वाटचाल : २०४७ कडे की १९४७ कडे?

    22-May-2024
Total Views | 96
Narendra Modi
 
नरेंद्र दामोदरदास मोदी भारताला २०४७ कडे घेऊन जात आहेत, त्याऐवजी भारताला १९४७ कडे घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदी यांना आजच २०२४ मध्येच रोखले पाहिजे! भारतविरोधी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शक्तींनो, लागा कामाला! मायबाप भारतीय मतदाता, त्यांनी तर त्यांचं ध्येय ठरवलं आहे; तू काय ठरवलं आहेस बाबा? मायबाप भारतीय मतदाता, तुझ्या मातृभूमीला तू २०४७ कडे पुढेपुढे घेऊन जाणार आहेस की, १९४७ कडे मागेमागे?
 
अठराव्या लोकसभेसाठी मतदानाचे आणखी दोन टप्पे शिल्लक असले, तरी पाचव्या फेरीअखेर महाराष्ट्रातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. महाराष्ट्राचं महामानस मतदान यंत्रात सीलबंद झाले आहे. यावेळी प्रथमच मतदानाबाबत महाराष्ट्र थोडासा संभ्रमावस्थेत दिसला. आताआतापर्यंत आमचे साहेब पंतप्रधान होतील म्हणून नेहमी उत्साहित असणारा साहेबांचा चाहता वर्ग हा त्यांचेच अजितदादा राष्ट्रवादी घेऊन गेल्यामुळे काही प्रमाणात हताश असण्याची शक्यता नाकारता येत नाही? अवघ्या अडीच वर्षांत ‘बेस्ट सीएम’ म्हणून नावारूपाला आलेल्या उद्धव साहेबांची शिवसेना त्यांचेच एकनाथ शिंदे घेऊन गेल्यामुळे उद्धव साहेबांचेही काही चाहते हताश असण्याची शक्यता नाकारता येत नाही? सलग दोन दारुण पराभव पदरी आल्यामुळे आणि यावेळीही त्याची पुनरावृत्ती होईल की काय, या धास्तीने राहुलजींचे काही चाहतेही हताश असण्याची शक्यता नाकारता येत नाही? मनोज जरांगे-पाटील यांच्या मराठा आरक्षण आंदोलनाचं योगदानही नाकारता येत नाही?
 
कुठलाही लोकशाहीप्रधान देश तिथले सत्ताधारी-विरोधक आबाद किंवा बरबाद करू शकत नाहीत, तर तिथले मतदार त्यांना तशी संधी मतदानाद्वारे देत असतात. त्यामुळे मतदारांची जागरूक कर्तव्यनिष्ठा अधिक महत्त्वाची असते. भारतासाठी ही लोकसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. मतदारांनी दिलेल्या जनमत कौलातून भारताची वाटचाल पुढेपुढे २०४७ कडे होणार? की मागेमागे १९४७ कडे जाणार? याचा उलगडा आणखी दोन मतदान टप्पे पार पडल्यानंतर ४ जून रोजी होईल. जल्लोष कुठे आणि मातम कुठे हेही त्याच दिवशी दिसेल.नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारत जीवनाच्या सर्व क्षेत्रांत जो चौफेर प्रगती करतो आहे, जीवनाच्या सर्व क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी भारत जी आत्मविश्वासपूर्ण दमदार वाटचाल करतो आहे, तिचा धसका स्वतःला ‘आंतरराष्ट्रीय पोलीस’ म्हणवून घेणार्‍या तथाकथित जागतिक महासत्ता असलेल्या अमेरिकेनेही घेतला असेल तर नवल नाही. जागृत नवभारताची जागतिक घोडदौड रोखण्यासाठी, तिला खीळ घालण्यासाठी अमेरिका बहादूर प्रयत्नशील असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अमेरिका हा स्थलांतरितांचा असा देश आहे, जो फक्त आणि फक्त स्वतःचाच मित्र आहे.
 
