देवभूमी हिमाचल प्रदेशातील लोकसभेच्या चार जागांसाठी सातव्या आणि अखेरच्या टप्प्यात, दि. १ जून रोजी मतदान होणार आहे. भाजपने २०१४ तसेच २०१९ मध्ये या राज्यातील चारही जागा जिंकल्या होत्या. २०२४ मध्येही तसाच पराक्रम करत ‘हॅट्ट्रिक’ नोंदविण्यासाठी भाजप प्रयत्नशील आहे. त्यातच कंगना राणावत हिच्या विरोधात केलेल्या टिपण्यादेखील काँग्रेसला महागात पडण्याचीच शक्यता अधिक. त्यानिमित्ताने हिमाचल प्रदेशमधील राजकीय परिस्थितीचा आढावा घेणारा हा लेख...
देवभूमी हिमाचल प्रदेशमधील चार जागांसाठी सातव्या टप्प्यात मतदान होत असून, भाजपने २०१४ तसेच २०१९ मध्ये या चारही जागा जिंकल्या होत्या. हमीरपूर, कांगडा, मंडी, शिमला येथे १ जून रोजी मतदान होईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली भाजप येथे पुन्हा चारही जागा जिंकण्याच्या तयारीत आहे. लोकसभेच्या चार जागांबरोबरच विधानसभेच्या सहा जागांसाठी येथे पोटनिवडणूक होणार आहे. राज्यसभा निवडणुकीवेळी हिमाचल प्रदेशात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसला चकित करत भाजपने तेथून अनपेक्षितपणे राज्यसभेची एक जागा जिंकली. भाजपला मतदान करणार्या सहा काँग्रेस आमदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. त्या सहा जागांसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. यात सुजानपूर, गाग्रेट, लाहौल-स्पीती, धर्मशाला, बडसर आणि कुल्लेहार या जागांचा समावेश आहे. लोकसभेच्या चार जागांसाठी एकूण ३७ उमेदवार रिंगणात आहेत, तर विधानसभेच्या सहा जागांसाठी २५ उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. हिमाचल प्रदेशमधील चारही जागांवर भाजपसह काँग्रेस आणि बहुजन समाज पक्ष यांनी उमेदवार दिले आहेत.
यातील मंडी लोकसभा मतदारसंघात अभिनेत्री कंगना राणावत आणि काँग्रेसचे विक्रमादित्य यांच्यातील लढत लक्षवेधी ठरली आहे. अभिनेत्री कंगना राणावत हिची उमेदवारी देशभरातच चर्चेची ठरली असून, तिच्या विरोधात काँग्रेसचे विक्रमादित्य सिंह निवडणूक लढवत आहेत. विक्रमादित्य सिंह यांच्या आई प्रतिभा सिंह येथून लोकसभेवर निवडून गेल्या आहेत. तसेच बसपने डॉ. प्रकाशचंद भारद्वाज यांना उमेदवारी दिली आहे. सुरेश कुमार कश्यप हे शिमला येथून भाजपच्या तिकिटावर लढत आहेत. त्यांच्याविरोधात विनोद सुलतानपुरी यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. बसपने अनिल कुमार मांगे यांना उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर हे स्वतः हमीरपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत असून, त्यांच्यासमोर काँग्रेसचे सतपाल रायजादा यांचे आव्हान आहे. हेमराज बसपकडून निवडणूक लढवत आहेत. कांगडा मतदारसंघात भाजपचे डॉ. राजीव भारद्वाज, बसपच्या रेखा चौधरी तर काँग्रेसचे आनंद शर्मा यांच्यात प्रमुख लढत आहे. हिमाचल प्रदेशातील चारही जागा भाजपने जिंकल्या होत्या, मात्र मंडी येथील झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या प्रतिभा सिंह यांनी विजय मिळवला होता. २०१४ तसेच २०१९ प्रमाणेच, यावेळीही येथील चारही जागा जिंकण्यात भाजप यशस्वी होतो का, याचे उत्तर ४ जून रोजीच मिळेल.
