व्यक्तिगत दु:खाला बाजूला सारून राष्ट्रहिताला प्राधान्य देत, अहिल्याबाईंना होळकर राज्याची धुरा हाती घेतली. पण, नुसतीच ती जबाबदारी न घेता, त्या जबाबदारीचे आयुष्यभर समर्थपणे निर्वहनदेखील केले. या कार्यात भारतात परकीय आक्रांतांच्या धार्मिक उन्मादाने धास्तावलेल्या संस्कृतीला आपल्या क्षात्रतेजाने पुन्हा तेजोवलय प्राप्त करून दिले. त्यांनी त्यांच्या कार्यकाळात देशभरात केलेल्या व्यापक कार्याचा आढावा घेणारा हा लेख...
पती निधनानंतर रितीरिवाजानुसार सतीचे कर्तव्य पार पाडण्यासाठी चितेकडे निघालेल्या पुत्रवधू अहिल्यादेवींस सुभेदार मल्हारराव होळकर यांनी थांबवून विनवणी केली की, “हे अहिल्या, मुक्ता आणि मालेराव ही तुझी दोन पाखरे बघ. त्यांच्या निरागस चेहर्यावर आलेले अश्रू पूस.” यावर अहिल्यादेवी म्हणतात, “मामंजी, मुक्ता आणि मालेराव आईवडिलांच्या आठवणीने रडतील, व्याकूळ होतील. मात्र, पुढे ते सावरतील. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य एक दिवस देवाजवळ जातो. आज मला सतीरुपाने देवाकडे जाण्याची आज्ञा झाली आहे. त्यामुळे, मला थांबवू नका. मला माफ करा.” यावर मल्हारराव म्हणतात, “अहिल्या, थांब पोरी. माझा उन्हाळा करू नको. मी पिकलं पान; कधीही गळून जाईल. हा होळकरशाहीचा डोलारा तुला सांभाळायचा आहे. आज माझा खंडू गेला नसून, अहिल्या गेली, असे समजतो आणि तुझ्यात माझा खंडू पाहतो. शास्त्रानुसार तुझे खरे आहे. मात्र, धर्मासाठी माणसे नसून, माणसासाठी धर्म आहे. सतीचा रिवाज मी मोडणार नाही. लक्ष्मीबाई तुझ्याजागी सती जाईल.” यानंतर अहिल्यादेवींनी सती जाण्याचा निर्णय मागे घेतला. भरतपूरचा राजा सुरजमल जाट याच्यासोबत कुंभेरी येथे झालेल्या लढाईत खंडेराव होळकर दि. 24 मार्च 1754 रोजी धारातीर्थी पडले. यावेळी होळकरांची छावणी गांगरसोली नामक गावाजवळ होती. छावणीशेजारी खंडेरावांच्या देहाला रितीरिवाजानुसार अग्नीडाग देण्यात येऊन, त्यांच्या अस्थी जवळच असलेल्या मथुरेच्या यमुनेत विसर्जित करण्यात आल्या.
मल्हाररावांना गौतमाबाई, द्वारकाबाई, बनाबाई, हरकुबाई अशा चार सौभाग्यवती होत्या. गौतमाबाई पुत्रशोकाने व्याकूळ झाल्या होत्या. त्यांनी इंदूरला आल्यानंतर पुत्रवधू अहिल्यादेवींची समजूत काढून त्यांना कारभारात लक्ष घालण्यासाठी तयार केले. इंदूरच्या राजवाड्यात होळकरांचा मोठा राबता असल्याने अहिल्यादेवींवर अचानकपणे मोठी जबाबदारी पडल्याने त्यांनी दुःख बाजूला सारून जबाबदारी स्वीकारली आणि होळकरशाहीच्या राज्यकारभारात लक्ष घालण्यास सुरुवात केली. त्यांच्या या निर्णयामुळे होळकर राजघराण्यात त्यांचे स्थान बळकट झाले. यावेळी त्यांच्या परिवारात सासरे मल्हारराव, सासू गौतमाबाई, द्वारकाबाई, बनाबाई, हरकुबाई, नणंद उदाबाई व सीताबाई आणि मुक्ता व मालेराव ही दोन मुले होती. तसेच, भावकीतील काही सदस्य महत्त्वाचे होते. इंदूरच्या होळकर राजवाड्यात एवढ्या मोठ्या परिवारात समन्वय ठेवून, खासगी आणि दौलतीचा कारभार चोखपणे पाहण्याची कसरत अहिल्यादेवी करीत असत. गौतमाबाई यांनी अहिल्यादेवींना ‘नेहमी मोठेपण हे काचेच्या भांड्यासारखे असते. हे मिळालेले मोठेपण जपण्यासाठी स्वतःला तटस्थ ठेवावे लागते. कधीकधी माघारही घ्यायची वेळ आपल्यावर येते,’ असे संस्कार केल्याने, अहिल्यादेवी दक्षतापूर्वक सर्व नातेगोते सांभाळून व्यवहार करीत असत. त्यामुळे, मल्हारराव, गौतमाबाईंनंतर त्यांना घरातील प्रमुख स्थान प्राप्त झाले होते.
