साधारणत: दोन महिन्यांपूर्वी देशात लोकसभेच्या रणसंग्रामाचे रणशिंग फुंकले गेले. आजपासून बरोबर दोन दिवसांनी या रणात गेले दोन महिने अविरत गर्जणार्या तोफा थंडावतील. अनेकांच्या तलवारी म्यान होतील. मग श्रमपरिहारासाठी साधारणपणे काही दिवसांची सुट्टी, आपल्या कुटुंबाबरोबर घालवण्यासाठी नेते मंडळी बाहेर पडतील, अशी सर्वसाधारण प्रथा. पण, पंतप्रधान मोदी त्याला अपवाद. दि. ३१ मेच्या संध्याकाळपासून ते १ जूनच्या सकाळपर्यंत दक्षिण भारतातील कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद शीळा स्मारक इथे साधना आणि चिंतन करणार आहेत. हे समजल्यावर मात्र विरोधकांनी जोरदार विरोधाला सुरुवात केली. दक्षिणेत द्रमुक या पक्षाने, तर देशात काँग्रेसने यावर जोरदार आक्षेप घेत, अगदी निवडणूक आयोगाकडे धाव घेतली आहे.
मुळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असा कोणताही विशेष परिवार नसल्याने, ते साधना करण्यासाठी अशा एकान्त स्थळी रवाना होतात. २०१९च्या निवडणुकीनंतर देखील पंतप्रधान मोदींना केदारनाथच्या गुहेत ध्यानस्थ बसलेले देशाने पाहिले. त्यामुळे हे काही पहिल्यांदाच घडते आहे असे नाही. पण, मोदींच्या कोणत्याही गोष्टीला फक्त विरोधच करायचा, हाच एकमेव अजेंडा विरोधकांचा असल्याने, यावर किमान मौन बाळगण्याचे भानदेखील त्यांना राहिलेले नाही. यावेळी ’आचारसंहितेचा भंग’ या कारणाने गळे काढत, मोदींच्या या दौर्याचा विरोध सुरु आहे. ’शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये’, अशी म्हण मराठीत प्रचलित आहे. इकडे तर कपिल सिब्बल आणि अभिषेक मनू सिंघवी हे दोघेही कायमच विरोधकांना न्यायालयाची पायरी चढायला लावतात. यातून या दोघांना काय मिळायचे ते मिळेलही, पण विरोधकांना काही मिळते का? हा संशोधनाचा विषय.
यावेळीदेखील मोदींच्या ध्यानधारणेला विरोध करताना, न्यायालयात जाण्याची तयारी विरोधक करत आहेत. मग निवडणुकीचा शीण घालवण्यासाठी ‘इंडी’ आघाडीतले अनेक राजकारणीदेखील सध्या परदेशात असल्याची चर्चा आहे. मग त्यांचे काय? मुळातच पराभवाच्या भीतीने पायाखालची वाळू सरकल्याने विरोधक सैरभैर झाले आहेत, परिणामी असे बालिश चाळे ते करताना दिसतात.
आडनावाचा‘च’ वारसा!
सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये गांधींजींविषयी केलेले वक्तव्य, चर्चेचा विषय ठरले आहे. अर्थात या ‘चर्चेच्या विषया’ला माध्यमांमधीलच काही खोडसाळ कारणीभूत. त्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की, ‘’नेल्सन मंडेला किंवा मार्टिन ल्युथर किंग यांच्यासारखी प्रसिद्धी महात्मा गांधीजी यांना जगात मिळाली नाही. जेव्हा त्यांच्यावर चित्रपट आला, तेव्हा जगाला गांधीजी अधिक समजले. जगातील अनेक समस्यांचे समाधान गांधीजींच्या विचारात आहे. त्यामुळे गेल्या ७० वर्षांत, आपण खूप काही गमावले आहे.‘’ मोदींच्या या वक्तव्याला ’जगात गांधीजींना कोणी ओळखत नव्हते, चित्रपटामुळे गांधीजी जगाला समजले’ असे खोडसाळपणे प्रस्तुत करण्यात आले. त्यामुळे नाहक वादंग उभा राहिला. या वादंगात मोदी यांचे कट्टर विरोधक असणार्या युवराज राहुल गांधी यांनी उडी घेतली. ‘रा. स्व. संघाच्या शाखांमध्ये जाणारे गांधीजींना समजू शकत नाहीत, ते गोडसेंच्या विचाराने चालतात,’ अशी टीका युवराजांनी केली. मुळातच ‘गांधी’ हे आडनाव वगळता, गांधीजींच्या सत्य, अहिंसा, अस्तेय, अपरिग्रह, ब्रह्मचर्य या विचारांचा कोणता वारसा खुद्द राहुल गांधींनी घेतला आहे? बरं, आडनाव मिळवण्यातसुद्धा यांचे ते योगदान काय?
त्यासाठी कुठलेही पूर्वग्रहदूषित न राहता देश हिंडावा लागतो. नुसते काही हजार किलोमीटर भ्रमंती केल्याने देश कळत नाही, त्याने राजकीय पर्यटनच होते. गांधीजींनी त्यांच्या हयातीत संघांच्या शिबिरांना भेट दिल्याचेही संदर्भ इतिहासात आढळतात. पण, युवराज राहुल गांधी यांनी संघ कळण्यासाठी किंवा जाणून घेण्यासाठी असे कोणते विशेष परिश्रम घेतले? त्यामुळे आपल्याला वारसा हक्काने मिळालेल्या आडनावाच्या जोरावर, रा. स्व. संघाच्या नावाने सतत शिमगा केल्याने युवराजांना काहीही साध्य करता येणार नाही. यापूर्वीही बरेचदा राहुल गांधींनी संघावर अशाच अज्ञानातून टीका-टीप्पणी केली आहे. त्यावर तक्रारी नोंदवल्यानंतर त्यांना न्यायालयाचीही पायरी चढावी लागली. पण, यातून राहुल गांधींनी कोणताही धडा घेतलेला नाही. त्यामुळे ‘संघ शक्ती युगे युगे’ हे वास्तव युवराजांना कळेल तो सुदिन!