नोकरीतून दर महिन्याला मिळणारा चांगल्या पगारावर पाणी सोडण्याचा विचार क्वचितच कुणी करेल. पण, संसाराचा गाडा हाकताना नोकरीकडे वळलेली पाठ पुन्हा एकदा आर्थिक स्थैर्य कसे मिळवून देईल, याचा त्यांनी विचार केला. उद्योग क्षेत्रात पाठीशी कुणीही ‘गॉडफादर’ नसताना, जिद्द, कष्ट आणि उमेद या त्रिसूत्रीच्या जोरावर भरारी घेणार्या अदिती कुडवा यांच्याविषयी...
स्त्रियांचं आयुष्य ‘रांधा, वाढा, उष्टी काढा’ या पलीकडे केव्हाच गेलं आहे. तरीही, आज घरातील स्त्री नोकरी करत असेल, तरीही तिच्यामागची घर-संसाराची जबाबदारी काही सुटत नाही. माहेर आणि सासर अशा दुहेरी जबाबदार्यांच्या धबडग्यात बरेचदा स्त्रीला स्वप्नांचा विसर पडतो. स्वत:च्या आवडीनिवडींकडे प्रसंगी दुर्लक्षित करत, कुटुंबाच्या आवडींना जपत ती जीवन जगते. उद्योजिका अदिती कुडवा यांचीदेखील अशीच काहीशी गोष्ट. पण, सासरकडच्यांनी दिलेल्या मानसिक आणि आर्थिक पाठबळामुळे आज त्या एक यशस्वी उद्योजिका म्हणून ओळखल्या जातात.
अदिती अमित कुडवा मूळच्या कोकणातील मंडणगडच्या रहिवासी. अदिती यांचं बालपण मंडणगडमध्येच गेलं. याशिवाय, शालेय आणि बारावीपर्यंतचे शिक्षण त्यांनी मंडणगडमध्येच पूर्ण केले. त्यानंतर पुढील पदवीच्या शिक्षणासाठी अदिती यांनी कोकणातून थेट मुंबई गाठली आणि वसईतील वर्तक महाविद्यालयातून त्यांनी कला या शाखेत आपले पदवीचे शिक्षण पूर्ण केले. सामान्य कुटुंबाच्या विचारसरणीप्रमाणे शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करायची, तेच अदिती यांनीदेखील केले. टेक्सटाईल्समध्ये नोकरी करण्यास सुरुवात केली. पुढे लग्न झाले, मुलगा झाला आणि त्यानंतर पुन्हा ऑफिसची पायरी त्या चढल्याच नाही. आई, सून या जबाबदार्या पूर्ण करत असताना त्यांच्या मनातून नोकरीचा विचारच दूर गेला होता.
काही काळनंतर घरातील आर्थिक स्थिती जरी उत्तम असली तरी स्वकष्टाने चार पैसे कमवावे आणि आपली काही स्वप्नं पूर्ण करावी, याचा विचार त्यांनी करण्यास सुरुवात केली. यावेळी स्वत:ला पारखत असताना मला काय येतं आणि मला काय आवडतं, याचा विचार करत असताना त्यांना टेक्सटाईल्समध्ये काम केल्यामुळे फॅब्रिक्सचे ज्ञान होते. कपड्यांची आवड होती आणि तीच आवड उद्योगात बदलण्याचा निर्णय अदिती यांनी घेतला. सासरकडची मंडळी दाक्षिणात्य गौड सारस्वत ब्राह्मण असल्यामुळे दक्षिणेवरून साड्या घेऊन येत त्यांनी किफायतशीर दरात घरोघरी जाऊन साड्या विकण्यास सुरुवात केली. आपल्याला ही बाब आत्मविश्वासाने येत असल्याची जाणीव झाल्यानंतर, अदिती यांच्या एका फॅशन डिझायनर मैत्रिणीने त्यांच्यातील धमक आणि नवे काहीतरी करण्याची जिद्द पाहून स्वत:च्या बुटीकमध्ये थोडी जागा दिली. तिथे अदिती यांनी होलसेलमध्ये ड्रेसेस विकत घेऊन, नंतर त्याची विक्री सुरु केली.
काही दिवस अशी विक्री केल्यानंतर अदिती यांनी विविध प्रदर्शनांमध्ये साड्या, ड्रेसेसचे स्टॉल लावण्यास सुरुवात केली. पहिली सुरुवात त्यांनी दादरच्या ग्राहक पेठेतून केली. जिथे राज्याच्या कानाकोपर्यांतून महिला आपल्यातील उद्योजिकेचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी येतात. तिथे अदिती यांनीदेखील आपले पहिले पाऊल टाकले. एक महिला तिच्यासमोरील आव्हाने न डगमगता पूर्ण करू शकते, याचे उत्तम उदाहरण महिलावर्गासमोर ठेवत अदिती यांनी तुटपुंज्या पैशांत सुरू केलेला उद्योग अगदी दुकानापर्यंत नेऊन ठेवला.अदिती यांनी ज्यावेळी उद्योजिका होण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी घरातील मंडळींनी थोडी नाकं मुरडली खरी, पण अदिती यांचे सासरे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. दादर भागात त्यांनी पहिले दुकान सुरू केले.
ते रानडे रोड येथे आणि त्यासाठी लागणारी आर्थिक मदत ही अदिती यांच्या सासर्यांनी देऊ केली. त्यानंतर हळूहळू अदिती यांच्या नवर्यानेदेखील त्यांना या उद्योगात साथ देण्यास सुरुवात केली. उद्योगाची सुरुवात करण्यापूर्वी अदिती यांनी कपड्यांच्या मार्केटमध्ये जाऊन सध्या फॅशन जगात काय ट्रेंडिंग सुरू आहे? कोणत्या प्रकारचे फॅब्रिक वापरले जातात? त्यांचे दर काय असतात? त्या कपड्यांपासून ज्यावेळी ड्रेस तयार होतो, तेव्हा त्याची किंमत काय असावी? या सगळ्या बाबींचा रीतसर अभ्यास करून उद्योगजगतात उडी घेतली. सध्या दादरमध्ये अदिती यांची दोन कपड्यांची दुकाने आहेत. ‘अदिती कलेक्शन’ आणि ‘स्वामिनी कलेक्शन’ अशी दोन दुकानं त्यांनी स्वबळावर, स्वकष्टाने उभी केली आहेत.
पुरुषमंडळी आजही कोणताही उद्योग सुरु करण्यापूर्वी फार विचार करतात. पण, अदिती यांनी आपल्या आवडीला अर्थार्जनाचे साधन म्हणून प्राधान्य दिले. समाजातील तमाम स्त्रिया ज्यांच्या हातात कला आहे, त्यांना केवळ आर्थिक, कुटुंबाचे पाठबळ, शिक्षणाचा अभाव यामुळे आपली स्वप्न पूर्णत्वास नेता येत नाहीत. परंतु, जर का मनाशी पक्क ठरवलं तर, स्त्री उंच आकाशात एकटीने भरारीही घेऊ शकते आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तगदेखील धरू शकते, हे अदिती यांनी सिद्ध केले आहे. अदिती कुडवा यांना ‘दै. मुंबई तरुण भारत’कडून पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा!