निष्प्रभ विरोधकांची निवडणूक

    27-May-2024   
Total Views |
oppositions in loksabha election



 यंदाची लोकसभा निवडणूक ही केवळ ‘नरेंद्र मोदी विरुद्ध विरोधी पक्ष’ अशी केंद्रित झाली आहे. अर्थात, याचा लाभ भाजपलाच झाल्याचे आतापर्यंतच्या सहा टप्प्यांमध्ये स्पष्ट झाले आहे. देशाच्या राजकारणामध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची असलेली मोठी रेष पुसणे तर सोडा, त्याच्या जवळपासही जाणेदेखील विरोधी पक्षांना जमलेले नाही. पंतप्रधान मोदींनी अथक परिश्रम करून नवनवीन रणनीती अवलंबली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच ‘इंडिया टीव्ही’ या खासगी हिंदी वृत्तवाहिनीस मुलाखत दिली. त्यामध्ये त्यांनी भाजपच्या ‘अबकी बार ४०० पार’ या घोषणेविषयी मोठी मजेशीर टिप्पणी केली. ते म्हणाले की, “४०० पारच्या घोषणेमुळे विरोधी पक्ष फारच सैरभैर झाले आहेत. भाजपने ही घोषणा केल्यापासून सर्वजण भाजपला सत्तेपासून रोखण्यात नव्हे, तर ४०० जागा जिंकण्यापासून रोखण्यासाठी सज्ज झाले आहेत. म्हणजे त्यांनी एकप्रकारे मान्यच केले की, भाजपला सत्तेत येण्यापासून नव्हे, तर ४०० जागा जिंकण्यापासून रोखायचे आहे.” पंतप्रधानांनी आपल्या खास शैलीत हा किस्सा सांगितला आणि उपस्थितांमध्ये हास्याची कारंजी उडाली. यातील विनोदाचा भाग सोडला, तर याद्वारे देशातील विरोधी पक्ष किती प्रमाणात विस्कळीत आहेत, हे यातून स्पष्ट होते. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक ही केवळ ‘नरेंद्र मोदी विरुद्ध विरोधी पक्ष’ अशी केंद्रित झाली आहे. अर्थात, याचा लाभ भाजपलाच झाल्याचे आतापर्यंतच्या सहा टप्प्यांमध्ये स्पष्ट झाले आहे.

देशाच्या राजकारणामध्ये सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाची असलेली मोठी रेष पुसणे तर सोडा, त्याच्या जवळपासही जाणेदेखील विरोधी पक्षांना जमलेले नाही. पंतप्रधान मोदींनी अथक परिश्रम करून नवनवीन रणनीती अवलंबली. दहा वर्षांत मोदी त्यांच्याशी बोलले नाहीत, अशी तक्रार विरोधी पक्ष आणि पत्रकार करत आहेत. मात्र, प्रसारमाध्यमांशी बोलण्यापेक्षा त्यांनी थेट जनतेशी संवाद साधला. हा अशा प्रकारचा विक्रम असेल की, २०१४ पासून पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे दर महिन्याला अंदाजे ११० वेळा जनतेशी संवाद साधला आहे, ज्यामध्ये ते कधीही राजकारण किंवा पक्षाबद्दल बोलले नाही. आज १८ ते २८ वयोगटातील तरुण गेल्या दहा वर्षांपासून मोदींशी जोडले गेले आहेत. हा मतदारांचा एक वर्ग आहे, ज्यावर प्रतिकूल निवडणूक प्रचाराचा परिणाम होणार नाही.

काँग्रेसप्रणित ‘इंडी’ आघाडीने वर्षाच्या प्रारंभी भाजप राष्ट्रीय लोकशाही आघाडीसमोर मोठे आव्हान उभे करेल, असा भास निर्माण केला होता. मात्र, तसे काहीही झाले नसल्याचे आतापर्यंतच्या सहा टप्प्यांमध्ये दिसून आले. ‘इंडी’ आघाडीचा प्रचार अतिशय विस्कळीत होता, नेतृत्वाचा अभाव असल्याचे अतिशय स्पष्टपणे दिसून आले. या निवडणूक प्रचाराची दुसरी बाजू आरोप-प्रत्यारोपांपुरती मर्यादित होती. विरोधकांनी ‘मोदी हटाओ’ अजेंड्यावर लक्ष केंद्रित करून पंतप्रधानांवर हल्लाबोल केला आणि जनतेला घाबरविण्याचा प्रयत्न केला की, मोदी लोकशाही संपवतील, संविधान बदलतील, आरक्षण संपवतील. मात्र, हे आरोप जनतेला अपील झाले नसल्याचे दिसून आले आहे.

