स्वत:च्या व्यक्तित्त्वाची पायवाट स्वतःच्या सकारात्मकतेने उजळून दुसर्यासाठी ऊर्जास्रोत होणार्या काही शलाका या नेहमीच स्वयंप्रकाशी असतात. आपल्या असण्याने त्या आपल्या आजूबाजूचे सारे अंधारकोपरे उजळून टाकतात. देवघरातली समई होऊन तेवत राहतात. कधीकधी निखार्यावर राख जमली की जसा तो विझतो, तसेच आपल्या मानवी मनाचेही होते. परिस्थितीची राख जमू लागली की आपले मनही सर्दावते. पण, काही मने अशी असतात जी स्फुल्लिंग पावतात. काहीतरी धरायचा ध्यास घेऊन उजळतात. फक्त विचार नाही, तर कृतीच्या वाटा शोधतात. असे लोक रडत नाहीत तर लढतात. समाजासाठी, समाजातील कमकुवत घटकांसाठी ते ऊजास्रोत होतात. ते समाजाच्या दुःखांशी नाते सांगतात. त्यांच्यातीलच एक होऊन जगताना आपले वेगळेपण जपतात. अहिल्याचा ‘अहिल्या ते राजमाता पुण्यश्लोक अहल्याबाई होळकर’ हा प्रवास एका प्रकाश-शलाकेचा उजास्रोत होण्याचा प्रवास आहे.
इंग्रजी लेखक लॉरेन्स यांनी अहिल्यादेवी होळकर यांना ‘भारताच्या कॅथरीन द ग्रेट, एलिझाबेथ मार्गारेट’ असे म्हटले आहे. थोडक्यात, अहिल्याबाई यांची तुलना रशियाची राणी कॅथरीन द ग्रेट, इंग्लंडची राणी एलिझाबेथ तसेच डेन्मार्कची राणी मार्गारेट यांच्याशी एकत्रित केली आहे. त्याने म्हटले आहे की, ज्यावेळेस जगातील सर्वात महान स्त्रियांचा इतिहास लिहिला जाईल, त्यावेळेस पुण्यश्लोेक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव सर्वप्रथम लिहिले जाईल. इ. सन 1765 मध्ये सत्तेसाठी झालेल्या एका लढाईदरम्यान लिहिलेल्या एका पत्रावरून मल्हाररावांचा अहिल्याबाईंच्या कर्तृत्वावर किती विश्वास होता, हे दिसून येते.
“चंबळ पार करून ग्वाल्हेर येथे जावा. तेथे तुम्ही चार-पाच दिवस मुकाम करू शकता. तुम्ही मोठे सैन्य ठेवू शकता व त्यांचे शस्त्रांसाठी योग्य तजवीज करा..... कूच करताना, मार्गावर तुम्ही सुरक्षेसाठी चौक्या लावा.” अशा प्रकारच्या सैनिकी व्यवस्थापनाच्या सूचना मल्हारराव होळकर यांनी अहिल्याबाई यांना दिल्या असल्याचे आणि त्यायोगे अहिल्याबाईंमधील नेतृत्वगुणाचे दर्शन आपल्याला होते.
1754 मध्ये आग्रा अजमेरच्या सुभ्यावरून मराठ्यांचे सुरजमल जाटाशी मतभेद होऊन युद्ध सुरू झाले. कुंभेरी किल्ल्यातील लढाईत खंडेराव धारातीर्थी पडले. तत्कालीन परिस्थितीत महिलांनी पतीच्या निधनानंतर सती जाण्याची प्रथा होती. त्यावेळच्या प्रथेप्रमाणे अहिल्यादेवी सती जायला निघाल्या. परंतु, सासरे मल्हारराव यांनी त्यांना तसे करण्यापासून थांबवले. ज्या परकीय आक्रमणाच्या काळात हिंदू स्त्रियांची असुरक्षितता ऐरणीवर आली होती, ज्यातून पुढे सती प्रथेसारख्या काही प्रथा उदयाला आल्या, असे म्हटले जाते. अशा परिस्थितीत अहिल्यादेवींचे सती प्रथेपासून दूर राहाणे दिशादर्शक व अनुकरणीय होते. सती गेल्याने पुण्य व न गेल्याने पाप, असा समज समाजात रूढ होता. रामायण आणि महाभारत यांमध्ये अनेक युद्ध होऊनही कोणी सती गेल्याचा उल्लेख नाही. असे अनेक दाखले देऊन सतीप्रथेला शास्त्राचा आधार नाही, हे प्रजेला पटवून दिले. कालांतराने 1829 साली राजाराम मोहन रॉय यांच्या प्रयत्नामुळे सतीची अनिष्ट चाल कायद्याने बंद करण्यात आली. यावरून अहिल्याबाई होळकर यांच्या दूरदृष्टीची प्रचिती आपणास येते.
