सनातनद्वेषाचे फूत्कार

    27-May-2024   
Total Views |
vck-leader-thol-thirumavalavan-calls-sanatan-terrorists


“सनातन धर्माचे दहशतवादी शस्त्रास्त्रांसह मोकळे फिरत आहेत,” अशी सडकी टीका केली, ‘विदुदलाई चिरुताईगल कच्ची’ (व्हीसीके) या तामिळनाडूमधील पक्षाचे संस्थापक आणि खासदार थोल थिरुमावलवनने. एवढेच नाही तर या थिरुमावलवनला माओवाद्यांचा तर पराकोटीचा पुळका. “माओवाद्यांच्याही हाती शस्त्र असून, त्यांना मात्र जंगलात वाईट परिस्थितीमध्ये राहावे लागते,” अशी ही नक्षलसमर्थनाची आणि सहानुभूतीची या खासदाराची भाषा. विशेष म्हणजे, सनातनविषयी हे असले विषारी फूत्कार काढणारे थिरुमावलवन हे ‘इंडी’ आघाडीच्या टोळीतलेच. त्यामुळे अन्य सनातनविरोधी टाळक्यांसारखेच हिंदू धर्म, हिंदुत्वावर कायमच विखारी विचार मांडण्यात हे महाशय आघाडीवर! यापूर्वीही तामिळनाडूमधील सत्ताधारी द्रमुकचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू-मलेरियाशी करण्याचा उद्दामपणा केला होता. त्यानंतर त्यांच्यावर देशविरोधातून संताप व्यक्त करीत पोलीस ठाण्यात तक्रारीही दाखल करण्यात आल्या. न्यायालयानेही स्टॅलिन यांना फटकारले आणि अजूनही यासंदर्भातील खटले सुरूच आहेत. याची पूर्ण कल्पना असूनही थिरुमावलवनने सनातन धर्माला थेट दहशतवादाशी जोडण्याचा उद्दामपणा केला. एवढेच नाही तर यावेळी अभिनेता, दिग्दर्शक प्रकाश राज याचा ‘आंबेडकर सुधार’ पुरस्काराने याच थिरुमावलवनने सन्मानही केला. मोदी आणि भाजपवर सदानकदा तोंडसुख घेण्यात धन्यता मानणार्‍या प्रकाश राजने तर मोदींची तुलना ‘टेस्ट ट्युब बेबी’शी केली. जनसामान्यांची म्हणे मोदींशी नाळ तुटलेली असून, ते पुन्हा पंतप्रधान होणार नाही, असे भाकीतही प्रकाश राजने केले. थिरुमावलवन तर सनातनविरोधाबरोबरच कट्टर हिंदूविरोधी आणि मंदिरविरोधीही. मंदिरे उद्ध्वस्त करून बौद्ध विहार बांधावे, यासारख्या टोकाच्या मागण्याही त्याने यापूर्वी केल्या आहेत. तसेच तामिळनाडूमध्ये कायमच जातीय, धार्मिक संघर्ष कसा पेटता राहील, यासाठी थिरुमावलवनची वळवळ सुरूच असते. पण, या सगळ्यांना दि. ४ जून रोजीच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर खरी चपराक बसणार आहे, हे निश्चित!

सनातनशक्तीची जाणीव


लोकसभा निवडणुकीपूर्वी आणि निवडणुकीदरम्यानही उत्तर विरुद्ध दक्षिण भारत, सनातन विरुद्ध अन्य असे प्रादेशिक, धार्मिक संघर्ष यावरूनही सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. पण, सनातनशक्तीचीच ताकद प्रत्येक प्रसंगी वरचढ ठरली. कारण, सनातन धर्म, हिंदुत्वाविषयी कोणीही काहीही बरळावं आणि हिंदूंंनी, हिंदू नेत्यांनी ते मूग गिळून ऐकावं, त्याकडे कानाडोळा करावा, तो काळ आता इतिहासजमा झाला. याचीच प्रचीती आणि प्रत्यय यंदाच्या निवडणुकीतही प्रकर्षाने आला. त्यामुळे भारतवर्षात जागृत झालेल्या सनातनशक्तीची जाणीव ही विरोधकांना झाली असून, आपल्या हाती त्रागा करण्याशिवाय आता दुसरे काहीही नाही, याचीही मनोमन त्यांना खात्री पटलेली दिसते. म्हणूनच, थिरुमावलवन आपल्या भाषणात असंही म्हणाला की, “ही सनातनशक्ती असे हजारो मोदी तयार करू शकते. जर मोदींचा लोकसभा निवडणुकीत पराजय झाला, तर मोदींपेक्षा हजारपटीने बलशाली लोकंही सनातनशक्ती निर्माण करू शकते.” या विधानावरून, गेल्या दहा वर्षांतील काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत सनातनशक्तीचा प्रभाव आता स्पष्टपणे ध्वनित होतो. थिरुमावलवनने असाच दावा, २०१४ पूर्वी केला असता का? तर नाही, पण आज सनातनशक्तीची ताकद मान्य करण्यावाचून या सनातनद्वेष्ट्यांपुढे कोणताही पर्याय नाही, हेच यावरून सिद्ध होते. खरंतर, सनातनशक्तीची हीच वाढती ताकद, जनमानसात आपल्याच धर्माबाबत झालेले जागरण, राम मंदिराच्या निर्मितीतून देशभरात गेलेला संदेश याची पराकोटीची धास्ती विरोधकांनी घेतली. आता आपला या सनातनशक्तीसमोर निभाव लागणार नाही, याची पूर्ण प्रचीती आल्यामुळेच सनातन धर्मापासून ते शक्तीपर्यंत, मिळेल त्या व्यासपीठावरून यथेच्छ टीका-टीप्पणी सुरू दिसते. काहीही करून सनातन धर्माचे समाजातील वाढते महत्त्व संपुष्टात आणण्यासाठी म्हणूनच थिरुमावलवनसारख्या मंडळींकडून फुटकळ प्रयत्न सुरू आहेत. पण, जो सनातन धर्म भारतवर्षावर पूर्ण शक्तिनिशी चाल करणार्‍या परकीय आक्रमकांनाही संपवता आला नाही, तिथे या सनातनद्वेष्ट्यांची काय गत... त्यांनी एकच लक्षात घ्यावे की, निद्रिस्त हिंदू आता जागा झाला आहे. हिंदू हिताची आणि हिंदू मताचीही किंमत त्याला पुरती कळली आहे!

 

विजय कुलकर्णी

 एम.सी.जे पर्यंत शिक्षण. सध्या ‘मुंबई तरुण भारत’मध्ये मुख्य उपसंपादक (फीचर्स) या पदावर कार्यरत. मुंबईतील बीएमएम महाविद्यालयांमध्ये पत्रकारितेतील विषयांसाठी व्हिजिटिंग फॅक्लटी म्हणून कार्यरत. चालू घडामोडी, सामाजिक विषय, युवा पिढीला आवडेल असे लेखन आणि वृत्तपत्रातील मांडणी आणि सजावटीमध्ये विशेष रुची