उत्तर मध्य मुंबईत 'एमआयएम'च्या एन्ट्रीमुळे ट्विस्ट
राजकीय समीकरणे बदलली; वर्षा गायकवाड यांची डोकेदुखी वाढली
04-May-2024
Total Views | 246
मुंबई : भाजपने आयत्यावेळी उज्ज्वल निकम यांच्यासारखा आश्वासक चेहरा रिंगणात उतरवल्यामुळे काँग्रेस आधीच टेन्शनमध्ये असताना, उत्तर मध्य मुंबईत 'एमआयएम'च्या एन्ट्रीमुळे त्यांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. दिग्गजांनी साथ सोडल्यानंतर केवळ मुस्लिम मतांचा आधार होता. आता त्यांचेही विभाजन होणार असल्याने काँग्रेसच्या चाकातील हवाच निघून गेली आहे.
मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष वर्षा गायकवाड दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघासाठी प्रयत्नशील होत्या. मात्र, उद्धव ठाकरेंनी अनिल देसाई यांना परस्पर उमेदवारी जाहीर करून काँग्रेसची कोंडी केली. याविषयी प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी चकार शब्दही काढला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या वर्षा यांनी हायकमांडकडे तक्रार केली खरी; परंतु त्यांच्या नाराजीची दखल घेण्यात आली नाही. अशावेळी धारावी पट्ट्यातील दीड-दोन लाख मते हातात असलेल्या गायकवाड यांची नाराजी अनिल देसाई यांना मारक ठरेल, ही बाब हेरून ठाकरेंनी उत्तर मध्य मुंबईतून वर्षा यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडे आग्रह धरला. त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. त्यामुळे हायकमांडने दक्षिण मध्य ऐवजी उत्तर मध्य मुंबईतून लोकसभा लढवण्याची सूचना त्यांना केली.
त्यानुसार, उमेदवारी जाहीर होताच वर्षा गायकवाड यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. ठाकरेंनीही आपले मत वर्षाताईंनाच, असा शब्द दिल्यामुळे त्या हर्षोल्लासित झाल्या. परंतु, त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद फारकाळ टिकला नाही. भाजपने मास्टरस्ट्रोक खेळत ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांच्या रुपाने एक आश्वासक चेहरा मैदानात उतरवला आणि काँग्रेसने अर्धी लढाई जागीच गमावली. त्यात भर म्हणजे माजी आमदार नसिम खान आणि भाई जगताप यांनी गायकवाड यांचे काम न करण्याचे जाहीर केले. त्यामुळे आधीच पंचाइत झालेली असताना, शेवटच्या क्षणाला 'एमआएम'ने उमेदवार देत काँग्रेसच्या चाकातील हवाच काढली.
मतविभाजनाचा फटका बसणार
वर्षा गायकवाड यांची सगळी भिस्त ही मुस्लिम आणि दलित मतदारांवर आहे. अशावेळी 'एमआएम'ने रमजान चौधरी यांना रिंगणात उतरवल्याने मुस्लिम मतांचे विभाजन होईल. त्याचवेळी वंचित बहुजन आघाडीने संतोष अंबुलगे यांच्या रुपाने उमेदवार दिल्यामुळे दलित मतांच्या विभाजनाचा फटकाही त्यांना बसणार आहे.