चंद्रपुरातील वाढता मानव-वाघ संघर्ष आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील रोडावलेली वाघांची संख्या या दोन्ही गोष्टींना मध्यभागी ठेवून लवकरच वाघांचे स्थानांतरण पार पडणार आहे. या महिन्यामध्येच ताडोबातील एक वाघीण सह्याद्रीत स्थानांतरित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या दोन्ही भूप्रदेशातील व्याघ्र अधिवास आणि स्थानांतरणाच्या प्रक्रियेविषयी आढावा घेणारा हा लेख...
चंद्रपुरातील व्याघ्र संख्या
2022 सालच्या व्याघ्रगणनेप्रमाणे भारतात वाघांची संख्या 3 हजार, 167 एवढी आहे. महाराष्ट्रात ही संख्या 446 आहे. याच गणनेप्रमाणे चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या 208 ते 248 एवढी आहे. वनविभागाच्या मते, या वर्षाअखेरीस ही संख्या 300च्या जवळ असेल. राज्यातील वाघांची सर्वाधिक संख्या ही चंद्रपूर जिल्ह्यात दिसून येते. 625 चौ. किमी वनक्षेत्रात पसरलेला ताडोबा व्याघ्र प्रकल्प आणि जिल्ह्यातील प्रादेशिक वनक्षेत्र मिळून 2014 साली वाघांची संख्या 111 होती, जी 2020 साली वाढून 246 एवढी झाली. पूर्वी ताडोबामधील वाघांची संख्या प्रादेशिक वनक्षेत्रापेक्षा जास्त असायची. परंतु, 2017च्या पुढे यात बदल झाला. आता प्रादेशिक जंगलामधील वाघांची संख्या ताडोबापेक्षा वाढली आहे. संरक्षित जंगलापेक्षा त्याबाहेरील जंगलात वाघांची संख्या वाढत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये प्रामुख्याने मानव-वाघ संघर्ष पाहायला मिळतो. 2022 सालच्या व्याघ्र गणनेनुसार ब्रम्हपूरीमध्ये वाघांची संख्या 53 आहे. मात्र, ती याहूनही अधिक असण्याची शक्यता आहे.
चंद्रपुरातील उपाययोजना
चंद्रपुरमधील जंगलात, शेतात, कोळसा खाणीत, थर्मल पॉवर स्टेशनमध्ये, औद्योगिक आणि ग्रामीण भागांत वाघांनी आपले तात्पुरते अधिवास तयार केलेले दिसतात. त्यामुळे, येथील मानव-वाघ संघर्ष शिगेला पोहोचलेला दिसून येतो. गेल्या चार महिन्यांमध्ये एकट्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वाघाने दहा माणसांचे बळी घेतले आहेत. अशा परिस्थितीत वनविभागाकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये चंद्रपुरातील सीताराम पेठ येथे आभासी भिंतीचा प्रयोग करण्यात आला आहे. यामध्ये गावाभोवती सहा कॅङ्केरे वापरून संरक्षणभिंत तयार करण्यात आली आहे. वाघांचा वावर असलेल्या परिसरात कॅङ्केरा ट्रॅप लावून त्याच्या हालचालींचा मागोवा घेण्यात येत आहे आणि जनजागृतीदेखील सुरू आहे. एकाच वाघाकडून सातत्याने हल्ले होत असले, तर घटनेचे स्वरुप पाहून त्याला जेरबंद केले जात आहे. गस्त घालण्यासाठी गावातील युवकांच्या प्रायमरी रिस्पॉन्स टीम तयार करण्यात आल्या आहेत. गावकर्यांचे जंगलावर अवलंबून असणे कमी करण्यासाठी श्यामा प्रसाद मुखर्जीसह अनेक योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. अशा सर्व उपाययोजनांमधील सर्वात महत्त्वाची उपाययोजना म्हणजे वाघांचे स्थानांतरण. म्हणजेच, चंद्रपूरातील वाघ इतर वनप्रदेशात हलविण्यात येत आहेत. याअतंर्गत ताडोबामधील दोन आणि गडचिरोलीमधील एका वाघाचे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरण करण्यात आले आहे. राज्यात आता प्रथमच एका वेगळ्या भूप्रदेशामधून दुसर्या भूप्रदेशामध्ये वाघांचे स्थानांतरण करण्यात येणार आहे. याअंतर्गत, ताडोबामधील आठ वाघांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थानांतरित करण्यात येणार आहे.
स्थानांतरण म्हणजे काय ?
