पंजाबमध्ये सर्वच पक्षांपुढे आव्हान

    23-May-2024   
Total Views |
Punjab Lok Sabha election

देशात ४००चा आकडा पार करण्याचा नारा खरा ठरविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तर पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दल मात्र आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. आम आदमी पक्षदेखील लोकसभेत आपले खाते पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस २०२२च्या विधानसभा निवडणुकीत आपला गमविलेला जनाधार पुन्हा मिळवून राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत पक्ष बनण्याचा प्रयत्न करत आहे.
 
पंजाबमध्ये यावेळी लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात मतदान आहे. निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसतशी उत्सुकताही वाढत आहे. यावेळची निवडणूकही पक्षांऐवजी चेहर्‍यांवरच अधिक केंद्रित आहे. देशात ४००चा आकडा पार करण्याचा नारा खरा ठरविण्याचा भाजपचा प्रयत्न आहे, तर शिरोमणी अकाली दल मात्र आपल्या अस्तित्वाची लढाई लढत आहे. आम आदमी पक्षदेखील लोकसभेत आपले खाते पुन्हा उघडण्याचा प्रयत्न करत आहे, तर काँग्रेस २०२२च्या विधानसभा निवडणुकीत आपला गमविलेला जनाधार पुन्हा मिळवून राष्ट्रीय स्तरावर एक मजबूत पक्ष बनण्याचा प्रयत्न करत आहे. एवढेच नाही, तर लोकसभेच्या निवडणुका असल्या, तरी २०२७ मध्ये पंजाबमध्ये होणार्‍या विधानसभा निवडणुकीकडे सर्व पक्षांचे लक्ष लागले आहे.
 
प्रदीर्घ काळापासून आंदोलन करणारे शेतकरी कोणत्याही एका पक्षासोबत नाहीत. वेगवेगळ्या कारणांमुळे ते आप, काँग्रेस आणि अकाली दल यांच्यात वेगवेगळ्या जागांवर विभागले गेले आहेत. ‘आप’साठी निराशाजनक बाब आहे की, राज्यात ‘एमएसपी’चे आश्वासन पूर्ण करता न आल्याने काँग्रेस आणि अकाली यांच्यात मोठा वर्ग विभागलेला दिसतो. मात्र, मोफत विजेमुळे एक विभाग ‘आप’च्या पाठीशी आहे. सर्व १३ जागांवर चौरंगी लढत होणार आहे. पूर्वी शहरी हिंदू मतदार काँग्रेससोबत होते. मात्र, श्रीराममंदिराच्या उभारणीनंतर हा विभाग भाजपकडे सरकताना दिसतो. दलित मतदार पूर्वी काँग्रेस आणि अकाली दलात विभागले गेले होते. यावेळी त्यांचा कल भाजपकडे दिसून येतो. शीख मतदार प्रामुख्याने काँग्रेस आणि अकाली दलात विभागलेले दिसतात. अनेक बड्या शीख नेत्यांना आणून भाजप शीख मतदारांमध्येही खळबळ माजवेल अशी आशा आहे.
 
अडीच दशके शिरोमणी अकाली दलासोबत युती करून एक ते तीन जागा जिंकणार्‍या भाजपला राज्यात पुढे जायचे असेल, तर नवीन मार्ग शोधावे लागतील, हे पक्षाला चांगलेच समजले आहे. त्यामुळे यंदाची लोकसभा निवडणूक भाजपसाठी अनेक अर्थांनी महत्त्वाची. काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग, त्यांची पत्नी आणि माजी परराष्ट्र राज्यमंत्री प्रनीत कौर, काँग्रेसचे पंजाब अध्यक्ष सुनील जाखड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ‘आप’चे खा. सुशील कुमार रिंकू, माजी काँग्रेस खासदार संतोख चौधरी यांच्या पत्नी करमजीत कौर, माजी मुख्यमंत्री बेअंत सिंग यांचा नातू आणि लुधियानाचे काँग्रेस खासदार रवनीत सिंग बिट्टू, हिमाचल काँग्रेसचे सहप्रभारी तजिंदर सिंग बिट्टू आणि काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते जयवीर शेरगिल असे आता भाजपचे पंजाबमधील चेहरे आहेत. अनेकांना तिकिटेही मिळाली आहेत. अमरिंदर, रवनीत आणि तजिंदर या शीख नेत्यांना आणून, भाजप हिंदू पक्षाच्या प्रतिमेतून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहे. रिंकू आणि करमजीत यांना आणून जाखड यांच्या माध्यमातून दलित आणि जाटांमध्ये जनाधार निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यासाठीच जाखड यांना पंजाबचे प्रदेशाध्यक्षदेखील करण्यात आले आहे.

