पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची प्रत्येक कृती, प्रत्येक निर्णय ईश्वराच्या आज्ञेने आणि ईश्वराप्रति समर्पित होती. कोणत्याही प्रकारचा भेद, विषमता न बाळगता, त्यांनी निःस्वार्थी भावनेने राजकार्य आणि त्याचबरोबर समाजकार्यही उभे केले. या सगळ्याला धर्माचे अधिष्ठान होते. त्यांच्या नावाने आणि विचाराने समाजात काम करतो, असे म्हणणार्या अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यातील काही संघटनांच्या कार्याचा मागोवा घेणारा हा लेख...
जय मल्हार सेना, पुणे
"शूरता, वीरता, बुद्धिमत्ता, पावित्र्य, माणुसकी आणि जगभरातल्या सगळ्या सद्गुणांचा आलेख काढला, तर त्याचे परिमाण म्हणजे आमच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर. मल्हारराव होळकरांचे आणि नंतरच्या यशवंतराव होळकरांचे कर्तृत्व काय कमी होते का? पण, समाज विसरला. समाजाला आपला देदीप्यमान इतिहास ज्ञात व्हावा, म्हणून ‘जय मल्हार सेना’ काम करते,” मल्हार सेनेचे अध्यक्ष विक्रांत काळे सांगत होते. ‘बीएस्सी बायोटेक्नॉलॉजी’ आणि पुढे ‘एमबीए’पर्यंत शिक्षण घेतलेले विक्रांत हे पूर्वी नोकरी करायचे. मात्र, सध्या पूर्णवेळ समाजाचे काम करतात. त्यांच्यासोबत विकासराव माने हे संघटनेचे संघटक आहेत, तर संघटनेच्या कार्यात शेकडो समाजबांधवांचे योगदान आहे. योगेशराजे होळकर, योगेश काळे, राहुल सरगर, किरण सोनवलकर-पाटील आणि आणखी कितीतरी समाजबांधव. धनगर समाजाला कायमस्वरूपी टिकेल, अशा एका सशक्त संघटनात्मक बांधणीची आवश्यकता आहे आणि म्हणूनच सशक्त संघटनेच्या बांधणीसाठी टाकलेले पहिले पाऊल म्हणजेच ‘जय मल्हार सेना, महाराष्ट्र राज्य.’ या संघटनेच्या माध्यमातून आगामी काळात धनगर समाजाच्या संघटनात्मक बांधणीसाठी महाराष्ट्रातील खेड्यांपासून ते शहरांपर्यंत विविध कार्यक्रम, योजना राबविल्या जाणार आहेत.
सध्या तरी ‘जय मल्हार सेना’ समाजाच्या मानबिंदूच्या अस्मिता समाजात पुन्हा तेजोमय व्हाव्यात म्हणून कार्य करत आहे. त्यासाठी सेना काही उपक्रम राबवते, त्यापैकी एक होळकर घराण्याचे पाचवे शासक यशंवतराव होळकर यांचे जन्मस्थान म्हणजे वाफगाव. यशवंतराव हे कर्तृत्ववान होते. मात्र, त्यांच्या स्मृती जपल्या गेल्या नाहीत. ‘जय मल्हार सेना’ यशवंतरावांच्या जन्मगावी - वाफगाव येथे त्यांच्या स्मृतिकार्यानिमित्त विविध उपक्रम राबविते. महाराष्ट्रात धनगर समाजाची तीर्थक्षेत्रे आहेत. काही ज्ञात, काही अज्ञात. या सर्वांचा शोध घेण्याचे काम ‘जय मल्हार सेना’ करते. स्वातंत्र्यलढ्यात धनगर समाजबांधवांचेही योगदान होते. मात्र, त्याबद्दलही पूर्ण माहिती कुठेही नाही. गावागावांतून स्वातंत्र्यासाठी हौतात्म्य पत्करणार्या देशसेवकांची माहिती संकलित करण्याचे कामही संघटना करत आहे. संस्थेचा मूळ उद्देश हाच आहे की, समाजात त्याच्या अंत:प्रवाहात असलेले शौर्य, कर्तृत्व पुन्हा प्रस्थापित व्हावे. त्यासाठी समाजाचे मानबिंदू असलेल्या थोरांचे, वीरांचे कर्तृत्व मांडणारी पुस्तकं, माहिती समाजात प्रसारित करणे. ‘जय मल्हार सेना’ ‘सुंबरान पुस्तक योजना’ राबविते. याबाबत विक्रम म्हणतात की, “सुंबरान पुस्तक योजनेच्या माध्यमातून धनगर समाजातील ऐतिहासिक व्यक्तींची पुस्तके, आत्मचरित्र, कथासंग्रह व इतर वाचनीय साहित्य आम्ही समाजबांधवांना उपलब्ध करून देते.