पूर्वीच शासक म्हणून तरबेज झाल्यामुळे, मल्हारराव व मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्यादेवींनी स्वतःलाच राज्यकारभार पाहू देण्याची अनुज्ञा द्यावी, अशी पेशव्यांना विनंती केली. पुढे हेच अहिल्याबाई होळकर हे नाव मराठ्यांच्या इतिहासात अमर झाले. त्याला त्यांची धर्मपरायण आणि उदारवृत्ती कारणीभूत ठरली. ‘बाई काय राज्यकारभार करणार,’ ही दरबारी मंडळींची अटकळ त्यांनी सपशेल खोटी ठरविली. त्यांनी शासन करण्यास माळव्यात अनेकांचा विरोध होता. पण, होळकरांचे सैन्य अहिल्याबाईंच्या नेतृत्वाखाली काम करण्यास उत्सुक होते. अहिल्यादेवी सैनिकी कवायतीत हत्तीच्या हौदाच्या कोपर्यात चार धनुष्य आणि बाणांचे भाते ठेवत असत, असे म्हणतात. 1754 मध्ये अहिल्याबाईंचे पती, मल्हारराव यांचा मुलगा खंडेराव युद्धात मरण पावला, तेव्हा गादी त्यांचा मुलगा मालेराव होळकर यांच्याकडे सोपविण्यात आली. तथापि, जबाबदारी घेण्यास फारच लहान असल्यामुळे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना कारभारी म्हणून नेमले. हे धाडसी पाऊल म्हणजे मल्हाररावांच्या अहिल्याबाईंच्या प्रशासकीय क्षमतेवरील विश्वास आणि राज्याविषयीच्या दूरदृष्टीचा पुरावा होता. 1766 मध्ये मल्हारराव आणि 1767 मध्ये त्यांच्या मुलाच्या मृत्यूनंतर, अहिल्याबाईंनी राज्याचा संपूर्ण ताबा घेतला. मालेरावाच्या मृत्यूपश्चात अहिल्यादेवी होळकर प्रशासकीय कारभार पाहू लागल्या. सुभेदार मल्हाररावांच्या प्रशासकीय व्यवस्थेत अहिल्यादेवी यांनी काही सुधारणा केल्या.
खासगी व सरकारी खर्चाचा हिशोब त्या अत्यंत चोख ठेवत असत. होळकरशाहीत दिवाण हा सर्वोच्च अधिकारी होती. अहिल्याबाईंच्या दरबारात गंगाधर चंद्रचूड, नारो गणेश शौचे आदि दिवाण लाभले होते. या सर्वांनीच अहिल्याबाईंना घरी बसविण्याचा प्रयत्न केला. परंतु, आपले प्रशासकीय कामकाज अहिल्यादेवींनी व्यवस्थित सुरू ठेवले. परगण्याच्या प्रमुख अधिकार्याला अर्थात कमाविसदाराला आपल्या प्रजेशी योग्य आचरणावरही त्यांचे कटाक्षाने लक्ष असे. त्यांची प्रशासनव्यवस्था चोख असे. दैनंदिन पत्रव्यवहार, हिशोब वगैरे गोष्टी त्या रात्र रात्र जागून पूर्ण करत. आपले त्या त्या दिवसाचे काम त्या त्या दिवशीच पूर्ण करीत. त्यातूनच त्यांची प्रशासकीय कार्यक्षमता दिसून येते. 18व्या शतकाच्या उत्तरार्धात संपूर्ण देशात अस्थिरतेचे वातावरण होते. अहिल्यादेवींच्या राज्यात मात्र शांतता व सुव्यवस्था होती. यातील प्रमुख कारण म्हणजे, मुळात हा भूप्रदेश सुपीक होता आणि दुसरे महत्त्वपूर्ण कारण म्हणजे तेथील शेतीची प्रगती. अहिल्याबाईंनी शेतीबाबत मल्हारराव होळकरांच्या काळच्या कायद्यात अनेक सुधारणा केल्या. करपद्धती कमी असल्यामुळे शेतकर्यांच्या उत्पन्नातून सारा वसूल केला जात असे.
