मुंबई : हॉटेलव्यवसायिक जया शेट्टी हत्येप्रकरणी कुख्यात गुंड छोटा राजन याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गुरुवार, दि. ३० मे रोजी तब्बल २३ वर्षांनी मोक्का विशेष न्यायालयाने याप्रकरणी निकाल दिला. पत्रकार जे. डे. हत्येप्रकरणी छोटा राजन सध्या दिल्लीच्या तिहार कारागृहात शिक्षा भोगत आहे.
गावदेवी येथील गोल्डन क्राऊन हॉटेलच्या मालक जया शेट्टी यांची दि. ४ मे २००१ रोजी याच हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर छोटा राजन टोळीतील दोन गुंडांनी गोळ्या घालून हत्या केली होती. हॉटेल मॅनेजरच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी या प्रकरणात हत्येचा गुन्हा दाखल केला होता. छोटा राजन टोळीचा सदस्य असलेल्या हेमंत पुजारी याने जया शेट्टी यांना खंडणीसाठी कॉल केल्याचे तपासात स्पष्ट झाले. खंडणी देण्यास नकार दिल्यामुळे शेट्टी यांची गोळ्या घालून हत्या केल्याचा निष्कर्ष पोलिसांनी काढला.
यानंतर छोटा राजन आणि त्याच्या टोळीतील इतर आरोपीविरुद्ध खंडणी मागणे, तसेच मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. यापूर्वी २०१३ मध्ये दोन वेगवेगळ्या सुनावणीत न्यायालयाने अजय मोहिते, प्रमोद धोंडे, राहुल पावसरे यांना दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आता छोटा राजनलाही जन्मठेप सुनावण्यात आली. न्यायाधीश ए. एम. पाटील यांनी हा निकाल दिला.