पुण्यलोक अहिल्यादेवींनी आपल्या अधिपत्याखालील प्रांतात सांस्कृतिक आणि सनातन सांस्कृतिक राष्ट्राचे जागरण केले. देवींच्या रुपाने छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे स्फुल्लिंग पेशवाईच्या आणि पर्यायाने होळकरांच्या पराभवानंतरही या वननिवासी आदिवासी जमातींनी धगधगते ठेवले. ब्रिटिशांना आदिवासींच्या या स्वातंत्र्यासंग्रामाची दखल घ्यावीच लागली. त्रोटक स्वरुपात का होईना, 1822 साली झालेला कोळ्यांचा पहिला उठाव आणि पाठोपाठ 1844च्या सुमारास झालेला कोळ्यांचा दुसरा उठाव नोंदवावा लागला. त्याविषयी...
हरिश्चंद्र डोंगररांगांतील हरिश्चंद्रगड, रतनगड (रत्नगड), अजुबा डोंगर, अळंगा व कळंगा जोडकिल्ले, बितनगड, पट्टागड (विश्रामगड), कळसूबाई या पर्वतशिखरांच्या उतरणीचा प्रदेश ‘डांगाण’ म्हणून ओळखला जातो. मूळा, प्रवरा, आढळा, म्हाळुंगी, कृष्णवंती या सर्व नद्या या भागात उगम पावतात आणि प्रवरा प्रवाहाने गोदावरीला मिळतात. प्रवरासंगम क्षेत्रात गोदावरी-प्रवरा संगम तीर्थक्षेत्र निर्माण झाले आहे. समुद्रमंथन प्रसंगाची कथा परिसराला जोडली असून, तेव्हापासूनचा इतिहास, क्षेत्रांच्या अस्तित्वाने बोलका होतो. हा डांगाण परिसर, अगस्त्यपूर क्षेत्रात म्हणजे इगतपुरी-नाशिकपासून प्रवरा-संगम येथपर्यंतच्या ‘तपोवन’ म्हणून ओळखल्या जाणार्या दंडकारण्याचा भाग होय. गोदावरीच्या खोर्याचा हा भाग शिवशाहीत ‘त्र्यंबकप्रांत’ म्हणून गणला जात असे. भीमाशंकर ते त्र्यंबकेश्वर या ज्योतिर्लिंगांच्या रांगेतील हा प्रदेश ठायी ठायी शिवस्थानांनी पवित्र झालेला, महादेवकोळ्यांची सलग गावे असलेला, गावांना जोडून ठाकरवाड्या असलेला, सोबतीला गोपालन करणार्या, तलवार कानडे जमाती बरोबरच, कुणबी, वंजारी इ. समूहांचा प्रभू रामचंद्रांच्या वास्तव्याने, भ्रमंतीने आणि अतिमहत्त्वाच्या अशा पंचवटीतील सीताहरण प्रसंगाचा, जटायु-रावण युद्धाचा आणि उत्तर रामायणातील वाल्मिकी ऋषींच्या आश्रमातील सीतामाईच्या लव-कुशासह वास्तव्य प्रसंगापासूनचा इतिहास सांगणारा! अकोले येथील महर्षी अगस्तिमुनी आश्रमात सर्व जमातींच्या साक्षीने रावणाशी युद्ध करण्यासाठी महर्षी अगस्त्यांकडून दिव्य अस्त्र स्वीकृती लीला इतिहास, वाल्मिकी रामायणातून प्रकटविणारा, शिवछत्रपतींच्या पट्टागड तथा विश्रामगडावरील वास्तव्याचा आणि पेशवाईच्या अस्ताचा साक्षीदार असा हा प्रदेश. पेशवाईतील व्यवस्थापकीय नोंदीनुसार त्र्यंबकप्रात हा होळकरांच्या अधिपत्याखाली होता. पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा प्रवास, त्यातील शिवतीर्थ विकास कार्याची श्री सिद्धेश्वर (अकोले), महर्षी अगस्ती आश्रम अकोले, कोळेश्वर (कोळी) रत्नेश्वर (रतनवाडी-प्रवरा उगम) तथा अमृतेश्वर यांच्या अस्तित्व रुपाने ओळख करून देणारा हा डांगाण प्रदेश.
