नवी दिल्ली: (विशेष प्रतिनिधी) काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यानंतर बोलावलेल्या इंडी आघाडीच्या बैठकीस प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतल्याचे समजते.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी विरोधी पक्षांच्या 'इंडी' आघाडीसोबत असल्याचा दावा करतात. मात्र, 'इंडी' आघाडीविषयी संभ्रम निर्माण करण्यातही त्या आघाडीवर असतात. बंगालमध्ये एकट्याने लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या ममता बॅनर्जी यांनी आता निवडणुकीनंतरच्या विरोधी आघाडीच्या बैठकीला उपस्थित न राहण्याचे जाहीर केले आहे.
तृणमूल काँग्रेसच्या सुप्रीमो ममता बॅनर्जी यांनी लोकसभा निवडणुका आणि रामल वादळ हे त्यांच्या निर्णयामागचे कारण सांगितले आहे. सोमवारी पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या की, लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान आणि चक्रीवादळ रामलनंतर सुरू असलेल्या मदतकार्यामुळे बैठकीला उपस्थित राहता येणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
ममता बॅनर्जींनी दिलेली ही कारणे म्हणजे 'इंडी' आघाडीविषयीचा अविश्वास असल्याची टिका भाजपने केली आहे. ममता बॅनर्जी यांनी 'इंडी' आघाडीच्या बैठकीस न येण्याचे लंगडे कारण सांगितले असल्याचे भाजपने म्हटले आहे. त्याचप्रमाणे ममता बॅनर्जी यांना निकालाचा अगोदरच अंदाज आला असून त्यामुळेच त्यांना निवडणुकीपूर्वी इंडी आघाडीसोबत जाण्याची इच्छा नाही. निकालानंतर जिंकलेल्या जागांनुसार इंडी आघाडीमध्ये जाण्याचा त्या विचार करतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात आहे.