मुंबई, दि.२३:प्रतिनिधी राज्य रस्ते विकास महामंडळाकडून पुणे व पिंपरी शहराची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी रिंग रोड हा महत्त्वाचा प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.१३६.८० किमी लांबीच्या पुणे रिंगरोड प्रकल्पाच्या ९ बांधकाम कंत्राटांसाठी पाच स्थापत्य अभियांत्रिकी कंपन्यांना मंगळवार दि.२१ रोजी आर्थिक निविदा उघडल्यानंतर सर्वात कमी बोलीदार म्हणून घोषित करण्यात आले. विजेत्यांच्या यादीमध्ये मेघा इंजिनिअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर्स लिमिटेड (MEIL), नवयुग इंजिनियरिंग कंपनी लिमिटेड (NECL), GR इन्फ्राप्रोजेक्ट्स (GRIL), PNC इन्फ्राटेक आणि रोडवे सोल्युशन्स इंडिया इन्फ्रा (RSIIL) यांचा समावेश आहे.
पुणे रिंगरोड हा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) द्वारे ४ ते ६ लेन प्रवेश-नियंत्रित महामार्ग म्हणून विकसित केला जाईल. त्याचे बांधकाम खेड, हवेली, पुरंधर, भोर, मुळशी आणि मावळ या तालुक्यांमधून ९ पॅकेजेस अंतर्गत केले जाईल. एमएसआरडीसीने जानेवारी २०२४ मध्ये १८ कंपन्यांकडून ९०० दिवसांच्या बांधकाम मुदतीसह आर्थिक बोली आमंत्रित केल्या. एप्रिल २०२४मध्ये या १२ कंपन्यांकडून २६ निविदा प्राप्त झाल्या.
राज्य रस्ते विकास महामंडळाने यापूर्वीच या कामासाठी १७ हजार ५०० कोटी रुपयांची निविदा प्रसिद्ध केली आहे. निवडणूक आचारसंहिता सुरु असल्याने या प्रकल्पाच्या भूमिपूजन संदर्भातील कोणताही निर्णय घेणे शक्य होणार नाही. तसेच निविदा उघडल्यानंतरही कंत्राटदारांना काम देण्यासंदर्भात घोषणा होण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे या दोन महिन्यांच्या काळात निविदांची पडताळणी करून स्वीकृतीचे पत्र कंत्राटदारांना दिले जाणार आहे.
असा असेल प्रकल्प
बोगदे : आठ
छोटे पूल : तीन
मोठे पूल : दोन
--
एकूण लांबी : १२२ किलोमीटर
एकूण रुंदी :११० मीटर
पूर्व रिंगरोड : ७१.३५ किमी
पश्चिम रिंगरोड : ६५.४५ किमी