‘चाळीसगाव डांगाण परिसर : सांस्कृतिक वाङ्मयीन आणि भाषिक अभ्यास’ अशा बोलीभाषा आणि लोकसाहित्य यांच्या संबंधाने क्षेत्रीय अभ्यासाआधारे मी पुणे विद्यापीठाकडे प्रबंध सादर करणार होतो. त्यानिमित्ताने क्षेत्रीय अभ्यासाबरोबर ग्रांथिक संदर्भही शोधत होतो. अहमदनगर (अहिल्यानगर) येथील 1876च्या ब्रिटिशांनी संकलित केलेल्या आणि 1976च्या महाराष्ट्र सरकारने विस्तारित पुनर्मुद्रित केलेल्या जिल्ह्याच्या गॅझेटियरमधील नोंदविलेल्या ‘कोळ्यांचा उठाव’ या नोंदीने मी थक्क झालो. आत्माभिमानाने मोहरलो. शिवशाहीतील स्वत्वाचा, हिंदवी स्वराज्याचा, भारतीय सनातन राष्ट्रीयत्वाचा ज्वलंत साक्षात्कार त्या नोंदींनी घडविला. नोंदविलेला गॅझेटियरमधील मजकूर मी माझ्या 1979 साली सादर केलेल्या प्रबंधात नोंदविला आहे. पीएचडी नंतर या राष्ट्राभिमानी शेड्युलप्रमाणे ‘आदिवासी’ म्हणून गणल्या गेलेल्या आणि ब्रिटिश जुलूमशाहीमुळे विकासापासून वंचित राहिलेल्या; मात्र प्राप्त परिस्थितीतही आपली शिवास्पद संस्कृती देवी पार्वती कळसूबाईच्या साक्षीने जतन करणार्या वननिवासींच्या विद्यार्थ्यांसाठी राष्ट्रीय बाण्याने शैक्षणिक सुविधा निर्माण करून देण्यासाठी ‘वनवासी कल्याण आश्रम’ जशपूरनगर, मध्य प्रदेशच्या अनुकरणातून महाराष्ट्रातील ‘वनवासी कल्याण आश्रमा’चे (जनजाती कल्याण) पहिले वसतिगृह घरीच सुरू करून सुरुवात केली. आज रा. स्व. संघ परिवार म्हणून त्याचा वटवृक्ष झाला आहे.
स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे, असा विचार करून ऐतिहासिक कादंबरी ‘अहिनकुळ’चे लेखन, दामुअण्णा दाते, तात्या बापट आणि मदन तथा अण्णा चोरघडे यांच्या आग्रहाने केेले. मोतीबाग संघकार्यालयात 1986 साली त्या कादंबरीचे पू. सरसंघचालक बाळासाहेब देवरस यांच्या शुभहस्ते प्रकाशन झाले. 1921-22 मध्ये ‘भारतीय विचार साधने’ने दुसर्या आवृत्तीचे प्रकाशन याच प्रयत्नाला पूरक म्हणून ‘कातळी निखारे’ ही गोविंद खाडे, रामजी भांगरे या योद्ध्यांच्या आत्माभिमानी समर्थपणावर आधारित एकांकिका लेखन केले. पुण्यलोक अहिल्यादेवींनी आपल्या अधिपत्याखालील प्रांतात सांस्कृतिक आणि सनातन सांस्कृतिक राष्ट्राचे जागरण केले. देवींच्या रुपाने छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे स्फुल्लिंग पेशवाईच्या आणि पर्यायाने होळकरांच्या पराभवानंतरही या वननिवासी आदिवासी जमातींनी धगधगते ठेवले. ब्रिटिशांना आदिवासींच्या या स्वातंत्र्यासंग्रामाची दखल घ्यावीच लागली. त्रोटक स्वरुपात का होईना, 1822 साली झालेला कोळ्यांचा पहिला उठाव आणि पाठोपाठ 1844च्या सुमारास झालेला कोळ्यांचा दुसरा उठाव नोंदवावा लागला. पहिल्या उठावातील योद्ध्यांना अहमदनगरच्या किल्ल्यात डांबल्याचा उल्लेख गॅझेटियरमध्ये केला. मात्र, डांबल्यानंतर घडलेल्या घटनांची कागदपत्रे एतद्देशीयांना उपलब्ध होणार नाहीत, याची दक्षता ब्रिटिश सरकारने घेतली.
