नाना पटोले नैराश्येत

    22-May-2024
Total Views | 85
Nana Patole
 
पराभव समोर दिसू लागला की, भल्याभल्यांचे संतुलन बिघडते आणि ते असंबद्ध बडबड करू लागतात. काँग्रेसचे महाराष्ट्रातील नेते त्याचे सर्वोत्तम उदाहरण. विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी उज्ज्वल निकम यांना देशद्रोही ठरवत कसाबचा केलेला उदोउदो काँग्रेसच्या अंगाशी आला असताना, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही योगी आदित्यनाथ यांच्याविषयी बेताल वक्तव्य करून देशवासीयांचा रोष ओढवून घेतला. “सीतामातेला पळवून नेण्यासाठी रावण भगवे कपडे घालून आला होता. आता योगी आदित्यनाथ भगवे कपडे घालून येतात,” अशी बडबड पटोलेंनी केली. लोकसभा निवडणूक निर्णायक टप्प्यावर असताना, पटोलेंनी योगींची तुलना थेट रावणाशी केल्याने विशेषतः उत्तर भारतात त्याचे तीव्र पडसाद उमटले. चार टप्पे शांततेत मतदान करणारा मतदार काँग्रेस आणि त्यांच्या हिंदूद्वेषाविरोधात उघडपणे बोलू लागला. त्यामुळे नाइलाजाने राहुलब्रिगेडला सारवासारव करावी लागली. याच काँग्रेसने ’भगवा दहशतवाद’ ही अस्तित्वात नसलेली संकल्पना मांडली. विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांतील कार्यकर्त्यांना देशविरोधी प्रकरणात गोवण्यात आले. खरे पाहता काँग्रेससह ‘इंडी’ आघाडीचा सनातन आणि भगव्या रंगाचा द्वेष लपून राहिलेला नाही. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या मुलांनी सनातन धर्म संपविण्याची भाषा करून हिंदू धर्मीयांना ललकारले. त्याला तितक्याच तीव्रतेने उत्तर मिळाल्यानंतर दोघांच्या पिताश्रींनी नमती भूमिका घेतली खरी; पण ती दाखवण्यापुरतीच होती. पटोले, वडेट्टीवारांसारखे काँग्रेसी नेते आजही हिंदू धर्माविषयी खुलेआमपणे गरळ ओकतात. वास्तविक, पाचव्या टप्प्यातील मतदानानंतर जनतेने आपल्याला नाकारल्याची जाणीव झाल्यामुळे काँग्रेसी पिलावळ बिथरलेली दिसते. शंभरचाही आकडा पार केला नाही, तर उरलेसुरले लोकप्रतिनिधी सोडून जाण्याची दाट शक्यता. त्यामुळेच नैराश्येपोटी राज्यासह केंद्रातील नेत्यांकडून अशी बेताल वक्तव्ये केली जात असावीत. मात्र, अशा विधानांनी ठराविक मतदार खूश होत असला, तरी बहुसंख्य हिंदू पेटून उठतो आणि हिंदू जर का इरेला पेटला, तर काँग्रेसचे दुकान कायमचे बंद होईल, हे निश्चित!

 
चोराच्या उलट्या बोंबा
 
अतिश्रीमंत बापाच्या मुलाने दारूच्या नशेत दोघांना कारखाली चिरडल्याची घटना पुण्यात घडली. त्यात आरोपीला कठोर शिक्षा होणे अपेक्षित असताना, १५ तासांच्या आत जामीन मिळाला. पण, देवेंद्र फडणवीस यांनी वेळीच हस्तक्षेप करीत गुन्हेगाराला कठोर शिक्षा होईल, याची खबरदारी घेतली. ‘फडणवीशी खाक्या’मुळे खडबडून जागे झालेल्या यंत्रणेने लागोलग सूत्रे हलवली आणि आरोपीच्या वडिलांना छत्रपती संभाजीनगरमधून ताब्यात घेतले. कर्तव्यदक्ष गृहमंत्री कसा असावा, हे त्याचे सर्वोत्तम उदाहरण. तरीही, विरोधकांनी निवडणुकीच्या निमित्ताने त्यात राजकारण शोधलेच. मात्र, दुसर्‍याकडे बोट दाखवताना, चार बोटे आपल्याकडे असतात, याचा मात्र विरोधकांना विसर पडला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आजवरच्या सत्ताकाळात नेहमीच गुन्हेगार आणि धनाढ्यांना पाठीशी घालण्याचे काम झाले. राज्यात कोरोनामुळे टाळेबंदी लागू असताना, वाधवान कुटुंबीयांना महाबळेश्वरला पिकनिकला जाण्यास मुभा देण्यात आली. एकीकडे, सर्वसामान्यांना गावची सीमाही ओलांडून दिली जात नसताना, हे अब्जाधीश मात्र चार जिल्ह्यांच्या सीमा ओलांडून विनाअडथळा सातार्‍याला पोहोचले, ही कोणाची कृपा म्हणावी? बारमालकांकडून १०० कोटींची खंडणी वसूल करणे असो वा अंबानींच्या बंगल्याबाहेर स्फोटके ठेवणार्‍याला पाठीशी घालणे, या आणि अशा आणखी असंख्य घटना सांगता येतील. याउलट, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाचाही मुलाहिजा न बाळगता तत्परतेने कारवाई केली. पुण्यातील घटनेनंतर त्यांनी तातडीने पोलीस आयुक्त कार्यालयात धाव घेतली, पोलिसांकडून आरोपीला वेगळी वागणूक मिळाली असेल, तर सीसीटीव्ही फुटेज तपासून बडतर्फ करण्याचे आश्वस्त केले. अतिरिक्त कलमे जोडण्याची सूचना करून कठोर शिक्षा होईल, याची तजवीज केली. नियमबाह्य बार आणि पबवर कारवाईची सूचना केली. त्यामुळेच आरोपीचे वडील, संबंधित बारमालक आणि व्यवस्थापकाला सत्र न्यायालयाने कोठडी सुनावली. समोरील व्यक्ती कितीही प्रभावशाली असली, तरी तिच्या दबावाला बळी न पडता, ठोस कारवाईचे धाडस फडणवीसांनी वेळोवेळी केले. पण, काँग्रेस-राष्ट्रवादी आणि त्यांच्या लाडक्या मित्राचा (उबाठा) पूर्वेतिहास तसा नाही. त्यामुळे त्यांनी चोराच्या उलट्या बोंबा बंद कराव्यात!

 
सुहास शेलार


अग्रलेख
जरुर वाचा
आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

आधी शरिया आणि नंतर संविधान! कट्टरपंथी हाफिजुल हसनने तोडले अकलेचे तारे, भाजप नेते म्हणाले हा तर लोकशाहीचा घोर...

constitution झारखंडचे मंत्री हाफिजुल हसन यांनी सोमवारी १४ एप्रिल २०२५ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी संविधानाहून अधिक शरीयाला सर्वाधिक प्राधान्य देण्याबाबत वक्तव्य केले. त्यांनी आधी कुराण धर्मग्रंथास आपल्या हृदयात ठेवावे आणि संविधानाला आपल्या हातात ठेवावे, असा वक्तव्य केले. हसन यांनी केलेल्या अशा विधानावरून भाजप नेत्याने हसनला आरसा दाखवला आहे. भारतीय लोकशाहीचा घोर अपमान असल्याचा दावा आता भाजपने केला आहे. ज्यांच्या हृदयात शरीयत आहे त्यांच्यासाठी पाकिस्तान बांग्लादेशची दारं खुली राहणार आहेत. भारत ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121