संघटनेची मल्हारगड ही एक अत्यंत महत्त्वाकांक्षी योजना आहे. मल्हारगड नामक वास्तूमध्ये धनगर समाजावरील साहित्य, कला, शिक्षण, राजकीय, सामाजिक, ऐतिहासिक, पौराणिक अशा विविध क्षेत्रांतल्या गोष्टींचा संग्रह करणे, त्यांचे जतन करणे ते समाजासाठी उपलब्ध करून देणे, तसेच धनगर समाजाविषयी संपूर्ण माहिती उपलब्ध होईल, अशा प्रकारची व्यवस्था इथे असेल. धनगर समाजाची खरी ओळख जगाला करून देण्याबरोबरच एका उत्कृष्ट संशोधन केंद्राचे काम मल्हारगडामार्फत होणार आहे.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन, परभणी
नुकतेच परभणी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासनाची निर्मिती झाली. हे अध्यासन संशोधनाच्या माध्यमातून समाजजागृती आणि संघटनात्मक कार्य करणार आहे. होळकरशाहीच्या कालखंडातील राष्ट्रबांधणीचे कार्य तसेच राजमाता अहिल्यादेवींच्या विचारकार्यावर आधारीत कार्यक्रम, उपक्रम, परिसंवाद, चर्चासत्र संशोधन, विविध स्पर्धा आणि पुस्तकनिर्मिती प्रकाशन वगैरे हे अध्यासन करणार आहे. दि. 18 एप्रिल 2024 रोजी स्थापन झालेल्या या अध्यासनाचे समन्वयक रिषीकेश सकनूर आहेत, तर नागसेन पुंडगे, गजानन अंबोरे, भूषणसिंह होळकर आदी मान्यवरही या अध्यासनाच्या माध्यमातून देवी अहिल्यामातेचे आणि एकंदर होळकरशाहीच्या वैभवाचे मंगल विचारकर्तृत्वाचे वास्तवपट समाजासमोर विविध माध्यमांतून मांडणार आहेत. या अध्यासनाचे मार्गदर्शक प्रदीप रावत, तर कार्यकारी मंडळावर प्रणव पाटील, हर्षद शेजाळ, नृसिंह सदगे, सतीलाल कन्नोर, अनिकेत भुषनर आहेत.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेडिकल असोसिएशन, मुलुंड
समाजबांधवांसाठी आरोग्यविषयक कार्य करणारी संघटना म्हणजे मुंबईतली ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेडिकल असोसिएशन’ ही संघटना. संघटनेचे अध्यक्ष डॉ. अरुण गावडे हे मूळचे सांगोला-पंढरपूरचे. काही दशकांपूर्वी वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी ते ठाण्यात राजीव गांधी मेडिकल कॉलेजला आले. वैद्यकीय शिक्षण घेताना त्यांना त्यावेळी नितीन वाघमोडे, महारथ घारगड, डॉ. सह्याद्री सरकर, तात्यासाहेब कोकरे इत्यादी अनेक समविचारी व्यक्ती भेटल्या. हे सगळे जण गावखेड्यांतून मुंबईत उच्चशिक्षणासाठी आले होते. हे सगळे धनगर समाजाचे युवक होते. एकाच जातीचे, साधारण एकाच परिस्थितीतले हे युवक एकत्र आले आणि त्यांना जाणवले की, मेंढ्यांची राखण करत म्होरक्या आणि त्याच्यासोबत चारदोन