"जयंत पाटील रोहित पवारांमुळे..."; संजय शिरसाटांचा दावा
01-Jun-2024
Total Views | 64
मुंबई : जयंत पाटील रोहित पवारांमुळे पक्ष सोडतील. त्यांना पोहित पवारांच्या हाताखाली काम करावं लागतंय हे दुर्दैव आहे, असा दावा शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सूरज चव्हाण यांनी जयंत पाटील काँग्रेसमध्ये जातील असा दावा केला होता. यावर शिरसाटांनी प्रतिक्रिया दिली.
संजय शिरसाट म्हणाले की, "राष्ट्रवादीचे आमदार महायूतीच्या कोणत्याही घटकपक्षाकडे येतील. ते काँग्रेसमध्ये जाणार नाहीत. जयंत पाटील अस्थिर आहेत. त्यांना तिकडे करमत नाही. त्यांनी अनेकवर्ष त्या पक्षात काम केल्यानंतर आज त्यांना रोहित पवारांच्या हाताखाली काम करावं लागत असेल तर यासारखं दुर्दैव नाही."
"सुप्रिया सुळे आणि रोहित पवार या दोघांचंच तिथे ऐकावं लागतं. ज्या लोकांनी पक्ष उभा करण्यासाठी शरद पवारांसोबत मेहनत घेतली त्यांचा तिथे अपमान होत असेल तर ते कशाला राहतील? त्यामुळे जयंत पाटील पक्ष सोडतील एवढं निश्चित आहे," असे ते म्हणाले.
संजय राऊतांवर बोलताना ते म्हणाले की, "संजय राऊत एकीकडे सरकार बदलणार असं सांगतात आणि दुसरीकडे दलदलीत फसलेलं सरकार म्हणतात. ४ जूननंतर सरकार बदलणार अलेल तर ५ जूनपासून आमच्या चौकशा करा. तुमचं म्हणणं खोटं ठरलं तर शिवाजी पार्कमध्ये उभं राहून लोकांकडून जोडे मारून घ्या," असेही ते म्हणाले.