आग तीच, पॅटर्न नवा...

    06-May-2024   
Total Views |
 forest fire
 
उत्तराखंड राज्य सध्या वणव्यांचे हॉटस्पॉट बनलेले दिसते. ‘देवभूमी’ म्हणून ओळखल्या जाणार्या उत्तराखंडला सध्या वणव्याने घेरले आहे. रुद्रप्रयाग आणि नैनितालपासून अगदी बागेश्वरपर्यंत ही आग पसरली. आतापर्यंत ६५० हेक्टर जंगल क्षेत्र या आगीत खाक झाले आहे. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भारतीय सैन्यालाही पाचारण करण्यात आले. वन विभागाच्या कर्मचार्यांच्या सुट्ट्याही रद्द करण्यात आल्या. दि. २७ एप्रिल रोजी ३१ ठिकाणी आग लागण्याच्या घटना समोर आल्या होत्या. यातच एका व्हायरल व्हिडिओमध्ये दोन युवक आग लावण्याची धमकी देत आहेत. “आमचं काम आग लावणं आणि आगीशी खेळणं हेच आहे. डोंगराला आम्ही आग लावून भस्म करणार आहोत,” अशी धमकी देताना या व्हिडिओमध्ये एक युवक दिसतो. यानंतर उत्तराखंड पोलीस प्रशासनही सतर्क झाले असून, लॅण्डस्टोन भागातील पाच युवकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आगीने अतिशय रौद्ररूप धारण केले असून, यावर सर्वोच्च न्यायालयाने आता तातडीने सुनावणी घेण्यास तयारी दर्शवली आहे.
 
उत्तराखंडचे रहिवासी रितुपर्ण उनियाल यांनीही यासंबंधात न्यायालयात याचिका दाखल केली आहे. जंगलातील आगीचा सातत्यपूर्ण इतिहास असूनही, प्रतिसादकर्त्यांचे अज्ञान, निष्क्रियता, निष्काळजीपणा आणि अप्रस्तुततेमुळे उत्तराखंडमधील जंगले, वन्यजीव आणि पक्ष्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि त्यामुळे पर्यावरणीय असंतुलन निर्माण झाल्याचा आरोप उनियाल यांनी केला आहे. विशेष म्हणजे, उत्तराखंडमधील आगीच्या घटनांपैकी ९० टक्के घटना या मानवनिर्मित असल्याचे याचिकाकर्त्यांनी म्हटले आहे. त्यातच व्हिडीओदेखील समोर आला असून यात आग लावण्याची धमकी देताना युवक दिसतोय. तसेच सोशल मीडियावर प्रसिद्धीसाठी हा सगळा प्रकार केल्याच्याही बातम्या समोर आल्या आहेत. त्यामुळे उत्तराखंड पेटवण्यामागे कोणाचा हात आहे, यामागे त्यांचा काय फायदा आहे, यासाठी उत्तराखंडमधील धामी सरकारनेही चौकशी सुरू केली आहे. सध्या लोकसभा निवडणुका असताना, अशा प्रकारच्या आगी लावून वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न का आणि कशासाठी केला जातोय, हे समोर येणे आवश्यक आहे. आगी लावून प्रशासनाला आव्हान देण्याचा हा पॅटर्न वेळीच मोडीत काढणे गरजेचे आहे.
सुंडकेंची खोड
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पवित्र मातीत शेकडो किल्ले आजही स्वराज्याच्या संघर्षगाथेची आठवण करून देतात. आपला देदिप्यमान इतिहास सांगतात. रयतेला छळणार्या आणि स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा कोथळा बाहेर काढून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला याच मातीत गाडलं. नव्हे नव्हे, तर छत्रपती शिवरायांनी स्वराज्यावर चालून आलेल्या प्रत्येक पिलावळीला याच मातीत गाडलं. परंतु, याच महाराष्ट्रात आता हिंदूंवर अनन्वित अत्याचार करणार्या टिपूच्या उदात्तीकरणाची प्रकरणे समोर येत आहे. मुंबई, नाशिक अशा अनेक ठिकाणी या ना त्या कारणाने टिपूचे उदात्तीकरण केल्याच्या घटना समोर आल्या आहेत. त्यात आता पुण्यातही टिपूचे उदात्तीकरण करण्याचा प्रकार घडला.
 
‘एमआयएम’ने पुणे लोकसभा मतदारसंघासाठी अनिस सुंडके यांना उमेदवारी दिली. या महाशयांना आता खासदार होण्याची स्वप्नही पडू लागली आहेत. पुणे शहराचा खासदार झाल्यावर टिपू सुलतानचं भव्य स्मारक उभारणार अशी घोषणा ‘एमआयएम’चे उमेदवार अनिस सुंडके यांनी केली आहे. टिपूचं कार्य लक्षात घेऊन टिपूचं स्मारक बांधण्याचा चंग या महाशयांनी बांधला. परंतु, सुंडके महाशय विसरले की, हे हैदराबाद नाही, तर पुणे आहे. पुणेकर अशा कित्येक सुंडक्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवून द्यायला कमी करणार नाही. बरं यांचे पक्षप्रमुख हैदराबादचे खा. असदुद्दीन ओवेसी यांना पळता भुई थोडी झाली आहे. भाजप उमेदवार माधवी लता सध्या हैदराबाद मतदारसंघ पिंजून काढताय. तिथे त्यांना लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळेत आता ओवेसींना बीफ, हिंदू-मुस्लीम अशा गोष्टींवर अधिक भर द्यावा लागत आहे. मागे एका व्हिडिओचा आधार घेत माधवी लता यांची बदनामी करण्याचाही प्रयत्न झाला, मात्र तो पुरता फसला. 
 
या लोकसभा निवडणुकीला ओवेसी आपल्या मतदारसंघातच अडकून पडले आहेत. माधवी लता या आपल्या अभ्यासपूर्ण भाषणांनी लोकांची मने जिंकत असताना ‘एमआयएम’चे सुंडके मात्र अशा बेताल घोषणा करून हिंदू धर्मीयांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न करीत आहे. छत्रपती शिवरायांच्या या महाराष्ट्रात टिपूचे उदात्तीकरण करणार्यांना थारा नाही, हे सुंडकेंनी लक्षात घ्यावं. निवडणुकीत अनामत रक्कम तर जप्त होईलच, पण टिपू प्रेमाचीही परतफेड लवकरच जनता करेल, हे नक्की!

पवन बोरस्ते

सध्या दै. मुंबई तरुण भारत वृत्तपत्रामध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत. मागील नऊ वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय. स्वा. सावरकरांच्या जन्मभूमीत वास्तव्य. पुणे विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. राजकारण, मराठी साहित्य आणि जनसंपर्क वृद्धीत विशेष रुची.