शार्क अभयारण्याचे यश

    27-May-2024   
Total Views |
harks faring in French Polynesia’s shark sanctuary


सुमारे २० वर्षांपूर्वी, ‘फ्रेंच पॉलिनेशिया’ने आपल्या समुद्रकक्षेतील शार्क आणि स्टिंग रे माशांचे संवर्धन करण्यासाठी एका समुद्री शार्क अभयारण्याची घोषणा केली. दक्षिण प्रशांत महासागरात दोन हजार किमीपेक्षा जास्त पसरलेल्या १०० हून अधिक बेटांचा समूह म्हणजे ‘फ्रेंच पॉलिनेशिया.’ हा देश ऑस्ट्रल, गॅम्बियर, मार्केसास, सोसायटी आणि तुआमोटू द्वीपसमूहांमध्ये विभागला गेला आहे. आता कल्पना करा, तुम्ही फ्रेंच पॉलिनेशियाच्या स्वच्छ, ऊबदार पाण्यात डुबकी मारताय.

एका छोट्या बोटीच्या बाजूला तुम्ही हळूहळू खोल पाण्यात जात आहात. पाण्याखाली, रंगीबेरंगी ‘हंपबॅक रेड स्नॅपर्स’ आणि ‘टायटन ट्रिगर फिश’सह माशांचा थवा आहे, जो तुमच्या अवतीभोवती पोहत आहे आणि अचानक आपल्याला मोठ्या शेपट्या आणि पंख दिसतात- हा शार्कचा एक गट आहे! पारंपरिक पॉलिनेशियन लोक शार्कला देवांचे प्रतिनिधित्व करणारे पवित्र प्राणी मानतात. पारंपरिक पॉलिनेशियन संस्कृतीत, शार्क हे पवित्र प्राणी आहेत. काही पौराणिक कथा शार्कबद्दल संरक्षक आणि दिशादर्शक (नॅव्हिगेटर) म्हणून स्थान देतात.

देशातील पूर्वजांनी वेगवेगळी बेटे शोधण्यासाठी शार्कचे निरीक्षण केले असल्याची इथे नोंद आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये समोर आलेल्या नागरिक-विज्ञान डेटानुसार अभयारण्यामुळे संवर्धनात वाढ झाल्याचे समोर आले आहे. परंतु, माशांच्या संरक्षणासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे. अभयारण्य स्थापन झाल्यापासून कोणतेही व्यापक वैज्ञानिक सर्वेक्षण झालेले नाही. त्यामुळे सध्याच्या शार्कच्या संख्येची तुलना करण्यासाठी कोणताही आधारभूत डेटा अस्तित्वात नाही. ‘सेग्वीन’च्या २०२३ डॉक्टरेट प्रबंधात २०११ आणि २०१८ दरम्यान १३,९०० शार्क असल्याची नोंद आहे.

परंतु, नागरिकांनी गोळा केलेला डेटा अभयारण्याचा प्रभाविता सिद्ध करण्यासाठी पुरेसा नाही. हे अभयारण्य असूनही, इथे शार्कना अजूनही ‘बायकॅच’मध्ये पकडले जाण्याचा, बेकायदेशीर मासेमारी आणि स्थानिक मच्छीमारांशी असलेल्या संघर्षाचा धोका आहे. २००६ मध्ये, फ्रेंच पॉलिनेशियाने ५.५ दशलक्ष चौ. किमी व्यापलेले, शार्क आणि स्टिंग रेंसाठी एक अभयारण्य घोषित केले. हे क्षेत्र, कॅनडाच्या अर्ध्या आकाराचे, जगभरातील शार्कचे निरीक्षण करण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.

पण, खरं तर सुमारे दोन दशकांपासून संरक्षण असूनही, अभयारण्याचे खरोखर संवर्धन उपयोगी आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी अधिकृत डेटाच उपलब्ध नाही. या वर्षी एप्रिलच्या सुरुवातीला, प्रवाळ गुहेत विश्रांती घेत असलेल्या तीन पिवळसर नर्स शार्कचे दर्शन काही डायव्हर्सना झाले. हे शार्क रात्रीच्या वेळी शिकार करण्याच्या तयारीत असतात. पिवळसर ‘नर्स शार्क’ असुरक्षित म्हणून वर्गीकृत आहेत. ताहितीमधील शार्क संशोधनावर काम करणार्‍या शास्त्रज्ञांच्या मते, हे शार्क डायव्हर्सचे मित्र असूनही काही प्रजाती असुरक्षित आहेत. ‘फ्रेंच पॉलिनेशिया’तील शार्कच्या प्रजाती आजही अनेक धोक्यांचा सामना करतात.

दरवर्षी सुमारे २० हजार शार्क ‘बायकॅच’मध्ये अडकल्यामुळे मरतात. बेकायदेशीर मासेमारीचा धोका आहेच! परदेशी ध्वजांकित जहाजे बहुधा पॉलिनेशियन पाण्यात बेकायदेशीरपणे शार्क मासेमारी करतात. याबद्दल असंख्य तक्रारी दाखल केल्या आहेत. सुदैवाने, काही अवैध मच्छीमारांना अटक करण्यात आली आहे. विशेषतः दुर्गम बेटांमध्ये या अभयारण्याच्या नियमांबद्दल आणि शार्कच्या महत्त्वाविषयी जनजागृती अजूनही कमी आहे. ‘सेग्वीन’च्या अलीकडील सर्वेक्षण अभ्यासात असे आढळून आले आहे की, अनेक रहिवाशांना शार्क धोकादायक समजतात.

तुआमोटूमध्ये, शास्त्रज्ञ आणि स्थानिक मच्छीमार शार्कला फिश पार्कमध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्यासाठी नवीन पद्धतींची चाचणी घेण्याची योजना आखत आहेत. पारंपरिक आधुनिक संवर्धनाच्या पद्धतींमध्ये समन्वय आणण्यासाठी जनजागृती आणि शिक्षण आवश्यक आहे. फ्रेंच पॉलिनेशियाचे शार्क अभयारण्य हे जगभरातील इतर प्रदेशांसाठी एक मॉडेल म्हणून काम करू शकते. सातत्यपूर्ण समर्पण आणि सहकार्याने, फ्रेंच पॉलिनेशियाचे पाणी या भव्य प्राण्यांसाठी आश्रयस्थान बनू शकते. ‘फ्रेंच पॉलिनेशिया’चे शार्क अभयारण्य हे या महत्त्वाच्या प्राण्यांचे संरक्षण करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.

उमंग काळे

पर्यावरण प्रतिनिधी, वन्यजीव छायाचित्रकार.
 
जंगलात फिरून विविध जीव कॅमेरात कैद करण्याची आवड, मध्य भारतातील बहुतांश जंगलात फिरण्याचा अनुभव. रामनारायण रुईया महाविद्यालयातून 'बी. एम. एम.' पदवी प्राप्त करून पर्यटन शास्त्रात पदव्युतर शिक्षण. आणि नाविन्याचा ध्यास.