करिअर व्यवस्थापनातील दोन घटक : विद्यार्थी व पालक

    23-May-2024
Total Views | 68
Career Management

नुकताच बारावीचा निकाल लागला असून, पुढील काही दिवसांत दहावीचा निकालही जाहीर होईल. अशावेळी विद्यार्थी आणि पालकांसमोरही करिअरच्या अनुषंगाने ‘पुढे काय?’ असा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी पाल्याच्या आवडीनिवडी, शैक्षणिक क्षमता, कुटुंबाची आर्थिक स्थिती यांसारख्या विविध निकषांच्या आधारे करिअर मार्गदर्शनाचा निर्णय फायदेशीर ठरु शकतो. त्यानिमित्ताने करिअर व्यवस्थापनासंबंधी मार्गदर्शन करणारा हा लेख...
 
प्रत्येकाच्या जीवनाच्या पहिल्या टप्प्यात करिअरचे महत्त्व असते. हा टप्पा साधारणत: विद्यार्थ्यांचे शिक्षण संपण्याच्या सुमारास सुरू होतो. त्याचाच परिणाम पुढे या विद्यार्थ्यांच्या रोजगार व प्रगतीवर होत असतो, त्यामुळेच करिअर नियोजनामागचे व्यवस्थापन व त्याचे तंत्र आणि मंत्राचे महत्त्व आणि माहात्म्य मुळातूनच समजून घेणे फार महत्त्वाचे ठरते.यासंदर्भातील अन्य महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेचा पुढील आयुष्यात खर्‍या अर्थाने फायदा व्हायचा असेल, तर या शिक्षण आणि शैक्षणिक पात्रतेवर आधारित व विकसित स्वरूपातील रोजगाराची जोड मिळणे आवश्यक असते. शिक्षण आणि रोजगार यांचा असा सार्थ समन्वय म्हणूनच प्रत्येक विद्यार्थी-युवकांसाठी महत्त्वाचा टप्पा ठरतो.

 
अर्थात, वरील मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर करिअरचे नियोजन विद्यार्थ्यांच्या व्यक्तिगत स्तरावर करण्यासाठी विशेष प्रयत्न अत्यावश्यक ठरतात. यासाठी म्हणूनच करिअर नियोजन करावे लागते. अशा नियोजनाचे फायदे विद्यार्थ्यांना दीर्घकालीन स्वरूपात तर होतातच, शिवाय त्यामुळे विद्यार्थ्यांचे पालक-कुटुंबीयांसाठी समाधानकारक सिद्ध होतात. विद्यार्थी शालांत-पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर काय? एवढाच मुद्दा महत्त्वाचा न मानता विद्यार्थी - युवकांच्या भविष्याचा कानोसा घेत, त्यानुसार प्रयत्न म्हणूनच गरजेचे असतात.म्हणूनच करिअर नियोजनाच्या या व्यापक प्रक्रियेत विद्यार्थ्यांच्या बरोबरीनेच पालकांची भूमिका, अपेक्षा, जबाबदारी अत्यावश्यक ठरते. बर्‍याचदा असे अनुभवास येते की, शैक्षणिक पात्रता पूर्ण करणार्‍या विद्यार्थ्यांवरच त्यांच्या पुढील कारवाईची जडणघडण करण्याची जबाबदारी सोपविली जाते. विद्यार्थी युवकांचे शिक्षण व पात्रता पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी व सर्वप्रकारचे प्रयत्न करणार्‍या पालकांनी आपल्या पाल्याच्या प्रगतीसाठी प्रयत्न करण्याची व त्यांना गरजेनुरूप मार्गदर्शन करण्याची पालकांची भूमिका व प्रयत्न म्हणूनच निर्णायक ठरते.

