नाशिक : ऐन लोकसभा निवडणुकीची धामधूम असूनही केंद्र सरकारने नुकताच शेतकरी हिताचा निर्णय घेऊन तब्बल ९९ हजार, १५० मेट्रिक टन कांदा निर्यातीला परवानगी दिली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचे नाशिकच्या कांदा उत्पादक शेतकर्यांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले आहे.
साधारण जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर ते फेब्रुवारी आणि जानेवारी ते जून असे कांद्याचे अनुक्रमे पोळ, लाल आणि उन्हाळी असे तीन हंगाम असतात. यामध्ये प्रामुख्याने पोळ आणि लाल कांदा काढणीनंतर लगेच बाजारात विकावा लागतो, तर उन्हाळी कांदा साठवता येतो. मात्र, पोळ आणि लाल कांदा हंगामात निर्यातबंदी झाली होती. याचा काहिसा प्रतिकूल परिणाम शेतकर्यांवर झाला होता. आता निर्यातबंदी उठवल्याने शेतकर्यांच्या मालाला चांगला भाव मिळणार आहे. हा कांदा आता श्रीलंका, भूतान, बांगलादेश, बहरीन, यूएई आणि मॉरिशस या देशांमध्ये निर्यात केला जाणार आहे.
निर्यातबंदीमुळे जो कांदा १० ते १२ रुपये किलोने विकावा लागत होता, तोच कांदा आता निर्यातीमुळे १८ ते २० रुपये प्रति किलोप्रमाणे विकला जात आहे. सध्या बाजारात लाल कांदा मोठ्या प्रमाणात विक्रीला आला आहे. याची टिकण्याची क्षमता साधारण एक ते दीड महिना असते. त्यामुळे व्यापार्यांकडून शेतकर्यांची नेहमीच अडवणूक केली जाते. परिणामी, शेतकर्यांना मिळेल त्या दरामध्ये आपला माल विकावा लागतो. परंतु, आता केंद्राकडून निर्यातीला परवानगी मिळाल्यामुळे व्यापार्यांना आता हाच माल चांगला भाव देऊन जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारने घेतलेल्या कांदा निर्यातीच्या निर्णयामुळे शेतकर्यांमध्ये समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
अतिरिक्त मालालाही मिळणार चांगला दर!
कांदा साठवण्यासाठी आवश्यक असलेल्या चाळ उभारण्यासाठी शेतकर्यांवर मर्यादा येतात. या चाळींमध्ये कांदा साठवल्यानंतर अतिरिक्त कांदा शेतकर्यांना बाजारात विकावा लागतो. तो माल १३ ते १४ रुपयांना विकला जात होता. परंतु, निर्यातबंदी उठवल्यामुळे आता कांदा १८ ते २० रुपयांना विकला जात आहे. अतिरिक्त मालालाही आता चांगला दर मिळत आहे. त्यामुळे संपूर्ण वर्षाचे अर्थकारण कांद्यावर अवलंबून असलेल्या शेतकर्यांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
- बापुराव पिंगळे, अध्यक्ष, भाजप नाशिक महानगर किसान मोर्चा
मेहनतीचे फळ मिळेल!
कांदा निर्यातीला परवानगी देण्याचा हा निर्णय अतिशय चांगला म्हणता येईल. उत्पादन खर्च निघेल की नाही, हा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, कांदा निर्यातबंदी उठवल्यामुळे आता केलेल्या मेहनतीचे नक्कीच फळ मिळेल.