त्याचवेळी सत्ताधारी पक्षानेही काँग्रेस आणि विरोधी पक्ष हिंदू असल्याचा आरोप करत प्रतिक्रिया दिली. महिलांकडून मंगळसूत्रही हिसकवून घेणार, पंथ आणि धर्माच्या आधारे संपत्तीची वाटणी करणार, दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण हिसकवून मुस्लिमांना देणार, हे सत्ताधारी पक्षाचे आरोप आणि त्याची एकप्रकारे पुष्टी करणारा काँग्रेस आणि मित्रपक्षांचा जाहीरनामा यांमुळे जनतेच्या मनात ‘इंडी’ आघाडीच्या मनसुब्यांविषयी संशय निर्माण झाला. विरोधकांनीही मोदींनाच आपल्या टीकेचे, उपहासाचे आणि आरोपांचे लक्ष्य बनविल्याने त्यांचा प्रचारही मर्यादित झाला. देशात ज्येष्ठांचा आदर करण्याची परंपरा आणि संस्कृती आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, विशेषतः राहुल गांधी यांनी ज्याप्रकारे कठोर भाषा वापरली, त्यांना शिवीगाळ केली आणि मोदींच्या कपड्यांवरही ताशेरे ओढले, ते जनतेला आवडले नाही. परिणामी ‘इंडी’ आघाडीविषयी मोठ्या प्रमाणात नकारात्मकता निर्माण झाली.

निवडणूक प्रचारात विरोधी पक्षांना कोणताही गंभीर ‘नॅरेटिव्ह’ तयार करता आले नाही. निवडणूक रॅलींमध्ये उमेदवार किंवा स्टार प्रचारक महत्त्वाचे आणि प्रभावी विचार मांडताना दिसले नाहीत. सत्तेत आल्यास ‘इंडी’ आघाडीच पर्यायी धोरणे काय असतील, हे विरोधकांना सांगता आले नाही. विरोधकांनी आपली धोरणे समजावून सांगितली असती, सत्ताधारी पक्षाच्या धोरणांपेक्षा ती कशी चांगली आहेत, हे जनतेला समजावून सांगितले असते, तर कदाचित भाजपला बचावात्मक पवित्र्यात ढकलता आले असते. मात्र, विरोधकांनी ती संधीही गमावली. त्यातच सॅम पित्रोदांसारख्यांनी तर काँग्रेसला अडचणीत आणण्यात फारच महत्त्वाची भूमिका बजाविल्याचे स्पष्ट आहे.

भाजपकडे एक नव्हे, तर अनेक मतपेढ्या आहेत, याचा विचार तर ‘इंडी’ आघाडीतील एकाही पक्षाने केला नाही. भाजपकडे आजघडीला पक्षाची विचारधारा मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्याशिवाय, अयोध्येतील श्रीरामलला प्राणप्रतिष्ठेमुळे आणखी घट्ट झालेला दुसरा वर्ग आहे. तिसर्‍या वर्गात मोदी सरकारच्या किमान तीन ते चार लोककल्याणकारी योजनांचा लाभ झालेल्यांचा समावेश आहे, तर चौथ्या वर्गामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास असणारा मतदार आहे. पाचव्या वर्गामध्ये नवमतदारांचा समावेश असून, मोदींनी या वर्गातही आपली क्रेझ निर्माण केल्याचे यावेळी दिसून आले आहे.

यंदाच्या निवडणुकीमध्ये भाजपने प्रत्येक टप्प्यासाठी स्वतंत्र रणनीती आखल्याचे स्पष्टपणे दिसून आले. त्यामुळेच खरेतर ‘इंडी’ आघाडीची जास्त अडचण झाली. कारण, प्रत्येक टप्पा संपल्यावर भाजपची रणनीती बदलत होती, तर ‘इंडी’ आघाडी मागच्या टप्प्याचेच मुद्दे पुढच्या टप्प्यातही वापरत असल्याचे दिसून आले. परिणामी, ही लोकसभा निवडणूक पूर्णपणे मोदीकेंद्रित केल्याने काय होते, हे दि. ४ जून रोजी ‘इंडी’ आघाडीस कळेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.