विद्यार्थीच नव्हे, तर त्यांचे पालक आणि घरच्यांचीही अशी समजूत असते की, करिअर नियोजन ही बाब शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या सुमारास महत्त्वाची असते. त्यातही मुख्य भर दिला जातो तो विद्यार्थ्यांची दहावी, बारावी नंतर त्यांचे शैक्षणिक प्रवेश व अभ्यासक्रमांची निवड करताना, नंतर मात्र त्याबद्दल तेवढासा विचार केला जात नाही. यामध्ये अर्थातच संबंधित विद्यार्थ्यांनी पदवी वा पदविका किंवा अन्य विशेष अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर त्यांचे करिअर, भविष्य कसे असावे वा असू शकते, हा महत्त्वपूर्ण मुद्दा दुय्यम ठरतो.प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचा मूलभूत वा महत्त्वाचा शैक्षणिक अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतरचे करिअर नियोजन हे दोन टप्प्यांमध्ये असणे आवश्यक व उपयुक्त ठरते. यामधील पहिला टप्पा हा अर्थातच दहावी, बारावीनंतरचे प्रवेश व त्यामागचा विचार आणि तयारी, याच प्रयत्नांमधला पुढचा व महत्त्वपूर्ण टप्पा असतो. बारावीनंतरचे पदविका, पदवी वा इतर विषयांमधील अभ्यासक्रम, या अभ्यासक्रमांमधील प्रवेश व त्यानुसार संबंधित अभ्यासक्रम विशेष टक्केवारी वा प्रावीण्यासह पूर्ण करणे. हे दोन्ही टप्पे विशेष यशासह पार करणार्‍यांना पुढील करिअरचा मार्ग निश्चित स्वरूपात सापडू शकतो.
 
व्यक्तिगत करिअरच्या प्रवासातील पुढील व सर्वात महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा असतो रोजगाराची निवड करण्याचा. यामध्ये प्राप्त शिक्षण-कौशल्य पात्रता इ.च्या आधारे रोजगाराची सुरुवात करण्याचा अंतर्भाव प्रामुख्याने होतो. नोकरी-रोजगाराची सुरुवात आयुष्याला दिशा देणारी असल्याने ती विचारपूर्वक व काळजीपूर्वक करणे आवश्यक असते. विशेषत: विद्यार्थी म्हणून पदवी वा तत्सम पात्रता पूर्ण केल्यावर आपले शिक्षण, रोजगाराची संधी व पुढील भवितव्य यांची सांगड घालण्याचा प्रयत्न केल्यास, त्याचा फायदा संबंधित विद्यार्थी-उमेदवाराला तर होतोच, शिवाय अशी नोकरीची संधी मिळाल्याचे समाधानसुद्धा दीर्घकाळ टिकते.करिअरचा महत्त्वाचा टप्पा म्हणून नोकरी-रोजगाराचा विचार करताना, इच्छुक विद्यार्थी उमेदवाराने आपले शिक्षण, कौशल्य पात्रता, इच्छा-आकांक्षा यांची सांगड घालून विचारपूर्वक निर्णय घेणे गरजेचे असते. हे साधण्यासाठी शैक्षणिक पात्रतेशिवाय विशेष प्रयत्न करावे लागतात. त्यामध्ये सद्यःस्थितीत शिक्षणाला-कौशल्याची जोड देणे अपरिहार्य ठरते.

 हे साधले तर नोकरी-रोजगारात अनेकविध व चांगले पर्याय उपलब्ध होतात. याच संदर्भात विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा मुद्दा असतो तो नोकरी, रोजगाराची सुरुवात करताना आपल्याला पुढे नेमके काय आणि कसे करायचे आहे, याचा. पुरतेपणी विचार करून त्यानुसार प्रयत्नपूर्वक आखणी करताना त्यांनी इच्छा-आकांक्षा व महत्त्वाकांक्षा आपण आपल्या रोजगारातून कशा साध्य करू शकतो, याचा अवश्य कानोसा घेऊनच विचार करावा व प्रसंगी आणि गरजेनुसार पालक-मार्गदर्शकांचे मार्गदर्शन घ्यावे. असे न करता, केवळ नोकरीची सुरुवात करण्यासाठी उपलब्ध रोजगाराचा विचार केल्यास भविष्यात नैराश्य वा हताशा येऊ शकते. असे होऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांच्या पालकांनी योग्य ती काळजी वेळेत घ्यायला हवी.तसे पाहता करिअर मार्गदर्शनाकडे ‘करिअर व्यवस्थापन’ या दृष्टिकोनातून विद्यार्थी वा पालक या उभयतांनी बघायला हवे. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे, करिअर क्षेत्राच्या सतत वाढत जाणार्‍या कक्षा व उपलब्ध असणारे पर्याय व्यवसाय क्षेत्राप्रमाणेच रोजगार संधीमधील वाढती स्पर्धा, आर्थिक अस्थिरता व त्यादृष्टीने भविष्याचा मागोवा घेण्याची त्यांच्या क्षमता युवकांमध्ये असतेच असे नाही, त्याचवेळी त्यांच्या आशा-आकांक्षा जोपासणे व योग्य मार्गदर्शन करण्याची असणारी गरज पालक पूर्ण करू शकतात. पालकांचे असे अनुभवी, वस्तुनिष्ठ व प्रोत्साहनपर मार्गदर्शन लाभल्यास खर्‍या अर्थाने करिअर व्यवस्थापनाचे उद्दिष्ट साध्य होऊ शकते.

