अक्षरमंच प्रतिष्ठान : वाचनाचा सांस्कृतिक ध्यास

    07-May-2024   
Total Views |
Aksharmanch Pratishthan

शब्दची आमुच्या जीवाचे जीवन
शब्देची वाटू धन जनलोका॥


संत तुकाराम महाराजांच्या या अभंगातील ओळींप्रमाणे शब्द व अक्षरे जनलोकांमध्ये वाटून, त्यांना वाचनासाठी प्रवृत्त करणे, वाचन संस्कृतीचा प्रसार करणे व लेखनासाठी प्रोत्साहित करणे, असे विविधांगी उपक्रम राबविणारी संस्था म्हणजे ‘अक्षरमंच सामाजिक आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान.’ या कार्याचा घेतलेला हा आढावा...
 
अक्षरमंच प्रतिष्ठान’ची स्थापना करताना कवी, लेखक, पत्रकार व शिक्षक यांना व्यासपीठ मिळावे आणि आजच्या विद्यार्थी वर्गाला वाचनाचे महत्त्व पटवून, त्यांना लेखन-वाचन प्रवाहात सामील करून घ्यावे, या उद्दिष्टांचा प्रामुख्याने विचार करण्यात आला होता. डॉ. योगेश जोशी, डॉ. मधुसूदन घाणेकर आणि हेमंत नेहते यांच्या संकल्पनेतून ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’चा जन्म झाला. गेल्या दोन दशकांमध्ये संस्थेच्या माध्यमातून पाचशेहून अधिक सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांचे स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आयोजन करण्यात आले आहे. ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’च्या कार्याला ’आठवणीतील साहित्यिक’ कार्यक्रमाने सुरुवात करण्यात आली. केशवसुत स्मृतिशताब्दी वर्षाच्या निमित्ताने प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे व केशवसुत स्मृतिविशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले. बालकवी जन्मशताब्दी वर्षानिमित्त ‘एक कविता तुमची, एक कविता बालकवींची’ या उपक्रमाअंतर्गत कवींनी बालकवींच्या कवितेबरोबर त्याच विषयाशी साधर्म्य साधणारी स्वतःची कविता सादर केली.

 इंदिरा संत यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या ‘कवितासंग्रहाची भिशी’ हा अभिनव उपक्रम राबविला होता. याअंतर्गत २५ सभासदांनी दर महिन्याला प्रत्येकी एक याप्रमाणे पुस्तक विकत घेऊन वर्षभर एकमेकांशी अदलाबदल केली व शताब्दी वर्षामध्ये महिन्याच्या पहिल्या रविवारी रसग्रहणात्मक कार्यक्रमही केले. कुसुमाग्रज जन्मशताब्दीच्या निमित्ताने प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. योगेश जोशी मराठी भाषेतील १०० कवी, त्यांचा परिचय, फोटो, त्यांची गाजलेली कविता अशी १०० मोठ्या आकाराची भीत्तिपत्रके (पोस्टर) तयार केली आणि १२५हून अधिक शाळांमध्ये त्याचे अभिनव प्रदर्शनही भरवले आहे आणि आजही हे प्रदर्शन विविध प्रसंगी आयोजित केले जाते.

संस्कारक्षम पुस्तकांचे प्रकाशन व त्यावर आधारित स्पर्धा याअंतर्गत स्वामी विवेकानंद यांच्या १५०व्या जयंतीनिमित्ताने विवेकानंद संस्कारकथा (डॉ. हरिश्चंद्र देवळे), डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५व्या जयंतीनिमित्त प्रज्ञासूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मच्छिंद्र कांबळे), भारतरत्न डॉ. अब्दुल कलाम यांच्या जीवनावर ’कहाणी एका मिसाईलमॅन’ची (डॉ. योगेश जोशी, हेमंत नेहते) अशा अनेक प्रेरणादायी पुस्तकांचे प्रकाशन करून त्यावर आधारित संस्कार स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत. या पुस्तकांमध्ये महनीय व्यक्तींची चरित्रकथा रुपात देण्यात येते. त्यावर आधारित ४०-५० वैकल्पिक प्रश्न आणि एक वर्णनात्मक प्रश्न पुस्तकाचे शेवटी दिलेला असतो. पुस्तक वाचून विद्यार्थ्यांनी प्रश्न सोडवून पाठवायचे असतात. प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला सहभाग प्रमाणपत्र आणि विजेत्या विद्यार्थ्याला बक्षिसे देऊन गौरविण्यात येते.

