वसईचे लोकजीवन

    24-May-2024   
Total Views |
 
vasaiche lokjivan
 
नजीकच्या काळातील आणि सर्वसाधारणपणे सर्वज्ञात असलेला वसईचा इतिहास म्हणजे पोर्तुगीज सरकार आणि चिमाजी अप्पांचा धर्म रक्षणासाठी असलेला लढा. या दोन्ही ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार म्हणजे वसईत स्थायिक असलेला जनसमुदाय. वसईत अनेक समाजाचे लोक वास्तव्य करून आहेत. त्यात बहुसंख्य लोकसंख्या असलेला समाज म्हणजे वाडवळ समाज. आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी, वाडवळ, ब्राह्मण, सामवेदी ब्राह्मण या सर्व जातींत अजून धर्माचे विभाजन. ख्रिस्ती धर्माचे पालन करणारे आणि हिंदू संस्कृती चे पालन करणारे. या सगळ्यांत मुसलमान समाजाची गणना अत्यल्प आहे. तूर्तास मुस्लिम समाज बाजूला ठेवल्यास असे दिसून येते की हिंदू आणि ख्रिस्ती धर्माचे पालन करणारी कुटुंब आणि त्यांच्या वस्त्या यामध्ये काही फार अंतर नाही. काही गावांमध्ये तर अजूनही ख्रिस्ती आणि हिंदू समाजातील घरे एकमेकांस खेटून वसलेली आहेत. याचे कारण असे की पूर्वीच्या बहादूर शहाच्या आक्रमणपूर्वी अहिनलवाडा पाटण येथून राजा प्रताप बिंब यांच्यासोबत सहासष्ट कुळे दमण पासून अलिबाग पर्यंत येऊन राहिली. त्यातील बहुतेक कुळे त्याकाळची राजधानी महिकावती नगरी जवळ म्हणून बहादूरपुरास येऊन राहिली. त्यात सोमवंशी पंचकळशी यांची सत्तावीस कुळे होती. हा समाज क्षत्रिय होता. हाती शस्त्र घेणं हा त्यांचा धर्म होता. परंतु बहादूर शहाच्या आक्रमणानंतर पोटापाण्यासाठी या लोकांनी शेती वाडी करायला सुरुवात केली. वाडी करणारे ते वाडवळ असे त्यांच्या जातीचे नामकरण झाले. परंतु वाडवळ हे नाव काही प्रचलित नाही त्यामुळे काही लोक जातीच्या रकान्यात पंचकळशी असेही लिहितात.
 
पुढे व्यापार आणि धर्मप्रसार करण्यासाठी आलेल्या पोर्तुगीज खलाशी यांनी लोकांना ख्रिस्ती बनवण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्धअधिक समाज हिंदू असून बऱ्यापैकी ख्रिस्ती धर्मीय लोक इथे राहतात. जसे आगरी हिंदू-आगरी ख्रिस्ती, हिंदू कोळी-ख्रिस्ती कोळी, सामवेदी ब्राह्मण- कुपारी अजूनही परस्परसंबंध टिकवून आहेत तेवढे घनिष्ट संबंध वाडवळ हिंदू- वाडवळ ख्रिस्ती समाजात दिसून येत नाहीत. त्याची कारणे काय असावीत? किंवा कदाचित संभाषण माध्यमांच्या वापरात बदल झाले असावेत, सामाजिक, राजकीय, शहरीकरण किंवा वैश्विकीकरण ही कारणे यामागे असू शकतात.
 
वसई विजयोत्सवानंतर जेव्हा पोर्तुगीज वसई सोडून निघून गेले त्यानंतर सुद्धा ख्रिस्ती बांधवांनी आपला मूळ धर्म विसरून ख्रिस्ती धर्म पालन करणे सोडले नाही. त्याबद्दल मात्र अनेक वाद आहेत. त्याकाळच्या कर्मठ समाजाने धर्मांतर करून पुन्हा हिंदू झालेल्या आपल्याच धर्मबंधूंना आपल्यात घेण्यास नकार दिला असे म्हणतात. त्यामुळे तेव्हापासून या समाजात दोन गट पडले. जसे ते इतर समाजात सुद्धा आहेत. त्यावेळी अर्थातच रोटी-बेटी व्यवहार हा वाडवळ समाजातील लोकांमध्ये बंद झाला. परंतु आता रोटी व्यवहार केला जातो. बेटी व्यवहार मात्र अजूनही दिसून येत नाही. पचनी पडत नाही. भाषेपेक्षा आणि संस्कृतीपेक्षा धर्माची ताकद अजूनही जास्त आहे हे यावरून जाणवतं.
 