भारताची ही विकासयात्रा रोखायची असेल, आताआता जागृत होऊ लागलेल्या भारतीयांना पुन्हा हर्षोत्साहित करायचे असेल, तर लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा दारुण पराभव झाला पाहिजे, ही अमेरिका बहादूरची आंतरिक इच्छा असू शकते. ‘मिनी अमेरिका’ असलेल्या कॅनडाची आंतरिक इच्छा अमेरिकी मनसुब्यापेक्षा वेगळी असू शकत नाही? ‘मिनी अमेरिका’ असलेल्या युरोपची आंतरिक इच्छा अमेरिकी मनसुब्यापेक्षा वेगळी असू शकत नाही! तसे नसते तर निवडणुकीच्या ऐन धामधुमीत अमेरिका, कॅनडा, जर्मनी हे देश अरविंद केजरीवाल यांच्यासाठी इतके हळवे झाले नसते. अमेरिका आणि युरोपस्थित जिहादी, खलिस्तानी हेही लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांचा पर्यायाने भारताचा पराभव व्हावा, यासाठी दंड थोपटून उभे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पाकिस्तान, तुर्कीये आणि इतर काही इस्लामिक देशांना यांना तर नरेंद्र मोदी, भारतीय जनता पक्ष, संघ परिवार, राष्ट्रभक्त भारतीय जनता सतत डोळ्यांत सलत असते. एकदा का नरेंद्र मोदींचा पराभव झाला की, मग ही मंडळी घाबरतील, मागं सरकतील आणि आपल्याला पुन्हा मोकळं रान मिळेल, यासाठी यांना मोदींचा पराभव हवाच असणार!
 
भारताचा सख्खा शेजारी आणि पक्का वैरी चीन तर नरेंद्र मोदी यांच्या पराभवासाठी कमालीचा उतावीळ. २०१४ पासून चीनची प्रचंड उपासमार होत आहे. कारण, २००४-२०१४ मधील भारत ही चीनसाठी सर्वात मोठी बाजारपेठ होती. तो कालावधी चीनसाठी आणि चीनच्या भारतीय हस्तकांसाठी सुगीचा, लुटीचा, भरभराटीचा कालावधी होता. युरोप आणि अमेरिका यांच्या अर्थव्यवस्थेचे तीन प्रमुख स्तंभ आहेत; शस्त्रास्त्र लॉबी, (औषध) फार्मा लॉबी आणि पेट्रो-डॉलर लॉबी. युरोप आणि अमेरिका यांच्या आंतरराष्ट्रीय धोरणांवर या तीन स्तंभांचा प्रचंड पगडा आहे, किंबहुना युरोप-अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार धोरण हेच तीन स्तंभ ठरवत असतात. कालपरवापर्यंत यांचा कायमस्वरूपी मोठा ग्राहक असलेला भारत २०१४ नंतर स्वतःच दुकानदार होण्यासाठी दमदार वाटचाल करतो आहे. मग जळफळाट तर होणारच ना? नरेंद्र मोदी यांचा पराभव व्हावा, असं यांनाही वाटत असेल तर त्यांना तसे वाटणे स्वाभाविकच की! मानवसेवेच्या नावाखाली धर्मांतरण; समाजसेवेच्या नावाखाली विकासकार्यात अवरोधन, फुटीरतेला प्रोत्साहन वगैरे विविध क्षेत्रांत राष्ट्रविरोधी, राष्ट्रद्रोही कार्यात गुंतलेल्या विदेशी धनपोषित मिशनरी, नक्षली, वामी, जिहादी एनजीओज, संघटना; परिवारवादी, क्षेत्रीय संकुचित विचारधारा जोपासणारे राजकीय पक्ष-संघटना आणि मीडियासह यांच्या विशाल देशीविदेशी इकोसिस्टिम्स यांचीही २०१४ पासून प्रचंड कोंडी होत आहे, उपासमार होत आहे. नरेंद्र मोदी यांचा पराभव यांनाही हवाच असणार ना!
 
