पुणे अपघातावरून अमृता फडणवीस संतापल्या; म्हणाल्या, "बाल न्याय मंडळाचा निकाल..."
22-May-2024
Total Views | 79
पुणे : पुणे अपघात प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे. बाल न्याय मंडळाचा निर्णय लाजीरवाणा असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांनी आपल्या 'X' अकाऊंटवर पोस्ट करत पुणे अपघात प्रकरणावर प्रतिक्रिया दिली.
My heartfelt condolences to families of Aneesh Awadhiya and Ashwini Kostha . The culprit #VedantAgarwal should be hard punished ! Shame on Juvenile Justice Board !#Pune
शनिवारी मध्यरात्री पुण्यात वेदांत अग्रवाल या अल्पवयीन मुलाने पोर्शे कारने धडक दिल्याने मोठा अपघात घडला. या अपघातात अनिस अवधिया आणि अश्विनी कोष्टा या दोन तरुणांचा मृत्यू झाला. त्यानंतर लवकरच बाल न्याय मंडळाने काही अटींसह वेदांत अग्रवालला जामीन मंजूर केला. यावर देशभरातून संताप व्यक्त होत आहे.
यावर आता अमृता फडणवीसांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. त्या म्हणाल्या की, "अनिस अवधिया आणि अश्विनी कोष्टा यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या संवेदना आहेत. दोषी वेदांत अग्रवालला कठोर शिक्षा झालीच पाहिजे. बाल न्याय मंडळाचा निर्णय अत्यंत लाजीरवाणा आहे," असे त्यांनी म्हटले आहे.
बाल न्याय मंडळाने "आरोपीला १५ दिवस ट्रॅफिक कॉन्स्टेबलसोबत चौकात उभं राहून मदत करावी लागेल. आरोपीला मानसोपचार तज्ज्ञांकडे जाऊन उपचार घ्यावे लागतील. त्याने भविष्यात कोणताही अपघात पाहिल्यास त्याला सर्वप्रथम अपघातग्रस्तांची मतद करावी लागेल आणि रस्ते अपघाताचे परिणाम आणि उपाय या विषयावर आरोपीला कमीत कमी ३०० शब्दांचा निबंध लिहावा लागेल," या अटींसह वेदांत अग्रवालला जामीन मंजूर केला होता.