, लोकल टॅक्सीचे दर किंवा लोकल हॉटेलचे दर हे फारच जास्त आहे. स्त्रियांकरिता कुठेही स्वच्छतागृहे दिसत नाही आणि असतील तर ती गलिच्छ असतात. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात अनेक वेळा दरड किंवा हिमकडा कोसळल्यामुळे रस्त्यावरची वाहतूक एकाएकी ठप्प होते आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.
सोनमार्ग-कारगिल रस्त्यावर प्रवास करताना आम्हाला सैन्यातील मित्रांकडून बातमी मिळाली की, एक मोठी दरड कोसळली आहे आणि रस्ता बंद पडला आहे. दोन दिवस रस्ता बंदच राहील. म्हणून आम्ही मागे फिरलो. मात्र, त्याच वेळेला मी स्वतःच्या डोळ्यांनी हजारो गाड्या याच रस्त्यावर कारगिलला पुढे जाताना बघितल्या. हे मुद्दाम केले जात असावे, असे वाटले. कारण, एक दीड तास प्रवास केल्यानंतर, त्या गाड्या अडकणार होत्या. रस्ता बंद झाल्यामुळे रस्त्यात असलेल्या हॉटेल्सचे दर, जेवणाचे दर जास्त वाढवलेले होते. याशिवाय, या पर्यटकांना परत यावेच लागले आणि राहायला सोनमार्ग किंवा श्रीनगर, शिवाय दुसरा कुठला पर्याय नव्हता. तिथे पण हॉटेलचे दर हे वाढवण्यात आले होते.
त्यामुळे मुद्दा असा की, दरड कोसळल्याची बातमी मिळाल्यानंतर या पर्यटकांना सुरुवातीलाच का थांबवण्यात आले नाही? त्यांना मुद्दाम पुढे जाऊन त्रासाचा सामना करायला लागला आणि हॉटेल्सवर दुप्पट किंवा तिप्पट पैसा खर्च का करावा लागला? म्हणजेच टुरिस्ट टॅक्सी, काश्मीरचे पोलीस, तिथले हॉटेलचे मालक ज्यांच्यामध्ये संगनमत असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, यामुळे पर्यटकांची नाहक लूट होते. हे काश्मीर सरकारने थांबवायलाच पाहिजे. हे उदाहरण मी जास्त विस्तृतरित्या सांगितले आहे. कारण, अशाच प्रकारचा त्रास हा डोंगराळ भागांमध्ये होत असतो. मग ते काश्मीर असो की हिमाचल प्रदेश की चारधामच्या यात्रा किंवा उत्तरेकडे असलेली वेगवेगळी डोंगरातली पर्यटनस्थळे. काही ठिकाणांमध्ये असलेली गावे विनाकारण टुरिस्ट गाड्यांकडून लोकल टॅक्स वसूल करतात, हे सरकारने मान्य केले आहे काय?
काश्मीर खोर्याचे भारतीयीकरण
अर्थातच सगळेच वाईट आहे असे नाही. काही काही चांगले अनुभवसुद्धा येतात.
पर्यटक प्रचंड प्रमाणामध्ये काश्मीरमध्ये यायला लागल्यामुळे महाराष्ट्रीयन खाद्यपदार्थ, गुजराती खाद्यपदार्थ, साऊथ इंडियन खाद्यपदार्थ हे आता काश्मीरमधल्या बहुतेक हॉटेल्समध्ये मिळू लागले आहेत.
श्रीनगरच्या आत अनेक हिंदू हॉटेल्स दिसतात, जे या आधी अशक्य होते. मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक काश्मीर खोर्यामध्ये प्रवास करताना दिसतात. पण, तरीही गेल्या दोन महिन्यांमध्ये काश्मीर खोर्यात पाच बाहेरचे नागरिक दहशतवाद्यांकडून मारले गेल्याची घटना सर्वस्वी दुर्देवीच.
काश्मीर खोर्यामध्ये जुनी किंवा प्राचीन मंदिरे अनेक आहेत. आता त्या मंदिरांची जीर्णोद्धार आणि डागडुजी केली जात आहे, ज्यामुळे तिथे भेट देणार्या पर्यटकांची संख्यासुद्धा वाढत आहे. यामुळे काश्मीर खोर्याचे भारतीयीकरण होत आहे.
येत्या काळात येणार्या अमरनाथ यात्रेमध्ये पर्यटकांना होणार्या गैरसोयींचा आढावा काश्मीर सरकारने घेतला पाहिजे आणि त्यांची यात्रा सुखद केली पाहिजे.
डोंगऱाळ भागांमध्ये आरोग्याच्या समस्यांमुळे बरेचदा अनेक पर्यटकांना त्रास होतो. अशांसाठी वैद्यकीय चाचणी आणि आरोग्याच्या इतर सुविधा असणे अत्यंत गरजेचे आहे. कारण, शेकडो पर्यटक हे अमरनाथ यात्रा किंवा चारधाम यात्रेमध्ये आपले प्राण गमावतात.
पर्यटनाला चालना कशी द्यावी, हे भारत थायलंडकडून शिकू शकतो. पर्यटन उद्योगात भारत एक प्रमुख शक्ती म्हणून उदयास येत आहे. या अहवालातील माहितीमुळे पर्यटन आणि हॉटेल उद्योगातील लोकांची मागणी आणि उपलब्ध सुविधा यांच्यातील तफावत कमी होण्यास मदत होईल. याचाच अर्थ पर्यटनाला चालना देण्यासाठी योग्य धोरणे आखणे, नवनवीन स्थळे पर्यटकांसाठी विकसित करणे आणि प्रवाशांच्या विशिष्ट आवडी आणि इच्छा पूर्ण करणारे अनोखे अनुभव तयार करणे व पर्यटकांचा प्रवास सुखकर करणे होय.
(नि.) ब्रि. हेमंत महाजन