मुंबई : कर्जत-जामखेडमध्ये 'एमआयडीसी'च्या आडून मोठा भूखंड घोटाळा झाल्याचा आरोप करीत राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाने आमदार रोहित पवार यांच्याकडे अंगुलीनिर्देश केला आहे. बेरोजगारांना रोजगार देण्याच्या नावाखाली एमआयडीसीच्या आडून उद्योगपतींच्या घशात भूखंड घालण्याचा रोहित पवार यांचा घाट आहे. त्यामुळे या संपूर्ण भूखंड घोटाळ्याची 'एसआयटी'मार्फत चौकशी करण्याची मागणी प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे.
राष्ट्रवादीच्या मुंबईतील कार्यालयात गुरुवार, दि. २३ मे रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. उमेश पाटील म्हणाले, ज्या कर्जत - जामखेडच्या पाटेगाव व खंडाळा येथील ४५८ हेक्टर (जवळपास १२०० एकर) क्षेत्र संपादित केले जाणार आहे, तेथील मूळ जमीनदार हे शेतकरी आहेत. काही जमीनी द्यायला तयार आहेत, तर काही गावे जमीनी देण्यास विरोध करीत आहेत. मात्र रोहित पवार यांचा त्याच जागेवर एमआयडीसीसाठी आग्रह आहे. मूळ शेतकऱ्यांकडून कवडीमोल दराने जागा घेतलेल्या उद्योगपतींना भरमसाठ मोबदला मिळावा, यासाठी त्यांचा खटाटोप सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
पाटेगाव, खंडाळा गावात आंतरराष्ट्रीय गुन्हेगार नीरव मोदी याची सहा ते सात ठिकाणी जमीन आहे. याशिवाय महाजन, अग्रवाल, पोद्दार, छेडा, खन्ना, जैन, शेट्टी, मेहता यांना मोबदला मिळवून देण्यासाठी लोकांनी रोहित पवार यांना निवडून दिले आहे का? उद्योगपती, व्यापारी, आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पैसे मिळवून देण्यासाठी, बेरोजगार तरुणांच्या नावाखाली एक खोटे चित्र उभे केले जात आहे. कर्जत - जामखेड नव्हे, तर महाराष्ट्रातील जनतेला आमदार रोहित पवार हा किती फ्रॉड आहे, हे यानिमित्ताने कळेल. त्यांचा दाखवायचा चेहरा आणि खरा चेहरा आम्ही जनतेसमोर आणला आहे. त्यामुळे या प्रकरणाची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणीही उमेश पाटील यांनी केली.