कोळ्यांच्या पहिल्या उठावातील नेते होते - गोविंद खाडे आणि रामजी भांगरे आणि त्यांचे सवंगडी, तर कोळ्यांच्या दुसर्या उठावाचे नेते होते, राघोजी भांगरे. राघोजी भांगर्यांना ठाणे येथील तुरुंगात डांबले. त्यांची कागदपत्रे उपलब्ध झाली त्यामुळे राघोजी भांगरे हे क्रांतिकारक म्हणून मान्यताप्राप्त झाले. वास्तविक गोविंद खाडे आणि रामजी भांगरे यांनी ब्रिटिश सत्ता स्थिरच होऊ नये, आपला ब्रिटिशांच्या ताब्यात गेलेला भाग परत आपल्या तलवारीच्या जोरावर मिळवावा, म्हणून निकराचा प्रयत्न केला.
प्रवरेचा उगम ज्या रत्नगडावर होतो, त्या रत्नगडावरून गडाच्या वेढ्यात ठेवलेल्या एका तोफेच्या बळावर गोविंद खाडे आणि रामजी भावरे यांनी अवघ्या 1000-1500 सवंगड्यांच्या जोरावर ठाणे, पुणे, नाशिक आणि नगर अशा चारही बाजूंनी घेरलेल्या कॅप्टन माकिनटोराच्या हजारोंच्या सैन्याशी निकराचे युद्ध केले. आज या युद्धभूमीवरच विटसनडॅमचे अर्थात भंडारादरा तलावाचे पाणी आहे. युद्धभूमी अशी तलावात गडप झाली तरी, परिसरातून गवताच्या पात्यापात्यापासून ‘हर हर महादेव’च्या आरोळ्या अवघा परिसर राष्ट्रीय अस्मितेने जागवितात.
पेशवाईत 1789 पर्यंत तुकोजी होळकरांच्यावतीने जावजी कोळी याने राजूर सुभ्याचा म्हणजे डांगाण भागाचा, साठगावांचा कारभार जबाबदारीने पाहिला. यात मोगलाईतील राजूर परिसरातील दुतर्फा 40 गावे, देशमुख देशपांडे व चौगुले यांना शहा आलम, शहा गाजी महंमदशाह अहंमदशाह दगाजी पिराजी यांच्याकडून इनाम मिळाली होती. ही सर्व गावे पेशवाईच्या अस्ताबरोबर व होळकरांच्या पराभवाबरोबर कंपनी सरकारच्या ताब्यात गेली होती. हे ‘सरकार कुंपणी इंग्रजबहादुर श्री। राधो महादेव शेकदार ता. अकोले पुरसीस देशमुख व देशपांडे ता. राजूर पैकी सन 1241 फसळी’च्या सवाल-जबाब नोंदणीवरून लक्षात येते. ही नोंद आता नगर येथील ऐतिहासिक वस्तुसंग्रहालयात त्र्यंबक रघुनाथ देशपांडे (संत) यांचे वारस पु. बा. टाकलकर यांनी सुपूर्द केलेल्या दप्तरात आढळते. मी प्रबंधात त्याची फोटोकॉपी नोंदविली आहे, तर या होळकरांच्या अखत्यारीतील राजूर सुभ्यात जावजी मोठ्या जबाबदारीने कारभार पाहात असतानाही, काही कंटक अनुयायांनी कट करून जावजीचा वध घडविला. त्यानंतर त्याचा मुलगा हिरजी नाईक हा सुभेदार झाला.