हिमाचल प्रदेश येथे लोकसभेच्या केवळ चार जागा असल्या, तरी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांचा बालेकिल्ला म्हणून हिमाचल प्रदेशकडे पाहिले जाते. म्हणूनच, हे राज्य भाजपसाठी महत्त्वाचे ठरते. अनुराग ठाकूर हे हमीरपूरमधून पाचव्यांदा निवडणूक लढवत आहेत. सलग तिसर्यांदा चारही जागा जिंकत काँग्रेसला चीत करण्यासाठी भाजपचा प्रयत्न आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाहान तसेच मंडी येथे प्रचारसभेला संबोधित करताना, काँग्रेसवर कठोर शब्दांत टीका केली. तसेच हिमाचल प्रदेशातील काँग्रेसी सरकारसमोरील अडचणी वाढणार असल्याचे संकेत त्यांनी दिले आहेत. राज्यसभा निवडणुकीत येथे काँग्रेसची एक जागा अनपेक्षितपणे भाजपने जिंकत ‘इंडी’ आघाडीला चकित केले होते. काँग्रेसने सहा आमदारांवर कारवाई केली असली, तरी काँग्रेस येथे अद्यापही अडचणीत आहे. केंद्रात पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार तिसर्यांदा सत्तेवर आल्यानंतर, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदरसिंग सुख्खू यांना सरकार वाचवण्यासाठी कसरत करावी लागणार, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाहान तसेच मंडी येथे झालेल्या सभेत काँग्रेसचे सरकार फार काळ टिकणार नाही, असे जाहीरपणे म्हटले आहे. काँग्रेसने निलंबित केलेले विधानसभा सदस्य भाजपकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांना विजयी करावे, असे आवाहन पंतप्रधान मोदी यांनी केले आहे. देवभूमी हिमाचल प्रदेशमध्ये प्रचार करताना, त्यांनी श्रीराम मंदिर उभारणीत राज्याचे जे योगदान आहे, त्याचा उल्लेख केला. देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी, विकासासाठी देवी-देवतांचे आशीर्वाद मागितले. कंगना राणावत हिच्याबद्दल विरोधकांनी केलेल्या अशोभनीय टिप्पणीचा देखील त्यांनी खरपूस समाचार घेतला. हिमाचल प्रदेशात विविध देवीदेवतांचे वास्तव्य आहे. त्यामुळे देवभूमीत अशा प्रकारची भाषा अशोभनीय असल्याचे त्यांनी म्हटले. काँग्रेस मुस्लीम पर्सनल लॉच्या कायद्याखाली शरियाचे समर्थन करत असल्याचा आरोप करत, गांधी परिवार देशाचे भले करू शकणार नाही, असा घणाघात त्यांनी केला. महिला आणि मुलींचा सन्मान न केलेली काँग्रेस आता महिलांना आर्थिक साहाय्य देण्याची खोटी आश्वासने देत आहे, असे म्हणत देशातील आणि राज्यातील जनता फसवणूक करणार्यांना कधीही माफ करणार नाही, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला.
काँग्रेसला ‘भारतमाता की जय’ आणि ‘वंदे मातरम्’ म्हणायला लाज वाटते, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी काँग्रेसी धोरणांचा घेतलेला समाचार कळीचा ठरणार आहे. काँग्रेसी कार्यकाळात सीमा भागात रस्ते बांधले गेले नाहीत. काँग्रेसच्या भ्याड मानसिकतेतूनच सीमा भागाचा विकास झाला नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. गेल्या चार दशकांपासून लष्करी कुटुंबांना ‘वन रँक, वन पेन्शन’ लागू करण्यात काँग्रेस सरकार अपयशी ठरले होते. भाजपने ही योजना लागू करत, आजपर्यंत माजी सैनिकांना १.२५ लाख कोटी रुपये दिले असल्याचेही त्यांनी नमूद केले. एकीकडे मोदी यांची हमी आहे, तर दुसरीकडे काँग्रेसचे विनाशाचे मॉडेल असल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.काँग्रेसने मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून जे आरक्षण दिले, ते काँग्रेससाठी अडचणीचे ठरले आहे. भाजपने काँग्रेसच्या या धोरणावर जोरदार प्रहार केला आहे. देशाची फाळणी धर्माच्या आधारावर झाल्याने, संविधान समितीने धर्मावर आधारित आरक्षण देण्यास विरोध केला होता, याचे भान न ठेवता, केवळ तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी काँग्रेस मुस्लिमांना ओबीसी कोट्यातून आरक्षण देत आहे. पश्चिम बंगालमध्येही असाच प्रकार करण्यात आला. तथापि, कोलकाता उच्च न्यायालयाने अशा पद्धतीचे आरक्षण रद्द करण्याचा निर्णय दिला.
काँग्रेसचे तुष्टीकरणाचे राजकारण पक्षाला महागात पडणार आहे. भाजपने या तुष्टीकरणाविरोधातच प्रचारात भर दिला आहे. जे. पी. नड्डा यांनीही आपल्या बालेकिल्ल्यात प्रचारसभा घेतल्या असून, त्यांनी चारही जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. काँग्रेसने कांगडा तसेच हमीरपूरमध्ये उमेदवार देण्यास केलेला विलंब पक्षाला महागात पडणार आहे. हमीरपूर हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचे मानले जाते. मंडी येथे कंगना राणावत यांच्या उमेदवारीने प्रचारात रंगत आली आहे. शिमला मतदारसंघ गेल्या १५ वर्षांपासून भाजपकडेच आहे.हिमाचल प्रदेशचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष डॉ. राजीव बिंदल यांनीही म्हटले आहे की, “हिमाचल प्रदेशमधील चारही जागा भाजप जिंकेल. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे तसेच त्यांनी राबवलेल्या कल्याणकारी योजनांमुळे मतदार मोदींना पुन्हा पंतप्रधान करतील.”
संजीव ओक