कुठल्याही कलेचा वारसाहक्क जपणं ही लादलेली जबाबदारी नसून, आपलं कर्तव्य समजून ती पुढे नेत यशस्वी ठरलेल्या सरोदवादक आणि गायक आदित्य आपटे यांच्याविषयी...
ही जणांकडून संगीत क्षेत्र हे एखाद्याच्या कायमस्वरुपी आर्थिक गरजा कसे भागवू शकते, असा प्रश्न आजही विचारला जातो. परंतु, आपल्या छंदाला अर्थार्जनाचे स्वरुप सरोदवादक आदित्य आपटे यांनी दिले. संगीत साधकांच्या कुटंबात जन्मलेल्या आदित्य आपटे यांनी लहानपणापासूनच गायनाचे धडे घेतले. आदित्य आपटे यांचे पणजोबा अनंत बुआ ओंकार हे हैदराबादचे संस्थानिक गवई होते, तर आदित्य यांचे आईवडील - मनीषा आणि मधुसूदन आपटे हे गुरु म्हणून लाभले. आदित्य यांचे पहिली ते दहावीपर्यंतचे शालेय शिक्षण कै. कृष्णा, मोरु, पाटील, देशमुख विद्यालय नालासोपारा येथे झाले. एक कलाकार म्हणून नावारुपास येण्यासाठी शाळा-महाविद्यालय फार महत्त्वाचे असते, असे म्हटले जाते आणि आदित्य यांच्या बाबतीत सौभाग्याने शाळा ही कलेचं महत्त्व जाणणारी मिळाली आणि तेथील रंगमंचावरुनच त्यांच्या गायनाला प्रोत्साहनदेखील मिळाले.
आदित्य यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण डहाणूकर महाविद्यालयातून वाणिज्य शाखेतून पूर्ण केले. अकरावी ते बी.कॉम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानतंर संगीत क्षेत्रात काम करण्याची आणि शिकण्याची इच्छा आदित्य यांना होती. त्यासाठी त्यांनी पुण्यातील भारती विद्यापीठातून ‘संगीत’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. संगीत विषयात ‘एम.ए’ झाल्यानंतर आदित्य यांनी प्राध्यापक होण्याचे स्वप्न पाहिले आणि ते साकारण्यासाठी ‘नेट’ची परीक्षासुद्धा दिली आणि ते पहिल्याच वेळेत या परीक्षेत ९६ टक्के मिळवत उत्तीर्णही झाले. मुंबई विद्यापीठात सध्या आदित्य संगीत याच पीएच.डी करत आहेत. संगीत किंवा गाणं हे केवळ ऐकण्यापुरतंच मर्यादित नसतं किंवा छंद जोपासण्याइतकेच ते मर्यादित नसते, याची जाणीव लोकांना करुन देत आदित्य सध्या 'NMIMS स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’मध्ये ‘व्होकल संगीता’चे साहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करत आहेत. शिवाय ते ‘ऑल इंडिया रेडिओ’चे श्रेणीबद्ध कलाकार देखील आहेत.
एकीकडे संगीत क्षेत्रात करिअर करत असताना, आदित्य यांनी अनेक स्पर्धांमध्ये देखील सक्रिय सहभाग घेतला होता. त्याबरोबरीने ‘संगीत विशारद’ देखील त्यांनी पूर्ण केले आहे. घरातच गाणं असल्यामुळे आईवडिलांकडून मिळालेला सांगीतिक वारसा पुढे घेऊन जाणं, हे आपलं कर्तव्य असल्याचे आदित्य यांना वाटले आणि तशी वाटचाल त्यांनी केली.
कला क्षेत्रात स्वत:ला पूर्णत: झोकून देण्याचा निर्णय घेणे हे आदित्य यांच्यासाठीही तसं अवघड होतं. शिवाय इतर मित्रांच्या तुलनेत आपण खूपच उशिरा आर्थिकरित्या सबळ होऊ किंवा आपल्या वाटेला खूप कष्ट असतील, याची जाणीव असूनही ‘परफॉर्मिंग आर्टिस्ट’ म्हणून ओळख निर्माण करण्याचा ध्यास आदित्य यांनी घेतला. तसेच, या क्षेत्रात आल्यानंतर आपले अढळ स्थान निर्माण करुन ते टिकवून ठेवणं, यासाठीची मेहनतदेखील त्यांनी केली आहे. संयम बाळगून आठ-दहा तास रियाज करणं, ही स्वत:च्या मनाला आणि शरीराला सवय लावण्याचा खरा ‘स्ट्रगल’ आदित्य यांच्या वाटेला आला होता. केवळ गळ्यात गाणं आणि हातात वाद्य वाजवण्याची कला असली की जग जिंकता येत नाही, याची जाणीव ठेवून उपजत ती कला आपल्या ध्येयाकडे घेऊन जाणारी हवी, याचे महत्त्व आदित्य यांना होते.
आदित्य हे स्वत: उत्तम गायक असून, ‘मैहर’ घराण्याच्या बाजाचे सरोददेखील शिकत असून, त्याची प्रस्तुती देखील करत आहेत. आदित्य सांगीतिक शिक्षण पं. प्रदीप बारोट आणि शास्त्रीय गायनाचे शिक्षण पद्मश्री पं. उल्हास कशाळकर यांच्याकडे घेत आहेत. आदित्य यांनी अनेक स्पर्धा, शिष्यवृत्ती आणि पुरस्कारांवर आपले नाव कोरले आहे.
महाराष्ट्र शासनाची पंडित भीमसेन जोशी युवा शिष्यवृत्ती दोन वर्षांसाठी, भारतरत्न डॉ. एम एस सुब्बलक्षमी फेलोशिप तीन वर्षांसाठी, त्यानंतर ‘आकाशवाणी’तर्फे घेतल्या जाणार्या स्पर्धांमध्ये सरोद, गायन आणि नाट्यसंगीत या विभागांत जिंकल्यामुळे ‘ग्रेड’ मिळाली. याशिवाय ‘हृदयेश पुरस्कार’, ‘स्वरनाद पुरस्कार’, ‘आचार्य अल्लाउद्दीन म्युझिक सर्कल पुरस्कार’ यांसारख्या मानाच्या पुरस्कारांनीही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. गायनासोबत २००१ सालापासून आदित्य सरोदवादनाची तालीम करीत आहेत. अनेक जाहिरातींच्या जिंगल्समध्ये आदित्य यांनी सरोदवादन केले आहे. तसेच, ‘अॅमेझोन प्राईम’च्या ‘हाफ सीए’ या वेबसीरिजमधील गाणी, ‘टी-सीरिझ’च्या मिक्स टेपमध्येही आदित्य यांनी सरोदवादन केले आहे. महाविद्यालयीन काळात ‘युथ फेस्टिव्हल’मध्ये दरवर्षी सरोद वादन आणि गायन यात आदित्य यांना सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. आदित्य आपटे यांची संगीत क्षेत्रात अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, यासाठी ‘दै. मुंबई तरुण भारत’तर्फे त्यांना मन:पूर्वक शुभेच्छा!