हिरजीच्या कारकिर्दीत गोविंदजी, मनाजी, वाळोजी यांनी बंड केले. त्यांना अनुयायी भरपूर मिळाले. मात्र, गोविंदजी पकडला गेला. मनाजी पळून गेला व पुढे मृत्यू पावला. वाळोजीने मात्र मोठी फौज जमवून कोकणात स्वारी केली. त्याला हिरजीने पकडले. पुढे हिरजी भांगरेचा पुतण्या रामजी भांगरे याने बंड केले. तो बंडखोर म्हणून प्रसिद्ध होता. म्हणजे बंडखोरी करून, मर्दुमकी गाजवून होळकरांच्या दरबारी मोठा सन्मान मिळवायचा, पेशवाईत लौकिक मिळवायचा अशा गोष्टी ही महादेव कोळी आणि मंडळी करीत असत. पुणे ब्रिटिशांच्या ताब्यात गेल्यानंतर बाजीराव जुन्नर भागातून पळ काढत ओतूर, ब्राह्मवाडा या पुण्याच्या सीमेवरील मार्गाने लिंगदेवपर्यंत आला. त्याचा पाठलाग करीत जनरल स्मिथ थेट शिरूरपर्यंत पोहोचला. तेथून तो अकोल्याजवळ थुगाव (सुगाव) पर्यंत आला. ही बातमी समजताच, बाजीराव कोतुलमार्गे राजूर परिसरात अवघड गडांच्या आश्रयाला गेला. दर्याखोर्यात ब्रिटिश येणार नाहीत, असे त्यास वाटले. राजूर परिसरातील अर्थात डांगाणातील होळकरांच्या अधिपत्याखालील ही महादेव कोळी, ठाकर, कानडे मंडळी आपापसात बंडखोरी करीत असली, तरी पेशवे, होळकर आणि शिवशाही यांच्या एकनिष्ठपणे पाठीशी उभी असत. मात्र, जनरल स्मिथच्या अर्थात ब्रिटिशांच्या म्हणजे कंपनी सरकारच्या कावेबाजपणाला, आधुनिक हत्यारांना घाबरलेली ही मंडळी काहीशी पळ काढत होती. अखेर जनरल स्मिथने पेशव्यांना तेथूनही पिटाळले.
त्याच सुमारास होळकरांचाही इंग्रज सरकारकडून पराभव झाला. त्यांच्या अधिपत्याखालील आणि मोठ्या आत्मीयतेने स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी सतत तत्पर असलेले डांगाण भागातील किल्ले रतनगड, अलंग कळंग, पट्टागड इ. कॅप्टन सिक्सने सर केलेे. या कारवाईने किल्लेदार, महालकरी इ. प्रकारे होळकरांच्या आणि पेशव्यांच्या पदरी असलेली बहादूर लढवय्ये एकनिष्ठ स्वराज्यरक्षक योद्धे तात्पुरते पळून गेले, तरी त्यांच्यातील आत्माभिमाने ते तेवढ्याच त्वेषाने ब्रिटिशांचा पाडाव करण्यासाठी सरसावले. मुळातील बंडखोरकृती ब्रिटिशांविरुद्ध उसळून आली.
त्यावेळी गोविंदराव खारी (खाडे) हा रतनगडचा प्रमुख सेनाधिकारी महाळकरी होता. पेशव्यांकडून त्याला छोटी जहागिरीही मिळाली होती. होळकरांच्या तर तो विशेष विश्वासातला होता. त्याच्या अधिकारावर कॅप्टन सिक्समुळे गदा आली होती. पेशवे आणि होळकर यांचा पराभव झाला, तरी गोविंद खाड्यांच्या ठायी असलेले स्वराज्याचे स्फुल्लिंग धगधगते होते. ब्रिटिश सरकारने अशा सर्व किल्लेदारांना पोलीस खात्यात सामावून घेऊन, त्यांच्या गुणांचा राजवटीसाठी उपयोग करायचे ठरविले. या अमिशाला काही किल्लेदार बळी पडले होते. मात्र, गोविंद खाडे यांनी देऊ केलेल्या नोकरीवर लाथ मारली. तसे किल्लेदारही बिथरले. परंतु, आणखी 12 किल्लेदार गोविंद खाडेंसोबत अधिकार गमावून बसले होते. त्यांच्यातील राम भांगरेने मात्र वेगळाच विचार केला. त्याने इंग्रज सरकारची जमादार म्हणून नोकरी स्वीकारली. काही किल्लेदारांनी त्याचे अनुकरण करायचे ठरविले. नोकरी करीत आपले ऐश्वर्य कायम राखण्याचा निर्णय त्यांनी घेतला. गोविंद खाडेने मात्र त्यांचे मन वळवून बिटिश सरकारविरुद्ध बंड करण्याचा निर्णय घेतला. त्यात गोविंद खाड्यांना काही प्रमाणात यशही मिळाले.
