‘विश्व’कल्याणी

    26-May-2024   
Total Views |
article on kalyani kale

लोककल्याणाचा वसा घेतलेली स्त्री आपले कुटुंब आणि नोकरी सावरत समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत असते, तेव्हा तिची दखल घ्यावीच लागते. ठाण्याच्या कल्याणी काळे यांच्याविषयी..
 
जव्हारमध्ये एका गोड मुलीचा जन्म झाला. कल्याणी तिचे नाव. आपण म्हणतो ना, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. खरेतर आत्या बाळाच्या कानात कुर्रर्र करते, तेव्हा ती बाळाचे भवितव्यच लिहित असते, जिवतीच्या रुपाने. आपण एखाद्या नावाने जेव्हा पुन्हा पुन्हा बाळाला हाक मारतो, तेव्हा त्या नावातील गर्भित अर्थ आपला परिणाम साधत असतो. नावात एक ऊर्जा असते, ती स्पंदने निर्माण करते. आपल्या मनावर, विचारपद्धतीवर खोलवर परिणाम करते. कल्याणीला म्हणूनच लहान असल्यापासूनच समाजसेवेची आवड होती. कल्याण या शब्दातच गहनता आहे, माया आहे. केवळ इतरांसाठी झटणे नाही, तर त्यांचे भले करणे आहे. माणसामाणसांत ऊर्जा प्रवाही करणारा योग, कल्याणी शिकू लागली. कल्याणी मोठी होत होती. जबाबदारी घेऊ पाहात होती.

वडिलांच्या निवृत्तीनंतर कल्याणीसहित सर्वांनी जव्हार सोडले, आणि त्यानंतर बदलापूरास स्थायिक झाले. येथे खर्‍या अर्थाने कल्याणी यांच्या आयुष्याचा कॅनव्हास विस्तारला. ‘घंटाळी मित्र मंडळा’तून त्यांनी योगप्रशिक्षण घेतले होते. आपण घेतलेले प्रशिक्षण केवळ आपल्यापर्यंत मर्यादित ठेवून त्याचा उपयोग शून्यच. पहिले प्राथमिक प्रशिक्षण घेतले. त्यानंतर वर्षभराचा कोर्स केला. ते पूर्ण झाल्यावर फाऊंडेशन कोर्ससुद्धा पूर्ण केला. हे सर्व करत असताना शिक्षण सुरू होतेच. तत्वज्ञानाचा अभ्यास करून मास्टर्स इन फिलॉसॉफी ही पदवी मिळविली. त्यानंतरही अभ्यास थांबविला नाही. एम. फिल पूर्ण केले आणि लग्न झाले. लग्नानंतर ठाण्यात वास्तव्य सुरू झाले.

२००५ नंतर ’आनंद वैष्णव गुरूकूल’च्या माध्यमातून, कल्याणी यांचे कार्य सुरू झाले. जनजागृती करत योगप्रसाराला सुरुवात केली. कॉर्पोरेट क्षेत्रात योगप्रशिक्षणवर्ग घेण्यास सुरुवात केली. ज्या ‘घंटाळी मित्र मंडळा’त योग शिकल्या, तिथे जो विचार मांडला होता, त्या विचाराचा वसा घेऊन त्या आयुष्य जगत होत्या, जगवत होत्या. नाही म्हणायला या काळात योग सोडून एका फार्मासिटिकल कंपनीत काही काळ त्यांनी नोकरी केली. यावेळी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय घडत होते? वर वर पाहता एका खंबीर स्त्रीसारख्या वाटलेल्या कल्याणी चक्क कवीमनाच्या आहेत. त्या कविता रचतात. तसेच, या स्वरचित कविता सादर करण्यासाठी ‘काव्य पुष्पांजली’ हा कार्यक्रम त्या करतात. केवळ ’फुले’ हा विषय घेऊन ४० पेक्षा अधिक कविता त्यांनी केल्या आहेत. फुलांची नाजूकता, त्यांचा कोमल स्पर्श, केवळ पाकळ्या उलगडल्या की पंचक्रोशी सुगंधित करणारे त्यांचे गंधवेल्हाळ अस्तित्व कल्याणी यांच्या स्वभावाशी किती साम्यदर्शक आहे!

त्यांनी लग्नानंतर ‘ऊर्जा’ या वेगळ्या प्रकल्पाची स्थापना केली. या प्रकल्पामार्फत ’संवाद’ आणि ’स्पर्श’ यांचे मानवी जीवनात काय महत्त्व आहे, हे सांगण्यास सुरुवात केली. ‘वी टूगेदर फाऊंडेशन’ची सुरुवात केली. एक ‘ध्यानी बँक’ त्या चालवितात. यासाठी त्यांची एक मैत्रीण त्यांच्या सोबतीस असते. जवळजवळ ३५ एनजीओ या प्रकल्पामार्फत त्यांच्याशी जोडले गेले. कितीतरी एनजीओ त्यांनी दत्तक घेतले. आपल्या घरातच धान्य साठवून किंवा दात्यांच्या घरातून ,परस्पर हे अन्न एनजीओपर्यंत पोहोचते केले जाते. किंवा केव्हा केव्हा संस्था दूर असल्यास पैसे देऊन तेथूनच धान्य खरेदी केले जाते. अन्नदान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान असे आपल्या संस्कृतीत सांगितले आहे. पण हे केवळ सांगितले नाही, तर आपण पिढ्यान्पिढ्या ते पाळतो. घरी कोणीही आले, तरी त्याला पहिले पाणी विचारावे आणि त्यानंतरही पाण्यासोबत वाटीत काही घेऊन जावे, ही आपली संस्कृती. लग्न, मुंज, वाढदिवस साजरे करताना जेवणावळी आणि पंगती उठतात. अगदी साधा हळदी कुंकवाचा किंवा बारशाच्या ओटीभरणीचा कार्यक्रम असेल, तरी चहा आणि खाणे असतेच. अन्नदानाने क्षुधातृप्तीनंतर मिळणारे आशीर्वाद मोलाचे असतात.

सूर्यापासून पृथ्वीला ऊर्जा मिळते. अन्नातून ती आपल्यापर्यंत पोहोचते. अन्नदानाने तर ती इतरांपर्यंत पोहोचतेच, पण मान्सून ऊर्जासुद्धा हस्तांतरित व्हायला हवी. त्यासाठी संवाद आणि स्पर्श महत्वाचे आहेत. माणसांना अंतर्बाह्य ऊर्जावान करणारे कल्याणी यांचे काम नक्कीच समाजसेवा आहे. कोविडच्या काळात मात्र थोडा खंड पडला या कार्याला. पण त्यातूनही नव्या वाटा समोर आल्याच. योगचे ऑनलाईन कार्यक्रम त्यांनी केले. टाटा इस्पितळात जाऊन एकाग्रतेचे वर्ग घेतले. भारताच्या सीमेवर जाऊन आपल्या जवानांसाठी सेवा दिली. देशप्रेम आणि राष्ट्रभक्तीचा वसा कल्याणी यांना घरातूनच मिळाला होता. त्या क्रांतिकारक अनंत लक्ष्मण कान्हेरे यांच्या कुटुंबातील आहेत. देशप्रेम त्यांना वारशातूनच मिळाले. पुढच्या वर्षापर्यंत दत्तक संस्थांचा आकडा ५० पार होईल, अशी त्यांना आशा आहे. त्यांचे हे ऊर्जावहनाचे कार्य सदोदित सुरू राहो, ही दै. ‘मुंबई तरुण भारत’ची इच्छा. तसेच तुमच्या कारकिर्दीला अनेकानेक शुभेच्छा!

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.