सतीचं वाण

    27-May-2024
Total Views | 283
Krutadnya Me, Krutarth Me Drama


स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रसिद्ध कवितेत उल्लेखल्याप्रमाणे, ‘जे दिव्य दाहक म्हणोनि असावयाचे’ याचा साधा अर्थ आहे की, जर कोणी दिव्य कार्य करण्याचे व्रत घेत असेल, तर ते दाहक असणारच! त्याचे चटकेसुद्धा बसतीलच. पण, ‘सतीचं वाण’ घेतल्यासारखे आम्ही स्वतःहूनच हे व्रत घेतले आहे आणि त्यातून होणारे परिणाम काय असतील, याचीदेखील आम्हाला पूर्ण कल्पना आहे. स्वातंत्र्यप्राप्तीसाठी स्वतःच्या जीवनाची आहुती देण्याची सिद्धता ज्यांनी अंगीकारली, त्या ‘नराग्रणीस’ जनतेसमोर मांडायचे, तर त्यासाठी आपल्याकडे असलेली प्रभावी शक्ती म्हणजे रंगमंचीय आविष्कार - ‘नाटक’. कारण, शक्तीची उपासना शक्तीनेच होणे क्रमप्राप्त. ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ या नाटकाची निर्मिती हीदेखील या तेजाचीच आरती करण्याचा एक संकल्प. व्यावसायिक गणिते मोडून नफा-तोट्याचा विचार न करता नेत्रा ठाकूर यांनी ‘मधुबिंब’ या संस्थेमार्फत या नाटकाच्या निर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. त्याविषयी...

'कोरोना’चा प्रकोप, जनतेमध्ये दहशतीचे वातावरण, त्यामुळे घरातून बाहेर पडणे दुरापास्त झालेले. अशा या बंदीवान अवस्थेत आठवण झाली, ती सावरकरांनी सोसलेल्या एकांतवासाची. मग मनात विचार आला की, सावरकरांनी सोसलेल्या एकांतवासापेक्षा हा एकांतवास कितीतरी सुसह्य आहे. किमान आपण आपल्या आप्तजनांच्या सहवासात, खाण्यापिण्याची आबाळ न होता आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, स्वातंत्र्यात आहोत. मग त्रास तो कसला? सारे आकाश कसे निरभ्र दिसू लागले. भीतीचे सावट आणि विचारांचे मळभ दूर झाले आणि हातात कादंबरीरुपी पुस्तक आले ते ज्येष्ठ कादंबरीकार अनंत शंकर ओगले लिखित ‘पहिला हिंदुहृदयसम्राट - विनायक दामोदर सावरकर.’ पुस्तक वाचताना जणूकाही सावरकरांचा जीवनपटच दृश्यमान होत होता; रक्त सळसळत होते, मन सैरभैर होत होते. जणूकाही अंतराळातील तात्यारावांच्या आत्म्याशी माझे तदात्म्य साधले गेले होते आणि मनाच्या त्या अवस्थेतच विचार आला, ‘सतीचे वाण’ घेतल्यासारखे स्वतःहूनच हे व्रत अंगीकारायचे. अनंत शंकर ओगले यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला आणि कोणतीही प्रस्तावना न करता प्रश्न केला, “आपण स्वा. सावरकरांवर नाटक लिहिणार का?”
 
पलीकडून उत्तर आले “हो!” मग प्रस्तावना झाली. मनातील विचारांना मोकळी वाट मिळाली आणि साधारण आठवडाभर रोज तीन-साडेतीन तासांच्या चर्चेनंतर नाटकाची पार्श्वभूमी निश्चित झाली. राजकीय व्यक्तिमत्त्वाचा अराजकीय जीवनप्रवास आणि सावरकरांच्या जीवनातील अप्रकाशित घटना, ज्या सर्वसामान्यांना अवगत नाहीत, त्या नाटकाद्वारे मांडणे. कारण, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जीवनावर रंगभूमीवर आजतागायत सात ते आठ नाटके सादर झाली. ही नाटके स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या स्वातंत्र्यपूर्व काळातील संघर्ष, अंदमानपर्व तसेच राजकीय संघर्षावर आधारित होती. यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या सादरीकरणाचा हेतू मनी योजून आणि या नाटकाच्या दिग्दर्शनाची धुरा आपणच वाहायची अशी मनाशी खूणगाठ बांधून स्वातंत्र्यवीरांच्या जीवनचरित्राच्या या नाटकाची निर्मिती करण्याचे योजले. कोरोना काळात जवळजवळ चार महिन्यांच्या रोजच्या अडीच ते तीन तासांच्या भ्रमणध्वनीच्या संभाषणावरून अनंत शंकर ओगले यांच्या अथक परिश्रमाने आणि विस्तृत संशोधनाने साधारण 15 ते 16 संहितेच्या आवृत्त्यांनंतर अखेर दोन गीतांसह अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ नाटकाची संहिता तयार झाली.
 