रामजी भांगरे पोलीस जमादार झाल्यानंतर तो वर्षातून एकदा ‘भेट’ नावाचा प्रकार घडवून आणत असे. इंग्रज सरकारने हे ‘भेट’ प्रकरण बंद करण्याचा हुकूम दिला. या ‘भेट’ प्रकारात रामजी एखाद्या राजासारखा दरबार भरवी आणि रयतेकडून नजराणे स्वीकारी. आपल्या मर्जीप्रमाणे आपल्या रयतेला सर्वप्रकारे मोकळीक देई. सरकारचा हुकूम आल्यावर रामजीला आपल्या स्वायत्ततेवर आणि स्वाभिमानावर आघात केल्यासारखे वाटले. त्याने राजीनामा दिला. ब्रिटिश सरकारने मोठ्या खुबीने त्याला सहा महिन्यांची पगारी रजा मंजूर केली. मात्र, पगार वाढविला नाही. ब्रिटिशांच्या या चुचकारण्याने रामजी बधला नाही, उलट नेहमीच्या सवयीप्रमाणे तो बंड करून उठला. त्याच्यासारखीच त्याच्या बरोबरच्या पोलीस अधिकार्यांची गत झाली होती. ते रामजीला येऊन मिळाले. त्यांनी इंग्रज सत्ताच उथलून टाकण्याचा निर्णय घेतला. या घडामोडींवर धूर्त स्वाभिमानी, कुशल संघटक आणि स्वराज्याचा एकनिष्ठ योद्धा गोविंद खाडे लक्ष ठेवून होता. या सर्व महादेव कोळी किल्लेदारांना त्यांनी आवाहन केले.
एकूण रामजी भांगरे आणि त्याचे साथीदार गोविंदराव खाडे आणि त्याच्या साथीदारांना येऊन मिळाले. स्वराज्याच्या फौजेची अर्थात गोविंद खाडेची ताकद वाढली. आणाभाका झाल्या. कोकण, नाशिक, पुणे आणि नगर भागात ब्रिटिश सरकारला सळो की पळो करून सोडण्यासाठी मोहिमा आखल्या गेल्या. पैसा जमविण्यासाठी हे योद्धेे बिटिशांना गुपचूप मदत करणारे सावकार, धनाढ्य फितूर लोक यांच्यावर दरोडे घालून, सरकारी खजिनाही वाटेत लुटून मोहिमा फत्ते करू लागले. त्यांचे हे बंड मोडून काढणे आता कॅप्टन सिक्सला शक्य नव्हते. तरुण अशा कॅप्टन माकिनटोश या अधिकार्यावर हे बंड दडपून टाकण्याची जबाबदारी देण्यात आली. कॅप्टन माकिनटोश सह्याद्रीच्या रांगांमध्ये आला. त्याला काहीच शोध घेता येईना. देशपांडे, कुलकर्णी, देशमुख अशा वतनदार मंडळींनी उलट कॅप्टन माकिनटोशला बंडखोरांमागे न जाण्याचा सल्ला दिला. कॅप्टनने तो तात्पुरता मान्यही केला. तरी गुप्तरितीने या बंडखोरांचा माग काढण्याचा त्याचा प्रयत्न चालूच होता. फंदफितुरीचा कॅप्टनने चांगलाच उपयोग करून घेतला. बंडखोरांची नावांसह माहिती मिळाली तरी, दोन-चार-सहा वर्षे बंडखोरांच्या मोहिमांवर त्याला मात करता येईना.
बंडखोर धन लुटत आणि रयतेतील गोरगरीब, आर्त प्रजेला वाटून देत. त्यांना वेळीअवेळी सर्वप्रकारे साहाय्य करीत. त्यामुळे अवघी प्रजा त्यांच्यावर प्रसन्न होती. एवढेच नव्हे, तर गोविंद खाडे, रामजी भांगरे आणि त्यांचे सवंगडी हे प्रजेला देव वाटू लागले. यामुळे तर, कॅप्टन माकिनटोशची मोठीच पंचाईत होऊ लागली. जसजसे दिवस पुढे जात होते, तसतशी गोविंद खाडेची ताकद वाढत होती. कॅप्टन माकिनटोशला सरकारला उत्तर देणे कठीण झाले. सरकारने महसूल वसूल करावा आणि तो वाटेतच लुटून नेला जावा, या घटनांनी कॅप्टन व त्याचे जवान हैराण झाले. अखेर कॅप्टन माकिनटोशने वरिष्ठांशी विचारविनिमय करून मोठी मोहीम आखली. कॅप्टनने भिवंडी, मालेगाव, अहमदनगर व पुणे येथून सैन्यपथके पुढे-पुढे सरकवत आणून, बंडखोरांना रानात त्यांच्या ठाण्यावर, प्रामुख्याने रतनगडावर पूर्ण कोंडीत पकडले. बंडखोरांना मोहिमा करता येईनात. अनेक साथीदार मारले गेले. रसद बंद झाली. काय करावे कळेना. दाणागोटा, पैसाअडका हळूहळू संपत आला. रतनगडावर हजार-पंधराशे फौज सांभाळणेही कठीण झाले. जमलेले सवंगडी कशाबशा मार्गाने घरोघरी शेती करण्यासाठी परतले. त्यातील काही तर बेजारीने फितुरी पत्करून, स्वत:चा बचाव करू लागले.