अहिल्याबाईंच्या कारकिर्दीत महसुलाची रक्कम रोख व धान्याच्या रुपात स्वीकारली जात असे. त्यांनी महसुलाची निश्चिती केली असली, तरी त्यांनी वाजवीपेक्षा अधिक महसूल कधीही घेतला नाही. त्यामुळे त्यांच्या राज्यात प्रजा व शेतकरी खूश होते. अहिल्यादेवींनी इंदूर येथे 1766 मध्ये टांकसाळ सुरू केले. अहिल्याबाईंच्या काळात नाण्यावर शिवलिंग, बेलपत्र, चंद्राचा वा सूर्याचा मुखवडा असून गव्हाची लोंबी वा अफूच्या झाडाचे चित्र, टांकसळीचे नाव असे. पुढे त्यांनी महेश्वर येथेही टांकसाळ सुरू केली. अशा प्रकारे एका स्त्रीच्या राजवटीला सुरुवात झाली, जी आपल्या दूरदर्शी नेतृत्वाने माळवा राज्याचा कायापालट झाला. 1767 मध्ये तिला अधिकृतपणे राणी म्हणून राज्याभिषेक करण्यात आला. तिच्या मार्गदर्शनाखाली, माळव्याने लवकरच अभूतपूर्व समृद्धी आणि प्रगतीचा काळ अनुभवला. पण, त्यावेळचे प्रमुख राज्यकर्ते पेशवे यांनी अहिल्याबाईंचा अधिकार नाकारला तेव्हा पेशव्यांकडे अर्ज करून अहिल्याबाईंनी आपल्यातल्या मुत्सुद्देपणाची चमक दाखविली आणि माळवा प्रांतावर शासन करण्याचा अधिकार मिळविला. पेशव्यांनी परवानगी दिल्यावर, ज्या माणसाने त्यांना विरोध केला होता, त्यालाच चाकरीत घेऊन, तुकोजीराव होळकर (मल्हाररावांचा दत्तक पुत्र) यास सैन्याचा मुख्य करून, अहिल्यादेवी होळकरांनी पूर्ण दिमाखात माळव्यास प्रयाण केले. पेशवा रघुनाथराव याला होळकरांच्या राज्याचा व दौलतीचा लोभ सुटला. त्याने पेशवाईत होळकरांचे राज्य विलीन करण्यासाठी 50 हजारांची फौज घेऊन इंदोरवर चढाई केली.
हे वृत्त तेजस्विनी अहिल्याबाईंना कळताच खचून न जाता त्यांनी रघुनाथरावांना खलिता पाठविला. त्या म्हणतात, “आपण माझे राज्य हिरावून घेण्याचे कपट रचून आलात, आमच्याकडील फितूरास गाठले. मला दुबळी समजलात की खुळी? दुःखात बुडालेेल्यास आधिक बुडवावे, हा तुमचा दुष्ट हेतू? आता आपली गाठ रणांगणात पडेल! माझ्याबरोबर युद्धात पारंगत असणार्या स्त्रियांची फौज असेल. मी हरले तर कीर्ती करून जाईन. पण, आपण हरलात, तर आपल्याला तोंड दाखवायला जागा उरणार नाही. म्हणून लढाईच्या भरीस न पडाल तर बरे. मी अबला आहे असे समजू नका. मी खांद्यावर भाले घेऊन समोर उभी राहिले, तर पेशव्यांना भारी पडेल. वेळ पडली, तर हत्तीच्या पायी साखळीशी बांधून तुमचे स्वागत न केले, तर होळकरांच्या सुनेचे नाव लावणार नाही.” मुत्सद्दी अहिल्या म्हणजे तळपती समशेर आणि लखलखती वीज होती. इतिहासतज्ज्ञ सर जॉन माल्कोम यांनी अहिल्यादेवींच्या मृत्यूपश्चात 40 वर्षांनी लिहून ठेवले आहे की, ‘प्रशासन व्यवस्थेबाबत अहिल्यादेवींचे मुख्य तत्त्व होते ते जमीनदार तसेच गावातील पाटील, देशमुख वगैरे अधिकारी वर्गाच्या हक्कांबाबत असणारी आदरयुक्त भावना आणि मध्यम मूल्यांकन. त्या प्रत्येकाची तक्रार शांतपणे ऐकत असत आणि दरबारातील प्रत्येक खटल्याचा न्यायबुद्धीने निवाडा होत आहे की नाही, याचा परामर्श घेत असत. निवाड्यासाठी अधिकार्यांकरिता त्या कायम वेळ देत असत. सर्व बिंदू जोडून न्याय देण्याच्या कर्तव्याची त्यांची जाणीव अत्यंत प्रबळ होती. त्यांचा मूळ स्वभाव सौम्य असला, तरी राज्यकारभारात त्यांनी मनरूपसिंगसारख्या कुविख्यात डाकूला फाशीची शिक्षा दिली होती.’
