आयुर्विमा : प्रकार आणि लाभ

    23-May-2024
Total Views | 40
Life Insurance Policy


विमा संरक्षण म्हणजे आपले आणि आपल्या कुटुंबाचे सुरक्षाकवच. यामध्ये आयुर्विमा हा अतिशय लोकप्रिय. तेव्हा, आयुर्विम्याचे नेमके स्वरुप, त्याचे विविध प्रकार आणि आयुर्विमा योजनांचे लाभ यांविषयी मार्गदर्शन करणारा हा लेख....

आयुर्विमा पॉलिसी घेण्याचा पहिला फायदा म्हणजे, संभाव्य धोक्यापासून संरक्षण मिळते. नियमित प्रीमियम भरलेला असल्यास आणि दुर्दैवाने विमाधारकाचा मृत्यू झाल्यास, विमाधारकाच्या कुटुंबाला जितक्या रकमेचा विमा उतरविला आहे, तितकी रक्कम, त्याशिवाय बोनस वगैरे अधिकची रक्कम मिळते. व्यक्तीच्या विम्याच्या गरजा लक्षात घेऊन, विमा कंपन्यांच्या विविध प्रकारच्या योजना असतात. जितका जास्त प्रीमियम तितके जास्त फायदे. काही विमा पॉलिसींमध्ये जास्तीचा प्रीमियम घेऊन, हॉस्पिटलचा खर्च, गंभीर आजाराचे कव्हर इत्यादीही फायदे दिले जातात. काही विमा पॉलिसींमध्ये प्रीमियमचा काही हिस्सा बचत/गुंतवणुकीसाठी वापरला जातो. अशा पॉलिसी तारण ठेवून त्यावर कर्जदेखील मिळू शकते. विमाधारकाने आर्थिक वर्षी भरलेला प्रीमियम हा ‘प्राप्तीकर कायदा, 1961’च्या ‘कलम 80 सी’ अंतर्गत वजावट देतो. तसेच विमाधारकाच्या मृत्यूनंतर त्याच्या वारसाला मिळणारी रक्कम ही ‘कलम 10 (10 डी)’ नुसार करमुक्त असते.आयुर्विमा पॉलिसींमध्ये संपूर्ण जीवन योजना, मनीबॅक पॉलिसी, युनिट संलग्न विमा योजना (यूलिप) आणि एंडॉवमेंट पॉलिसी असे प्रकार आहेत. विमाधारकाचा पॉलिसी काळात मृत्यू झाल्यास, कायदेशीर वारसांना पॉलिसीचे फायदे मिळतात. जर विमा पॉलिसीची मुदत संपताना पॉलिसीधारक जीवंत असेल, तर त्याला, उतरविलेल्या विम्याची पूर्ण रक्कम व इतर लाभही मिळतात.

एंडॉवमेंट पॉलिसी- विमाधारक पॉलिसीची मुदत संपेपर्यंत हयात असेल, तर त्याला बोनससह परतावा दिला जातो. युनिट संलग्न विमा पॉलिसी- या पॉलिसीतून विमा संरक्षणाबरोबर, विमाधारकासाठी संपत्तीही निर्माण करतात. या पॉलिसीतून विमाधारकास त्याची काही रक्कम अंशत: काढून घेता येते व त्यावर कर्जही मिळू शकते. मनी बॅक पॉलिसी - ही पॉलिसी ‘एंडॉवमेंट’सारखीच असली तरी विमा पॉलिसीच्या कालावधीमध्ये ठराविक वर्षांनंतर काही रक्कम परत मिळते. संपूर्ण जीवन पॉलिसी - काही प्रकारच्या पॉलिसी एका विशिष्ट कालावधीसाठी असतात. पण, ही पॉलिसी विमाधारकाला संपूर्ण आयुष्यभर विमा संरक्षण तसेच ‘सर्व्हायव्हल बेनिफिट’ देते. विमाधारकाला अंशत: पैसे काढण्याचा व पॉलिसी तारण ठेवून कर्ज काढता येते. अ‍ॅन्युईटी/पेन्शन प्लॅन, यात प्रीमियमची एकत्रित रक्कम ही विमाधारकाला त्याच्या पसंतीनुसार नियमित रक्कम किंवा एकरकमी दिली जाते.
 