कुटुंबे तीनचार शहरे सहज पालथी घालतात. पण, दुर्दैैवाने कधी आरोग्यासंदर्भातल्या समस्या आल्या तर? त्यांना शहरातील इस्पितळांमध्ये जावेच लागते. तिथे त्यांना खूप अडचणी येतात. मुंबई-ठाण्यात मेंढपाळ करत येणार्या धनगर समाजबांधवांना कुटुंबांना आरोग्यासंदर्भातल्या अडचणी आल्या, तर त्यांना मदत करणारे तसे कुणी नव्हते. साधारण 2002 साली डॉ. अरुण गावडे यांनी ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर मेडिकल असोसिएशन’ ही संघटना स्थापन केली. डॉ. ललीत धायगुडे, डॉ. मनोज माने, डॉ. केशव काळे, डॉ. कल्पेश खताळ, डॉ. अमित खरजे आणि डॉ. वर्षा चौरे हे समाजबंधू-भगिनी या संघटनेचे पदाधिकारी आहेत. मुंबई आणि परिसरात गावखेड्यांतून येणार्या समाजबांधवांना वैद्यकीय मदत उपलब्ध करून देणे, वैद्यकीय क्षेत्रात उच्चशिक्षण घेऊ इच्छिणार्यांना त्यासंदर्भात माहिती देणे आणि मार्गदर्शन, सहकार्य करणे, धनगर समाजाच्या वस्तीमध्ये, गावामध्ये वैद्यकीय शिबिराचे आयोजन करणे, रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, मुंबई परिसरातील वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणार्या समाजातील विद्यार्थ्यांना सर्वतोपरी सहकार्य करणे, पालक म्हणूनच त्यांची काळजी घेणे, गंभीर आजार किंवा शस्त्रक्रियेसाठी सरकारी माध्यमातून आर्थिक मदत उपलब्ध करून देणे ही आणि इतर अनेक कामे ही संघटना करते. संस्थेचे उद्दिष्ट आहे की, वैद्यकीय शिक्षणात पदव्युत्तर शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत वसतिगृहाची निर्मिती करणे. तसेच समाजबांधवांसोबतच इतर समाजातील गरजू रुग्णांसाठी सुसज्ज हॉस्पिटल निर्माण करणे.
अहिल्या महिला मंडळ, पेण
अहिल्यादेवींच्या विचारांनी कार्य करणार्या संघटना केवळ धनगर समाजातील मंडळींनीच निर्माण केल्या, असे नाही. माता अहिल्या या प्रत्येक शक्तिशाली आणि कर्तृत्ववान स्त्रियांसाठी कायमच आदर्श. त्या आदर्शानुसार विश्व हिंदू परिषदेच्या काम करणार्या वासंती देव यांनी दि. 18 ऑक्टोबर 1996 रोजी पेण येथे ‘अहिल्या महिला मंडळा’ची स्थापना केली. वनवासी महिलांना कौटुंबिक समुपदेशन करता करताच मंडळ आज पेणच नव्हे, तर राज्यातील एकंदर सेवाकार्याचे मानबिंदू ठरले आहे. ‘अहिल्या महिला मंडळा’च्या कार्याबाबत वासंती देव सांगतात, “श्री. शंकर आज्ञेवरून यानुसार पुण्यश्लोक राजमाता आहिल्यादेवी काम करत असत. जे काही आहे, ते ईश्वराचे आहे आणि ते त्याला समर्पित आहे, या भावनेने त्यांनी राज्य