आपल्याकडील सैन्यात कवायती फौज होती, असे अहिल्याबाई यांचे मत होते. इंग्रजांबद्दल त्या म्हणत, “वरकड व्याघ्रादिक श्वापदे बख, युक्ति-प्रयुक्तिने मारतील. परंतु, अस्वलाचे मारणे कठीण आहे. सुरत धरून मारले तर मरेल अन्यथा अस्वलाच्या लपेटीत कोणी सापडला तर गुदगुल्या करून त्यास मारील तद्वत ही इंग्रजांची लढाई आहे. पाहता त्यास मारणे कठीण!!” यावरून त्यांचे इंग्रजांबद्दलचे मत स्पष्ट होते. इंग्रजांबाबत पेशव्यांनी काय काळजी घ्यावी, याविषयीही त्यांनी वेळोवेळी सूचन दिल्याचे उल्लेख ग्रंथांतून मिळतात. इंग्रजांसारख्या शत्रूंना शह देण्यासाठी कवायती फलटण उभी करणे त्यांना आवश्यक वाटत होते. इ.स. 1792-93च्या सुमारास कर्नल जे. पी. बॉईड नामक अमेरिकन अधिकार्यामार्फच पाश्चात्य पद्धतीची पलटण तयार केली. अमेरिकन कर्नल बॉईडला सेवेत घेतले. मात्र, आमच्या देशाच्या विरोधात आम्ही लढणार नाही, अशी अट घालत जे. पी. बॉईड करार केला, ज्यात त्यांची राजकीय दृष्टी दिसून येते. अहिल्याबाईंनी त्याला जहागिरी न देता, केवळ पगारी ठेवले होते. केवळ एक अधिकारी परकीय असून बाकी सर्व फौज देशी राहणार होती. संरक्षणाच्यादृष्टीने त्यांनी अहिल्याबाईंनी महेश्वर, चांदवड, हिंगलाज गरड, सेंधवा असिरगड याचे बांधकाम केले होते. त्यांच्या होळकरशाहीत किल्ले, भुईकोट व वाडे असे 100 पेक्षा अधिक होते.
अहिल्यादेवींनी स्वतः लष्करी शिक्षण घेतले होते. होळकर संस्थानातील संरक्षण क्षेत्रातील लक्षणीय योगदान म्हणजे त्यांनी सैन्यात महिलांची विशेष तुकडी तैनात केली होती. अहिल्यादेवींनी पडदा प्रथा कधीच पाळली नाही. त्या रोज जनतेचा दरबार भरवीत असत व लोकांची गार्हाणी ऐकण्यास नेहमीच उपलब्ध असत. अहिल्यादेवींनी जनतेच्या-रयतेच्या काळजीपोटी अनेक गोष्टी केल्या. अहिल्याबाईंनी 250 वर्षांपूर्वीच हुंडाबंदी केल्याचे उल्लेख साप़डतात. एकदा दरबारात चार ब्राह्मण आले असता, त्यांनी मुलींच्या लग्नाला हुंड्यामुळे समस्या येत असल्याचे कथन केले. यावर बाईंनी कारभार्यांना सांगून, यापुढे कुठल्याही जातीजमातीत कन्येच्या पालनकर्त्याकडून पैसे घेतल्यास, तो गुन्हा समजण्यात येईल, असे स्पष्ट केले. जो द्रव्य घेईल त्याला दामदुप्पट, जो देईल त्याला जेवढ्यास तेवढे व मध्यस्थास जे मिळाले असतील, ते त्या प्रमाणात सरकार दरबारी जमा करावे लागतील, असा कायदा केला. याच्या प्रती काढून प्रांतोप्रांती पाठविल्या. अहिल्यादेवींनी 250 वर्षांपूर्वी कायदा करून न्यायाचा वेगळाच वस्तुपाठ शासनव्यवस्थेपुढे घालून दिला. 18व्या शतकात स्त्री अनेक प्रथा, रुढी, अंधश्रद्धा यात अडकली होती. आपल्या प्रजेला, विशेषतः महिलांना हितकारक ठरतील, असे निर्णय घेऊन एका अर्थाने त्यांचे पुनर्वसनच अहिल्यादेवींनी केले. तत्कालीन समाजजीवनात अपत्यहीन विधवांचे धन सरकार जप्त करत असे व ती स्त्री निर्धन अवस्थेत दुसर्याच्या आश्रयावर जगत असे.
