कोलकाता : पश्चिम बंगालमधील पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील नंदीग्राममध्ये बुधवार, दि. २२ मे २०२४ तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडून भाजपच्या एका महिला कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संतप्त झालेल्या भाजप कार्यकर्त्यांनी गुरुवारी जोरदार निदर्शने केली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी हत्येच्या निषेधार्थ जागोजागी रस्तारोको करून आपला विरोध केला.
नंदीग्राम लोकसभा मतदारसंघात दि. २५ मे लोकसभेच्या सहाव्या टप्प्यात मतदान होणार आहे. मतदानापूर्वी झालेल्या हिंसाचारामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. हिंसाचारानंतर निदर्शने आणि तणावाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्यपालांनी ममता सरकारला पत्रही लिहिले आहे.
पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस यांनी या घटनेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका केली. या संदर्भात बोस यांनी बॅनर्जी यांना दोषींवर तत्काळ कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. राज्यपालांनी ममतांना दिलेल्या आदेशात आदर्श आचारसंहितेच्या मापदंडांमध्ये सर्व आवश्यक कारवाई केली जाईल याची खात्री करण्यास सांगितले.
बंगालमध्ये सुरू असलेला रक्तपात तातडीने थांबवावा, असे राज्यपालांनी पत्रात लिहिले आहे. आचारसंहितेचे निकष लक्षात घेऊन कार्यवाही करावी, असे ते म्हणाले. एवढेच नाही तर नंदीग्राममध्ये उसळलेल्या हिंसाचाराला राज्यपालांनी प्रायोजित म्हटले आहे. ते म्हणाले की भारतीय राज्यघटनेच्या कलम १६७ नुसार राज्यपालांना कारवाईनंतर अहवाल पाठवणे आवश्यक आहे.
नंदीग्राम हत्याकांड आणि हिंसाचार प्रकरणी सरकारने तात्काळ कारवाई करून राज्यपालांना तातडीने कृती अहवाल पाठवावा. भारतीय राज्यघटनेच्या कलम १६७ अन्वये ते करणे बंधनकारक आहे. संविधानाचे उल्लंघन झाल्यास त्याची गंभीर दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. मुख्यमंत्र्यांनी आदर्श आचारसंहिता (MCC) च्या मापदंडांमध्ये प्रभावी कारवाई करावी, असा आदेशही राज्यपालांनी दिलेला आहे.