कवी बींच्या कवितेतल्या लहरी धुंडाळताना कवी बींच्या वेधक शब्दखुणा...

    31-May-2024   
Total Views |
 Narayan Muralidhar Gupte
 नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांची आज जयंती. त्यांच्या काही कविता गाजल्या, प्रसिद्ध झाल्या. परंतु, त्या प्रदीर्घ असल्याने त्यातील काही भागच रसिकाभिमुख झाला. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या काव्यप्रतिभेचा पैस धुंडाळताना त्यांच्या कवितेत केलेली मुशाफिरी...
उत्कृष्ट साहित्यमूल्य असणार्‍या कविता पाहिल्या, तर तशा अनेक आहेत. चांगले लिहिणार्‍या कवींच्या कवितांची संख्याही तशी चांगलीच असते. कवी बींचा उल्लेख मला येथे विशेषत्वाने करावासा वाटतो. कारण, कवी बी यांनी केवळ ४९ कविता लिहिल्या. आपल्या ७९ वर्षांच्या कालावधीत त्यांनी केवळ दोन कवितासंग्रह प्रकाशित केले! पहिला ‘फुलांची ओंजळ’ हा संग्रह, या संग्रहाला आचार्य अत्र्यांनी प्रस्तावना दिली आहे, तर ‘पिकले पान’ हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. ‘फुलांची ओंजळ’ची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली, ती पाहणेही त्यांच्या नशिबात नव्हते. विद्यमान कवींच्या यादीत त्यांचे नाव वर घ्यावे लागेल आणि म्हणून त्यांच्या प्रसिद्ध कवितांचे संकलन करून त्यातून कवी बींच्या काव्यप्रेरणेविषयी जाणून घ्यावेसे वाटले.
 
बी दीर्घ लिहितात. अगदी प्रदीर्घ. काव्यलेखन हाच त्यांच्या अभिव्यक्तीचा मार्ग असावा असे. आता उदाहरण घायचे झालेच, तर त्यांची सुप्रसिद्ध कविता म्हणजे, ‘गायी पाण्यावर काय म्हणुनि आल्या?’ ही कविता सर्वांना परिचित. पण, संपूर्ण नाही. या कवितेत तब्बल २५ कडवी आहेत. काव्यलेखनातील विषयांचे वैविध्य दाखवणारी उत्तम कविता म्हणजे ‘माझी कन्या.’ ही कविता पूर्वी ‘बालभारती’च्या पाठ्यपुस्तकात विद्यार्थ्यांना अभ्यासाला असल्यामुळे तिची काही कडवी रसिकांना तोंडपाठ आहेत. पण, त्यातील माहीत नसलेली कडवी कोणती?
 
गौरकृष्णादिक वर्ण आणि त्यांच्या,
छटा पातळ कोवळ्या सम वयांच्या
सवे घेउनि तनुवरी अद्भुतांचा,
खेळ चाले लघु रंगदेवतेचा!
 
 
आपली सौंदर्याची प्रतीके काय आहेत? सौंदर्याचे मूल्यमापन करण्याची परिमाणे काय आहेत? आपल्या लेकीच्या सौंदर्याचे वर्णन करता करताच तो विव्हळ बाप पुढे आपल्या लेकीची तुलना या महामायेशी, निळावंतीशी करतो. निळावंती म्हणजे पृथ्वी. स्त्रीतत्त्व. हिरवाईने शाकारून नटायची शृंगारायची तिची आवड विलक्षण.

खरे सारे! पण मूळ महामाया,
आदिपुरुषाची कामरूप जाया
पहा नवलाई तिच्या आवडीची,
सृष्टीशृंगारे नित्य नटायाची.


यातील ‘जाया’ शब्दावर श्लेष आहे. जायाचे दोन अर्थ होतात. एक म्हणजे पत्नी आणि दुसरा म्हणजे अंकित - बंधनात असलेली. खरेतर दोन्ही अर्थी ही ओळ भिन्न भिन्न चालते. त्यातून गर्भित अर्थ दिसतो. या आदिपुरुषाची जायबंदी आहे. म्हणूनच त्याला सदैव आकृष्ट करण्यासाठी तिला सालंकृत असावे लागते का?