 आजपर्यंत झालेल्या विविध संस्कार स्पर्धांमध्ये ५० हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘क्रांतीगाथा स्वातंत्र्याची’ (डॉ. योगेश जोशी) हे पुस्तक छापील, ऑनलाईन आणि ऑडियो बुक स्वरूपात प्रकाशित करण्यात आले होते आणि ते ३९ हजार विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले होते. ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’च्या या संस्कार स्पर्धांचे वैशिष्ट्य म्हणजे, यासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश विनामूल्य असतो. विद्यार्थी वाचत नाही, ही सर्व स्तरातून येणारी तक्रार खरी असली, तरी प्रतिष्ठानच्या यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागण्यास निश्चितच मदत होते, असे मत अनेक शाळांच्या मुख्याध्यापकांनी, शिक्षकांनी व पालकांनी मांडले आहे.

पुस्तके मिळत नाहीत, म्हणून वाचन करता येत नाही, अशा विद्यार्थ्यांसाठी विविध आदिवासी पाडे, आश्रमशाळा येथील ग्रंथालयांना विनामूल्य पुस्तके प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येतात. आजमितीला ३५९ आश्रमशाळा, आदिवासी पाडे व सरकारी अनुदान न मिळणारी ग्रंथालये यांना ६५ हजारांहून अधिक (साठ लाखांहून अधिक किमतीची) पुस्तकांचे वाटप करण्यात आले आहे. पहिल्या ‘वाचन प्रेरणा दिना’च्या निमित्ताने एकाच दिवशी १८५ शाळांना ११ हजार १११ पुस्तकांचे विनामूल्य वितरण करून ‘अक्षरमंच सामजिक सांस्कृतिक प्रतिष्ठान’ने विक्रम रचला आहे. त्याचप्रमाणे विविध संस्था आणि शाळांनी आयोजित केलेल्या विविध स्पर्धा, शालेय बक्षिसे यासाठी प्रतिष्ठानच्या वतीने पुस्तक स्वरूपात भेट दिली जात असते. ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’च्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या कार्यक्रमांमध्ये ‘बुके ऐवजी बुक’ ही संकल्पना अमलात आणली जाते. ‘पै फ्रेंड्स लायब्ररी’च्या वतीने आयोजित करण्यात येणार्‍या पुस्तक आदानप्रदान आणि ‘बुक स्ट्रीट’ या भव्यदिव्य उपक्रमांमध्ये ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’चा सक्रिय सहभाग असतो.