संस्कृतीमध्ये झालेले तत्कालीन बदल
 
वाडवळ समाजाच्या लोकांवर बाराव्या शतकापासून वेगवेगळ्या राज्यांच्या राजवटीचा परिणाम झाला आहे. वेगवेगळ्या संस्कृती आणि वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या वास्तव्यामुळे त्यांच्या संस्कृतीमध्ये बरेच बदल झालेले आढळतात. त्यातल्या बऱ्याचशा रूढी अजूनही वाडवळ हिंदू समाज जोपासतो आहे. परंतु ख्रिस्ती संस्कृती मध्ये तेवढ्या परंपरा पाळल्या जात नाहीत. शिवाय भाषा, ख्रिस्ती लोकांनी वाडवळ भाषा अजूनही टिकवून ठेवली आहे व संभाषणासाठी ते आपली भाषा मुख्यत्वे वापरताना दिसतात. परंतु हिंदू समाजात जन्माला आलेल्या शेवटच्या पिढीला या भाषेचा गंध सुद्धा नाही. आपापसातील बदलत्या संभाशणासंबंधी संस्कृती हा घटक असू शकतो का? लग्नाच्या सोहोळ्यात, मुहूर्तमेढ रोवतानाचे काही विधी सारखे आहेत, मात्र लग्न ख्रिस्ती पद्धतीने ख्रिस्तमंदिरातच लागते. तसेच नंतरच्या दिवशी मात्र शालू नेसून मंगळसूत्र घालून नवरी नवरा हिंदू पद्धतीत रुतली असलेली मुळे दिसून येतात. ही एकच संस्कृती, जी काहीं तात्कालिक सामाजिक कारणास्तव दोन भागात विभागली गेली, तीच संस्कृती त्यांचं वेगळेपण जपत पुन्हा एकत्र येऊ शकेल काय? तसे घनिष्ट संबंध पुन्हा निर्माण होऊ शकतील काय? कोणत्या घटकांना बदलण्याची अथवा काढून टाकण्याची गरज आहे? आजच्या पिढीतील हा या प्रकारचा संवाद कितपत पोषक आहे?
राजस्थानात मूळ असलेला हा समाज गुजरातच्या चंपानेर प्रदेशातून राजा प्रतापबिंब यांच्यासोबत उत्तर कोकणात आला.
 
राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विविध संस्कृतींनी मिळून एक अतिशय वेगळी आणि उठावदार संस्कृती हा समाज अजूनही जपतो आहे. शालिवाहन, यादव काळापासून अनेक राजवटीच्या सत्ता पाहिलेला हा समाज तुर्क, पोर्तुगीज आणि इंग्रज सत्तेच्या वेळच्या खाणाखुणा सुद्धा अजून जपतो आहे. वाडवळ समाज हा पूर्वीपासूनच पुढारलेला व आधुनिक विचारांना प्राधान्य देणारा आहे. यादव काळापासून, जेव्हापासून हा समाज उत्तर कोंकणात स्थिरावला तेव्हापासूनच हुंडा व देण्याघेण्याचे व्यवहार होत नसत. विधवा पुनर्विवाह होत असत. त्यास पाट लावणं म्हंटलं जाई. वाडवळ कन्या रखमाबाई राऊत ही पहिली महिला जिने नवऱ्यासोबत काडीमोड घेण्यासाठी तत्कालीन सरकार ची मदत मागितली. आनंदीबाईनन्तर परदेशात जाऊन डॉक्टर होऊन येऊन सेवा देणारी पहिली महिला ही याच समाजात जन्मली होती. प्रतापबिंब राजाने राजा बिंबिसार याच्यासवे अहिनलवाडा पाटण येथून जी सहासष्ट कुळे आणविली त्यात सोमवंशी होते शेशवंशी होते ब्राह्मण होते तसेच वसईत पूर्वीपासून असलेला कोळी समाज, आगरी समाज व आदिवासी समाज. हे सारेच हिंदू संस्कृती चे पालन करणारे होते. बहा‌दूरशाह च्या आक्रमणानंतर इथे मुस्लिम वस्ती सुद्धा नांदू लागली. परंतु पोर्तुगीज सत्ता आली तेव्हा बळजबरीने हिंदूंना ख्रिश्चन बनवण्यात आले असे म्हणण्यात येते. ज्याची सत्ता त्याचा धर्म या न्यायानुसार अनेक कुटुंबे ख्रिस्ती झाली. शंकराचार्य निर्मळ देवस्थानी आले होते तेव्हा अनेक पुन्हा हिंदू झाले. माणसाला पूर्वीपासून स्वतःभोवती मर्यादा आखून राहायची सवय आहे, या मयदिबाहेर पडणं महत्वाचं आहे. आपलं परकं नावाच्या रेषेने त्याने आशा अनेक मर्यादा स्वतःला घालून घेतल्या आहेत. जात, धर्म, राष्ट्र, भाषा, संस्कृती, वर्ण आशा अनेक. आजच्या एकविसाव्या शतकात इंटरनेट मुळे आजची तरुण पिढी काही प्रमाणात ही बंधनं तोडू पाहतेय, पण या काही दशकांत पडलेली ही दरी भरून न काढणं अतिशय धोकादायक आहे. बऱ्याचशा रूढी परंपरा पाळल्या न गेल्याने लयाला गेल्या आहेत, त्यांच्या मागच्या कथा कहाण्या माणूस विसरत चालला आहे. ही समृद्ध संस्कृती जोपासायला हवी. ह्या रूढी परामपराच्या मागची कारणं शोधायला हवीत. धर्माच्या नावाखाली विभागली गेलेली ही वाडवळ संस्कृती पुन्हा एकत्र यायला हवी. धर्मावर इतक्या सहज मात करणं शक्य नसलं तरी संस्कृती चे संवर्धन व्हायला हवं.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.