मुंबई (Nalesafai in Mumbai) : राज्यात आणि मुंबईतही यंदा चांगला पाऊस पडणार आहे. वेधशाळेनेही त्याबद्दल माहिती दिली आहे. या पार्श्वभूमीवर नालेसफाई योग्यपद्धतीने झाली नाही तर त्याचा त्रास मुंबईकरांना होणार आहे. निवडणूकांचा प्रचार संपल्यापासून भाजपचे कार्यकर्ते नालेसफाईवर लक्ष ठेवून आहेत. नालेसफाई योग्य पद्धतीने झालेली नाही, हे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे आयुक्तांनी स्वतः नालेसफाई होत आहे का? याचे परिणाम घेण्यासाठी नाल्यांवर फिरावं, अशी आमची प्रमुख मागणी आहे.
नालेसफाई करताना नाल्यांची खोली किती आहे. किती मेट्रीक टन गाळ काढणार? याबद्दल स्पष्टता द्यावी. २५ वर्षांत उद्धव ठाकरेंच्या महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी का कामे केली नाहीत?, असा प्रश्न आमचा आहे. हा गाळ वसईला खासगी क्षेपणभूमीवर नेला जात आहे. या खासगी क्षेपणभूमीचं ऑ़डीट श्वेतपत्रिकेवर मिळावं, अशी आमची मागणी आहे. मुंबईकरांच्या प्रॉपर्टी टॅक्सच्या वसुलीत महापालिकेला यश मिळाले आहे. मात्र, महापालिकेला गाळ काढण्यात अद्याप यश का मिळाले नाही?, याबद्दल प्रश्न आशिष शेलार यांनी विचारला आहे.
मतदानाच्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन गायब झालेले उद्धव ठाकरे नेमके कुठे आहेत?, असा सवालही शेलार यांनी केला. मुंबईकरांसाठी ग्राऊंडवर उतरण्याचे कष्ट ते का घेत नाही? मुंबईकरांवरचं त्यांचं प्रेम हे पुतना-मावशीचं आहे. मुंबईकरांबद्दल त्यांची भावना स्पष्ट दिसून येत आहे. निवडणूकीच्या काळात पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरेंनी संथगतीने होणाऱ्या मतदानाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप आहेत, असा आरोप कुठल्या पुराव्याच्या आधारे केला? निवडणूक आयोगाच्या कर्मचाऱ्यांवर दबाव टाकण्याचा आणि धमक्या देण्याचा प्रकार उद्धव ठाकरेंनी केला. याबद्दल मी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार नोंदविली आहे. त्यानुसार यात न्याय होईल, असेही ते म्हणाले.