निवडणुकीतील अंदाज व्यक्त करताना त्यामागे निश्चित तर्क असावा लागतो. गेल्या दहा वर्षांत देशात अर्थव्यवस्थेच्या वाढीमुळे जो नवा सधन वर्ग उदयाला आला आहे, त्याला संपत्तीच्या फेरवाटपाचे आकर्षण कसे वाटू शकते? आजचा भारत गरीब राहिलेला नाही, हेच काँग्रेसच्या लक्षात आलेले नाही. राममंदिराला भेट देणारे दोन कोटी लोक हे मोदींच्या विरोधात मत देतील काय?
लोकसभा निवडणुकीच्या निकालांची प्रतीक्षा सर्वांनाच लागली असून, दि. ४ जून उगवेपर्यंतचे येते चार-पाच दिवस हे असह्य प्रतीक्षेचे आहेत. येत्या शनिवारी मतदानाचा अखेरचा टप्पा पार पडल्यावर, संध्याकाळी एक्झिट पोल प्रसारित केले जातील. ते कितपत विश्वासार्ह आणि अचूक असतात, हा वेगळा प्रश्न आहे. पण निदान त्यांमुळे निकालांच्या अपेक्षेला एक दिशा मिळेल, आणि चर्चेला आधार प्राप्त होईल. गेले काही दिवस वृत्तवाहिन्यांवरून अनेक प्रस्थापित आणि हौशी वृत्तविश्लेषकांकडून, लोकसभा निवडणुकीच्या निकालांसंबंधी आपल्या अंदाजांचे पतंग उंच उडविले जात आहेत. भाजपला बहुमत मिळणार नाही, मोदी निवडणूक हरतीलच, इथपासून ’एनडीए’ ४०० पार जाईल, इथपर्यंत सर्व प्रकारचे तारे तोडले जात आहेत. त्यांतून काहींची करमणूक झाली, तरी प्रेक्षकांची मने अधिकच गोंधळून जात आहेत. या मतामतांच्या गलबल्यात विश्वासार्ह अंदाज कोणाचा असू शकतो, हे शोधणे कठीण झाले असले, तरी काही पत्रकारांनी केलेले विश्लेषण ऐकल्यावर ते तर्कसंगत आहे, हे जाणवते.
एका वृत्तवाहिनीवर झालेल्या अशाच प्रकारच्या चर्चेत, काँग्रेसचे नरेश अरोरा आणि भाजपसमर्थक पत्रकार हर्षवर्धन त्रिपाठी सहभागी झाले होते. नरेश अरोरा हे काँग्रेसचे समर्थक असून, त्यांनी आजवर अनेकदा काँग्रेसची निवडणूक रणनीती निश्चित केली आहे. या कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, यंदाच्या निवडणुकीत ते काँग्रेसच्या प्रचार रणनीतीत सहभागी झालेले नव्हते. पण ते काँग्रेसचा प्रचार आणि मोहिमेचा बारकाईने अभ्यास करीत आहेत. त्यांचे मत मोदी पुन्हा सत्तेवर येतील, असेच आहे. हर्षवर्धन त्रिपाठी यांनी या निवडणुकीतील वेगवेगळ्या नेत्यांच्या भाषणांचा, आणि मतदानाच्या टक्केवारीचा वेध घेऊन, आपले मत मांडले होते. त्यांच्यामते यंदाची निवडणूक ही मूक लाटेसारखी आहे. वरकरणी विरोधकांकडून भाजपवर जोरदार शरसंधान केले जात असले, आणि मोठमोठे दावे केले जात असले, तरी लोकांमध्ये भाजपला पुन्हा एक संधी देण्याची इच्छा दिसत आहे.
