मध्यमवर्गीय असल्यामुळे शिक्षण पूर्ण करून मग नोकरी करा, हाच आवाज ऐकत लहानाच्या मोठ्या झालेल्या माधवी अष्टेकर यांनी त्यांच्या मनातील आवाज ऐकला आणि आपल्या जादूई आवाजाची भूरळ लोकांना पाडली. कशी? जाणून घेऊया..
मोठ्या पडद्यावर चित्रपटाच्या किंवा कार्टून्सच्या माध्यमातून जरी चित्र दिसत असले, तरी बर्याचदा ऐकू येणारा आवाज हा त्याच पात्राचा असेल असे नाही. मनोरंजन क्षेत्रात विविध माध्यमांद्वारे, कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी, दालने खुली करून दिली आहेत. त्यातीलच एक प्रकार म्हणजे ‘व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट.’ माधवी अष्टेकर यांनी सुप्रसिद्ध चित्रपट बाहुबली याच्या अॅनिमेटेड व्हर्जनला म्हणजेच, ‘क्राऊन ऑफ ब्लड’ या ‘डिस्नी प्लस हॉटस्टार’वर प्रदर्शित झालेल्या मराठी भाषेतील सीरिजमध्ये ‘शिवगामी’ या पात्राला आवाज दिला आहे. जाणून घेऊया त्यांच्या या प्रवासाबद्दल...
माधवी अष्टेकर यांचे बालपण मुंबईतील बोरिवली येथे गेले. लहानपणापासूनच अभिनय आणि चंदेरी दुनियेत त्यांना रस होता खरा, पण मध्यमवर्गीय कुटुंब असल्याकारणाने आईवडिलांनी अभिनय क्षेत्रात जाऊ दिले नाही. मात्र, जे नशिबात लिहिलेले असते, ते घडतेच, यावर विश्वास ठेवणार्या माधवी यांचा धागा मनोरंजन क्षेत्राशी आवाजाच्या मार्फत जुळलाच. माधवी यांनी ‘टुरिझम मॅनेजमेंट’ यात स्वित्झर्लंडमधून शिक्षण घेतले. नोकरी त्यांनी दुबईला केली. टुरिझम, सेल्स अशा विविध क्षेत्रांत नोकरी केल्यानंतर, काही काळाने त्या पुन्हा आपल्या मायदेशी भारतात परतल्या. मुंबईत पुन्हा आल्यावर त्यांनी काही काळ नोकरी केली, पण त्यात मन रमत नव्हते. आपल्या मनाला आनंद मिळेल, असे काही काम हाती लागले, तर ते करण्यात अधिक आनंद होईल, या विचारांमध्ये माधवी स्वत:ला चाचपडत राहिल्या.
माधवी यांचा आवाज, फार सुंदर असल्याचे अनेकांनी त्यांना सांगितले होते. पण, चांगला आवाज असल्यावर त्यातून करिअर घडविता येते, आणि पैसेदेखील कमविता येतात, याची त्यांना माहिती नव्हती. पण, जवळच्या मित्र-मैत्रिणींनी व्हॉईस ओव्हर हे एक मनोरंजनाचे माध्यम आहे आणि आपले आवाज वेगवेगळ्या पद्धतींनी रेकॉर्ड करून त्याचे सॅम्पल्स डबिंग कंपनीला पाठविले की, आपल्याला बोलवून जाहिरात, कार्टून्स किंवा अन्य कामांसाठी डबिंगचे काम मिळते, अशी माहिती माधवी यांना दिली. ते म्हणतात ना, घरातच खजिना असतो, पण तो आपल्याला नाही, तर शेजार्यांना चटकन शोधता येतो, तसेच झाले. माधवी यांच्या आवाजातील जादू लोकांनी शोधून काढली. त्यानंतर माधवी यांनी आपले आवाज रेकॉर्ड करून, काही डबिंग कंपनींना दिल्यानंतर, त्यांना अॅनिमेटेड सीरिजच्या डबिंगचे काम मिळण्यास सुरुवात झाली. त्यानंतर पुढे त्यांनी अनेक जाहिरातींसाठीदेखील कामे केली.