तपःसिद्धीचा ‘समय’ तपस्व्याचा,
‘भोग’ भाग्याचा कुणा सभाग्याचा;
पुण्यवंताचा ‘स्वर्ग’ की कुणाचा,
‘मुकुट’ कीर्तीचा कुण्या गुणिजनाचा


अनुप्रास अलंकाराचे हे उदाहरण. यमकही आहे. अर्थगर्भित तर त्याहूनही! तुमच्या एक लक्षात येत आहे का? कधी रूढार्थाने सामाजिक परिस्थितीवर भाष्य करताना पुढीलच कडव्यात कवी अध्यात्माकडे वळतो,तर त्याच्या पुढील कडव्यात तत्वज्ञान सांगतो. पुढील ओळीत एखादे रुपक देऊन उदाहरणासहित परिस्थितीचे विश्लेषण करतो हा कवी! तर त्याच्या पुढे मनामनांच्या गुंत्याला हात घालून मानसिक स्थितीचे विवेचन करतो. बरे, या सर्व कडव्यांतून कथाही पुढे जाते. विषय जराही बाजूला होत नाही आणि साहित्यिक वैशिष्ट्ये आणि मूल्येही भरभरून आहेत. अलंकारांनी नवस्नुषा नटवावी तशी कविता नटवतात बी!

ढगे बळकट झाकोनि चंद्रिकेला,
तिच्या केले उद्विग्न चांदण्याला,
हास्यलहरींनी फोडुनी कपाट,
प्रकाशाचे वाहवी शुद्ध पाट!
माज धनिकाचा पडे फिका साचा,
असा माझा अभिमान गरीबाचा
प्राप्त होता परि हे असे प्रसंग,
हृदय होते हदरोनिया दुभंग!


प्रत्येक कडव्याची ढब वेगळी आहे, ताल वेगळा आहे आणि साचा वेगळा आहे; तरीही कविता एकसंध आहे. पाहा! ही दुसरी कविताही सुप्रसिद्धच. ‘चाफा बोलेना चाफा चालेना.’ पण, या कवितेच्या प्रसिद्ध होण्यामागील कारण वेगळे. वसंत प्रभु यांनी संगीत दिलेले हे गीत लता मंगेशकरांनी गायले आहे. यमन रागातील भावगीत आहे.

गेले केतकीच्या बनी,
गंध दरवळला वनी
नागासवे गळाले देहदेभान रे
चल येरे, येरे गड्या,
नाचु उडू घालु फुगड्या
खेळु झिम्मा झिम्पोरी झिम्पोरी झिम्


एक अंक येथे संपतो. ‘झिम्मा’ हा भारतीय नारींचा सहजभाव. आनंद व्यक्त करण्याचे माध्यम. पण, आनंद या झिम्म्याने संपतो का? तो आनंदसुद्धा एवढा प्रगल्भ की आत्मानंदाचे वेध त्याला लागावे. ते पुढे लिहितात,

हे विश्वाचे अंगण, आम्हां दिले आहे आंदण
उणे करू आपण दोघेजण रे
जन विषयाचे किडे, यांची धाव बाह्याकडे
आपण करू शुद्ध रसपान रे
चाफा फुली आला फुलून, तेजी दिशा गेल्या आटुन
कोण मी - चाफा? कोठे दोघे जण रे?


ज्ञानोबांचे अद्वैत तत्वज्ञान आठवते. तरीही मनुष्य स्वभावाची सरलसुलभ रुसायची, पुन्हा हसायची आणि मग खुलायची व्यक्तिविशेष यात ठळक होतात. तसे पाहायला गेले तर ‘मीटर’मध्ये नसलेले हे काव्य. काहीसे दिलखेच, पण विस्कळीत वाटते. वसंत प्रभूंसारखा ‘मेलडी किंग’ जादू करतो आणि काय! व्हायोलिन-क्लॅरोनेट-मेंडोलिन-पियानो-बासरी यांच्या जोडीला तबला-ढोलक आणि बींचे काव्य अजरामर होते! त्यांची पहिली कविता ‘प्रणय पत्रिका‘ ही वर्‍हाडात चिखलदरा येथे सप्टेंबर १८९१ मध्ये लिहिली गेली, असे उल्लेख आढळतात. त्यावेळी ते १९ वर्षांचे असावे. पाहावयास गेले तर प्रणय कविता लिहिण्याचे वय १९ योग्य आहे. पण, त्यातून प्रतीत होणारी विरहिणीची प्रगल्भता, आतुरता, भय, समर्पणाचे भाव आणि न थकता पाहिलेली वाट पाहता, हे वय मात्र लहान वाटते, नाही का? ही कविता त्याच वर्षी कै. हरिभाऊ आपटे यांच्या ‘करमणूक’ पत्रात प्रसिद्ध झाली. अनेक दिवस झाले तरी प्रियकराचे कुशल सांगणारे पत्र आले नाही, म्हणून चिंताग्रस्त अशा प्रेयसीचे आपल्या प्रियकराला लिहिलेले पत्र म्हणजे ‘प्रणय पत्रिका.’ खरेतर या कवितेत प्रणय नाही. तो दृश्य स्वरुपात नसला तरीही जी ओढ आहे, त्याचे प्रेरणास्थान नेमके काय? त्या ओढीचे उद्दिष्ट काय? तिचा अर्थ काय? या प्रश्नांचा गुंता सोडवू गेलो, की स्पष्ट दिसतो तो विशुद्ध भावनेतला प्रणयी भाव.

