नाशिक : राज्यात १३ मतदारसंघांमध्ये लोकसभेच्या अंतिम टप्प्यातील मतदान सुरु असून नाशिकचे अपक्ष उमेदवार शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शांतिगिरी महाराजांनी ईव्हीएम मशीनला हार घातल्यामुळे त्यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतिगिरी महाराजांनी त्र्यंबकेश्वरमधील कला , वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मतदान केंद्रावर मतदान केलं. मात्र, त्यानंतर त्यांनी ईव्हीएम मशीनला हार घातला. या घटनेचा व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल झाला आहे. हे आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून याप्रकरणी शांतिगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शांतिगिरी महाराजांनी याविषयी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, "आपण मशीनला नाही तर मशीनच्या कव्हरवर लावलेल्या भारतमातेच्या फोटोला हार घातला आहे. आमची नियम तोडण्याची कोणतीही भावना नव्हती. सर्वांमध्ये देव आहे, अशी आमची स्पष्ट भावना आहे. आम्ही मतदानाच्या मशीनला हार घातलेला नसून तिथे असलेल्या पुठ्ठ्याला हार घातला आहे. त्यांना चुकीचं वाटलं तर त्यांनी तेव्हाच हार काढून ठेवायला हवा होता. आम्ही हे मुद्दाम केलेलं नाही," अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.