संतसंगतीत सापडतो सन्मार्ग...

    22-May-2024   
Total Views |
 santsangati


संतांच्या सहवासाने दुष्टांच्या दुर्वासनेची जागा हळूहळू सद्विचार, सद्वासना घेऊ लागतात. माणसाची सद्बुद्धी जागी होते. संताच्या संगतीच्या, सहवासाच्या प्रभावाने त्याचे मन आत्म्याविषयी विचार करू लागते. संतगुणांच्या अनुकरणाने त्याग, आत्मज्ञानाची ओढ लागते व संतांकडून जाणून घेण्याचा तो प्रयत्न करतो, ही मनाच्या परिवर्तनाची अवस्था विलक्षणरीत्या काम करते. साधकाच्या मनाच्या तळाशी असलेली दुष्टबुद्धी, दुर्वासना, पापबुद्धी नाहीशी होऊन तो सन्मार्गाकडे वळतो.

समर्थांनी मागील श्लोक क्रमांक १३४ मध्ये संतसज्जन योगिराणा याची लक्षणे सांगितली आणि ’यहीं लक्षणीं जाणिजे योगिराणा’ असे स्पष्ट केले. त्यात सांगितल्याप्रमाणे, योगिराणाच्या अंगी अभिमान, गर्व, त्याग नसतो. त्याला भौतिक, व्यावहारिक गोष्टींचे आकर्षण नसल्याने तो नेहमी विरक्त, वीतरागी असून त्याच्या ठिकाणी दया, क्षमा, शांती हे गुण पाहायला मिळतात. याचा अर्थ तो दैन्यवाणा म्हणजे हीन, दीन, लाचार, दुबळा असतो, असे नाही, हेही स्वामींनी त्या श्लोकात स्पष्ट केले आहे. हा योगिराणा अनेक दृष्टींनी सामर्थ्यवान असतो. समर्थांनी दासबोधात साधकाचे जे वर्णन केले आहे, ते योगिराणा याला लागू पडते. आत्मानुसंधान टिकवण्यासाठी साधकाला आपल्या जुन्या सवयी, पूर्वायुष्यातील आचारविचार गुंडाळून ठेवून आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी आवश्यक आचारविचारांचा अभ्यास करावा लागतो. त्यासाठी मानसिक सामर्थ्य असावे लागते.

साधक सत्संगतीत राहून आपल्या आध्यात्मिक शंकांचे, संभ्रमित विचारांचे निराकरण करून घेतो. तो शास्त्रप्रचिती, गुरुप्रचिती आणि मुख्यत्वेकरून आत्मप्रचिती यांचा अनुभव घेऊन त्यांचा सुरेख मेळ घालतो व त्यातून आपल्या आध्यात्मिक समस्यांची उत्तरे शोधतो. जन्मभर मनात साठलेले विकार, सवयी यांना मोडीत काढून सुखप्रद विरक्ती अनुभवतो. आसक्ती, मोह, दुःख, शोक या विकारांशी त्याला एखाद्या वीराप्रमाणे लढावे लागते. त्याचे स्वामींनी आवेशपूर्ण शब्दांत वर्णन केले आहे. मनाच्या श्लोकातील योगिराण्यालाही असेच लढावे लागते. स्वामींनी दासबोधात सांगितले आहे की,
 
 
मोहासी मधेंचि तोडिलें। दुःखासि दुःधडचि केलें।
शोकास खंडून सांडिलें। येकिकडे ॥
(दा. ५.९.४५)

 
त्याने मोहाला उभा चिरला. दुःखाचे दोन तुकडे केले. शोकाला तर तुकडे तुकडे करून फेकून दिले. हे वीरश्रीयुक्त वर्णन पुढे या साधकाने मानसिक विकार कशाप्रकारे मारून टाकले, याचे आणखी समर्थकृत वर्णन पाहा.
 
 
तिरस्कार तो चिरडिला। द्वेष खिरडूनि सांडिला।
विषाद अविषादे घातला। पायातळी॥ (५.९.४९)


संत सज्जन योगिराणा सतत अभ्यासाने, चिंतनाने, अनुसंधानाने आपली स्वरूपस्थिती अनुभवत असतात. त्यांच्या ठिकाणी देहाभिमान शिल्लक राहत नाही. अशा संत सज्जनांची संगत आपल्यासारख्या सामान्य माणसांना मिळाली तर आपले विकारी, विषादी, अहंकारी मन बदलून सद्विचारी होईल असे स्वामींना वाटते, त्यासाठी स्वामी मनाला संतसंगतीचा उपदेश करीत आहेत-

धरी रे मना संगती सज्जनाची।
जेणें वृत्ति हे पालटे दुर्जनाची।
बळे भाव सद्बुद्धि सन्मार्ग लागे।
महां क्रूर तो काळ विक्राळ भंगे ॥१३५॥