एखाद्या भूप्रदेशातून वन्यजीवाची एखादी प्रजात नष्ट झाल्यास किंवा तिची संख्या कमी झाल्यास दुसर्या प्रदेशामधून त्या प्रजातीचे स्थानांतरण करण्यात येते. मात्र, यासाठी काटेकोरपणे अभ्यास करावा लागतो. वन्यजीव संशोधक आणि जीवशास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासानंतरच स्थानांतरणाचा निर्णय घेण्यात येतो. स्थानांतरणाची ही प्रक्रिया किचकट असते. त्यासाठी निरनिराळ्या विभागाच्या परवानग्या घेणे आवश्यक असते. स्थानांतरणामध्ये काही वेळा उलट परिस्थितीदेखील असते. एखाद्या प्रदेशात वन्यजीव प्रजातींची संख्या अधिक असेल आणि त्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष निर्माण झाला असेल, तर अशा परिस्थितीतदेखील संघर्ष निर्माण झालेल्या प्रदेशातून प्राण्यांचे स्थानांतरण करण्यात येते. 2008 सालापासून भारतात वाघांचे स्थानांतरण सुरू आहे. 2008 मध्ये सरिस्का व्याघ्र प्रकल्पात आणि 2009 मध्ये पन्ना व्याघ्र प्रकल्पात वाघांचे यशस्वी स्थानांतरण झाले आहे. तर, ओडिशातील सातकोसिया व्याघ्र प्रकल्पामध्ये पार पडलेला देशातील पहिल्या आंतर-राज्य व्याघ्र स्थानांतरणाचा प्रकल्प अयशस्वी झाल्याचेही उदाहरण आहे.
सह्याद्रीतील व्याघ्र प्रदेश
सह्याद्री-कोकण वन्यजीव भ्रमणमार्गाचा विस्तार हा महाराष्ट्रातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पापासून दक्षिणेकडे कर्नाटकातील काली व्याघ्र प्रकल्पापर्यंत आहे. 10 हजार, 785 चौ. किमी क्षेत्रावर या भ्रमणमार्गाचा विस्तार पाहायला मिळतो. राज्याच्या अनुषंगाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, राधानगरी वन्यजीव अभयारण्य आणि तिलारी संवर्धन राखीव हे तीन भूप्रदेशातील वाघांचे प्रजनन आणि स्थलांतराच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत. 2010 मध्ये चांदोली राष्ट्रीय उद्यान आणि कोयना वन्यजीव अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे 317.670 चौ. किमी आणि कोयना वन्यजीव अभयारण्याचे 423.550 चौ. किमी असे मिळून हे क्षेत्र सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आले आहे. सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला दक्षिणकडे जोडणारे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी वन्यजीव अभयारण्य हा सह्याद्री कोकण वन्यजीव भ्रमणमार्गातील महत्त्वाचा दुवा आहे. चांदोली राष्ट्रीय उद्यान ते राधानगरी वन्यजीव अभयारण्यादरम्यान असलेला महत्त्वपूर्ण व्याघ्र भ्रमणमार्गाला जोडण्यासाठी तीन कॉन्झर्वेशन रिझर्व्हची निर्मिती करण्यात आली आहे. यामध्ये, कोल्हापूरमधील विशालगड (9 हजार, 324 हे्नटर), पन्हाळा (7 हजार, 291 हे्नटर), गगनबावडा (10 हजार, 548 हे्नटर) कॉन्झर्वेशन रिझर्व्हचा समावेश आहे. राधानगरी अभयारण्य ते तिलारी दरम्यानचा व्याघ्र भ्रमणमार्ग संरक्षित करण्यासाठी आजरा-भुदरगड (24 हजार, 663 हे्नटर), चंदगड (22 हजार, 523 हे्नटर), आंबोली-दोडामार्ग (5 हजार, 692 हे्नटर) आणि तिलारी कॉन्झर्वेशन रिझर्व्ह आरक्षित करण्यात आले आहे. तिलारी परिसर हा महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या तीन राज्यांच्या सीमेवर स्थित आहे. गोव्यातील म्हादाई अभयारण्य, कर्नाटकातील भिमगड अभयारण्य आणि तिलारी राखीव संवर्धन ही तीन क्षेत्रे वन्यप्राण्यांच्या दृष्टीने विशेषत: वाघांच्या भ्रमणमार्गाकरिता अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
सह्याद्रीतील वाघांची संख्या