सुभेदार मल्हारराव मोहिमेवर गेल्यानंतर त्यांच्या पश्चात सर्व कारभाराची, अहिल्यादेवी आणि गौतमाबाई मिळून हाताळणी करीत असत. थोरले बाजीराव पेशवे यांनी गौतमाबाई यांना खासगीची जहागीर दिल्याने, गौतमाबाईंकडे तीन लक्ष रुपये उत्पन्नाचा मोठा कारभार होता. यासाठी मल्हाररावांनी खासगीच्या व्यवहारासाठी गोविंदपंत गाणु यांची खासगी दिवाण म्हणून निवड केली होती. सौभाग्यवती गौतमाबाई मल्हारराव होळकर यांच्या नावे बहाल करण्यात आलेल्या खासगी सनदेत 1) परगणे महेश्वर, चोळी परगणे, इंदूर परगणे, हरसोला, परगणे सावेरपैकी बरलाई तालुका, परगणे देपालपुरपैकी तालुके हातोदा, परगणे महत्पुरपैकी तालुके जगोठी व करंज माकडोण वगैरे बरहुकूम यादीमखलसीची. 2,63,000/- 2) दक्षिणप्रांती चांदवडपैकी गावे व अंबडपैकी कोरेगाव वगैरे मोगलाईकडील बरहुकूमयाद 36,010/- एकूण (2,99,000) दोन लाख, नव्याण्णव हजार इनाम कुलबाब कुलकानुगांवे दरोबस्त खासगीकडेच नेमून दिले आहे. तरी, निरंतर उपभोग घेऊन नवीन सनदेशी आक्षेप न घेणे. जाणिजे दि. 20 जानेवारी 1734 असून पुढे सासू गौतमाबाई होळकर यांच्या निधनानंतर, ऑक्टोबर 1761 पासून अहिल्यादेवींना खासगीचा अधिकार प्राप्त झाला. त्यांनी खासगी कोषातून कोणकोणती लोकाभिमुख कामे करावी, याचा शोध घेण्यासाठी महेश्वर येथे गावोगावी फिरणारे व्यापारी, साधुसंत, कवी, कलावंत, कारागीर, कामगार, शेतकरी, महिला, सेवेकरी, यात्रेकरू यांची बैठक घेऊन त्यांच्याशी संवाद साधला. त्यांनी सुचविलेल्या कामांची यादी केली.
