काँग्रेसला १२ आणि आम्हाला ९ जागा मिळतील : शरद पवार
04-May-2024
Total Views | 219
मुंबई : लोकसभा निवडणूकीमध्ये काँग्रेसला १२ जागा आणि आम्हाला ९ जागा मिळतील, असा दावा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी केला आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही टीका केली. त्यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला.
शरद पवार म्हणाले की, "सध्या माझं लक्ष १० जागांवर आहे. मागच्या वेळी काँग्रेसला एक जागा मिळाली आणि आम्हाला पाच जागा मिळाल्या. तसेच औरंगाबादची एक जागा एमआयएमला मिळाली होती. म्हणजेच महाराष्ट्रात सहा जागा मिळाल्या होत्या. यावेळी काँग्रेसला कमीत कमी १०-१२ जागा मिळतील आणि आम्हाला ८-९ जागा मिळतील. यावेळीचं चित्र आणि मागच्या चित्रात जमीन आसमानाचा फरक आहे," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "सध्या परिस्थिती वेगाने बदलत आहे. मागच्या पाच वर्षांच्या निवडणूकीमध्ये मोदींविषयी असलेली आस्था आता कमी झाल्याचे दिसते. विशेषत: शेतकरी फार अस्वस्थ आहे. बेछूटपणे बोलण्याचा मोदींचा स्वभाव आहे. २०१४ ला त्यांनी डॉ. मनमोहन सिंग यांच्या निर्णयावर अनेक ठिकाणी टीकाटिपण्णी केली. पण आज तेच निर्णय ते स्वत: राबवायचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे लोकांना हा विरोधाभास दिसत असल्याने ते नाराज आहेत," असेही ते म्हणाले. तसेच उद्धव ठाकरेंवर मोदींची मदत घेण्याची वेळ येऊ नये, असेही ते म्हणाले आहेत.