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा वाघांच्या दृष्टीने संरक्षित करण्यात आलेला प्रदेश असला, तरी येथील वाघांच्या अधिवासाकडे बर्याचवेळा संशयाच्या नजरेने पाहिले जाते. सद्य परिस्थितीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात एका नवजात नर वाघाचे अस्तित्व आहे. तर, वनविभाग आणि ‘वाईल्डलाईफ कॉन्झर्वेशन ट्रस्ट’ने (डब्लूसीटी) केलेल्या अभ्यासाअंतर्गत त्यांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्प ते तिलारीदरम्यानच्या भ्रमणमार्गामध्ये दहा वाघांचे अस्तित्व आढळले आहे. प्रामुख्याने राधानगरी ते तिलारी या पट्ट्यामधील भ्रमणमार्गामध्ये वाघांचा अधिवास आहे. हा अधिवास कायमस्वरुपी आहे. तिलारी प्रदेशात तर वाघांचे प्रजनन सुरू आहे. मात्र, वाघांसाठी राखीव केलेल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात कायमस्वरुपी वाघांचा अधिवास नसल्याने स्थानांतरणाचा अवलंब केला जाणार आहे. ताडोबातील आठ वाघ पुढील पाच ते सहा वर्षांमध्ये क्रमाक्रमाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात सोडले जाणार आहेत. यासाठीची तयारी सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने पूर्ण केली आहे. या महिन्यात पार पडणार्या पहिल्या टप्प्यामध्ये ताडोबातील वाघिणीला सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात हलविले जाईल. स्थानांतरणाच्या पहिल्या टप्प्यासाठी आवश्यक असलेल्या ताडोबातील वाघिणीची निवडप्रक्रिया पूर्ण झाली आहे. सध्या व्याघ्र प्रकल्पात वावरणार्या नर वाघासोबत प्रजनन करण्याच्या दृष्टीने स्थानांतरणाच्या या पहिल्या टप्प्यात वाघिणीची निवड करण्यात आली आहे.
स्थानांतरण कसे पार पडेल?
स्थानांतरणासाठी निवडलेल्या ताडोबातील वाघिणीला सर्वप्रथम बेशुद्ध करून पिंजराबंद करण्यात येईल. त्याचवेळी तिच्यावर ‘सॅटलाईट कॉलर’ बसविण्यात येईल. ती शुद्धीवर आल्यावर ताडोबा ते चांदोली राष्ट्रीय उद्यानापर्यंतचा प्रवास सुरू होईल. या प्रवासात तिच्यावर पशुवैद्यांची नजर असेल. लांबचा प्रवास असल्याने प्रवासादरम्यान थांबे घेऊन तिला पाणी आणि खाणे देण्यात येईल. चांदोली राष्ट्रीय उद्यानात ही वाघीण दाखल झाल्यावर तिला थेट जंगलात सोडण्यात येणार नाही. प्रवासातील शीण घालविण्याबरोबरच या नव्या भूप्रदेशात तिला स्थिरावू देण्यासाठी वाघिणीला पिजराबंद अधिवासात ठेवण्यात येईल. हा कालावधी दहा ते वीस दिवसांचा असण्याची शक्यता आहे. सह्याद्रीतील धुवाधार कोसळणार्या पावसाचा अंदाज घेऊन हा कालावधी वाढूदेखील शकतो. चांदोली राष्ट्रीय उद्यानाच्या गाभा क्षेत्रातील सोनुर्ली वनपरिक्षेत्रामध्ये काहीशे हेक्टरवर पसरलेला पिंजरा तयार करण्यात आला आहे. या पिंजर्यात वाघीण स्थिर झाल्यावर तिला जंगलात सोडण्यात येईल. यावेळी, तिच्या गळ्यात बसविण्यात आलेल्या ‘सॅटलाईट कॉलर’च्या माध्यमातून तिच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येईल.
'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'विशेष प्रतिनिधी' (पर्यावरण/ वन्यजीव) म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या तीन वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. पर्यावरण आणि वन्यजीव क्षेत्राची आवड असल्याने त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. महाराष्ट्रातील महत्वाच्या वन्यजीव संवर्धन आणि संशोधन कार्यात सहभाग. भारतीय शास्त्रीय नृत्यशैलीतील 'कथ्थक' नृत्यात विशेष प्राविण्य. देशातील महत्वाच्या शास्त्रीय नृत्य महोत्सव आणि नृत्यविषयक टेलिव्हिजन मालिकांमध्ये सादरीकरण.