यादीनुसार काम करण्यासाठी लागणारे मनुष्यबळ, पैसा, वेळ, कामावर देखरेख करणारे विश्वासू लोक, शिल्पकार, कारागीर, लोहार, सुतार, पानाडे, कामासाठी लागणारी स्थानिक ठिकाणी उपलब्ध असलेली साधनसंपत्ती, आदींचा मेळ घालून काम सुरू केल्यानंतर अविरतपणे ते काम पूर्णत्वास नेण्यासाठी प्रयत्न करणे, नैसर्गिक आपत्ती तसेच आपत्कालीन परिस्थितीत मदतीसाठी यंत्रणा उपलब्ध करून देणे, खर्चाचा हिशोब, योजनेनुसार कामाला गती देणे आदी बाबींचा अचूक आराखडा तयार करण्यासाठी अहिल्यादेवींनी खासगी दिवाणास आज्ञा देऊन प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली. खासगी कोषातील गंगाजळीत दरवर्षी वृद्धी होऊ लागल्याने, अहिल्यादेवींनी मोठमोठी कामे हाती घेतली. एकाचवेळी तब्बल तीन लाख बेरोजगारांना कामे दिली. मंदिरे, धर्मशाळा, अन्नछत्र, बारव, वाडे, घाट, रस्ते, तलाव, झाडांची लागवड, छत्र्या, किल्ले दुरुस्ती, दगडी पूल बांधकाम, नावांच्या बांधणीचा समावेश विकासकामांच्या योजनेत झाला. या कामांना गावाच्या नावासह ‘कारखाना’ हे शीर्षक देण्यात आले. जयपूर, जोधपूर, गुजरात, राजस्थानसह दक्षिणेतून आणलेल्या विविध कारागीरांचा, एकत्रित मेळ बसवून त्यांना कामांवर पाठवून दिले, तर नियाजित मंदिरे, घाट, बारव कामांची स्थापत्य प्रतिकृती कागदावर तयार करण्यात येऊन त्याची मोजमापे देण्यात आली. शास्त्रानुसार सर्व वास्तू निर्माण झाल्या पाहिजेत, यासाठी शास्त्रपारंगत लोकांची मदत घेण्यात आली. ज्यातून बारा ज्योतिर्लिंग, चारधाम, सप्तपुरीसह स्थानिक लोकदैवत, ग्रामदैवत, शिवालये, विष्णुपद, राममंदिर, जैनमंदिरासह 11 हजार मंदिरांची कामे सुरू करण्यात आली.
भारतावर झालेल्या हल्ल्यात 12 ज्योतिर्लिंग, सप्तपुरी, चारधाम उद्ध्वस्त करण्यात आले होते. या उद्ध्वस्त धार्मिक क्षेत्रांना अहिल्यादेवींनी प्रथम प्राधान्य देत, त्यांच्या जीर्णोद्धारासाठी स्थानिक शासकांसोबत पत्रव्यवहार करून, काम करण्यास मान्यता मिळवून कामांना सुरुवात करण्यात आली. या कामांमुळे अनेक व्यापारी, पुजारी, कामगार यांचे वास्तव्य ठिकठिकाणी वास्तुरुपाने निर्माण झाले. या वस्तींना संरक्षण, तसेच त्यांना मूलभूत सुखसुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यासाठी, शेती व शेतीसाठी कर्ज, पाणीपुरवठा, बी-बियाणे यांची व्यवस्था करून देण्यात आली. ज्याचा परिणाम समाजावर सकारात्मक होऊन, हिंदू धर्मीयांच्या आस्थेला मोकळीक मिळाली. हिंदू धर्मीयांची देवस्थाने भयमुक्त करून त्यांस संरक्षण देऊन अहिल्यादेवींनी खंडित झालेली पूजाअर्चा, वार्षिक उत्सव, जत्रा, यात्रा, सोंग, लळीत सुरू करून त्यांस राजाश्रय दिला. तसेच, ठिकठिकाणी पुजारी, गुरव नियुक्त करून देवस्थान, पुजारी, गुरव, मानकरी यांना स्वतंत्र इनाम, वर्षासन देण्यात आले. या कामामुळे विविध जाती-धर्मात विभागलेला समाज एकत्र आला. साधुसंत, संन्यासी, पुजारी, महंत, गुरव, ज्योतिषी, नंदीवाले, गोसावी, बहुरुपी, कीर्तनकार यांनी खंडित झालेल्या परंपरा नव्याने सुरू केल्या. अहिल्यादेवींच्या या दूरदृष्टीचा समाजावर सकारात्मक परिणाम झाला. ज्यातून लोक एकत्रित होण्यास मदत झाली, तर, विविध कामांमुळे शेतीमध्ये बदल घडून आले.
