दुर्गाबाईंचा पैस

    07-May-2024   
Total Views |

durgabai
 
साने गुरुजींनी आग्रह केला म्हणून तिने लिहायला सुरुवात केली. तसं लेखन हा तिचा प्रांत नव्हता. ती होती अभ्यासक. पाहून, वाचणं, निरीक्षण करणं, ती नोंदवून त्या आधारे आपले विचार मांडणं आणि त्यातून व्यक्त होणं ही सर्वसाधारण तिच्या लेखणीची पद्धत. एखादी व्यक्तिरेखा मूल्य वैशिष्ठ्यांच्या मापावर तोलून खुलवून सांगणे तिचे वैशिष्ट्य. संशोधनपर वैचारिक लेखनाने दुर्गाबाईंनी लेखनास प्रारंभ केला. समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, लोकसाहित्यशास्त्र या विषयांवरील त्यांचे लेखन मुख्यतः इंग्रजीत आहे. हिंदुइझम अँड इटस् प्लेस इन द न्यू वर्ल्ड सोसायटी हा डॉ. केतकरांच्या समाजशास्त्रीय ग्रंथाचा दुर्गाबाईंनी केलेला अनुवाद. त्यांची विषय निवड पाहून आपण त्या काळातील स्त्रीजीवनाविषयी विचार करू लागतो. तत्कालीन समाजव्यवस्थेप्रमाणे सर्वच स्त्रिया आजच्यासारख्या बाहेरच्या जगात मुक्त विहार करत नसत. दुर्गाबाईंसारख्या बुद्धीमंत प्रतिभावंत आणि आस्वादक स्त्रीला हे स्वातंत्र्य मिळालं यात संपूर्ण देशाचा फायदा आहे. लोकसंस्कृतीचा शोध घेत त्या वणवण फिरल्या. लोकसाहित्याचा अभ्यास करायची त्यांची एक विशिष्ट वस्तुनिष्ठ आणि शास्त्रीय भूमिका आहे.
 
गोंडजीवनातील प्रेमकथा त्यांची पहिली ललितनिर्मिती. त्या अशाच जंगलात फिरत होत्या, रानातल्या फळे भाजा रांधून अन्नसंस्कार करत होत्या. एकदा अशातूनच त्यांना विषबाधा झाली आणि त्या अंथरुणाला खिळल्या. या आजारपणात एका खिडकीने त्यांना दिवस रात्र सोबत केली. ६ ऋतूंचे ६ सोहळे दाखवले. बाईंना उठाव लागलंच, लिहावं लागलं. मांडावं लागलं. यातून ऋतुचक्र साकार झालं. विविध ऋतूंतील निसर्गाच्या बदलत्या लावण्यविभ्रमांचे चित्रांकन करणाऱ्या या गद्यकाव्यात्म ललितनिबंधातून निसर्ग आणि मानव यांच्यातला गूढ ऋणानुबंध प्रतीत होतो. अभिजात रसिकता, सौंदर्यसक्ती, जीवनोत्सुक आशाप्रवण वृत्ती, तीव्र संवेदनशीलता, तत्त्वज्ञवृत्ती, काव्यात्मता तसेच शास्त्राज्ञाचे डोळस, मर्मग्राही कुतूहल यांचे अपूर्व रसायन दुर्गाबाईंच्या व्यक्तिमत्त्वात आणि अनुषंगाने त्यांच्या ललित साहित्यात प्रत्ययास येते.
 
स्वातंत्र्यचळवळीमागची त्यांची भूमिका किती स्पष्ट. ठामपणे नाही म्हणणे हा जन्मसिद्ध अधिकार त्यांनी प्रतिकूल परिस्थितीतही आपल्यासोबत ठेवला. अपेक्षेप्रमाणे राजकीय नजर त्यांच्यावर स्थिरावलीच. आणि सुरु झाला मग ससेमिरा आणि ठाम विरोध.
दुर्गाबाई कविता रचत कितीजणांना माहितीय? हो, त्या महाविद्यालयीन काळात कविता लिहायच्या. त्यांच्या कविता त्यांच्या व्यतिरिक्त केवळ त्यांच्या वडिलांनी वाचल्या आहेत. त्यानंतर त्यांनीत्या चक्क जाळून टाकल्या. त्यांच्या या विपरीत वागण्याचा आपण कुतर्क करू नये, त्या स्पष्टीकरण देताना म्हणतात मी मुक्तीच्या कैफात त्या सर्व जाळून टाकल्या. पुढे त्यांनी संपूर्ण गीतांजली चा संस्कृत अनुवाद केला होता. पण तोही फाडून टाकला. एखादी कलाकृती संपूर्ण झाल्यानंतर लेखकाचा त्या साहित्यकृतीशी असलेला संबंध तसाच राहतो का? त्याच त्याच्या अभिव्यक्तीसोबत असलेलं नातं संपत आणि त्यातून तो पार निघून जातो. तेव्हा मागे राहिलेल्या या साहित्याचा त्यांना उपयोग न वाटण साहजिक आहे परंतु आज लाखमोलाचा ऐवज असा त्याच्या स्वामिनीच्या हट्टापायी नाहीसा झाला याचा मला खेद वाटतो.
 
असो. आज त्यांचे पुण्यस्मरण. त्यानिमित्ताने त्यांच्या वाचनात आलेल्या साहित्यातून मला उमगलेल्या दुर्गाबाई तुमच्यासमोर मांडल्या. या त्रोटक असू शकतात परंतु अस्सल आहेत. त्यांच्याबद्दल अप्रकाशित काही किस्से असतील तर ते आम्हाला नक्की कळवा, या देवाणघेवाणीचा वापर दुर्गाबाईंच्या सर्व वाचकांना व्हावा ही इच्छा!

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.