बारामतीत पवार विरुद्ध पवार राजकारण पुन्हा तापलं; अजितदादांनी केली रोहित पवारांची नक्कल
06-May-2024
Total Views | 59
पुणे : बारामती लोकसभेत पुन्हा एकदा पवार विरुद्ध पवार राजकारण तापलं आहे. सुनेत्रा पवारांच्या प्रचार सभेत बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवारांची नक्कल केली आहे. तसेच बारामतीकर ही नौटंकी सहन करणार नाहीत, असे ते म्हणाले आहेत.
रोहित पवार एका सभेत बोलताना भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. "जोपर्यंत नवी पीढी जबाबादारी घेत नाही तोपर्यंत मी माझे डोळे मिटणार नाही, असे शरद पवार म्हणाले होते," असा किस्सा त्यांनी सांगितला. यावेळी बोलताना ते भावूक झाले आणि त्यांच्या डोळ्यात अश्रू आले.
त्याचवेळी अजित पवारांनी आपल्या सभेत प्रत्युत्तरादाखल त्यांची नक्कलच करुन दाखवली. ते म्हणाले की, "शेवटच्या क्षणी लोक तुम्हाला भावनिक करण्याचा प्रयत्न करतील, हे मी सांगितलं होतं. आता आमच्या एका पठ्ठ्याने डोळ्यातून पाणी काढून दाखवलं. मग मी पण दाखवतो," असे ते म्हणाले. यावेळी त्यांनी रोहित पवारांचा व्हिडीओही दाखवला.
अजित पवार पुढे म्हणाले की, "असली नौटंकी बारामतीकर खपवून घेणार नाही. तुम्ही तुमचं काम दाखवा. तुमचं खणखणीत नाणं दाखवा. हा रडीचा डाव झाला. मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगत होतो की, काहीजण भावनिक होतील. रोहित पवारांना मी जिल्हा परिषदेची तिकीटं दिली. साहेबांनी नाही म्हटल्यानंतरही मी ते दिलं होतं. त्यानंतर त्यांना हडपसरमध्ये उभं राहायचं होतं. त्यावेळी मी त्यांना कर्जत-जामखेडला जाण्यास सांगितलं. मात्र, आम्ही तुम्हाला राजकारणाचे बाळकडू पाजलेले असताना आज तुम्ही आमच्यावर टीका करत आहात. तुझ्यापेक्षा कितीतरी जास्त उन्हाळे आणि पावसाळे मी बघितले आहेत," असेही ते म्हणाले.