अखेर कॅप्टन माकिनटोशने थेट रतनगड सर करण्यासाठी चारही बाजूंनी घेरून युद्धच सुरू केले. रतनगडावर दारूगोळा मर्यादित, त्यात फौजेचे धैर्य टिकवून लढणे कठीण. कॅप्टनने तर जोरदार चढाई केली. गोविंद खाडे, रामजी भांगरे, रामाकिरवा आणि सोबतचे सवंगडी निकराने जमेल तसे भोवती जमलेल्या ब्रिटिश फौजेवर, म्हणजे स्वदेशी बांधवांवरच तुटून पडू लागले. रतनगडावर कल्याण दरवाजाच्या अलीकडे शिखराच्या नेढ्यात (विस्तीर्ण नैसर्गिक आरपार भगदाडात) एक तोफ ठेवली होती. त्या तोफेच्या बळावर जवळपास 15 दिवस कॅप्टनच्या सैन्याला खालीच अडकवून ठेवण्यात गोविंद खाड्यांना यश आले. पण, उसने अवसान टिकेना, दाणागोटा, दारूगोळा सारेच संपले. कॅप्टन माकिनटोशने सर्वबाजूूंनी गडावर स्वारी चढविली आणि घात झाला. गोविंद खाडेने ज्याला जसे पळून जाता येईल, तसे पळून जाण्यास सांगितले. रामाकिरवाने मोठ्या शिताफीने नगरच्या बाजूने जमेल तेवढ्यांना घेउन पळ काढला. रामाकिरवा आपल्या बरोबरच्या सवंगड्यांसह नगर जिल्ह्यातील ब्रिटिशांविरुद्ध मोहिमा करणार्या भिल्लांच्या टोळ्यांना जाऊन मिळाला.
गोविंद खाडे, रामजी भांगरे त्यांच्या बरोबरीचे किल्लेदार आणि अनुयायी मात्र कॅप्टन माकिनटोशच्या हातात सापडले. या सर्वांना कॅप्टनने अहमदनगरच्या तुरुंगात डांबले. पेशवाई आणि होळकरांच्या पाडावानंतर या वननिवासी लढवय्यांनी स्वराज्य पुनर्संपादनाची मोहीम सुरूच ठेवली. एके ठिकाणी अपयश स्वीकारावे लागले, तर दुसर्या ठिकाणी पुन्हा जमवाजमव करीत स्वराज्य मोहीम सुरू राहिली. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या या एकनिष्ठ अशा स्वराज्याच्या सेवकांनी, हिंदवी स्वराज्यासाठी आणि पुढे भारतीय स्वातंत्र्यासाठी चळवळ सुरूच ठेवली. डॉ. गोविंद गारे यांनीही आदिवासी महादेव कोळी या व अन्य पुस्तकात या इतिहासाची नोंद घेतली आहे.
1818 नंतर 1820-22 पासून 1835-37 पर्यंतचे हे पहिले स्वातंत्र्यसमर सह्यशिखरांच्या सान्निध्यात सुरूच होते. हा पहिला उठाव संपतो न संपतो, तोच 1840 नंतर राघोजी भांगर्यांनी याच महादेव कोळी, ठाकर, तलवार कानडे आदी सर्वांना बरोबर घेऊन स्वराज्यासाठी क्रांतीचा मार्ग स्वीकारला. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वाटचालीत अहिल्यादेवींचे पुण्यमयी स्मरण करताना, हा पहिला स्वातंत्र्यसंग्राम अस्मिता जागी करीत तनामनाला रोमांचित करतो.
डॉ. अनिल सहस्रबुद्धे