वाचन संस्कृती वृद्धिंगत व्हावी, या हेतूने संस्थेचे अध्यक्ष डॉ. योगेश जोशी यांच्या संकल्पनेतून गतवर्षी ’अखंड वाचनयज्ञ’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याअंतर्गत सलग ३६ तास आणि एकत्रित २०० तास व्यासपीठावर येऊन १ हजार ७५हून अधिक वाचकांनी वाचन केले. स्वा. वि. दा. सावरकर वाचनसत्र, वि. आ बुवा वाचनसत्र, ना. धों. महानोर वाचनसत्र, डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम वाचनसत्र, अण्णा भाऊ साठे वाचनसत्र अशा एकूण ४० सत्रांमध्ये वाचकांनी कथा, कविता, लेख, नाट्य अशा विविध साहित्याचे वाचन केले आणि दहा हजारांहून अधिक रसिक वाचकांनी त्याचा आस्वाद घेतला. संस्थेच्या वतीने सर्व वाचकांना सहभाग प्रमाणपत्र आणि पुस्तकभेट देण्यात आली. यामध्ये २२ शाळांच्या ७२५ विद्यार्थांनी वाचन सहभाग नोंदविला होता. ७५हून अधिक वृत्तपत्रे, वृत्तपत्रे, संकेतस्थळांनी या कार्यक्रमाची दखल घेतली होती. ‘कल्याण नागरिक’, ‘अक्षरआनंद’, ‘कल्याण वैभव’, ‘जनादेश’ आदी वृत्तपत्रांनी या उपक्रमावर विशेषांक प्रकाशित करून, उपक्रमाची माहिती व महती सांगणारे संपादकीय सुद्धा लिहिले होते. सदर उपक्रमासाठी ‘बालक मंदिर’ संस्था आणि ‘सार्वजनिक वाचनालय, कल्याण’ यांचे सहकार्य लाभले होते.
 
विविध क्षेत्रांतील मान्यवर वाचनासाठी कसा आणि केव्हा वेळ काढतात, काय वाचन करतात, त्यांचे वाचन विषयक विचार लोकांपर्यंत पोहोचावे, या हेतूने डॉ. योगेश जोशी यांनी ’वाचनरंग’ हे पुस्तक प्रकाशित केले होते. या पुस्तकात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमिताभ बच्चन, डॉ. प्रकाश बाबा आमटे, मधु मंगेश कर्णिक, अशोक सराफ, श्रीधर फडके, मकरंद अनासपुरे, जयेंद्र साळगांवकर, विजू माने, विसुभाऊ बापट, उदय सबनीस, डॉ. निलेश साबळे, अरुण म्हात्रे, डॉ. सुकृत खांडेकर, डॉ. आसावरी बापट, डॉ. गंगाधर वारके, डॉ. सुनील खर्डीकर आदी अनेक मान्यवरांचे वाचनविषयक लेख व मुलाखती संकलित करण्यात आल्या होत्या. सदर पुस्तकाच्या दोन आवृत्ती प्रकाशित झाल्या असून, पुस्तकास सहा पुरस्कार प्राप्त झाले आहेत.
 
पुस्तक व वाचन हा केंद्रबिंदू मानून विद्यार्थीवर्गासाठी नानाविध उपक्रम संस्था अध्यक्ष डॉ. योगेश जोशी आणि सचिव हेमंत नेहते सातत्याने साकारत असतात. इतर अनेक पदाधिकार्‍यांचे त्यांना सहकार्य लाभत असते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, हे उपक्रम रसिक वाचकांसाठी विनामूल्य आयोजित करण्यात येत असतात. यंदाच्या वर्षीसुद्धा ‘अखंड वाचनयज्ञ’ उपक्रम राबविण्यात येत आहे. यामध्ये एकत्रित ३०० तास व्यासपीठावरून अभिवाचन करण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. तसेच ’वाचनाची आनंदयात्रा’ या पुस्तकाचे प्रकाशनसुद्धा करण्यात येणार आहे. ‘अक्षरमंच प्रतिष्ठान’च्या ‘अखंड वाचन संस्कृती वारी’मध्ये व इतर सांस्कृतिक उपक्रमांमध्ये आपणही सहभागी होऊ शकता. या आणि अशा अनेक वाचन विषयक संकल्पना प्रत्यक्षात आणणारे संस्था अध्यक्ष आणि लेखक डॉ. योगेश जोशी यांच्या शब्दात सांगायचे झाले, तर
 
घरात असावे ग्रंथांचे कपाट
देव जसा पाट देव्हार्‍यात॥


(अधिक माहितीसाठी संपर्क: अक्षरमंच सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान
९७५७०७७६१४