अयोध्या येथील रामजन्मभूमी, ज्ञानवापी परिसर, श्रीकृष्ण जन्मभूमीप्रमाणे इस्लामी आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली भोजशाला म्हणजे हिंदूंचे मंदिर होते, हे या सर्व्हेक्षणातून सिद्ध होईल. याबद्दल कोणीही संदेह बाळगण्याचे कारण नाही!
मध्य प्रदेशात असलेल्या धार येथे परमार घराण्याची सत्ता होती. या परमार घराण्याने केवळ राजकीय सामर्थ्य दाखविले नाही, तर कला, वास्तुरचना या क्षेत्रांतही अनेक प्रकारची उल्लेखनीय कामगिरी केली. दहाव्या आणि तेराव्या शतकाच्या दरम्यान मध्य भारताच्या बहुतांश भागावर परमार घराण्याची सत्ता होती. धार ही त्या साम्राज्याची राजधानी. या घराण्यातील सुप्रसिद्ध राजा म्हणजे राजा भोज! याच्या काळात त्या राज्यात कला, विविध वास्तुरचना असलेल्या वास्तू आकारास आल्या. याच राजा भोज याने धारमध्ये सरस्वती किंवा वाग्देवीचे मंदिर उभारले.
राजा भोज याच्या काळात हे मंदिर हे विद्यादानाचे मोठे केंद्र बनले होते. यात्रेकरूही मोठ्या संख्येने या मंदिरास भेट देण्यासाठी येत. पण, नंतरच्या काळात इस्लामी आक्रमकांची वक्रदृष्टी या मंदिरावर पडली. अलीकडेच काशीमधील ज्ञानवापी परिसराचे भारतीय पुरातत्व खात्याकडून जसे सर्वेक्षण करण्यात आले, तसेच सर्वेक्षण करण्याचा आदेश मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला. भोजशाला नावाने ओळखली जात असलेली वास्तू नेमकी काय आहे, यामागील सत्य शोधून काढण्यासाठी असे सर्वेक्षण करण्याचा आदेश न्यायालयाने दिला. खरे म्हणजे, या भोजशालेची वास्तू पाहिल्यास ही हिंदूंची वास्तू असल्याचे कोणाच्याही लक्षात येईल आणि आता सर्वेक्षणातूनही ते सिद्ध होईल.
या भोजशालेच्या पश्चिम आणि उत्तर भागावर नजर टाकल्यास हिंदू मंदिराचे अवशेष तेथे आढळून येतात. ब्रिटिश राजवटीत एका ब्रिटिश अधिकार्यास तेथे देवी सरस्वतीची मूर्ती सापडली. सध्या ही मूर्ती ब्रिटिश म्युझियममध्ये आहे. भारतीय पुरातत्त्व खात्याने १९८७ मध्ये जे उत्खनन केले होते, त्यावेळी हिंदू धर्माशी संबंधित ३२ शिल्पे आढळून आली होती. इस्लामी आक्रमकांनी हिंदू मंदिरांचे अवशेष वापरून अन्यत्र जशा वास्तू उभारल्या, तसाच प्रकार भोजशाला परिसरात थडगी उभारण्यासाठी केला. हे हिंदू मंदिराचे अवशेष आहेत, असे ओळखले जाऊ नये म्हणून त्या अवशेषांना हिरवा रंग फासण्यात आला.
पण, अशी कितीही बनवाबनवी केली असली तरी भोजशाला म्हणजे सरस्वतीचे मंदिरच असल्याचे आज न उद्या सिद्ध झाल्यावाचून राहणार नाही. काशी विश्वनाथाचे मंदिर पाडून मशीद उभारण्यात आल्याचे जसे पुरातत्त्व खात्याच्या सर्वेक्षणातून सिद्ध झाले, तसेच भोजशालेबाबतही होणार आहे. भोजशाला ही मशीद असल्याचा दावा मुस्लीम समाजाकडून केला जात आहे. पण, तो दावा बिनबुडाचा आहे. त्याला काही आधार नाही. इस्लामी आक्रमकांनी अशी मंदिरे पाडून त्या मशिदी असल्याचे म्हटल्याने त्या मशिदी ठरत नाहीत!
प्रा. आलोक त्रिपाठी यांच्या नेतृत्वाखाली पुरातत्व अभ्यासकांची एक तुकडी भोजशालेत असलेल्या शिलालेखांचा अभ्यास करणार आहे. तसेच या परिसरात जो दर्गा आहे, त्याचाही अभ्यास करण्यात येणार आहे. या भागात जे मंदिर होते, त्याच्या ‘अधिष्ठाना’चे अवशेष त्या ठिकाणी अजून विद्यमान आहेत. त्यांचाही अभ्यास सर्वेक्षण तुकडीकडून केला जाणार आहे. सर्वेक्षणानंतर जो तपशीलवार अभ्यास करण्यात येणार आहे, त्याचा अहवाल मध्य प्रदेश उच्च न्यायालयास सदर करण्यात येणार आहे. अयोध्या येथील रामजन्मभूमी, ज्ञानवापी परिसर, श्रीकृष्ण जन्मभूमीप्रमाणे इस्लामी आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली भोजशाला म्हणजे हिंदूंचे मंदिर होते, हे यातून सिद्ध होईल. याबद्दल कोणीही संदेह बाळगण्याचे कारण नाही!
रुचिरा कंबोज यांनी युनोत पाकिस्तानला खडसावले!
