बनू रक्षक जैवसंपदेचे

    20-May-2024   
Total Views |
जगभरातील 196 देशांमध्ये ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन’ साजरा केला जातो. या निमित्तानेच सह्याद्रीतील विपूल जैवविविधता, तिथे आढळणार्‍या प्रजातींचे महत्त्व यावर प्रकाश टाकणारा हा लेख दि. 22 मे रोजीच्या ‘आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिना’ निमित्त...



international biodiversity day

जैवविविधतेची खाण म्हणजेच ’बायोडाव्हर्सिटी हॉटस्पॉट’ म्हणून ओळखली जाणारी सह्याद्रीची पर्वतरांग. भारताच्या गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ या पाच राज्यांमधून जाणारी ही पर्वतरांग 1 हजार, 600 किमी इतकी लांब पसरली आहे. महाराष्ट्रामध्ये यापैकी 650 किलोमीटरचा भाग येत असून या पर्वतरांगांना ‘युनेस्को’ या जागतिक संघटनेने जागतिक वारसास्थळ म्हणून ही घोषित केले आहे. पश्चिम घाटासारख्या जैवसंपन्न प्रदेशामध्ये विपूल प्रमाणात जैवविविधता आढळते. त्याङ्कुळेच, या प्रदेशाला बायोडायव्हर्सिटी हॉटस्पॉट म्हटले जाते. जगभरात असणार्‍या 26 बायोडाव्हर्सिटी हॉटस्पॉट्सपैकी पश्चिम घाट हा हे एक हॉटस्पॉट आहे.

पश्चिम घाट हा भारताच्या केवळ पाच टक्के भूभागावर पसरलेला असला तरीही भारतातील सर्वाधिक उंच वाढणार्‍या झाडांच्या 15 हजार प्रजातींपैकी सुमारे चार हजार प्रजाती म्हणजेच 27 टक्के पश्चिम घाटामध्ये आढळतात. त्याचबरोबर, प्रदेशनिष्ठ प्रजातींपैकी सह्याद्रीमध्ये जवळजवळ 84 उभयचर प्राण्यांच्या प्रजाती, 16 पक्ष्यांच्या प्रजाती, सस्तन प्राण्यांच्या सात प्रजाती, तसेच 1 हजार, 600 प्रकारची फुलझाडे आढळतात. या प्रजाती सह्याद्रीपुरत्या प्रदेशनिष्ठ असून, त्या जगात इतरत्र कोठेही आढळत नाहीत. उदाहरणार्थ, कोंढाणा रॅट - ही संकटग्रस्त उंदराची प्रजात जगभरात केवळ महाराष्ट्रातील कोंढाणा (आत्ताचा सिंहगड), राजगड आणि रायरेश्वराच्या पठारावरच आढळते. तसेच, बेडूक, सरडे आणि सापांच्या काही प्रजातींचा यामध्ये समावेश आहे. प्रदेशनिष्ठ प्रजात एकदा त्या प्रदेशातून नष्ट झाली, म्हणजे तिला जगाला कायमचे मूकावे लागणार. त्याङ्कुळेच, या प्रजातींचे संवर्धन अत्यंत महत्त्वाचे आहे.

जैवविविधतेतील या घटकांना अनेक धोकेही आहेत. देशभरात अनेक ठिकाणी सध्या एक्झॉटिक प्रजाती, म्हणजेच परदेशी वनस्पतींची लागवड केलेली पाहायला मिळते. या परदेशी वनस्पतींचा स्थानिक जैवविविधतेला कोणताही फायदा होताना दिसत नाही. याउलट, झाला तर तोटाच होण्याची शक्यता अधिक असते. अनेकदा या परदेशी वनस्पती आक्रमक होऊन स्थानिक प्रजातींना धोका निर्माण करतात. त्यामूळेच, स्थानिक प्रजातींना वाचवून ती परिसंस्था संरक्षित करणे, गरजेचे ठरत आहे.


त्याचबरोबर, यंदा भारतातच नव्हे, तर जगभरात सहन करावी लागत असलेली तापमानवाढ, हवामान बदल या प्रश्नांकडे लक्ष दिले असता, त्यामूळेही जैवविविधतेला धोका पोहोचण्याची अनेक कारणे निर्माण होतात. या सर्व प्रश्नांकडे बारकाईने लक्ष देऊन कृतिशील पाऊले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. त्यामूळेच, जागतिक पातळीवर ठरविलेल्या बायोडाव्हर्सिटी फ्रेमवर्क किंवा एक्शन प्लॅनमध्ये सहभागी होऊन आपणही जैवविविधता संरक्षण आणि संवर्धनासाठी प्रयत्नशील असायला हवे. सह्याद्रीमध्ये आढळणार्‍या केवळ प्रदेशनिष्ठ प्रजातीच नाही, तर इतरही प्रजातींचे संवर्धन जैवविवधेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. तरच, सह्याद्रीतील ही जैवसंपदा राखून हे जागतिक वारसास्थळ अबाधितपणे समृद्ध ठेवता येईल.

‘Be a Part of the Plan’
पृथ्वीवर आढळणार्‍या विविध प्रकारच्या परिसंस्थांमध्ये विपूल जैवविविधता आढळते. परिसंस्थेमध्ये असणार्‍या सस्तन प्राण्यांचा गट, पक्षी, सरपटणारे जीव, झाडांच्या विविध प्रजाती इत्यादी सर्व घटक एकत्रितपणे जैवविविधता म्हणवत असून, ते परिसंस्थेत महत्त्वाची भूमिका बजावतात. या प्रत्येक घटकाचे आपले असे महत्त्व असल्यामूळे यापैकी एकजरी घटक अनुपस्थित असला किंवा नामशेष झाला तरी संपूर्ण परिसंस्थेला त्याचा धक्का पोहोचतो. यामूळेच, जैवविविधतेतील प्रत्येक घटक कसा महत्त्वाचा आहे, हे अधोरेखित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिवस दरवर्षी साजरा केला जातो. दि. 22 मे रोजी हा दिवस साजरा केला जात असून 196 देशांमध्ये हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. यंदाच्या आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिनाची ‘Be a Part of the Plan’ अशी संकल्पना ठेवण्यात आली आहे. या संकल्पनेमधून 2023 रोजी जागतिक पातळीवर निश्चित करण्यात आलेल्या ग्लोबल बायोडायव्हर्सिटी फ्रेमवर्क किंवा बायोडाव्हर्सिटी प्लॅनच्या आधारावर प्रत्यक्ष कृती करून या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सामान्यांनी या मोहिमेमध्ये सहभागी होऊन जैवविविधतेचे संरक्षण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. 


समृद्धी ढमाले

लेखिका रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेच्या पदवीधर आहेत. सध्या दै. 'मुंबई तरुण भारत'मध्ये पर्यावरण प्रतिनिधी म्हणून कार्यरत. यापूर्वी विविध 'ह्यूमन इंटरेस्ट स्टोरीज', मुलाखती आणि इतर वार्तांकनासाठी काम. आवाज आणि सूत्रसंचालन या क्षेत्रांमध्ये काम आणि विशेष आवड.