त्रिपाठी यांच्यामते काही विश्लेषक हे फार उथळपणे मांडणी करीत आहेत. मतदानाच्या प्रत्येक टप्प्यानंतर त्यांची मते बदलत असतात. निवडणूक अशी लढली जात नाही. योगेंद्र यादव हे नामवंत निवडणूक विश्लेषक (सेफॉलॉजिस्ट) म्हणून ओळखले जातात. त्यांनी या निवडणुकीत एनडीएला २७५ जागा मिळतील, अशी भविष्यवाणी केली आहे. दुसरीकडे निवडणुकीच्या प्रचारमोहिमेचे रणनीतीकार म्हणून ओळखले जाणारे, प्रशांत किशोर यांनी मात्र यावेळी पुन्हा एकदा २०१९ सारखीच स्थिती निर्माण होऊन भाजप पुन्हा सत्तेवर येईल, असे सांगितले आहे. या दोघांच्या अंदाजांवर त्रिपाठी म्हणाले की, “आपल्या मते एनडीए कमीतकमी ३७५ जागांचा टप्पा पार करेल आणि प्रसंगी ४०० पेक्षाही अधिक जागी जिंकेल.” हे कसे होईल, ते त्यांनी विशद केले. कोणतीही निवडणूक ही तकड्यातुकड्यांमध्ये किंवा टप्प्याटप्प्यांमध्ये लढविली जात नाही. त्यामागे पक्षाचे व्यापक, सलग आणि दीर्घकालीन धोरण असते. पहिल्या एक-दोन टप्प्यांमध्ये झालेल्या ’कथित’ कमी मतदानाची आकडेवारी पाहून, काही विश्लेषकांनी भाजपसाठी मतदान घटत असल्याचा दावा केला (नंतरच्या सर्वच टप्प्यांमध्ये जवळपास पहिल्या टप्प्याइतकेच म्हणजे ६२-६३ टक्के मतदान झाले आहे.) पण, पुढील टप्प्यांमध्ये २०१९ मधील निवडणुकीइतकेच मतदान होताना दिसल्यावरही काही विश्लेषकांनी आपला सूर बदलला.
त्रिपाठी यांनी दाखवून दिले की, गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा मतांची टक्केवारी अजिबात घटलेली नाही. ती गेल्या वेळेइतकीच आहे. कॅमेर्यापुढे आलेले मतदार आपल्या मनातील खरी गोष्ट कदाचित सांगत नसावे. पण ज्याअर्थी मतांची संख्या घटलेली नाही, त्याअर्थी मतदाराने आपला निर्णय पक्का केला असून, तो परिपक्वतेने मतदान करीत आहे. गेल्यावेळची निवडणूक ही ‘मोदी लाटे’वर स्वार झाली होती. यंदा ही लाट इतक्या उघडपणे दिसत नसली, तरी ती निश्चितच आहे. याला ते ‘सायलेंट वेव्ह इलेक्शन’ म्हणत आहेत. या निवडणुकीतील मुद्दे कोणते आहेत, ते वरकरणी स्पष्ट दिसत नसले, तरी काही मुद्दे हे अदृष्य आहेत. त्रिपाठी यांनी सांगितले की, “राममंदिर हा महत्त्वाचा मुद्दा ठरेल. कारण, आतापर्यंत तब्बल दोन कोटी भक्तांनी प्रत्यक्ष मंदिराला भेट दिली आहे. ते भव्य मंदिर आणि परिसर पाहून ,तसेच नव्याने सजलेल्या अयोध्या नगरीचे रुप पाहून, हा भक्त मनोमन खूश झाला आहे. याचा अर्थ, हे सर्वच्या सर्व दोन कोटी भाजपचे मतदार असतील, असे नव्हे. पण त्यांपैकी बहुतेकांच्या मनात व्होटिंग बूथवर मशीनचे बटण दाबताना राममंदिराचा विचार नक्कीच असेल.”
त्रिपाठी यांच्यामते, काँग्रेसच्या ’वेल्थ रिडिस्ट्रिब्युशन’ संकल्पनेनेच राहुल गांधी यांचा घात केला आहे. गेल्या दहा वर्षांत मोदी यांनी भारतात रोजगाराच्या लाखो संधी निर्माण केल्या आणि २५ कोटी लोकांना दारिद्र्यरेषेखालून वर आणले आहे. ग्रामीण भागांत आता जरा सुस्थितीत आलेल्या, या मतदाराला राहुल गांधी यांच्या या संकल्पनेत मोठा धोका दिसतो आहे. आपण स्वकष्टाने अर्जित केलेल्या संपत्तीतील निम्मा वाटा काँग्रेस सरकारकडून काढून घेणे, हे या वर्गाला पूर्णपणे अमान्य आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील सधन वर्गच काँग्रेसला विरोध करीत आहे. देशातील स्टार्टअप उद्योगांची संख्या २०० वरून एक लाखावर गेली आहे. त्यात काम करणारे कर्मचारी हे मोदींचे विरोधक असतील की समर्थक? हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे. त्याचप्रमाणे, २०१४ मध्ये देशात केवळ दोन वंदे भारत ट्रेन होत्या. आज ती संख्या १०२ वर गेली असून, त्यात भरच पडत आहे. दोन डझनांपेक्षा अधिक शहरांमध्ये, मेट्रो रेल्वे सुरू झाली आहे. यासारखे अनेक मुद्दे जोडले तर, ही निवडणूक मोदींविरोधात कशी असेल, हा विचार करण्यासारखा मुद्दा आहे.
राहुल बोरगांवकर