विद्यार्थी-पाल्यांचे शिक्षण, करिअर नियोजन या सार्‍या प्रकियेत पालकांचा सहभाग किती असावा? हा प्रश्न सदोदित विचारला जातो. यासंदर्भात कौटुंबिक जबाबदारी पालकांची असते, हे मान्य करुन सुद्धा असे स्पष्टपणे नमूद करायला हवे की, आपल्या मुलांच्या उच्च-शिक्षण वा रोजगार-करिअरच्या निवड प्रक्रियेत पालकांनी मार्गदर्शक या भूमिकेत असणे हे पाल्य व पालक या उभयतांसाठी फायदेशीर ठरते.पालकांचा अनुभव, परिस्थितीची अभ्यासपूर्ण अंदाज व दूरदृष्टी यावर आधारित असे मार्गदर्शन पालकांनी करायला हवे. एवढेच नव्हे, हे सारे करताना आपल्या मुलाचा कल कसा आहे, त्याची बौद्धिक आवड-निवड, प्रयत्नशीलता इत्यादीचा वस्तुनिष्ठ विचार करुन पालकांनी मार्गदर्शन केल्यास ते परस्पर पूरक व प्रेरक ठरते. थोडक्यात म्हणजे, शिक्षण पूर्ण केलेल्या आपल्या पाल्यांनी उच्च-शिक्षण वा रोजगासाठी काय करावे व कुठे जावे, हे त्यांना सांगताना आता आपल्या पाल्यांना बोट धरुन चालवण्याची गरज नाही, तर त्यांच्या पाठीवर हात ठेवून त्यांची पाठराखण करण्याचे भान जे पालक ठेवतात, त्यांचा आपल्या मुलांच्या करिअर विकासाचा मूळ उद्देश साध्य होतो.
 
बरेच पालक आपल्या पाल्यांचे शिक्षण पूर्ण होण्याच्या आधीपासूनच आपल्या मुलांनी पुढे काय करावे, याबद्दल ठाम असतात. त्यातही अनेकांचा आग्रह असतो की, त्यांच्या पूर्वायुष्यात कुठल्या ना कुठल्या कारणाने त्यांना जे करिअर करता आले नाही, त्यांचे ते स्वप्न त्यांच्या पाल्याने काहीही करुन पूर्ण करावे. असे करताना मात्र बरेचदा पाल्यांच्या इच्छा-आकांक्षा वा प्राधान्यांचा विचारच केला जात नाही. विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाऐवजी आई-वडिलांच्या इच्छेलाच स्वीकारावे लागते. अनेकांना त्यामुळे अनिच्छेने करिअर क्षेत्र निवडावे लागते. कोटा शहरातील आत्महत्यांसारखे प्रकार सुद्धा यामुळे घडू शकतात, हे भयाण वास्तव विशेषत: पालकांनी लक्षात घ्यावे.याचवेळी पाल्य आणि पालक या उभयतांनी करिअर नियोजनाच्या व्यवस्थापनेकडे अधिक व्यापक, डोळस व सकारात्मक पद्धतीने पाहणे सद्यस्थितीत फार गरजेचे ठरते. आज विविध क्षेत्रातील शिक्षण-प्रशिक्षण, उच्च-शिक्षण व अद्ययावत कौशल्यांवर आधारित रोजगार संधी उपलब्ध आहेत. मुख्य म्हणजे, या नव्या संधी केवळ पूर्वापार पद्धतीच्याच न राहता त्याला अद्ययावत व अधिक लाभदायी स्वरूप लाभले आहे. उदाहरणार्थ, विज्ञान-तंत्रज्ञानाला आज संशोधनाची साथ लाभली आहे. संगणकाचा उपयोग पूर्वापार न ठरता, आज त्याद्वारे कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारे अचाट कामे केली जात आहेत. बँका-वित्तीय व्यवस्थापनाने तर सारे व्यवसाय क्षेत्र व्यापले आहे. साहित्य-भाषाशास्त्राची गरज सर्वच प्रकारच्या व सर्व स्तरांवरील संवादासाठी भास असून, त्याला जाहिरात-संवाद क्षेत्रात प्राधान्याचे स्थान लाभले आहे. या मर्यादित उदाहरणांवरून करिअर क्षेत्राची व्यापकता व विस्तारलेल्या कक्षा स्पष्ट होतात.