चालवले. आम्हीसुद्धा याच भावनेने मंडळाचे काम करतो.” वासंती यांच्या म्हणण्यात 100 टक्के तथ्य होते. कारण, त्या आणि मंडळाच्या पदाधिकारी पेण परिसरातील शोषित-वंचित समाजबांधवांंंंचे उत्थान कसे होईल, यासाठीच काम करतात. त्यामध्ये स्वार्थाचा एक अंशही नाही. महिला, मुली, वृद्ध सगळ्यांसाठी विविध पातळ्यांवर मंडळ काम करते. मंडळाने संस्कार केंद्र, शिशुवर्ग ते इ. चौथीपर्यंत पेणजवळील ग्रामीण आणि आदिवासी मुलांना शहराशी जोडण्यासाठी मुक्ताई विद्यामंदिराची स्थापना केली. देववाणी संस्कृत, ज्ञान, विज्ञान, धर्म नीतीवैद्यक यांचा अमृततुल्यसाठा असलेली भाषा आहे. तिचा प्रचार व प्रसार व्हावा, या उद्देशाने संस्कृत पाठशाळेची स्थापना केली. ती इंदिरा संस्कृत पाठशाळा होय. आदिवासी मुलींना शिक्षण मिळून मुख्य शहरी जीवन प्रवाहाशी त्यांना मिसळता यावे म्हणून आनंदी वसतिगृह सुरू केले.
विष्णुपंत भागवत वाचनालय मंडळाच्या इमारतीत सुरू झाले. सामाजिक आरोग्य हा दृष्टिकोन डोळ्यांसमोर ठेवून डॉ. घाटे आरोग्य केंद्र स्थापन केले. इथे रक्त, लघवी, थुंकी इ.ची तपासणी अल्पदरात केली जाते. सर्वसामान्य स्त्रिया स्वावलंबी होण्यासाठी ‘स्वादभारती’, ‘स्वयंसिद्धा’, ‘माहेर’ या आयामाद्वारे कार्य केले जाते. त्यातून महिलांना रोजगार उपलब्ध होतो. गतिमान जीवनामुळे मुलांना आईवडिलांना सांभाळणे कठीण जाते. अशा परिस्थितीत वृद्धांचे एकाकीपण टाळण्यासाठी तसेच त्याचे उर्वरित आयुष्य आरोग्यपूर्ण, शांततेने, समाधानाने जावे म्हणून संजीवन आश्रम मंडळाने सुरु केला आहे. डोंगरपाड्यात राहणार्या सुमारे दहा पाड्यांवरील इयत्ता तिसरी ते बारावीमध्ये शिकणार्या कातकरी समाजातील मुलींसाठी आनंदी वसतिगृह चालवले जाते. आज या वसतिगृहाचा लाभ 38 मुली घेत आहेत. याशिवाय डॉक्टर घाटे आरोग्य केंद्र, पॅथॉलॉजिकल लॅब, कृष्णाजी रानडे ब्लड स्टोअरेज सेंटर, कौटुंबिक सल्ला केंद्र, असे वैद्यकीय सेवा पुरवणारे अनेक उपक्रम यशस्वीरित्या राबवले जातात. शिक्षण, आरोग्य, सेवा, कला, स्वीकृत कार्य, याद्वारे सर्व समाजघटक स्वावलंबी बनवणे, महिलांचे स्वास्थ्य, त्यांना स्वावलंबी बनवणे हे संस्थेचे ध्येय. संस्था हे ध्येय निःस्पृहपणे कार्यान्वित करत आहे. अहिल्यादेवी होळकरांनी राज्याचे सुराज्य बनवण्यासाठी आणि अधर्मावर धर्माचा विजय मिळवण्यासाठी सूक्ष्म नियोजन करत असत. त्यांच्या नावाने कार्यरत असलेले अहिल्या महिला मंडळही समाजाच्या कल्याणासाठी सूक्ष्म आणि यशस्वी नियोजन करत असते.