या नाट्यकलाकृतीमध्ये वीर सावरकरांच्या समृद्ध आयुष्यात साहित्य तसेच सांस्कृतिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तींचे उदाहरण द्यायचे झाले, तर लता मंगेशकर, सुधीर फडके, पृथ्वीराज कपूर, भालजी पेंढारकर इ. तसेच राजकीय क्षेत्रातील जी दिग्गज मंडळी येऊन गेली. उदाहरणार्थ, डॉ. हेडगेवार, नेताजी सुभाषचंद्र बोस, डॉ. आंबेडकर, आचार्य अत्रे आदींबरोबर झालेल्या स्वातंत्र्यवीरांच्या वैयक्तिक भेटी तसेच वीर सावरकरांचे कौटुंबिक जीवन आणि त्यांच्या अर्धांगी यमुनाबाई उपाख्य माई सावरकर यांच्याबरोबरचे भावनिक जिव्हाळ्याचे संबंध, या नाट्यकलाकृतीमध्ये चितारण्याचा प्रयत्न केला. ज्याप्रमाणे एक बिनीचा धागा मिळावा आणि वीण बसत जावी, तशी कोरोनाला न जुमानता नाट्यनिर्मितीची मुहूर्तमेढ रोवली. सर्वप्रथम या नाटकाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी आणि स्वातंत्र्यवीरांची भूमिका मी करणार असल्याचे मनोमन ठरविले असले, तरी तात्यांचे बोलणे, चालणे, हातवारे, भाषणाची ढब यांचा अभ्यास करणे आवश्यक होते. अनेक लोकांकडे उपलब्ध वैयक्तिक आणि युट्यूबवरील संगहित चलचित्रांवरून अभ्यासाला सुरुवात केली. ती सावरकर अभ्यासकांकडून प्रमाणित करून घेतली. कर्मधर्मसंयोगाने तात्यांरावांची आणि माझी उंची सारखी असल्याने ही भूमिका करण्याचे संकेत मिळालेच होते. प्रश्न होता तो अंगकाठीचा! कारण, सावरकर सडपातळ आणि माझे वजन 70 किलो. परंतु, माझे मित्र वैद्य उदय आणि मधुरा कुलकर्णी यांनी आपल्या वैद्यकीय कौशल्याने केवळ चार महिन्यांच्या कालावधीत माझा बांधा शिडशिडीत केला आणि वजनाचा काटा 53 किलोवर आणला.

नाटकात कलाकार दोनच. तात्या आणि माई. माईंची भूमिका, त्यात माईंच्या तोंडी ओव्या आणि एक पद आहे. त्यामुळे ती सकस अभिनेत्री असणे आवश्यक होतेच, परंतु तिला सुराचे ज्ञान आणि गाता गळा असणेही क्रमप्राप्त होते. मनात विचार आला - दिप्ती भागवत. भ्रमणध्वनीवरून संपर्क केला, ओळख नसताना, कोणतीही पूर्वकल्पना नसताना केवळ सावरकरांच्या जीवनावरील नाटक, माईंची भूमिका आणि नाटकावरील प्रेम याच्या आधारावर पहिल्याच संभाषणात त्यांचा होकार मिळाला. कोरोना काळातच सरकारी निर्बंध पाळून, सगळी सावधगिरी आणि खबरदारी बाळगून, जवळजवळ दोन महिने तालमी केल्या. सांगायचे विशेष म्हणजे, नाटकाच्या संहितेपासून ते तांत्रिक बाबींपर्यंत संपूर्ण नाटक उभे राहिले ते कोरोना महामारीच्या काळातच आणि हे शक्य झाले, ते केवळ सहकलाकार आणि तंत्रज्ञांच्या अजोड सहकार्यामुळेच. 25 प्रयोगांनंतर दिप्ती भागवत यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम आणि चित्रीकरणामुळे प्रयोगास खीळ बसते की काय, अशी भीती निर्माण झाली. परंतु, दिप्ती भागवत यांनीच सुचविलेल्या सायली संभारे या कलावतीने आठ दिवसांच्या तालमीत अतिशय जबाबदारीने ‘माई’ साकारली आणि नाटकावरील सावट दूर झाले. आता दोघींच्या संगनमताने प्रयोगात माई साकारल्या जातात. यावरून या गोष्टीची प्रचिती आली की, निरंतरपणे आणि सचोटीने मार्गक्रमण करीत राहिल्यास, प्रकाश आणि मार्ग आपोआप मिळत जातो.
पार्श्वसंगीताची जबाबदारी अनुराग गोडबोले! कारण, माझ्या आधीच्या दोन्ही नाटकांना त्यांनीच पार्श्वसंगीत आणि पार्श्वगायनासाठी आवाज दिला होता. परिणामतः या नाटकासही यथायोग्य पार्श्वसंगीत, संगीत आणि सुमधुर पार्श्वगायनासाठी मोलाची साथ मिळाली. नाटकात पात्र केवळ दोनच असली, तरी अनेक ज्येष्ठ आणि श्रेष्ठ दिग्गज मंडळींची हजेरी नाटकात असल्या कारणाने आणि तरीही रंगमंचावर वावर न दाखवता, उपस्थिती आणि चर्चा दाखवायची, तर दृकश्राव्य माध्यमाचा वापर करावा लागणार! या सगळ्या व्यक्तिरेखांचे मूळ आवाज, चलचित्र आणि छायाचित्रे आणि इतर संदर्भ जमविण्यासाठी आणि मिळविण्यासाठी मोलाची मदत झाली, ती स्वा. सावरकर स्मारक, सर्वश्री रणजित सावरकर, चंद्रशेखर साने, डॉ. सच्चिदानंद शेवडे, दुर्गेश परुळेकर, अक्षय जोग, आशाताई खाडिलकर, मंजिरी मराठे, तसेच अनेक ज्येष्ठ सावरकर अभ्यासकांनी संकलनासाठी बहुमूल्य मदत केली. प्रा. दीपक देशपांडे, सुदेश भोसले, नरेंद्र बेडेकर, उदय सबनीस, मंदार कारुळकर, प्रतीक जयस्वाल, मकरंद पाध्ये, शिरीष घाग, विनायक जोशी, महेंद्र पाटणकर या ज्येष्ठ शब्दभ्रमकरांनी नाटकातील व्यक्तिरेखांना हुबेहूब आवाज देऊन रंगभूमीवर त्या साक्षात उभ्या केल्या.
 