परंतु, हा नियम रद्द करून अशा विधवांना पुत्र दत्तक घेण्याचा व धनाचा उपयोग करू देण्याचा नियम त्यांनी केला. 18व्या शतकात विधवांचे प्रश्न समजून घेऊन तिला समाजात बरोबरीचे स्थान मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केले. त्यांनी अनेक विधवांना पतीची मिळकत त्यांच्यापाशीच ठेवण्यात मदत केली. अहिल्यादेवींच्या राज्यात कोणीही विधवा मुलाला दत्तक घेऊ शकत असे. एकदा त्यांच्या एका मंत्र्याने लाच घेतल्याशिवाय दत्तक घेण्याच्या मंजुरीस नकार दिला, तेव्हा अहिल्यादेवींनी दत्तकविधानाचा कार्यक्रम स्वतः प्रायोजित करून, रीतसर कपडे व दागिन्यांचा आहेर दिला. अहिल्याबाईंच्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण घटना ही त्यांचा कार्यलौकिक वाढविणारी आहे. आपली कन्या मुक्ताबाई हिचे स्वयंवर घोषित करताना त्यांनी जाहीर केले की, “जो कोणी चोर, लुटारु, दरोडेखोर यांचा राज्यात बंदोबस्त करील, त्या शूर व्यक्तीशी मुक्ताबाईचा विवाह लावला जाईल. त्यावेळी जातपात बघितली जाणार नाही.” हा अलौलिक विचार जाहीर करून त्या थांबल्या नाहीत, तर यशवंतराव फणसे या गुणी, शूर तरुणाशी त्यांनी मुलीचा विवाह करून दिला. कारभार करत असताना प्रजेच्या, यात्रेकरूंच्या, व्यापार्यांच्या व प्रवाशांच्या लुटमारीच्या तक्रारी अहिल्यादेवींच्या कानावर येऊ लागल्या. लूट करणार्या भिल्ल, गोंड आदी जनजातीय लोकांवर जरब बसविण्यासाठी त्यांनी यशवंतराव फणसे यांना सैन्यासह पाठविले. त्यांनी भिल्लांच्या पुढार्यांना त्यांच्यापुढे आणून उभे केले.
अपराधी गुन्हा का करतो, हे लक्षात घेऊन मगच त्याचा योग्य तो सोक्षमोक्ष लावला पाहिजे व अपराध्याला योग्य न्याय दिला पाहिजे, या भूमिकेतून अहिल्याबाईंनी शांतपणे त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. कमाईचे साधन नसल्याने हे लोक वाटसरूंकडून ‘भिलकवडी’ नावाचा कर वसूल करत. त्यांना उपजीविकेचे साधन म्हणून त्यांच्या वस्तीशेजारील जमीन देऊन शेतीसाठी प्रवृत्त करण्यात आले. त्याचप्रमाणे डोंगरमाळ, जंगली भागातील रस्ता व तेथून जाणार्या प्रवाशांच्या संरक्षणाची जबाबदारी त्याच्यावर सोपविण्यात आली. त्याचप्रमाणे, कोणास लुटले गेले तर ते लुटारूंकडून परत मिळवून मालकाच्या ताब्यात देण्याची अभूतपूर्व व्यवस्थाही लावली. त्यामुळे भिल्ल होळकरांच्या सैन्यात आले व त्यांनी सुरतेवर वचक बसविला. असे पुण्यसंचयाचे काम अहिल्यादेवी करीत होत्या. तशातच त्यांचा नातू 13व्या वर्षी मरण पावला. काही दिवसांतच जावई लढाईत कामी आला आणि मुलगीही सती गेली. आयुष्यभर कोसळलेल्या संकटांनी त्यांचा अंत पाहिला होता. अहिल्याबाईंची प्रकृती बिघडत गेली आणि अखेर दि. 13 ऑगस्ट 1795 रोजी त्यांनी शांतपणे मृत्यूला जवळ केले. कोणाही इतिहास अभ्यासकाने अहिल्याबाईंचे श्रेय आजवर नाकारलेले नाही. अहिल्यादेवी होळकर ही उदात्त व्यक्ती, सक्षम राज्यकर्ती आणि प्रबळ सम्राज्ञी होती. 18व्या शतकात एक महिला शासक म्हणून अहिल्याबाईंनी सामाजिक नियमांचे अडथळे तोडून महिला सक्षमीकरण आणि नेतृत्वाचा आदर्श ठेवला. तिची कथा प्रेरणा देत राहते, ती महत्त्वाकांक्षी नेत्यांसाठी एक दीपस्तंभ म्हणून काम करते आणि प्रबुद्ध नेतृत्वाच्या क्षमतेचा दाखला देते. अशा महान शासनकर्त्या पुण्यश्लोक महाराणीला मनाचा मुजरा!!!
अॅड. मानसी चिटणीस