माधवी यांच्या पदरात मूल असल्यामुळे, अनेक तासांची नोकरी करणे, त्यांना शक्य नव्हते. त्याचमुळे ’व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट’ म्हणून काम करणे, त्यांना सोयीचे वाटले. त्यांच्या कामाचे तास वाचत होते, कुटुंबाकडे लक्ष देता येत होते, आणि महत्त्वाचे म्हणजे स्वतःची आवडदेखील या माध्यमामुळे जपता येत होती. माधवी यांनी डबिंग क्षेत्रात 2012 साली पदार्पण केले. मुळात हे क्षेत्र काय आहे, कसे चालते, याचे काहीही ज्ञान आणि अनुभव नसताना, माधवी यांनी घेतलेली झेप त्यांना थेट ‘शिवगामीचा आवाज’ अशी ओळख मिळवून देणारी ठरली.
परदेशातील नोकरी ते व्हॉईस ओव्हर आर्टिस्ट, हा प्रवास तसा माधवी यांना अनेक धडे जीवनात शिकवून जाणारा होता. डबिंग करताना कोणत्या पात्रासाठी आवाज कसा लागला पाहिजे, लिप्सिंग कसे असले पाहिजे, उच्चार कसे असले पाहिजेत, हे शिकण्यापासून माधवी यांनी प्रत्येक पायरी सर केली. यात अनेकांनी त्यांना अपमानास्पद वागणूकदेखील दिली. परंतु, आपल्याला या क्षेत्रात नाव कमवायचे आहे, आणि एक स्त्री तिची आवड ही नोकरीत बदलू शकते आणि त्यातून स्वतःच्यापायावर उभी राहू शकते, हा एकच ध्यास मनात ठेवून माधवी यांनी त्यांचा या क्षेत्रातील प्रवास सुरूच ठेवला. याशिवाय त्यांनी डबिंगचे शिक्षणदेखील घेतले, जेणेकरून त्यातील अनेक तांत्रिक बाबींचे त्यांचे ज्ञान, आणि आकलन वाढण्यास मदत होईल. शिकलेली विद्या कधीही वाया जात नाही, तर त्यामुळे आपली उत्तरोत्तर प्रगतीच होते, यावर माधवी यांनी पक्का विश्वास ठेवला.
‘वीर द रोबॉ बॉय’ या सीरिजमध्ये एका मुलीच्या पात्राचे, इंग्रजी भाषेत माधवी यांनी डबिंग केले होते. याशिवाय, लहान मुलीपासून ते म्हातार्या बाईपर्यंत, सगळ्यांच्या आवाजात त्यांनी आजवर विविध पात्रांना आपला आवाज दिला आहे. याशिवाय ‘काला’ चित्रपटात ईश्वरी राव, ‘बळी’ चित्रपटात एलिझाबेथ, ‘मोटू पतलू’ या कार्टूनमधील चिंगमची आई, या पात्रांसाठी माधवी यांनी डबिंग आर्टिस्ट म्हणून काम केले आहे. तर, सध्या त्यांनी बाहुबलीची अॅनिमेटेड सीरिज ‘क्राऊन ऑफ ब्लड’ या सीरिजच्या मराठी भाषेतील व्हर्जनमध्ये, ’शिवगामी’ या पात्राला मराठीत आवाज दिला आहे. आपल्यातील प्रत्येक कला ही उपयोगाचीच असते, आणि त्यामुळे समाजात आपली अनोखी ओळख निर्माण होते, यावर विचार करण्यास भाग पाडणार्या माधवी अष्टेकर यांना दै. ‘मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीस शुभेच्छा!
रुईया महाविद्यालय आणि मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेत पदव्युत्तर शिक्षण पूर्ण. चार वर्ष पत्रकारिता क्षेत्रात विविध वृत्तपत्र आणि डिजीटल माध्यमांत कार्यरत. सध्या 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मनोरंजन प्रतिनिधी' म्हणून कार्यरत.