अतिशय जिकरीचे असे दृकश्राव्य संपादन आणि मिश्रणाचे काम आपल्या अनुभवाने, कल्पकतेने, अतिशय हुशारीने, नेटाने आणि चिकाटीने तासन्तास बसून अतिशय शिताफीने पार पाडले, ते मनोज भाबल यांनी. कोणत्याही नाटकासाठी नेपथ्य हा फार महत्त्वाचा घटक असतो. या नाटकासाठी नेपथ्य असे बनवायचे होते की, मुंबई तसेच दौर्‍यावरदेखील ने-आण करण्यासाठी सुलभ व्हावे, असे खास घडीचे नेपथ्य. याचा आराखडा जरी माझा असला तरी अतिशय शिताफीने स्वहस्ते बनविले ते रविंद्र आणि मेघराज जंगम यांनी. कोणत्याही महनीय व्यक्तिरेखेला रंगभूमीवर अभिनीत करायचे, तर त्यांचे दिसणे हे फार महत्त्वाचे! हे कसब ज्यांच्या हाती होते त्या दिपक लाडेकर आणि मनोज आमोदकर यांनी अतिशय शिताफीने रंगभूषा करून आम्हाला तात्या आणि माई सावरकर म्हणून प्रेक्षकांसमोर आणले. नाटकातील व्यक्तिरेखांच्या भावभावना प्रेक्षकांना समोर आणण्यासाठी मदत होते ती प्रकाशयोजनेची. आपल्या दीर्घ अनुभवाने लक्ष्मण केळकर यांनी शिताफीने या कामाला न्याय दिला. तसेच दृकश्राव्य संकेत, ज्यात अचूकता फार महत्त्वाची आहे, ते काम मन लावून केले ते उपेंद्र तारकुंडे यांनी.

तालमी झाल्यावर वेळ येते, ती प्रयोग नाट्यगृहात लावण्याची. परंतु, खरे सांगायचे तर या सगळ्या जुळवाजुळवी आणि नाटकाच्या तालमीमध्ये जवळ असलेली गंगाजळीही संपुष्टात आलेली. आता काय आणि कसे करायचे? असा विचार करीत असताना, त्याच सायंकाळी संपर्क झाला तो ‘पितांबरी उद्योग समुहा’चे व्यवस्थाकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई यांचा. त्यांच्याशी संपर्क होताच त्यांनी भेटायला बोलविले. नाटकासंदर्भात सगळे शांतपणे ऐकले आणि केवळ एवढेच विचारले की, “किती खर्च आला?” मी आकडा सांगताच उद्गारले, “दिले!!!” अशाप्रकारे ‘मधुबिंब’निर्मित ‘कृतज्ञ मी, कृतार्थ मी’ या नाटकाचा ‘शुभारंभाचा प्रयोग’ दि. 31 ऑक्टोबर 2021 रोजी स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक, शिवाजी पार्क येथे स्वा. सावरकरांचे नातू रणजित सावरकर यांच्या उपस्थितीत सादर झाला. मग काय, प्रयोग लावले, लावले अन् लावले! पण, प्रेक्षकांची मात्र वानवा! परंतु, एक मात्र झाले की, प्रयोगास जे प्रेक्षक येत होते, ते भारावून जात होते आणि प्रत्येक प्रयोगानिशी त्यांतील कोणी ना कोणीतरी प्रयोग घेत अथवा मिळवून देत होते. ‘टोकियो महाराष्ट्र मंडळा’नेदेखील ऑनलाईन प्रयोग केला. उदय परांजपे, संचालक, ‘मराठी कला अकादमी, मध्य प्रदेश’च्या पुढाकाराने या नाटकाचे प्रयोग झाले. प्रयोगांची संख्या वाढत होती. महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, पनवेल, पुणे, नाशिक, मिरज तसेच महाराष्ट्राबाहेर जबलपूर, बालाघाट, उज्जैन, भोपाळ, खंडवा, ग्वाल्हेर, हैदराबाद, बंगळुरू तसेच दिल्ली येथे महाराष्ट्र समाजांमध्ये प्रयोग झाले. त्याचप्रमाणे इतर ठिकाणीही महाराष्ट्र समाजांमध्ये तसेच परदेशांतही प्रयोगांची निश्चिती झाली.
 