किति तरि दिन झाले! भेट नाही पदांची,
करमत मज नाही; वेळ वाटे युगाची.
निरलस दिनरात्री आपणाला जपाया
नच जवळ कुणीही काळजी योग्य घ्याया


हे मालिनीवृत्त. अक्षरगणवृत्त आहे. या कवींच्या कवितांचे गमकच वृत्तात-छंदात आहे. आजची गीते आपण एकदा ऐकतो. कानांना गोड वाटतात आणि तेवढेच सहज आपण विसरून जातो. पण, या जुन्या कवींच्या कविता दीर्घकाळ लक्षात राहतात त्या त्यातील छंदामुळे. संगीतकारालाही वृत्ताचे ज्ञान असायचे. आजच्या गीतकाराला आणि संगीतकाराला याविषयी कितपत माहिती असेल, हा प्रश्नच आहे. मुक्तछंद प्रचंड अर्थगर्भित असणे अभिप्रेत असते. ते तसे नसल्यास त्याचे टोक, शब्दांची धार नाहीशी होते. प्रत्येक वृत्ताला एक भाव असतो, गीताला तो गवसला, की शब्दही मनांचे अंकित होतात.
 
कमलिनि भ्रमराला नित्य कोशात ठेवी
अविरत म्हणुनी तो पंकज प्रेम दावी.
विसर पडुनि गेला काय माझाही नाथा?
म्हणुनिच धरिले हे वाटते मौन आता

 
पुरुषस्वभाव जाणून त्याला कसे गुंतवून ठेवायचे, हे कमलिनीला पुरेपूर ठाऊक असते. अशा वेड्या वेळी तिच्या पाकळ्यांत अडकून तुझ्या प्रेयसीलाही विसरलास की काय, असा प्रश्न ती प्रणयिनी आपल्या प्रियकराला करते आणि उगी खंतावत बसते. तू कुणा दुसरीच्या मोहपाशात गुंतून मग माझ्या आठवणीने स्वतःस अपराधी समजून तर माझ्याशी मौन धरले नाहीस ना? तसे नको, तुझा चंचल स्वभाव मी जाणते, तू पुन्हा ये, तुझ्या वाटेकडे मी डोळे लावले आहेत, असे ती सांगते. या सर्व आशयगर्भ कविता वाचल्या की आपण म्हणतो किती विद्वत्तापूर्ण असामी! मग वाचनातयेते ते ‘वेडगाणे’

‘ट’ला ‘ट’, ‘री’ला ‘री’।
जन म्हणे काव्य करणारी।

 
ही ‘वेडगाणे‘ नावाची एक अत्यंत नादमधुर कविता ‘मासिक मनोरंजना’त प्रसिद्ध झालेली. केवळ यमकाला यमक जुळवून अर्थहीन काव्य करण्यावर उपहासात्मक अशी ही कविता म्हणजे बींच्या प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण. परंतु, ही अतिशय अर्थपूर्ण कविता रचताना स्वतः कवी बी मात्र यमक जुळविल्याशिवाय राहात नाहीत. पण, हे सारे साधताना कवितेचे सौंदर्यदेखील त्यांनी ढळू दिले नाही. हे वाखाणण्याजोगे.

पाचूंच्या वेली
न्हाल्या लावण्याच्या जली
दारी उभ्या स्वर्गीय नरनारी गं,
जन म्हणे काव्य करणारी


हलकी-फुलकी कविता आणि त्यातील नादमाधुर्य. यांच्या जोडीला दीर्घ प्रवास आणि परस्पर संबंध उलगडून सांगण्यातील हुकूमी शब्दरचना. या बींच्या शब्दखुणा.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.