संयुक्त राष्ट्रांच्या सर्वसाधारण सभेत बोलताना पाकिस्तानच्या प्रतिनिधीने भारतावर तोंडसुख घेण्याचा पुन्हा प्रयत्न केला. पण, पाकिस्तानच्या प्रतिनिधीस संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या कायमच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी चांगलेच खडसावले आणि त्यांचे तोंड बंद केले. गेल्या ३ मे रोजी पाकिस्तानी प्रतिनिधी मुनीर अक्रम यांनी, नवी दिल्लीकडून पाकिस्तानमध्ये लक्ष्य निश्चित करून हत्या केल्या जात असल्याचा आरोप केला. केवळ पाकिस्तानमध्येच नाही, तर अमेरिका व कॅनडामध्येही असा दहशतवाद भारताकडून केला जात असल्याचा आरोप पाकिस्तानी प्रतिनिधीने केला.
पाकिस्तानच्या या वक्तव्यावर त्या देशाचे नाव न घेता रुचिरा कंबोज यांनी भारत नेहमीच विधायक चर्चेवर भर देत आला आहे. त्यामुळे आमच्यावर जे आरोप करण्यात आले आहेत, ते दुर्लक्ष करण्याच्या योग्यतेचे आहेत. नको तेथे नको ते मुद्दे उपस्थित करून त्यांनी औचित्यभंगही केला आहे. दहशतवादास आश्रय देण्याचा ज्या देशाचा इतिहास आहे, त्यांनी इतरांना सल्ले देण्याच्या फंदात पडू नये, असेही त्यांनी सुनावले. दहशतवाद हा पूर्णपणे शांततेच्या संस्कृतीच्या विरुद्ध आहे.
दहशतवादाद्वारे वैरभावाची बीजे जोपासली जातात, असेही रुचिरा कंबोज यांनी पाकिस्तानचे नाव न घेता त्या देशास सुनावले. संयुक्त राष्ट्रांमध्ये पाकिस्तान संधी मिळेल, तेव्हा भारतास लक्ष्य करण्याचा प्रयत्न करीत असतो. आपण दहशतवादास राजाश्रय द्यायचा आणि भारत दहशतवाद जोपासत आहे, अशा चोराच्या उलट्या बोंबा मारायच्या, ही पाकिस्तानची जुनी खोड आहे. पण, केंद्रातील मोदी सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले आहे. आमच्यावर हल्ला केल्यास घरात घुसून मारू, असे केवळ सांगितले नाही, तर भारताने ते दाखवून दिले आहे. भारत आता पूर्वीचा राहिलेला नाही हे पाकिस्तानने अजून लक्षात घेतल्याचे दिसत नाही!
मंदिरास मिळणारा महसूल सरकारने उघड करण्याची मागणी
तामिळनाडू राज्यात मंदिरांच्यासाठी कार्य करीत असलेले कार्यकर्ते टी. आर. रमेश यांनी तामिळनाडू सरकारच्या हिंदू धार्मिक आणि धर्मादाय देणगी खात्याचे मंत्री शेखर बाबू यांना आव्हान दिले असून, सन २०२०-२०२१ आणि २०२३ -२०२४ या काळात मंदिरास भाड्याच्या महसुलापोटी किती रक्कम मिळाली, हे सार्वजनिकरीत्या उघड करण्यात यावे, असे आव्हान दिले आहे. मंदिरांना मिळणार्या पैशांचा गैरवापर होत असल्याचे रमेश यांचे म्हणणे आहे. त्यातूनच किती पैसे प्राप्त झाले, याची माहिती उघड करण्याचे आव्हान त्यांनी तामिळनाडू सरकारला दिले आहे.
चेन्नई येथील कोदम्बक्क्म येथे असलेल्या भरतवजेश्व्र मंदिराचे उदाहरण देऊन हिशोबातील विसंगती दाखवून दिली आहे. भाड्यापोटी या मंदिरास दरवर्षी १०० कोटी उत्पन्न मिळायला हवे. त्या उत्पन्नाचा उपयोग हिंदू समाजाच्या हितासाठी करता आला असता. पण, प्रत्यक्षात तसे होताना दिसून येत नाही. मंदिरास मिळणार्या या रकमेचा उपयोग शेकडो हिंदू तरुणांना नोकर्या देण्यासाठी, हिंदू बालकांना शिक्षण देण्यासाठी करता आला असता, हे रमेश यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मंदिरास मिळणार्या हक्कांच्या पैशास कसे पाय फुटतात, हे रमेश यांनी संबंधित मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले आहे.
तामिळनाडू राज्यातील केवळ एका मंदिराचे हे उदाहरण झाले. अन्य मंदिरांच्या बाबतही असे प्रकार नक्कीच घडत असणार! रमेश हे मंदिर परिसरात उभारण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांकडेही प्रशासनाचे लक्ष वेधतात. तिरुवन्नमलई येथील श्री अरुणाचलेश्वर मंदिराच्या राजगोपुरमच्या अगदी समोर उभारण्यात आलेल्या १५० अनधिकृत दुकानांकडे त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. ही घटना २०२३ या सालातील. त्यानंतर रमेश यांनी न्यायालयात दाद मागितली आणि या सर्व बांधकामांवर स्थगिती आणली. हा मंदिरात येणार्या भक्तांचा विजय असल्याचे रमेश यांनी म्हटले होते. रमेश यांच्यासारखे जागरूक कार्यकर्ते सरकारी गैरकारभारावर कसा अंकुश ठेवू शकतात त्याचे हे उदाहरण!
९८६९०२०७३२