प्रयोगासाठी माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण अनिल काकोडकर, माझे नाट्यगुरू, ज्येष्ठ दिग्दर्शक आणि श्रेष्ठ कलावंत माधव खाडिलकर, ज्येष्ठ गायिका आशा खाडिलकर, नटवर्य जयंत सावरकर, आ. संजय केळकर, आ. पराग अळवणी, आ. रवींद्र चव्हाण, ग्वाल्हेरचे खा. विवेक शेजवलकर या आणि अशा अनेक ज्येष्ठांनी आणि अभ्यासकांनी हजेरी लावली आणि एकमुखाने कौतुक केले. या नाटकाचा सुवर्णमहोत्सवी प्रयोग यावर्षी दि. 4 मे रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे साजरा झाला. ‘केवळ आणि केवळ सावरकर!’ माझ्या अंगात शक्ती आणि मुखात वाणी असेपर्यंत लोकांपर्यंत पोहोचविणे, हाच संकल्प! आणि ते पूर्णत्वास नेण्याचे बळ मिळो, हीच नटराजाचरणी प्रार्थना! किमान पात्र योजना, घडीचे नेपथ्य तसेच कमीतकमी तंत्रज्ञ यांच्या साहाय्याने या नाटकाचे सादरीकरण करण्यात येते; दृकश्राव्य माध्यमाचा वापर करून, लोकप्रिय गीते आणि संगीताच्या माध्यमातून अधिकाधिक रसिकांपर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस आहे, जेणेकरून स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे जीवनचरित्र पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचे भाग्य आमच्या ‘मधुबिंब’ या संस्थेस लाभो! स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची अथक राष्ट्रनिष्ठा, अचल मनोधैर्य, अजोड बुद्धिमत्ता, दूरदर्शी विचारधारा, ओघवते वक्तृत्व, सखोल साहित्यमाला आणि सूर्यासारखे तेजस्वी व्यक्तिमत्त्व शतकानुशतके मनामनांना स्फुरण देत राहो. त्यांच्या जीवनप्रवासातील सत्य घटना अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचाव्या, यासाठी केलेला आमचा हा छोटासा प्रयत्न!
 
 
प्रेषित द्रष्टा, महान वक्ता,
अमोघ वाणीचा।
त्यागाच्या ज्वाळेत जळाला वारस दधीचीचा॥
परिवर्तन आणि विज्ञानाचा ऋषितुल्य नेता।
यज्ञपुरुष हा देशभक्तीचा चला वंदू आता॥
वंदे मातरम्!
 
यतिन ठाकूर
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

"आम्ही टिकल्या काढून फेकल्या... अल्लाहु अकबर म्हणायला सुरुवात केली"; पर्यटकांनी सांगितली हल्ल्याची थरारक कहाणी!

Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मिरच्या पहलगाममधील बैसरन खोऱ्यात मंगळवारी ४ दहशतवाद्यांकडून भ्याड हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात आतापर्यंत २८ जणांचा मृत्यू तर २० पेक्षा जास्त पर्यटक जखमी झाल्याची माहिती आहे. या हल्ल्यात काहींनी आपला नवरा गमावलाय, काही तरुणांना आपले प्राण गमवावे लागलेत. काहींनी आपल्या डोळ्यांसमोर वडिलांना मारताना पाहिलंय. सैरभर पळणारे लोक, मृतांचा खच, रक्ताचे पाट, मृतांच्या कुटुंबियांचा आक्रोश, किंकाळ्या आणि बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज या सगळ्या भयावह प्रसंगाचं वर्णन बचावलेल्या पर्यटकांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121