प्रत्यक्ष निवडणूक लढवत असलेल्या ‘इंडी’ आघाडीसह सर्वच मोदी विरोधकांनी मोदींच्या ‘४०० पार’चा धसका घेतला आहे. या सगळ्यांना नरेंद्र मोदी यांचा पराभव हवा आहे आणि तोही २०२४ लोकसभा निवडणुकीतच हवा आहे. नरेंद्र दामोदरदास मोदी तिसर्‍यांदा अभूतपूर्व बहुमताने निवडून आले, तर भारत अधिकाधिक आत्मनिर्भर बनेल. अधिकाधिक स्वाभिमानी बनेल; भारतीय जनता अधिकाधिक राष्ट्रवादी, राष्ट्रहितवादी बनेल; आपल्या समृद्ध, सनातनी, सांस्कृतिक, आध्यात्मिक, वैज्ञानिक, वैद्यकीय विरासतींच्या अधिकाधिक जवळ जाईल; त्याचा रास्त अभिमान बाळगू लागेल, त्यावर गर्व करू लागेल आणि मग अशा जागृत नागरिकांना आणि त्यांच्या जागृत राष्ट्राला भौतिक सुखांची लालुच दाखवून विकत घेणे अधिकाधिक दुरापास्त होत जाईल. आपली दुकानदारी बंद होईल! हे सगळं आक्रित घडण्यापूर्वीच नरेंद्र मोदी यांचा लोकसभा निवडणूक २०२४ मध्येच पराभव झाला/केला पाहिजे, असं या सार्‍यांना वाटत असणारच ना?‘सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास और सबका प्रयास’ हा महामंत्र जगत नरेंद्र मोदी यांचा विशाल भारत सर्व जात-पंथ, भाषा-प्रांत, धर्म-संप्रदाय यांना कडेवर घेऊन २०४७ पर्यंत पहिल्या तीन जागतिक अर्थव्यवस्थांमध्ये स्थान पटकाविण्यासाठी जोरदार मुसंडी मारतो आहे. पूर्वसुरींनी खोदून ठेवलेले अनेक खड्डे बुजवत मोदी सरकारने गेल्या दहा वर्षांत त्याचे राष्ट्रीय विकास महामार्गात रूपांतर केले. नरेंद्र मोदींचा भारत सनातन भारताचा देदीप्यमान सुवर्णकाळ जागवत अंतराळात झेपावतो आहे.
 
मुस्लीम महिलांना सुरक्षित वैवाहिक जीवनाची हमी देणारा ’तिहेरी तलाक बंदी’ कायदा, जम्मू-काश्मीर-लडाख यांना मुख्य भारतीय राष्ट्रीय प्रवाहात सामील करून घेण्यासाठी ‘कलम ३७०’चे उच्चाटन, राष्ट्रचैतन्य जागविणारे भव्य श्रीराम मंदिर, कररचनेत सुसूत्रता आणण्यासाठी जीएसटी; भारतीय अर्थव्यवस्थेला गिळंकृत करू घातलेल्या भ्रष्टाचाराचा, काळ्या पैशांचा-नकली नोटांचा बीमोड करण्यासाठी नोटाबंदीसारखा धाडसी निर्णय; अफगाणिस्तान, पाकिस्तान, बांगलादेश येथून निर्वासित होऊन भारतमातेच्या आश्रयाला आलेल्या गैरइस्लामिक शरणार्थींसाठी ‘सीएए’; ‘कोविड’ काळात सारं जग हवालदिल झालेलं असताना नरेंद्र मोदी यांच्या भारतानं स्वतःसाठी आणि जगातल्या गरीब देशांसाठी पार पाडलेली कौतुकास्पद मानवतावादी कामगिरी; ‘जी २०’ चं यशस्वी आयोजन आणि अशा कितीतरी!भारताला रोखायचं असेल तर भारतीयांच्या नरेंद्र दामोदरदास मोदी नावाच्या दैवताला रोखलं पाहिजे, भारत भाग्य विधात्याला रोखलं पाहिजे, काहीही करून रोखलं पाहिजे, आजच रोखलं पाहिजे, २०२४ च्या लोकसभा निवडणुकीतच रोखलं पाहिजे. नरेंद्र दामोदरदास मोदी भारताला २०४७ कडे घेऊन जात आहेत, त्याऐवजी भारताला १९४७ कडे घेऊन जाण्यासाठी नरेंद्र मोदी यांना आजच २०२४ मध्येच रोखले पाहिजे! नरेंद्र मोदी यांना आजच रोखले तर भारत कोलमडून पडेल आणि मग भारताला १९४७ कडे घेऊन जाणे अधिक सोप्पं होईल! कुणाकडेही स्पष्ट बहुमत नसलेलं बिगर-भाजप कडबोळं काँग्रेसी खिचडी सरकार भारतात पुन्हा सत्तेवर आणता आलं तर अधिक सोयीचं होईल!
 