पंजाबमध्ये मतदार यंदा भाजपकडे नवी आशा म्हणून बघत असल्याचा दावा भाजपच्या एका राष्ट्रीय सरचिटणीसांनी केला आहे. एवढी वर्षे युतीत असल्याने भाजपला येथे आपला जनाधार वाढविण्याची संधीच मिळाली नाही. मात्र, यंदा भाजपला ती संधी प्राप्त झाली आहे. भाजपला जरी लोकसभा निवडणुकीत मोठे यश मिळाले नाही, तरीदेखील विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची दावेदारी अतिशय मजबूत होणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे.पंजाबमध्ये यंदा काँग्रेसला अंतर्गत लाथाळ्यांचाच सामना करावा लागत आहे. २०१९च्या सार्वत्रिक निवडणुकीत अमरिंदर सिंग मुख्यमंत्री होते, तेव्हा काँग्रेसने १३ पैकी आठ जागा जिंकल्या होत्या. नवज्योतसिंग सिद्धू, ज्यांना नंतर राज्यप्रमुख करण्यात आले, त्यांनी अमरिंदर यांच्या विरोधात आघाडी उघडली. २०२१ मध्ये चरणजीत सिंह चन्नी मुख्यमंत्री बनले. २०२२ मध्ये दलित मुख्यमंत्री वापरूनही काँग्रेसला सत्ता वाचविता आली नाही. यानंतर सुरू झालेली दिग्गजांच्या पक्षांतराची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. आव्हानांच्या दरम्यान प्रदेशाध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वाडिंग यांच्यावर काँग्रेसला यश मिळवून देण्याची मोठी जबाबदारी आहे.
 
अकाली दलाचे संस्थापक प्रकाशसिंग बादल यांच्या निधनानंतर आणि अकाली-भाजप युती तुटल्यानंतर ही पहिलीच सार्वत्रिक निवडणूक. अकाली दलाचा गावागावात चांगलाच जनसंपर्क मानला जातो. अकालींनी शेतकर्‍यांच्या नावावर युती तोडली. मात्र, २०२२ मध्ये त्याचा काहीही फायदा झाला नाही. विधानसभा निवडणुकीत बसपासोबत हातमिळवणी करूनही ११७ विधानसभा जागांपैकी केवळ तीन जागा या पक्षाला जिंकत्या आल्या. त्यामुळे आताची लोकसभा निवडणूक ही सुखबीर बादल यांची सर्वात मोठी परीक्षा आहे.दलितांचा मोठा चेहरा असलेल्या कांशीराम यांनी उत्तर प्रदेशात जाऊन चारवेळा बसपचे सरकार स्थापन केले. पंजाबमधील सुमारे ३२ टक्के लोकसंख्या दलित आहे. यापैकी, ६० टक्के शीख आणि ४० टक्के हिंदू आहेत. सर्व प्रयत्न करूनही कांशीराम त्यांना एकत्र करू शकले नाहीत. दलितांचा मोठा गट काँग्रेस आणि अकाली दलात विभागला गेला आहे. उत्तर प्रदेशप्रमाणेच येथेही बसपा स्वबळावर लढते आहे.
 
काँग्रेसमधील अस्वस्थता आणि शेतकर्‍यांच्या प्रचंड पाठिंब्यामुळे २०२२ मध्ये विधानसभेच्या ११७ पैकी ९२ जागा जिंकून ‘आप’ मोठ्या बहुमताने सत्तेवर आली. २०१९ मध्ये ‘आप’ला संगरूरमध्ये फक्त एकच जागा मिळाली होती. भगवंत मान हे येथून खासदार होते. ते मुख्यमंत्री झाल्यावर पोटनिवडणूक झाली. असे असूनही, मान यांना संगरूरमध्ये ‘आप’ला विजय मिळवून देता आला नाही. यंदा ‘आप’ने मान सरकारमधील पाच मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले आहे. परिणामी, ‘आप’ला यंदा मोठा संघर्ष करावा लागणार आहे.