लोकसभेत काय होईल हे ब्रम्हदेवही सांगू शकत नाही : उपमुख्यमंत्री अजित पवार
28-May-2024
Total Views | 60
मुंबई : लोकसभा निवडणूकीत केव्हा काय होईल हे ब्रम्हदेवही सांगू शकणार नाही, असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. सोमवारी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना सल्लाही दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, "ज्यावेळी आम्ही एकत्रित काम करायचो तेव्हा शिवसेनेबद्दल टोकाची भूमिका घ्या, शिवसेनेला ठोका, असं आम्हाला सांगितलं जायचं. यावर का असा प्रश्न विचारला तर शिवसेनेला ठोकल्यावर अल्पसंख्यांना समाधान मिळतं, असं सांगायचे. म्हणजे हे शिवसेनेचा विरोध करतात. पण यावेळी तर अल्पसंख्यांक शिवसेनेसोबतच जायला निघाला होता. त्यामुळे काय, कुठं आणि कसं गणित बदलतं हे ब्रम्हदेव आला तरी सांगू शकणार नाही," असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, "निवडणूक हे राजकीय पक्षासाठी सत्ता मिळवण्याचं साधन आहे असं मी मानत नाही. पाच वर्षात आपण लोकासाठी केलेल्या कामाचं मुल्यमापन लोक निवडणूकीत करत असतात. त्यांनी दिला तो कौल मान्य करुन आपण पुढे जायचं. कधी विजयाचा उन्माद होऊ द्यायचा नाही आणि पराभवाने खचूनही जायचं नाही, अशी भूमिका प्रत्येकाने घेतली पाहिजे," असा सल्लाही त्यांनी दिला आहे.