हे सारे महत्त्वाचे पैलू लक्षात घेतल्यावर, विद्यार्थी व पालक या उभयतांनी करिअर नियोजनाचा विचार करून निर्णय घेताना व त्याची अंमलबजावणी करताना एक खूणगाठ बाळगायला हवी आणि ती म्हणजे, आपल्या मुख्य करिअर क्षेत्र वा विषयावर सारे लक्ष केंद्रित करून प्रयत्नशील असतानाच कमीतकमी एक तरी पर्यायी करिक्षेत्र लक्षात घ्यावे. याद्वारे दोन गोष्टी होतात. एक म्हणजे आगामी पाच वर्षांपर्यंत संबंधित विद्यार्थ्याच्या निवडलेल्या करिअर क्षेत्रात त्याच्या अपेक्षेनुसार वा सकारात्मक वाढ वा उलाढाल झाली नाही, तर त्याला नोकरी-रोजगाराचा पर्याय उपलब्ध असतो. याच अनुषंगाने महत्त्वपूर्ण ठरणारी दुसरी बाब म्हणजे, विविध अभ्यासक्रम असोत वा रोजगार संधी, बर्‍याचदा भरपूर प्रयत्न करूनही इच्छित साध्य, प्राप्त होत नाही व त्यावेळी एकमेव प्राधान्यावर प्रयत्न करूनही यश साध्य न झाल्यास येणारे अपयश व येणारे वैफल्य पाल्य व पालक या उभयतांसाठी मोठेच तापदायक ठरतात.यासाठी काही वानगीदाखल उदाहरणे करिअर नियोजन-व्यवस्थापनाच्या संदर्भात निश्चितपणे मार्गदर्शक ठरू शकतात.
 
उदाहरणार्थ, चार्टर्ड अकाउंटन्सीची तयारी व प्रयत्न करूनसुद्धा अपेक्षित यश साध्य न करणार्‍या उमेदवारांसाठी करसल्लागार हा पर्याय होऊ शकतो, तर कंपनी सेके्रटरी न होऊ शकणार्‍यांसाठी कायदा क्षेत्राचा, त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्रात एमबीबीएसला फिजिओथेरपी वा फार्मसी, लष्करी क्षेत्राला पोलीस विभाग, अभियांत्रिकी-तंत्रज्ञानाला प्रगत विज्ञान संशोधन असे पर्याय प्रत्यक्षात उपलब्ध आहेत. अधिकांश वेळा पाल्य आणि पालक केवळ एका वा एकमेव क्षेत्राचाच आग्रह वा अट्टहास धरतात. काही कारणाने ते उद्दिष्ट पूर्ण करू न शकणार्‍यांचा मोठा भ्रमनिरास होतो. या निर्णय प्रक्रियेत पालकांची भूमिका मोठी व महत्त्वाची असते आणि ती विद्यार्थी-पाल्यांच्या आकांक्षा आणि प्रयत्नांना पूरक असते.त्यामुळेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक अभ्यासक्रमांनंतरचे कौशल्य विकासविषयक व त्यापुढील पाया बनतो, तर या शिक्षण, कौशल्य व प्रशिक्षणाद्वारेच त्यांना आपले करिअर सुरू करून पुढे विकास साधता येतो. याकामी वाढती स्पर्धा व वर नमूद केल्याप्रमाणे उपलब्ध असणारे विविध पर्याय व करिअर क्षेत्राची व्याप्ती लक्षात घेऊन नियोजनपूर्वक प्रयत्न करून, त्याद्वारे यशस्वी होण्यासाठी पाल्यांच्या इच्छाशक्तीसह प्रयत्न व पालकांचे वेळेत उपलब्ध होणारे अनुभवी सल्ला वजा मार्गदर्शन या दोन्ही बाबी महत्त्वपूर्ण ठरतात.

दत्तात्रय आंबुलकर

(लेखक एचआर - व्यवस्थापन सल्लागार आहेत.)




अग्रलेख
जरुर वाचा
तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान मोदींची १४ वर्षे जुनी पोस्ट व्हायरल! नेमकं काय म्हटलं होत?

(PM Narendra Modi Old Post On Tahawwur Rana) २६/११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार तहव्वूर राणाला १० एप्रिल रोजी भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे.अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर आणि दीर्घ कायदेशीर लढाईनंतर भारताला राणाचे प्रत्यार्पण करण्यात यश आले आहे.आता राष्ट्रीय तपास यंत्रणांकडून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. न्यायालयाने तहव्वूर राणाला १८ दिवसांची एनआयए कोठडी सुनावली आहे. राणाच्या प्रत्यार्पणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे १४ वर्षे जुने ट्विट आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121