ज्या संत सज्जनांनी आपल्या बळाने दुर्गुण, विकार, वासना यांना जिंकले आहे अशा संतांची, सज्जनांची संगती धरायला स्वामी मनाला सांगत आहेत. संगतीचा बरा-वाईट परिणाम मानवी जीवनावर होत असतो. सत्संगतीने आपली विचार करण्याची पद्धत बदलून विचार सूक्ष्म होऊन वृत्तीपर्यंत पोहोचतात. दुर्जनांची वृत्ती पालटण्याचे सामर्थ्य संतांच्या सहवासात असते. शिक्षण, ग्रंथवाचन, कथा कीर्तन, श्रवण यामुळे विकार वासना तात्पुरत्या सावरल्या जातात. पण, कायमस्वरूपी विकार वासनांच्या विळख्यातून मनाला सोडवण्याचे काम पुस्तकी विद्या, कथाकीर्तने करू शकत नाहीत. परिस्थितीत फरक पडताच विकार वासना उद्भवून माणसाला आपल्या ताब्यात घेतात. हा नित्याचा अनुभव आहे. कारण, विकार वासना दुर्बुद्धी यांचे स्थान मनाच्या खालच्या थरापाशी असते. त्यांना सावरणे किंवा त्यांच्यावर ताबा मिळवणे कठीण कर्म वाटले तरी अशक्य नाही, यासाठी स्वामी सज्जनांच्या संगतीचा उपाय सुचवतात, संतसज्जनांच्या सहवासात राहिल्याने त्यांचे बोलणे, वागणे, आचारविचार त्यांचा विवेक त्यांची ईश्वराप्रति असलेली निष्ठा आणि त्यातून निर्माण झालेली समाधानी अवस्था यांचा अनुभव घेतल्यानंतर आपल्या दुर्गुणांची जाणीव होऊ लागते. ही जाणीव सूक्ष्म असल्याने ती मनाच्या खालच्या घरापर्यंत पोहोचते आणि परिवर्तन करण्यास सुरुवात करते. स्वामींच्या मते, संतसहवासाने दुर्जनांची विकार वासनायुक्त वृत्ती बदलली जाते.

 
सर्वसाधारणपणे बहुतांश प्रापंचिक माणसे वासनेच्या आहारी गेलेली असतात आणि विकारवशतेमुळे दुष्ट बुद्धीने वागत असतात. वासना विकार, अहंकार, स्वार्थ, देहबुद्धी यांचा पगडा सर्वसामान्य माणसाच्या जीवनावर पडलेला असतो आणि तेच आपले जीवनसर्वस्व आहे, अशी माणसाने समजूत करून घेतलेली असते. त्यामुळे कालांतराने ते अवगुण वृत्तीत उतरून त्याची तशी वृत्ती जाते. एकदा विकारांची वृत्ती बनली की वासनादी दुर्गुणांचे माणसाला काही वाटेनासे होते. विकार वासनांचे एकंदरीत दुष्परिणाम पाहता, ते त्या माणसाने नव्हे तर सार्‍या समाजाचे नुकसान करतात.संतांच्या सहवासाने दुष्टांच्या दुर्वासनेची जागा हळूहळू सद्विचार, सद्वासना घेऊ लागतात. माणसाची सद्बुद्धी जागी होते. संताच्या संगतीच्या, सहवासाच्या प्रभावाने त्याचे मन आत्म्याविषयी विचार करू लागते. संतगुणांच्या अनुकरणाने त्याग, आत्मज्ञानाची ओढ लागते व संतांकडून जाणून घेण्याचा तो प्रयत्न करतो, ही मनाच्या परिवर्तनाची अवस्था विलक्षणरीत्या काम करते.
 
साधकाच्या मनाच्या तळाशी असलेली दुष्टबुद्धी, दुर्वासना, पापबुद्धी नाहीशी होऊन तो सन्मार्गाकडे वळतो. थोडक्यात, संत सहवास साधकाच्या वृत्तीत बलपूर्वक परिवर्तन घडवून आणतो, असा बदल घडवून आणतो की, साधक तेथून पुन्हा मागे फिरत नाही. विकार, वासना, स्वार्थ मनात न उरल्याने त्याची भीती नाहीशी होते. त्याच्या ठिकाणी अपूर्व धैर्य उत्पन होले. तो मृत्यूचीही पर्वा करीत नाही. मृत्यूची त्याला भीती वाटत नाही. सत्संगतीने मानवी जीवनात विलक्षण क्रांती घडून येते, सत्संगती दुर्जनांची वृत्ती पालटून तेथे शुद्धबद्धी निर्माण करते, धैर्य प्राप्त करून देते, त्यांना सन्मार्गाला लावते. सत्संगतीच्या या कामाला सामाजिक मोलही आहे. काळ कितीही महाक्रूर भासला तरी सत्संगतीने तो नीतीधर्माने, श्रद्धेने वागणार्‍या साधकांचे अहित करू शकत नाही. येथे ‘सत्संगतीने हृदयपरिवर्तन’ या श्लोकगटाची समाप्ती होते. येथून पुढे स्वामी नवीन विचार घेऊन येत आहेत.



 

सुरेश जाखडी

दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये 'समर्थांच्या पाऊलखुणा' या सदराचे लेखक, 'एम.ए'पर्यंत शिक्षण, समर्थ वाङ्मयाचे अभ्यासक, रिझर्व्ह बँकेतून निवृत्त अधिकारी..