 
टर्म इन्शुरन्स - यात विशिष्ट कालावधीसाठी संरक्षण दिले जाते. हा कालावधी पाच वर्षे ते 30 वर्षे असतो. ही मुदत विमाधारकाने ठरवावयाची असते. यात विमा संरक्षणाची रक्कम, तसेच त्यासाठी यावा लागणारा प्रीमियम पॉलिसी खरेदी करतानाच निश्चित केली जाते व यात पॉलिसीची मुदत संपेपर्यंत काहीही बदल होत नाही. त्यामुळे ही पॉलिसी वय कमी असताना घ्यावी. त्यामुळे कमी रकमेच्या प्रीमियममध्ये, जास्त रकमेचा विमा उतरविला जाऊ शकतो. यात ‘प्रीमियम’ची रक्कमही कमी असते.कुटुंबातल्या कमावत्या व्यक्तीने ज्याच्यावर कुटुंबाची आर्थिक जबाबदारी आहे, त्याने हा विमा घ्यावा. हा विमा किती रकमेचा असावा, हे खूप विचार करून ठरविले पाहिजे. गरज वाटल्यास आर्थिक सल्लागाराचा सल्लाही घ्यावा. शक्यतो सेवानिवृत्तीपर्यंत या इन्शुरन्सचा कालावधी असावा. व्यक्ती-व्यक्तीनुसार यात बदल होऊ शकतो. या विम्याच्या ‘प्रीमियम’साठी मासिक, तिमाही, अर्धवार्षिक किंवा वार्षिक असे पर्याय उपलब्ध आहेत. तसेच काही पॉलिसींमध्ये एकरकमी प्रीमियम भरण्याची किंवा मर्यादित कालावधीसाठी प्रीमियम भरून जास्त काळासाठी कव्हर घेण्याची सुविधाही असते. मुदत विमा घेताना गंभीर आजार, अपघाती मृत्यू, कायमचे अपंगत्व असे विविध रायडर काही अतिरिक्त प्रीमियम दिल्यास मिळू शकतात. कोणताही विमा दीर्घकालीन व्यवस्था असल्याने विमा कंपनी निवडताना तिची कामगिरी तपासून पाहणे आवश्यक असते. त्यासाठी त्या कंपनीचे दावे निकालात काढण्याचे प्रमाण, रक्कम देण्याचे प्रमाण तसेच तिचा ‘सॉल्व्हन्सी रेशो’ पाहणे उपयुक्त ठरते. दावा सेटलमेंट प्रमाण पाहताना कंपनीने किती दावे फेल केले ते समजावे, तर रक्कम सेटलमेंट प्रमाण तपासताना एकूण दावा रकमेपैकी किती रकमेचे हप्ते सेटल केले ते कळते. ‘सॉल्व्हन्सी रेशो’ या कंपनीची दावे सेटल करण्याची क्षमता दर्शवितो. ज्या कंपनीचे हे तिन्ही ‘रेशो’ जास्त असतील, ती कंपनी चांगली मानली जाते.
 
आयुर्विमा की मुदतविमा?
 
या दोघांतून कोणता विमा घ्यावा, हे ठरविताना आपल्या गरजा आणि जोखीम समतांचा विचार महत्त्वाचा असतो. टर्म इन्शुरन्स (मुदतविमा) मध्ये मिळणारे विमाकवच हे अधिक असते व प्रीमियमची रक्कमही कमी असते. त्यामुळे कमी प्रीमियममध्ये टर्म इन्शुरन्स घेऊन, उर्वरित रक्कम ‘एसआयपी’द्वारे म्युच्युअल फंडात गुंतविल्यास जमा होणारी रक्कम आपली आर्थिक उद्दिष्ट्ये पूर्ण करू शकते. आयुर्विमा पॉलिसींवर परताव्याचे प्रमाण 5.50 ते 6.00 टक्क्यांच्या दरम्यान असते. जे महागाईदरावर मात करू शकत नाही. विमा हा काळजीपूर्वक निवडला पाहिजे. आयुर्विम्याकडे गुंतवणूक म्हणून पाहू नये. आयुर्विमा हे कोणाच्याही जीवनात जर काही अघटित घडलं, तर त्या कुटुंबाच्या आर्थिक गरजा भागवण्यासाठी आयुर्विमा हवा. आयुर्विमा योजनेमध्ये किंवा संरक्षणाशिवाय संपत्ती निर्मितीचाही विचार होतो. प्रीमियम जास्त असतो. मुदत जास्त असते. काही पॉलिसी या संपूर्ण आयुष्यासाठीही असतात. त्यामुळे व्यक्तीचे पूर्ण आयुष्य या पॉलिसीद्वारे कव्हर होऊ शकते. पॉलिसीधारकाला गरजेच्या वेळी कर्जही मिळते. टर्म इन्शुरन्सची रक्कम पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतरच कुटुंबांना मिळते. प्रीमियम फार कमी असतो. विमा किती वर्षांसाठी, किती रकमेचा घ्यायचा, हे पॉलिसीधारक आपली आर्थिक परिस्थिती आणि उद्दिष्टांनुसार ठरवू शकतो. यात कर्ज मिळत नाही.

 
शशांक गुळगुळे


अग्रलेख
जरुर वाचा
वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

वक्फ सुधारणा विधेयकामुळे देशाचे विभाजन होईल! मौलानाचा देशाप्रति द्वेष

Waqf Amendment Bill २ एप्रिल २०२५ रोजी संसदेत केंद्रीय अल्पसंख्यांक मंत्री किरेन रिजिजू यांनी सादर केले आहे. यावेळी त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि गरीब निराधार महिलांसाठी हा कायदा महत्त्वपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. एवढेच नाहीतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही वक्फ सुधारणा विधेयकावर संसदेत भाषण केले. यावेळी बोलताना त्यांनी वक्फची एकूण माहिती दिली. त्यावेळी अनेक विरोधकांनी याला विरोध केला. मात्र, त्यांनी वक्फ सुधारणा विधेयकामुळे गरीब मुस्लिम आणि मुस्लिम महिलांना त्याचा फायदा होईल असेही ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121