जंजिरा अर्नाळा

    21-May-2024   
Total Views |

arnala
 
वसई किल्ल्याच्या व्हिडिओला तुमचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला त्यानंतर त्या किल्ल्यावर नजर ठेवणारा जंजिरा अर्नाळा, फारसा इतिहासात दखल न देणारा पण महत्वाची भूमिका बजावणारा असा आहे.
 
वसई म्हणजे राजधानी होती. त्याकाळची. तिच्यावर नजर ठेवण्यासाठी अर्नाळा बेटावर एक दुर्ग बांधण्यात आला. उत्तरेतून सतत परकीय आक्रमणं होत होती. त्यातच गुजरातचा सुलतान महमूद बेगडा याने हे अर्नाळा बेट १५३० मध्ये जिंकून घेतले. त्यानंतर बराच काळ पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेला हा दुर्ग १७३७ मध्ये पेशव्यांनी जिंकून घेतला. त्याची बांधणी पोर्तुगीज शैलीची होती तो पेशव्यांनी पुन्हा बांधून पूर्ण केला. आजचा दिवस म्हणूनच इतिहासात महत्वाचा आहे.
 
या बेटावर हा जंजिरा दुर्ग व्हावा ही इच्छा कुणाची हे माहिती नाही परंतु इथे वस्ती मात्र होती. अजूनही अर्नाळा बेटावर स्थानिक आगरी समाज राहतो. पावसाळुयात जेव्हा समुद्र उग्र स्वरूप धारण करतो तेव्हाही हे लोक बेट सोडत नाहीत. या किल्ल्याच नेमकं ठिकाण सांगायचे तर वैतरणा नदी समुद्राला मिळते त्या पट्ट्यात हा किल्ला आहे. चौकोनी आकारातला हा दुर्ग जवळपास १० मित्र उंचीची तटबंदी आहे. आज घडीला किल्ल्यात स्थानिकांची लोकसंख्या वाढल्याने तटबंदीनजीक वस्ती वाढलीये. जमिनीलगत नसल्याने फारशी वर्दळ गडावर पाहायला मिळत नाही. स्थानिक मच्छिमार पावसाळ्याव्यतिरित दुर्गाच्या बांधकामाचा उपयोग सर्रास मासे सुकवायला करतात. सुमारे दहा मीटर उंचीची अखंड व मजबूत तटबंदी या दुर्गाचे संरक्षण करते. किल्ल्याचे क्षेत्रफळ सुमारे ४ हेक्टर एवढे आहे. ९ बुरुज आहेत दुर्गाला. किल्ल्याला तीन दरवाजे असून मुख्य दरवाजा उत्तरेला आहे. या प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूंस दोन बुलंद बुरूज उभे आहेत. या दरवाजाच्या कमानीवर अत्यंत सुंदर नक्षीकाम असून दोन्ही बाजूंना सिंह व सोंडेत फुलांच्या माळा घेतलेले हत्ती यांच्या प्रतिमा कोरलेल्या आहेत.
 
सागरी दरवाजाजवळ एक शिलालेख कोरलेला आहे. 'बाजीराव अमात्य सुमती आज्ञापिले शंकर! पाश्चात्त्यासि वधूनि सिंधु उदरी बांधा त्वरे जंजिरा!!' असे त्यात लिहिले आहे. म्हणजे हा किल्ला पाशात्य लोकांच्या ताब्यात असल्याने त्यांचा वाढ करून जिंकून घ्यावा आणि त्याच जागी सिंधूच्या आत म्हणजे समुद्राच्या आत जंजिरा बांधावा. या शिलालेखावरून हा किल्ला पूर्णपणे बाजीराव पेशव्यांनीच बांधून घेतला असा तर्क करता येतो. मात्र यापूर्वीही किल्ल्याच्या हिकानी बेटावर फोर्टीफिकेशन होते. महमूद बेगडा किंवा मलिक तुघाण आणि पोर्तुगीज या बेटाचा वापर केवळ चौकी म्हणून करत होते. मात्र किल्ल्याकडे तोंड केल्यावरून उभे राहिल्यावर डाव्या हाताला थोड्या अंतरावर किल्ल्यापासून स्वतंत्र असा एक बुरुज आहे. ’हनुमंत बुरूज’ म्हणून ओळखला जाणारा भक्कम बुरूज आधीपासूनच होता असे म्हंटले जाते. हा बुरुज बराच पडझड झालेल्या अवस्थेत आहे. तर इतर किल्ल्याचे बांधकाम आधुनिक व ावे वाटते. या हनुमंत बुरुजावर चढण्यासाठी कोणताही मार्ग नाही. मात्र वडाच्या झाडांच्या पारंब्यांच्या आधारे या बुरुजावर चढता येते. वर गेल्यावर चक्क दोन मजले आहेत. तसेच पुरातन लहानसे शौचालय असावे असा कोनाडा या बुरुजावर आहे. या बुरुजाच्या ३ बाजूंनी समुद्र आहे! भरतीच्या वेळी लाटा इतका गोंधळ घालतात की बुरुजावर झोपणे अशक्य. पूर्ण चंद्राच्या प्रकाशात या बुरुजाला धडकणाऱ्या लाटा चांदी घेऊन याव्या तशा वरून भासतात.
  
किल्ल्याच्या आत त्र्यंबकेश्वराचे व भवानीमातेची मंदिरे आहेत. त्र्यंबकेश्वराच्या मंदिरासमोर एक अष्टकोनी तळे आहे. तळ्यात उतरायला दगडी पायऱ्या आहेत. तळ्यातले पाणी आतले पाणी हिरवे आणि अस्वच्छ असले तरी, तळ्याची बांधणी अत्यंक सुबक आहे. याशिवाय किल्ल्यात गोड पाण्याच्या पाच-सहा विहिरीसुद्धा आहेत. किल्ल्याच्या सभोवार तीन-चार हजार मुख्यतः कोळी लोकांची वस्ती असून काहींची शेतीही आहे. किल्ल्याच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर कालिका मातेचे मंदिर आहे. इतरही दुर्गातील बुरुज, यशवंत बुरुज, भवानी बुरुज, गणेश बुरुज इथे आहेत, वेताळ देव मंदिर शेजारी आहे. गणेश बुरुज हा या किल्ल्यातील महत्त्वाचा बुरूज आहे. या बुरुजाच्या खाली सैनिकांच्या राहण्याची सोय केलेली आहे. या गणेश बुरुजामध्येच एकापुढे एक असे तीन दरवाजे आहेत.
 
किल्ल्याच्या बांधकामासाठी आलेल्या खर्चाच्या नोंदी पेशवे दप्तरांत आहेत. परंतु टेहळणीशिवाय इतर कशासाठी या दुर्गाचा उपयोग करण्यात आलेला इतिहासाला ज्ञात नाही.

मृगा वर्तक

मुंबई विदयापीठातून पत्रकारिता व संज्ञापण विषयात पदव्युत्तर शिक्षण. इंदिरा गांधी मुक्त विद्यापीठातून मानसशास्त्र विषयात पदव्युत्तर शिक्षण. वसईतील विविध समाज व खाद्यसंस्कृतीचा अभ्यास. ललित व पर्यटन विषयावर लेखन करण्याची आवड. तसेच स्त्रीवादी विषयांवर लेखन करण्याची आवड.