दरवळते साहित्य माधुर्य...

    31-May-2024
Total Views | 63
Madhuri Vaidya
विद्यार्थीदशेत शाळेच्या मासिकात लिखाणाचा श्रीगणेशा करून उतारवयातही साहित्यात मुशाफिरी करणार्‍या चतुरस्र लेखिका माधुरी वैद्य यांच्याविषयी...

गेली अनेक वर्षे संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणार्‍या कल्याणच्या माधुरी वैद्य यांचा जीवनप्रवास थक्क करणारा आहे. नोकरी, संसार सांभाळून त्यांनी केलेला प्रवास, साहित्यातील मुशाफिरी, महाराष्ट्रभर दिलेली व्याख्याने या सार्‍यांची गोळाबेरीज फार मोठी आहे. कविता, कादंबरी, कथालेखन, प्रवासवर्णन, आठवणी इत्यादी विविध पुस्तकांबद्दल त्यांना अनेक मानाचे पुरस्कार मिळाले आहेत. कथा, कविता, लेख, चारोळ्या, कादंबरी, नाटक, एकांकिका वगैरे सर्व प्रकार त्यांनी हाताळले. पण, लेखनाचा श्रीगणेशा झाला तो शाळेच्या मासिकातून. विद्यार्थीदशेत शाळेच्या मासिकात त्यांचा एखादा लेख किंवा कविता छापून आली की त्यांना खूप आनंद व्हायचा.
माधुरी यांच्या घरची परिस्थिती बेताचीच. वडील साखर कारखान्यात वायरमन, तर आई घरीच शिलाईकाम करायची. कारखाना चालू असेल, तर पूर्ण पगार मिळायचा. पण, कारखाना बंद झाला की, अर्धा पगार पुढचा सिझन चालू झाल्यावर मिळायचा. मधल्या काळात वडील इलेक्ट्रिकची कॉन्ट्रॅक्टची कामे घेत. तसेच त्यांनी इतर अनेक जोडधंदे केले. आईने शिलाईकाम केलेल्या कपड्यांना काजबटणदेखील करायचे. माधुरीही त्यांना मदत करीत असत. वडील दंतमंजन बनवीत, तर कधी सरबताच्या गोळ्या आणून विकत. ते सतत उद्योगी राहात. “सांगलीहून वडील त्यांच्या मित्राच्या कारखान्यातून हळद, तिखट, शिकेकाई, मसाला इ. माल एसटीतून पार्सलने मागवायचे. त्याचे आम्ही छोट्या छोट्या वजनाची पाकिटे तयार करून ते विकायचो. रात्र रात्र पॅकिंग करत बसायचो कारण, मालाच्या शुद्धतेच्या खात्रीमुळे ग्राहक वाट बघत असायचे. वडिलांनी घराच्या एका दरवाजावर ‘जनसेवा हीच ईश्वरभक्ती’ अशी अक्षरे रंगविली होती, ती माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहेत,” असे माधुरी सांगतात.
माधुरी यांचे शिक्षण सलग झाले नाही. त्यांच्या गावात अकरावीपर्यंत शाळा होती. पण, मध्येच त्यांना आजीबरोबर सांगलीला जावे लागले. तेथील मनपा शाळेत सातवीपर्यंत शिक्षण झाले. पुन्हा आठवी ते अकरावीपर्यंतचे शिक्षण श्रीपूरच्या शाळेत झाले. गावात महाविद्यालय नसल्याने पदवीपूर्व शिक्षण रोज दहा मैल एसटीने जाऊन पूर्ण केले. एक एसटी गेली की दुसरी दोन तासांनी येत असे. त्यामुळे शिक्षण आणि खेळाची आवड यांची सांगड घालताना चांगलीच तारेवरची कसरत होत असे. खेळाच्या वेडामुळे घरी पोहोचायला नेहमीच उशीर होत असे. पुढच्याच वर्षी योगायोगाने त्या सांगलीला गेल्या आणि पुढे जी. ए. कॉलेजमधून बी. कॉम. उत्तीर्ण होऊन परत गावी आल्या. वडील म्हणाले, “तू परत जा. अजून पुढे शिक. लॉ किंवा एम. कॉम. कर. मी तुला कर्ज काढून शिकवीन.” पण, ‘कर्ज’ शब्द ऐकून त्यांनी माघार घेतली. कारण, माधुरी यांच्या मागची दोन भावंडे अजून शिकायची होती. यासाठी ‘यापुढील शिक्षण स्वबळावर घेईन’ असा शब्द वडिलांना देत नोकरीचा शोध सुरू केला.
 
सुरुवातीला त्यांच्याच शाळेत काही काळ शिक्षिकेची नोकरी करून मग ‘एमपीएससी’च्या परीक्षेसाठी त्या पुण्याला गेल्या. तेथे एका जुन्या ओळखीच्या बाईंकडे काही दिवस राहिल्या. थोड्याच दिवसांत एक नोकरी मिळवून माधुरी वसतिगृहात राहायला गेल्या. ‘एमपीएससी’ परीक्षेचा निकाल लागून माधुरी यांना राज्य शासनाच्या सेवेमध्ये थेट भरतीचे पत्र त्यांच्या मूळ गावी पोहोचले, तोपर्यंत माधुरी यांनी पाच-सहा नोकर्‍या केल्या होत्या. गावी आलेले नोकरीचे पत्र घेऊन वडील पुण्यातील त्यांच्या वसतिगृहात धडकले. वडिलांनी त्यांना तातडीने मुंबईकडे रवाना होण्यास बजाविले. वडिलांचा आदेश शिरसावंद्य मानून दुसर्‍याच दिवशी माधुरीने मुंबईकडे प्रस्थान केले. खाकीच्या सेवेत रूजू झालेल्या असताना चार महिन्यांतच रिझर्व्ह बँकेच्या नोकरीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याने त्यांना रिझर्व्ह बँकेच्या मुलाखतीचा कॉल आला. मुलाखतीत उत्तीर्ण होऊन त्या रिझर्व्ह बँकेत रूजू झाल्या.
माधुरी यांची रिझर्व्ह बँकेतील कारकीर्द खूप गाजली. टोकाचा संघर्ष करूनही उपयोगी आणि अजातशत्रू राहून ३७ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर डिसेंबर २०१५ मध्ये त्या सेवानिवृत्त झाल्या. माधुरी यांनी चाकरमानी म्हणून बजाविलेल्या आठवणींना उजाळा दिला. माधुरी यांना मूळ आवड लिखाणाची असल्याने तो प्रवास त्यांनी शेवटपर्यंत चालू ठेवला असून, त्यातून निवृत्त होणार नसल्याचे त्या सांगतात. आत्तापर्यंत त्यांची १२-१३ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. सर्वात जास्त गाजलेले पुस्तक म्हणजे त्यांनी कोरोना काळात लिहिलेले ‘माझी नर्मदा परिक्रमा- एक अनुभव.’ हे पुस्तक आजही प्रचंड लोकप्रिय आहे. ‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठा’तून त्यांनी एम.बी.ए. (फायनान्स) ही पदव्युत्तर पदवी घेतली. त्यानंतर, सीएआयआयबी (सर्टिफिकेटेड असोसिएट ऑफ इंडियन इन्स्टिटयूशन ऑफ बँकर्स) पूर्ण केले. सध्या त्यांची पाच पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. अशा या हरहुन्नरी चतुरस्र व्यक्तिमत्वाला पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मनःपूर्वक शुभेच्छा!

दीपक शेलार
(अधिक माहितीसाठी संपर्क - ९८२०८५०५१४)
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121