 भारतविरोधी राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय शक्तींनो, लागा कामाला! सनातनींमधले जातीभेद अधिक रुंद करा, त्यांना फुकटच्या रेवड्यांचे आमिष दाखवा, संपत्ती वितरणाचा धाक दाखवून संपत्तीनिर्मिकांना घाबरवा, हतोत्साहित करा, भारतीय औद्योगिक घराण्यांची बदनामी करा; नरेंद्र मोदी हा तमाम सनातनींचा मानबिंदू आहे, त्यांच्या स्वच्छ प्रतिमेवर आघात करा; सनातनींचा टक्का घटला की भारत आक्रसला म्हणून समजा, लागा कामाला! मायबाप भारतीय मतदाता, त्यांनी तर त्यांचं ध्येय ठरवलं आहे; तू काय ठरवलं आहेस बाबा? मायबाप भारतीय मतदाता, तुझ्या मातृभूमीला तू २०४७ कडे पुढेपुढे घेऊन जाणार आहेस की, १९४७ कडे मागेमागे? भारतीय मतदाता, तू घेतलेला निर्णय ४ जून रोजी सर्व जगाला कळेलच! तू २०४७ कडे जाणारा निर्णय घेतला असेल तरी धन्यवाद आणि १९४७ कडे जाणारा निर्णय घेतला असेल तरीही धन्यवाद! तू मतदारराजा आहेस, तू भारत भाग्यविधाता आहेस, कुणी कितीही प्रयत्न केले तरी तू चुकीचा निर्णय घेणार नाहीस, याची खात्री खुद्द अमेरिका बहादूरलाही आहे, तुझ्या भारतमातेला तर आहेच आहे, कारण तू नरेंद्र मोदी यांच्या जागृत झालेल्या जागृत भारताचा जागृत मतदार आहेस! शुभम् भवतु!

 
सोमनाथ देशमाने
 


 
अग्रलेख
जरुर वाचा
नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली तहव्वूर राणाचे अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पण, सत्तेतून बाहेर जाऊनही काँग्रेस घेतंय श्रेय?

Tahawwur Rana काँग्रेस नेतृत्वाखालील असणाऱ्या युपीए सरकारला सत्तेतून बाहेर जाऊन ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विरोधक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या एनडीए सरकारच्या प्रत्येक कामाचे श्रेय हे स्वत:घेताना दिसत आहेत. नरेंद्र मोदींच्या प्रयत्नातून युपीए सरकारच्या शासनकाळात २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाला अमेरिकेतून भारतात प्रत्यार्पित करण्यात आले आहे. नरेंद्र मोदी सरकारच्या नेतृत्वाखाली संबंधित दहशतवाद्याचे प्रत्यार्पित करण्यात आले. मात्र, याचे सर्व श्रेय हे काँग्रेस घेत असल्याच..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121