पिकांना देण्यासाठी पाणी मिळाले. बाजारपेठांची संख्या वाढली. व्यापारी, कामगार, शेतकरी यांच्या खिशात पैसा आला. तर, सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणावर कर जमा होऊ लागल्याने, माळव्यातील होळकर संस्थानास ‘श्रीमंत संस्थान’ म्हणून नवीन ओळख मिळाली. सुभेदार मल्हारराव होळकर यांनी निर्माण केलेल्या होळकरशाहीच्या बांडा ध्वजाची कीर्ती, अहिल्यादेवींनी लोककल्याणकारी कामांतून दिगंत केल्याने समाजात चैतन्य निर्माण झाले होते. नवीन रस्ते, नद्यांवर पूल बांधणी, धर्मशाळा, व्यापारी मालाला संरक्षण, चोर-लुटारूंचा बंदोबस्त करून त्यांना भिलकवडी घेण्याचा बहाल केलेला अधिकार, यात महत्त्वाचा ठरला. देशोदेशीचे व्यापारी व्यापारासाठी निःसंकोचपणे माळव्यात येऊ लागल्याने, व्यापाराची भरभराट झाली. अहिल्यादेवींनी खासगी आणि सरकारी कारभार पाहताना समतोल राखला. नर्मदेच्या शांत वाहणार्या धारेसारखे त्यांनी आपले उत्तरदायित्व ‘श्री शंकर आज्ञे’नुसार पार पाडले. दरम्यान अनेक दुःखे, संकटे त्यांच्यासमोर उभी राहिली. मात्र, त्यांनी ईश्वरकार्यात खंड पडू दिला नाही. काशीविश्वनाथ मंदिरासह इतर 50 मंदिरे, चार वाडे, धर्मशाळा, मनकर्णिका घाट, काशीशेजारी असलेल्या ब्रह्मपुरीत वेदशिक्षण शाळा सुरू केली. काशीविश्वनाथांच्या नियमित पूजेअर्चेसाठी पुजारी नियुक्त केले. पुजार्याच्या उदरनिर्वाहासाठी इनाम दिले. तसेच, वेधशाळेत शिक्षण घेणार्या विद्यार्थी आणि शास्त्रींसाठी अन्नधान्यव्यवस्था व वर्षासन सुरू केले. अयोध्येतील खंडित केलेल्या राममंदिराची नव्याने उभारणी करून श्रीरामाची स्थापना करून धर्मशाळा, अन्नछत्र सुरू केले. तसेच, कुंभमेळ्यासाठी अहिल्यादेवींनी मदत करून कुंभमेळ्यास राजाश्रय देत, ‘राज्याचा उत्सव’ म्हणून साजरा केला.
अहिल्यादेवींनी नव्याने निर्माण केलेले मंदिर अत्यंत सुबक मूर्त्यांनी कोरलेले होते. क्षतीग्रस्त झालेल्या मंदिराच्या स्थापत्यानुसार त्यांनी यादव, चालुक्य शैलीतील मंदिराची उभारणी केली. तसेच, मुस्लीम आक्रमकांनी पाडलेल्या मंदिरांचा जीर्णोद्धार अहिल्यादेवींनी मंदिराच्या मूळ ग्राऊंड प्लाननुसार केला आहे, ज्यामुळे भारतीय मूर्ती व स्थापत्यकलेचे रक्षण आणि जतन झालेले पाहायला मिळते. अहिल्यादेवींनी परळी वैजनाथ महादेव मंदिर, घृष्णेश्वर महादेव मंदिर, गया येथील विष्णुपद निर्माण करताना नागर, द्रविड शैलीचा वापर केलेला दिसून येतो. अहिल्यादेवींच्या या लोकोत्तर कार्याचा भारतीय इतिहासावर प्रभाव निर्माण होऊन, इतिहासाने त्यांच्या योगदानाची योग्य दखल घेतल्याचे दिसून येते. माळव्याची महाराणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माला पुढील वर्षी 300 वर्षे पूर्ण होत असून, 300 वर्षांपासून त्यांनी लावलेल्या लोककल्याणकारी कार्याचा नंदादीप भारताला सुजलाम् सुफलाम् करीत आहे. विदेशातील लोक राम, कृष्ण, महादेवाबरोबर ‘अहिल्यादेवींचा भारत’ अशी ओळख सांगतात. हिंदुस्थानची जगात वेगळी ओळख निर्माण करणार्या या शिवयोगिनीस मानाचा मुजरा!!
रामभाऊ लांडे
(लेखक होळकर राजघराण्याचे अभ्यासक आहेत.)